संकीर्ण

उजवी वाद्ये, डावी वाद्ये

धनंजय

जे डावखुरे जन्मतात, त्यांचे आयुष्य खडतर असते. कित्येक सोयी आणि अवजारे उजव्या हातात सहज वापरता यावी अशी सोयीची असतात. हे कामाच्या अवजारांचे. विरंगुळ्यासाठी वाद्ये वापरावीत तर तिथेही डावखुर्‍यांची गैरसोय होते. पण यातही गंमत आहे.

उजवीकडचा तबला आणि डावीकडचा डग्गा कोणाला डावखुऱ्याचे शत्रू वाटावेत तर ते तितके नाहीत. तबला डाव्या हाताशी घेतला तर तसाच वाजतो, आणि डग्गा उजव्या हातानेही तितकेच नादमय "ढुम्म" म्हणेल. बाजाच्या पेटीचेही तेच. भाता उजव्या हाताने हलवा किंवा डाव्या हाताने, आणि स्वराच्या पट्ट्या दुसऱ्या हाताने दाबा. पेटी गाईल. पण सर्व काही ठीक नाही. डाव्या हाताला मंद्र सप्तकातले स्वर अधिक सोयिस्कर, तर उजव्या हाताला तार सप्तकातले.
उजवी-डावीकडे समान दिसणाऱ्या पट्ट्या असलेला पियानो डावा-उजवा समभाव दाखवत असेलसे वाटते का? पण तसे नाही. डावीकडे मंद्रातिमंद्र सप्तके असतात, आणि साधारणपणे डावा हात ताल-लहरा देतो. उजवा हात ताना गातो, मध्य आणि तार सप्तकांमध्ये हे बहुधा गोड वाटते.

बरे तर बरे - बाजाची पेटी, पियानो, यांच्यातल्या पट्ट्यांखालचे तार-मंद्र सुर बदलता येत नाहीत. दिलरुबा, व्हायोलिन यांच्या तर फक्त चार-एक वाजवायच्या तारा आसतात. (तरफ-जवारीच्या तारा एकदा जुळवल्या की पुरे - ते उजव्या डाव्या वादकांना सारखेच.) त्या खुंट्यांना बांधणे आणि सोडवणे हे तर प्रत्येक वादकाला जमतेच. त्या उजवीकडच्या डावीकडे बांधता येतील ना! पण इथेही चालत नाही. दिलरुबा-सरोद-सतारींच्या खुंट्या वाद्याच्या एकीकडे असतात. उजव्या हाताचे काम डाव्याने केले तर या खुंट्या मध्येमध्ये येतील. मग आपले व्हायोलिन बरे म्हणूया का? कारण त्याच्या खुंट्या एका टोकाला असतात. गजाला (’बो’ला) उजवे डावे काही नसते. तारांचा तार-मंद्र क्रम बदलला की झाले का व्हायोलिन डावखुरे? नाही होत! नेहमीच्या वाजवणार्‍यांच्या सर्वात डावीकडे मंद्र सप्तकाची तार असते, ती जाड असते, आणि वाद्यावर तिचा ताण खूप अधिक असतो. म्हणून वाद्याच्या पोकळीमध्ये त्या बाजूला एक दणकट लाकडी फासळी असते. दुसरीकडे तार सप्तकातली तार वाद्याला तितका ताण देत नाही. म्हणून आतमध्ये एक नाजूक उभी कांडी पुरेशी असते. म्हणजे वरून दिसायला उजवे-डावे सारखे असले, तरी हे वाद्य आडून भेदभाव करते. काही प्रसिद्ध डावखुरे गिटारवादक आपले वेगळे गिटार कारागिराकडून बनवून घेतात, ते उगाच नाही .

घशातल्या कंठमण्यामधल्या दोन स्वरतंत्री (व्होकल कॉर्ड) मात्र दोन्ही सारख्याच असतात. गाणारा माहिर असेल असेल तर त्याचा उजवा हात धरणारा कोणी नाही की डावा हात धरणारा कोणी नाही!

महागडं पेन

अंजली

२-३ महिन्यापूर्वी मी माझ्या एका सहकार्‍याकडे शाईचा पेन बघितला होता. कुतूहल वाटले! अजूनही शाईचा पेन वापरतात म्हणून. त्यांच्याशी बोलत असतांना मी त्यांना तसे बोलूनही दाखवले. त्यांना खूप बरे वाटले. ऑफिस कामाची चर्चा पुढे चालू होती. बोलता बोलता त्यांचा तो जाड भासणारा शाईचा पेन खाली पडला. पेन खाली पडल्यावर मलाच वाईट वाटले. शाळेच्या दिवसांची आठवण ताजी झाली. शाईचा पेन- शाई, नीब! किती सांभाळून वापरावे लागायचे. नीब तुटली की नवी नीब! नव्या नीबने अक्षर निट येत नसे. दाब देवून अक्षर काढावं लागत असे. शाईची बॉटल.बहूतेक सगळ्यांनकडे कॅम्लिनचीच शाई असायची. शाईचा रंगपण निळाच. रोज शाळेत जायच्या आधी पेनात शाई निट भरायची. त्यात कधी कधी शाईने हात खराब होत असे. शाई खाली जमिनीवर सांडत असे. आईचा त्यामुळे मिळालेला ओरडा, हा ओघाने आलाच.

शाईच्या पेनची मजाच काही वेगळी होती!

मी वापरलेल्या शाईच्या पेनांची आठवण ताजी झाली होती. वेगवेगळ्या कंपन्यांचे पेन आणि शाई वापरले होते. महागातल्या महाग पेन वापरला होता त्याची किंमत जास्तीत जास्त १०० रूपये असेल असे मला वाटते. खूप महाग पेन असतात. सोन्याची नीब असते, हिरे लावलेलापण पेन असतो. हे फक्त कानावर पडले होते. माझ्या मित्र परिवाराकडे कोणाकडेही असे महागडे पेन नव्हते.

भेटवस्तू म्हणून हमखास मिळणारी वस्तू म्हणजे पेन! शाईचा पेन वापरून २०-२५ वर्ष नक्कीच झाली असतील. शाईच्या पेनाची जागा, बॉलपेन, रोलर पेनने कधी घेतली हे कळले सुद्धा नाही. अरे! मी हे काय आठवत बसले!. असो.

तर, त्या माझ्या सहकार्‍याचा पेन खाली पडला होता. तो त्यांनी उचलला. त्याची नीब तुटली नाही ना हे बघितले. मोन्ट ब्लांकचा (मॉंटब्लॉंक - mont blanc )आहे असे पुटपुटले. माझ्या सोबत अजून एक सहकारी होता. त्याला 'मोन्ट ब्लांक' बद्दल थोडी माहिती होती. मला काही माहिती नव्हती. खूप महाग पेन असतो तो म्हणाला. ज्यांचा पेन होता त्यांनी त्या पेनात भरण्यासाठी शाईची बॉटल बाहेर काढली. आकार खूप छान होता. गंमत वाटली ती बॉटल बघून. त्यांनी त्या बॉटलीची अधिक माहिती दिली ह्या बॉटलला सगळ्यात चांगल्या 'डिझाईन्'चा पुरस्कार मिळाला होता. ह्या 'मेक्'चा पेन वापरण म्हणजे श्रीमंतीचे लक्षण आहे.

माझी उस्तुकता वाढली होती पण मी ती दाखवली नाही. महाजालावर त्याची माहिती बघू असे ठरवले आणि नंतर ती माहिती मी बघितली. शाईची बॉटल ८ ते १२ डॉलरला . भारतात ठराविक ठिकाणीच ह्या वस्तू मिळतात. मुंबईत ताज हॉटेलच्या शॉपिंग मॉलमध्ये मिळते असे समजले. असो! आपल्यासाठी ह्या वस्तू नाही. आपले कँम्लिन, पार्कर, अ‍ॅड जेलचेच पेन बरे!

माझ्यासाठी हा मोन्ट ब्लांकचा विषय इथेच संपला होता.

मागच्या आठवड्यात परत ह्या पेनची दूरदर्शनवरची जाहिरात पाहिली. १४० व्या गांधीजयंतीसाठी मोन्ट ब्लांकने विशेष श्रेणीचे पेन बाजारात आणल्याची बातमी पेपरमध्ये वाचली. तुषार गांधींनी त्या बद्दल माहिती दिली होती. पेन सोनं आणि चांदीच्या नीब मध्ये उपलब्ध आहे. नीबवर गांधीजींचे दांडी यात्रेच्या वेळेसचे चित्र कोरले आहे.

फक्त १४ लाख रूपये ही ह्या पेनाची किंमत! त्वरा करा फक्त २४१ पेन जगात उपलब्ध आहेत!

गांधीवाद हा सामान्य माणसाला सहजा सहजी कळत नाही म्हणतात ते खरेच म्हणायचे! साधी राहाणी हे विचार गांधीजींचेच. उच्च विचार गांधीजींनी साध्या पेनाने लिहीले असावे!

हा गांधीजींचा पेन $28000 ला विकल्या गेल्याची बातमीपण वाचली.

गांधीजींचे आवडते फाऊंटन पेन हरवले होते अशी गोष्ट लहानपणी वाचली होती. उपक्रमावर ह्या आधी त्या बद्दल लिहिले गेले आहेच. http://mr.upakram.org/node/480.

अर्थातच माझ्या माहितीतले असे हे 'महागडं पेन' ! ह्या पेक्षापण महाग पेन बाजारात असतीलच!