भाग ३
दहा दिवसाचे विपश्यना शिबिर
ध्यानधारणेच्या वैज्ञानिक प्रयोगांच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास विपश्यना या ध्यानप्रकारातील फोलपणा सहजपणे लक्षात येईल. विपश्यना हा ध्यानप्रकार बौद्ध काळात विकसित झालेला असून मनाला घडवणारा संस्कार म्हणून बौद्ध धर्माचे अभ्यासक त्याकडे बघतात. डोळे उघडे ठेवून मन:पूर्तीचा ध्यानानुभव घेण्याचाच हा प्रकार त्या काळी होता. आधुनिक युगातील ध्यानोत्सुकांना सुलभरित्या उपासना करता यावी यासाठी मूळ विपश्यना पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत. सत्यनारायण गोएंका हे म्यानमार येथील गृहस्थ भारत व इतर देशात गेली अनेक वर्षे या आधुनिक विपश्यना पद्धतीचा प्रचार करत आहेत.
विपश्यनेची प्राथमिक माहिती, ध्यान करण्याची पद्धत, ध्यान करताना पाळावे लागणारे नियम, ध्यानानुभव येण्यासाठी कराव्या लागणार्या शारीरिक हालचाली व विपश्यनेची जुजबी तात्विक मीमांसा यासाठी ठिकठिकाणी दहा दिवसाचे विपश्यना शिबिरं घेतली जातात. अशा शिबिरात अनेक ध्यानोत्सुक वेगवेगळे उद्धेश साध्य करण्यासाठी येतात. काहींना वैफल्यातून बाहेर पडायचे असते; काहींना ताण तणावापासून मुक्ती हवी असते; विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त गुण मिळवण्याची कला हस्तगत करून घ्यायची असते; पहिलटकरणीला आपले मूल आइन्स्टाइनच्या तोडीची हवी असते; काहीना दैनंदिन जीवनातील तोचतोचपणा टाळायचा असतो; काहींचा 'हवा पालट' हा उद्देश असतो. काही पालक मुलगा वांड आहे म्हणून (जबरदस्तीने) मुलांना शिबिरात पाठवत असतात. छोट्टा मोठ्या मानसिक रोगांच्या उपचाराच्या अपेक्षेने काही येतात. ध्यानानुभवाकडे सर्व समस्यांचे रामबाण उपाय म्हणून बघितले जाते. तुमच्या उद्देशाची येथे चर्चा केली जात नाही. तुम्ही येथे का आलात याची विचारपूस केला जात नाही. शिबिराशेवटी उद्देश सफल झाला की नाही हेही विचारले जात नाही. कारण विपश्यना हा चर्चेचा वा अभ्यासाचा विषय (वाणीविलास वा बुद्धीविलास) नसून प्रत्यक्ष अनुभवानीच तो कळतो असा दावा विपश्यनेचे प्रचारक करत असतात. पहिल्या शिबिरात अपेक्षित फळ मिळाले नाही म्हणून दुसऱ्या-तिसऱ्यांदा येणाऱ्यांची संख्या पण कमी नसते.
विपश्यनेच्या शिबिर काळात संपूर्ण मौन (आर्य मौन!) पाळण्याची अट असून 10 दिवसातील 9 दिवस हा नियम अत्यंत काटेकोरपणाने पाळला जातो. सकाळच्या 4 पासून ते रात्रीच्या 10 पर्यंतच्या या दिनचर्येत, सकाळ संध्याकाळ मर्यादित नाष्टा, दुपारचे फक्त एक वेळ जेवण (रात्री काही नाही!), दिवसातून 8-10 तास (सक्तीची!) साधना (प्रात:साधना, सामूहिक साधना, सायंसाधना, निर्देशानुसार साधना) 2 तास व्हिडीओवरून गोएंकाचे प्रवचन, असा भरगच्च कार्यक्रम असतो. पहिले तीन दिवस (आनपान) श्वासप्रकाराकडे लक्ष वेधण्याचा सराव शिकवला/ केला जातो. नंतर मात्र विपश्यना हा प्रकार शिकवला जातो. यात श्वासामुळे शरीरावर होणाऱ्या संवेदनाची (सूक्ष्म व स्थूल संवेदन!) नोंद घेण्याच्या अनुभवावर भर दिला जातो. प्रत्येक ध्यानधारक आपापल्या कुवतीप्रमाणे हा अनुभव घेऊन शेवटच्या दिवशी मौन सोडतो (हुश्श....) व इतराशी अल्प परिचय (मंगल मैत्री!) करून घेत घरी निघुन जातो. या प्राथमिक परिचयात्मक शिबिरानंतर रोज सकाळी व संध्याकाळी किमान एक तास डोळे मिटून मौन राखून हे ध्यान करावे अशी अपेक्षा असते. आठवड्यातून एखादा तास सामूहिक ध्यान करावे, रोज उठताना व झोपताना 5-10 मिनिटे ध्यान करावे अशी अपेक्षा पण बाळगली जोते. विपश्यनेच्या अनुभवांच्या विस्तारासाठी 20, 30, 60, 90 दिवसांचे शिबिराचे आयोजन पण केले जाते.
गोएंकाच्या व्हिडीओ प्रवचन
गोएंकाच्या व्हिडीओ प्रवचनात मन, सुख - दु:ख, पुनर्जन्म, जन्म जन्मांतरीचे संचित, त्रयस्थपणे जगाकडे बघण्याची दृष्टी, सर्व दिवस सुखात (!), अनिच्छा (अनिच्च) असणे अशा अनेक विषयावर भाष्य केले जाते. बुद्धीपेक्षा अनुभवावर आधारित ज्ञान (अनुभूती), सत्य (आर्यसत्य!), जाणीव, संवेदना, प्रतिक्रिया इत्यादी विषयावर गोएंका भाष्य करत असतात. कुदरत का करिष्मा, विश्व का बिधान, निसर्ग का नियम, 121 चित्त (!), 52 चित्तवृत्ती (!), शील, समाधी, प्रज्ञा या प्रकारच्या बौद्ध संकल्पनांची पेरणी त्यांच्या प्रवचनात असते. मन व शरीर, संवेदनांचा मनोविकाराशी असलेला संबंध, दु:खाचे मूळ कारण इत्यादींचा शोध त्यांच्या भाषणातून घेतला जातो. अनित्यबोध, दु:खचक्र, अनुभूती इत्यादी संकल्पनांचे महत्व काय आहे हे सांगितले जाते. यातील कित्येक शब्द पहिल्यांदाच आपल्या कानावर पडत असतात. प्रश्न विचारायची सोय नाही. अळीमिळी गप्प चिळी!. अर्धवट उपाशी पोटी असताना ऐकलेले तत्वज्ञान कितपत भावते ते फक्त गोएंकाच सांगू शकतील.
उदास वातावरण
निसर्गरम्य ठिकाणी विपश्यना शिबिर भरत असले तरी या संपूर्ण दहा दिवसांच्या शिबिराच्या कालावधीत एक प्रकारचा उदासपणा जाणवत असतो. वेगवेगळ्या ठिकाणातीन उद्योग-व्यवसायातून, संस्कारातून (संखारा), वयोगटातून आलेला समूह किती उत्साहवर्धक असायला हवा. येथे मात्र सर्वच उलटे. मौन व्रतामुळे बोलायला बंदी, देवाण घेवाण नाही, साधक बाधक चर्चा नाही, खेळी मेळीचे वातावरण नाही, हसणे खिदळणे नाही. शिवाय अपेक्षित अनुभव मिळेल का याची खात्री नाही. मिळत असल्यास कधी मिळेल याची निर्दिष्ट कालमर्यादा नाही. जसे जमेल तसे, जमेल तितके, मिळेल तसे हा सर्व व्यवहार असतो. सर्व काही दु:खमय आहे, दु:खाचे निवारण (आमच्याच) ध्यानामुळे होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीकडे निरिच्छेने बघावे. असे काही सांगत असल्यामुळे उत्साहवर्धक असे काही वाटत नाही. सगळीकडे सुतकी चेहरे. विशेषकरून 18 ते 30 वयोगटातील जीवनात नुकतेच पदार्पण करणाऱ्या युवक - युवतींना हे सर्व अशा पद्धतीने सांगितलेले ऐकताना त्यांची कीव कराविशी वाटते. अजून त्यांना जीवनानुभव नाही, दु:खाचा स्पर्श नाही, जीवनाकडे बघण्याची त्यांची दृष्टी सकारात्मक असते. अशा वेळी काही काल्पनिक धोक्याची माहिती सांगून भीतीचे बुजगावणे उभे करणे, त्यांच्या अदम्य उत्साहावर टिप्पणी करणे कितपत योग्य आहे, हा विचार मनात आल्याशिवाय राहणार नाही. खरे पाहता या वयात नैराश्येच्या भावनेपेक्षा परिस्थितीत बदल करण्यासाठी झोकून घ्यायला हवे. राग यायला हवा. यामुळेच प्रत्यक्ष कृती होऊ शकते. परिस्थिती बदलता येते. संघर्षात्मक पवित्रा घेता येते. कातडीबचाऊ धोरणातून काहीही साध्य होणार नाही. विपश्यना मात्र असले काही होऊ देणार नाही.
विपश्यनेचा अनुभव घेत असताना आपण अजूनही चिकित्सक दृष्ट्या विचार करू शकत नाही हे जाणवते. साधारण जीवन जगणारी सामान्य माणसं थोडीफार चौकस झालेली आहेत हे खरे. परंतु विषयाच्या खोलात शिरून चिकित्सकपणे विषय समजून घेण्याची तसदी त्यांच्याकडून घेतली जात नाही. अगदी उच्चशिक्षित पदवीधरसुद्धा यास अपवाद नाहीत. या कच्चेपणाचा फायदा घेण्यासाठी लोकं टपून बसलेली असतात. आधुनिक जाहिरात तंत्र वापरून हे लुच्चे संघ संस्था स्थापून सामान्याना फसवत असतात. ही एका प्रकारे आधुनिक बुवाबाजीचीच आवृत्ती आहे. यांच्या तथाकथित पांडित्यावर, लालित्यपूर्ण भाषणबाजीवर सामान्य माणसं मुग्ध होतात. यांच्या पांडित्याची छाप पडते. ऐटबाज नखऱ्यात समाजशास्त्र, अणुविज्ञान, क्वांटम मेकॅनिक्स, जीवविज्ञान, मानसशास्त्र, इत्यादी विषयांची जुजबी, प्राथमिक माहितीद्वारे समोरछ्याना मंत्रमुग्ध करून जाळ्यात पकडण्याची कला त्यांना अवगत झालेली असते. उतारे, वचने, अभंग, संदर्भ, मोठमोठ्या पुस्तकांची, (पाश्चात्य) लेखकांची नावे, श्रोत्यांच्या अंगावर धबधब्यासारखे फेकण्यासाठी लागणारी स्मरणशक्ती त्यांच्याकडे असते. स्मरणशक्ती व वक्तृत्वकला म्हणजेच शास्त्रीय दृष्टिकोन व संपूर्ण चिंतन अशी समजूत श्रोते करून घेत असतात. त्यामुळे गोएंकांचे भाषण (तेही 10 दिवस) ऐकून सर्वजण भारावलेल्या अवस्थेत घरी जातात. जाताना चकचकित मुखपृष्ठ असलेली पुस्तकं, कॅसेट्स् विकत घेतात. कॅसेट्सची विक्रमी विक्री होते.
अंधश्रद्ध नसलेल्याचा आभास
विपश्यना शिबिरांचे आयोजन सूत्रबद्ध असते. आधुनिक सुविधा वापरल्या जातात. यात भाग घेणारेही सुशिक्षित मध्यमवर्गीय अशा असतात. मंत्र -तंत्र, ताईत-गंडे - दोरे, रुद्राक्ष, नवस- जपजाप्य, पूजा - भजन, सत्संग, अशा गोष्टी नाहीत. कर्मकांडे नाहीत. कर्मठपणा नाही. त्यामुळे आम्ही अंधश्रद्ध नाही व सर्व काही शास्त्रीय दृष्ट्या ठीक आहे असा भास निर्माण केला जातो. ताण-तणाव, वैफल्य, नैराश्य, अगतिकता इत्यादीमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे किंवा पुढे मागे कधीतरी बिघडल्यास त्यावर विपश्यना हा एकमेव उपाय आहे अशी समजूत करून दिली जाते, ठसवली जाते. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या याचा प्रत्यय येतो की नाही याचा विचारच केला जात नाही. सामाजीक दृष्ट्या याचे काय परिणाम होऊ शकतात याची पर्वा नाही. व्यक्तीकेंद्रित विचार ठसवल्यामुळे समाजाशी बांधिलकी, समाजाचे देणे-घेणे याचा येथे कुठेही संबंध येत नाही. व्यक्तीच्याच सुख-दुखाना, दुखाच्या विश्लेषणाला, दुख परिहाराच्या एकतर्फी मार्गाला महत्व दिल्यामुळे समाजाचा घटक म्हणून परिस्थिती, अन्याय, विषमता, शोषणावस्था इत्यादीमुळे काही दुखे आपल्यावर लादल्या जात असतात, याची कल्पनाच या शिबिराच्या संयोजकांना हिरीरीने भाग घेणाऱ्याना वा अशा गोष्टींचे उधोउधो करणाऱ्यांना नसते. परिस्थिती शरणता हाच एकमेव मार्ग असल्यासारखे वाटू लागते.
मुळात माणूस हा सामाजिक प्राणी आहे. कितीही प्रयत्न केले तरी तो एकटा कधीच जगू शकत नाही. आणि काही काळ जगला तरी त्याला मनुष्याचे गुणधर्म प्राप्त होऊ शकत नाहीत. परस्पर सहकार्य, जिज्ञासा, विचार, कल्पकता, उत्सुकता, धाडस, धोका पत्करणे, राग, लोभ इत्यादींना पर्याय नाही. फाषाण युगापासून आजपर्यंतच्या इतिहासाची पाने उलटल्यास धाडस, शौर्य, धैर्य, मर्यादित धोका पत्करणे, उद्दिष्टांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, जीव ओतून काम करणे, कार्यसिद्धीसाठी झोकून काम करत राहणे, यांना पर्याय नाही असेच दिसेल. विचारासाठी मेंदू, व विचारविनिमयासाठी भाषा, असताना कपोल कल्पित व्यक्तिगत अनुभूतीसाठी या गोष्टींचा त्याग करणे मानवाला शोभणारे नाहीत. जीवनानुभव घेणे जीवनानुभवांचा लाभ घेणे, त्यातून शिकत जाणे, त्यांची चिकित्सा करणे व त्यातून प्रगती करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून चिकित्सा केल्यास विपश्यनेचे अजब तत्वज्ञान व त्याचे तंत्र अशा गोष्टींना उपकारक नाही असे वाटते.
शेवटी आपण आपला वेळ कशा प्रकारे घालवावा हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सामाजिक प्राणी म्हणून प्रत्येकावर काही जवाबदार्या आहेत. काही कर्तव्य आहेत. यांची जाण ठेऊनच विपश्यनेच्या आहारी जावे की नाही याचा निर्णय घेणे योग्य ठरेल. माकडाबरोबर झाडाखाली बसून फळे खावीत. परंतु माकडांच्या सारखे झाडावर चढून एका फांदीवरून दुसर्या फांदीवर उड्या मारण्याच्या फंदात पडू नये हेच शहाणपणाचे ठरेल.
समाप्त
लेखक इंग्रजी थॉट ऍण्ड ऍक्शन नियतकालिकाचे संपादक, एआरडीई मधून निवृत्त शास्त्रज्ञ.
Comments
तर्कविसंगत
थोडा काळ (पाटी कोरी ठेऊन) समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन दहा दिवस काय सांगतात ते ‘ट्राय’ करणे याला स्वत:ची बुद्धी गहाण ठेवणे म्हणतात हे आज समजले. असो. बडगा म्हणजे नेमका काय त्रास होतो, नुकसान होते हे लेखात स्पष्ट व्हायला हवे.
एका ध्येयाकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात असे म्हणण्यात काय तार्किक विसंगती आहे? मुंबईहून दिल्लीला जायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. निरनिराळे ट्रॅव्हल एजंट आपापली जाहिरात करत असतात. काहीजण फसवे असतात. काहीजणांची सेवा समाधानकारक नसते. काहीजणांशी आपले चांगले जमते, प्रवास चांगला होतो. ध्यानाचा उद्देश स्पष्ट नाही असे इथे म्हणले आहे. जगण्याचा उद्देश स्पष्ट असतो का? मार्गाचा पत्ता असतो का? उद्या काय होणार आहे ते माहीत असते का? आयुष्यात काय काय प्लॅनिंग लोक करतात, तसे तेवढे जगू शकतील, निश्चित प्रयत्नांनंतर साध्य करतीलच असे ठामपणे सांगता येते का? आयुष्य म्हणजे सर्व काही बेभरवशाचा व्यवहार, संदिग्ध, धूसर! अनुभवांचे वर्णन शब्दांत पकडता येत नाही असे म्हणण्यात काय आक्षेपार्ह आहे? गोड, लाल, सुंदर म्हणजे नेमके काय? हे शब्दांत पकडता येते का? लेखकाला कधी वर्णन करता येणार नाही असा आनंद झालेलाच नाही का? असे दु:ख वाटलेलेच नाही का? सगळे काही शब्दांत पकडता आलेच पाहिजे का? जे शब्दांत सांगता येणार नाही ते सगळे खोटे का? आणि सगळ्यांनी एकाच प्रकारचे ध्यान सांगितले पाहिजे, तरच ते तर्कसंगत, असे का? सगळ्यांनी एकसारखाच विचार केला पाहिजे. एकाच वेळी उठले पाहिजे, एकाच वेळी झोपले पाहिजे. एकाच मापाचे कपडे घातले पाहिजेत. एकाच चवीचे जेवण घेतले पाहिजे. तरच आपले जगणे वागणे तर्कसंगत. विविधता म्हणजे तार्किक विसंगती!
वास्तवापासून दूर म्हणजे काय? वास्तव जग म्हणजे काय? कुठलेही जग हे कुणाच्यातरी कल्पनेतीलच जग असणार. कुणाच्याच कल्पनेत नसणारे जग असू शकेल काय? आणि जरी असले, तरी त्याचे वर्णन करणे शक्य आहे काय? ज्याक्षणी वर्णन सुरू होते, त्याक्षणी ते वर्णनकर्त्याच्या कल्पनेतील जग बनते.
एकाग्रता म्हणजे नेमके काय याचा अर्थबोध होत नसेल, तर मानसिक जडण-घडण म्हणजे नेमके काय याचाही अर्थबोध व्हायला नको. इतरांपेक्षा ध्यानोपासकांच्यात एकाग्रता जास्त असते असा एखादा दावा (असलाच तर) घेऊन त्याला फोल ठरवून ध्यान कसे बिनकामाचे आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. हे म्हणजे असे म्हणण्यासारखे आहे – अमन आणि चमन हे दोन भाऊ आहेत. अमन नियमित व्यायाम करतो, चमन करत नाही. पण चमन हा अमनपेक्षा अधिक निरोगी आहे, शक्तिशाली आहे. व्यायामाने शक्ती वाढते, आरोग्य राहते हा दावा फोल आहे. मुळात आरोग्य म्हणजे नेमके काय याचा अर्थबोध होत नाही. या गोष्टी शारीरिक जडण घडणीवर जास्त करुन अवलंबून असतात.
ध्यान करणारी व्यक्ती डोळे मिटते की डोळे उघडे ठेवते याला काही अर्थ उरत नसेल असे समजू. ध्यानाला अर्थ उरतो असा यातून अर्थ घ्यायचा का? विद्यार्थी शारीरिक व मानसिकरित्या तादात्म्य पावतो म्हणजे नेमके काय? त्याचे काय कशाशी तादात्म्य पावते? त्यालाच एकाग्रता म्हणायचे, ध्यान म्हणायचे, की अजून एखादा “वैज्ञानिक” शब्द शोधायचा? जी गोष्ट नाकारायची, तीच गोष्ट दृष्टांत म्हणून द्यायचा हा प्रकार आहे.
ध्यान धारणा करणाऱ्या व्यक्ती जास्त समस्याग्रस्त असतात, चिंताग्रस्त असतात, मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या असतात असे म्हणून काय सिद्ध करायचे आहे? ध्यान केल्यामुळे चिंताग्रस्त होतात; की चिंताग्रस्त असतात, म्हणून ध्यानाकडे वळतात? ध्यान केले म्हणून व्यसनी होतात, की व्यसनातून सुटायचे असते म्हणून ध्यान करण्याचा प्रयत्न करतात? ध्यान केले म्हणून समस्याग्रस्त होतात, की समस्याग्रस्त असतात म्हणून ध्यानाकडे वळतात?
यात कुठेतरी असे गृहीत धरलेले आहे की ध्यानधारणांविषयी अवास्तव दावे म्हणजेच ध्यानधारणा, आणि म्हणून ध्यानधारणाच त्याज्य. काही ध्यानोपासक ध्यानधारणा मधूनच सोडून देत असतील, म्हणून ध्यानधारणा चुकीची ठरते का? मानसशास्त्रज्ञांच्या मते ध्यान ही एक प्रकारची भान निर्माण करणारी प्रक्रिया असेल, तर अशा प्रकारची प्रक्रिया, म्हणजेच ध्यान, त्याज्य ठरावे का? भान निर्माण झाल्याने दु:ख कमी होत असेल, तर ध्यान केल्याने सुख मिळते असे म्हणू शकतो का? मानसिक आजारावर ध्यानधारणेमुळे आजार कमी होण्याऐवजी बळावण्याची शक्यता जास्त असते हे बरोबर आहे. पाठदुखी गंभीर असेल, तर व्यायामाने बरी होण्याऐवजी बळाऊ शकते, तसेच आहे हे. पाय मुरगळलेला असताना पळायची सक्ती केली जाऊ नये हा कॊमन सेन्स आहे. त्यासाठी पळणे शरीराला/ प्रकृतीला घातक आहे असा निष्कर्ष निघू शकत नाही. फिटनेस नसणाऱ्यावर व्यायामाची सक्ती केल्यास गंभीर इजा होऊ शकते. यावरुन आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायामाचा कितपत उपयोग होतो याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. कारण व्यायाम करणारांचे आरोग्य आणि एरवी व्यायाम न करता निरोगी राहिलेल्यांचे आरोग्य सारखेच असण्याचा संभव जास्त; असे म्हटल्यासारखे आहे.
व्यायामशाळेत न जाता निरोगी राहता येते, आणि आजारी माणसाने व्यायाम केल्यास दुखापत होते, यावरुन व्यायामाचा फोलपणा सहजपणे लक्षात येईल.
सामाजिक दृष्ट्या विपश्यनेचे काय परिणाम होतात असे लेखकाला वाटते? यावर काही वैज्ञानिक संशोधन झाले असल्यास त्याचा दाखला दिलेला नाही. एक सामाजिक परिणाम ऐकण्यात आहे. तिहार तुरुंगात झालेल्या सुधारणा. विपश्यनेतील/ ध्यानधारणेतील “व्यक्तीकेंद्रीत” विचार ठसवल्यामुळे समाजाच्या बांधिलकीमध्ये, समाजाच्या देण्याघेण्यामध्ये काही अडचणी आल्याचे कुठे दिसून आलेले नाही. उलट, या तत्त्वज्ञान/ दर्शनावर आधारीत बौद्ध संघाने समाजाची सेवाच केलेली आहे. सगळ्या समस्यांचा आमच्याकडे (आणि आमच्याकडेच) रामबाण उपाय आहे असे मी तरी विपश्यना शिबिरात कधी ऐकले नाही. असा रामबाण उपाय असू शकत नाही, असेच ते सांगत असताना मी ऐकले आहे. स्वत:ला बदला, जग बदलेल हा कॉमन सेन्सशी सुसंगत विचार मी त्यांच्याकडून ऐकलेला आहे. आपल्या प्रतिक्रियांना योग्य, विधायक वळण देण्याचे शिक्षण घेतल्याने समाजाला कसा काय अपाय होऊ शकतो? परिस्थिती शरणता तर दूर दूरवर फिरकत नाही. जबरदस्त आशावाद, आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द निर्माण करणारी ही पद्धत आहे. दहा दिवस शिबिर अटेण्ड करुन बुद्धांच्या बॅचेस बाहेर पडल्या तरच विपश्यनेला अर्थ आहे अशी काहीशी लेखकाची समजूत दिसते.
विपश्यना शिबिरात काय होते याचा गोषवारा लेखकाने दिलेला आहे. ते वाचून एवढेच समजले की लेखकाने एकतर स्वत: शिबिराचा अनुभव घेतलेला नसावा, किंवा घेतला असेल, तर दहा दिवस वाया घालवले आहेत. विपश्यना आयुष्यभर मौनव्रत बाळगायला सांगत नाही. “साधकबाधक” चर्चांचे व्यसन असणाऱ्या लोकांना थोडा काळ गप्प राहून समोरचा काय सांगत आहे ते ऐकून घेणे, त्यावर विचार करणे, थोडा वेळ काय करायला सांगतात ते (पाटी कोरी ठेऊन) करुन बघणे ही गोष्ट किती अवघड असते हे यातून समजले. तिथले वातावरण उदास असते, उत्साहवर्धक नसते असे लेखक म्हणतात, हे “उदास” पणाचे वर्णन “वास्तव” म्हणायचे की लेखकाचा स्वत:चा (कपोलकल्पित) अनुभव म्हणायचा?
विपश्यनेचे तत्वज्ञान व त्याचे तंत्र अजब असून उपकारक नाही असे म्हणण्यासाठी विपश्यना वरती दिलेल्या उपकारक सामाजिक गोष्टींच्या विरुद्ध आहे असे दाखवावे लागेल. माझ्या मते विपश्यना (तसेच इतर अनेक ध्यानधारणा पद्धती) जगाला सामोरे जायला शिकवतात. या वरती दिलेल्या (पर्याय नसलेल्या) गोष्टी नीट करायला शिकवतात. विपश्यनेत असे कुठेही सांगत नाहीत की सगळे धंदे सोडून आयुष्यभर मांडी घालून डोळे मिटून (आर्य)मौन धारण करुन (कपोलकल्पित) अनुभूतीची वाट बघत बसा.
याला आधुनिक बुवाबाजी का म्हणायचे हेही लेखात स्पष्ट केलेले नाही. बुवाबाजीमध्ये शोषण हा अपरिहार्य घटक असला पाहिजे. अशी तथाकथित बुवाबाजी करुन कुणाचे आणि कसे शोषण होते हेही स्पष्ट होत नाही. दहा दिवस तुम्हाला फुकट रहायला, जेवायला मिळते. यात कसले शोषण आले आहे? कॅसेट्सची विक्रमी विक्री होते म्हणे. किंमती अव्वाच्या सव्वा असतात, की विकत घ्यायची सक्ती होते? आणि अशा कॅसेट्समध्ये कोणते समाजविघातक संदेश असतात? कत्तलखान्यांची इकॉनॉमी चालावी म्हणून रेड मीट कसे आरोग्यदायी आहे याची “वैज्ञानिक” संशोधने प्रसिद्ध केली जातात. जाहिरातींमधून पद्धतशीररीत्या सिगारेट, दारु ग्लॅमरस बनवली जाते. या शोषणाविषयी कुणी वैज्ञानिक चिकित्सेने लेख लिहिताना दिसत नाही.
शेवटी आपण कसा विचार करायचा हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सामाजिक प्राणी म्हणून प्रत्येकावर काही जवाबदाऱ्या आहेत. काही कर्तव्ये आहेत. वैज्ञानिक चिकित्सेच्या आवरणाखाली काही चांगल्या, समाजाला उपकारक असणाऱ्या उपक्रमांना विरोध करायचा, अभ्यास न करता पूर्वग्रहित दृष्टीने वरवरची माहिती गोळा करून प्रतिक्रिया द्यायची; किंबहुना प्रतिक्रिया मनामध्ये ठरवूनच एखादी गोष्ट पहायची, आणि ज्यांना विशेष माहिती नसेल त्यांचा बुद्धिभेद होईल असे पहायचे हे सामाजिक जवाबदारीचे लक्षण नाही.
इथे मी विपश्यनेचा पुरस्कार करतो आहे असे वाटू शकेल. मी तसा अवश्य करतो. पण तोच एक चांगला मार्ग आहे असे माझे आजिबात म्हणणे नाही. तो अपकारक आहे, असे कुणाचे म्हणणे असेल, तर ते तर्कदुष्ट आहे. एका चांगल्या मार्गापासून लोकांना परावृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे, तो चिकित्सेच्या आवरणाखाली केला गेलेला आहे. असा प्रयत्न अंधश्रद्धा पसरवणे जितके निंद्य आहे, तितकाच निंद्य आहे. लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत असा परिचय वाचल्यामुळे याचा जास्तच खेद वाटतो.
मी प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो असे लेखात छाती ठोकपणे म्हणायला संकोच
विपश्यना शिबिरात काय होते याचा गोषवारा लेखकाने दिलेला आहे. ते वाचून एवढेच समजले की लेखकाने एकतर स्वत: शिबिराचा अनुभव घेतलेला नसावा, किंवा घेतला असेल, तर ...
....वर्णनावरून लेखकानी अनुभव घेतला असावा असे मानायला भरपूर वाव आहे. मात्र त्यांनी तो अनुभव मी घेतला असे लिहायचे मुद्दाम टाळले असावे असे दिसते. कारण त्यांच्या विचारसरणीच्या व त्यांना मानणाऱ्या लोकांना जर हे लेखक महाशय विपस्यना केंद्रात जाऊन आलो असे कळले तर ते त्यांच्या अनुयायांना ते खपणार नाही असे असावे. आम्हाला जाऊ नका असे ठासून सांगणारा लेख लिहिलात पण आपण मात्र जाऊन का आलात असा आक्षेप घेतला जाऊ नये असा यामागचा विचार असू शकतो. अन्यथा लेखकाला मी प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो असे लेखात छाती ठोकपणे म्हणायला संकोच वाटायला नको होता...
अरेरे
प्रत्येक परिच्छेद पूर्वग्रह्दूषित दिसतोय.
शिवाय 'कमी' पण 'फुकट' अशा जेवणमूळे डिप्रेशन आलेले दिसतय!
... त्यात तसे आश्चर्य काहीच नाही. १०-१० वेळ विपश्यना शिबिराला हजेरी लावून आलेले ( 'विपश्यना केलेले' म्हननार नाही),
अनेक 'कोरडे पाषाण' जगात आहेत!
'ज्या' व्यक्तीच्या अनुभवांवरुन हा लेखनप्रपंच केला आहे, तिला 'त्या' १० दिवसातले ७-८ क्षण जरी अतर्मुख होता आले असते,
तरी इतका 'कडवट्पणा' शिलक राहिला नसता.
त्रिवार 'अरेरे!'
कितपत शास्त्रीय?
या लेखातील खालील वाक्ये पहा:
- या वैज्ञानिक प्रयोगाचे निष्कर्ष स्वीकारणे ध्यानोपासकांना जड वाटू लागले. परंतु आणखी काही प्रयोग केल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा काढलेल्या निष्कर्षांनाच पुष्टी मिळाली.
- दुसर्या एका प्रयोगात तीन गट निवडण्यात आले.
- यासंबंधी एक प्रयोग करताना रोज 15-16 तास नियमितपणे ध्यान करणारे व फक्त 2 तास ध्यान करणारे असे दोन गट निवडण्यात आले.
- याबाबतीतही एक प्रयोग करण्यात आला.
एखाद्या गोष्टीची शास्रीय चिकित्सा करताना अशा प्रकारचे मोघम संदर्भ का दिले असावेत? त्यामुळे ते प्रयोग कोणी, कुठे, कधी केले हे वाचकांस पडताळून पाहता येत नाही, आणि पर्यायाने लेखकावरच 'श्रद्धा' ठेवावी लागते.
जे मोजता येत नाही ते आस्तित्वातच नसते असा ठाम समज असेल तर त्यास 'सायंटीफिक टनेल व्हिजन' म्हणतात याची आठवण झाली.