भाषा; मानवी भाव-भावनांची समर्थ अभिव्यक्ती ही भाषेद्वारे साधली जाते. भाषेचे मानवी जीवनातील महत्त्व वादातीत आहे. भाषा व्यक्तीपरत्वे, भौगोलिक परिस्थिती, स्त्री, पुरुष, जात-धर्म, भाषेचे नियम इ. कारणांमुळे बदलासहित, स्वतःचे व्यवहार पूर्ण करत असते. पूर्वी भाषा प्रत्येक मैलावर बदलते असे म्हटले जायचे, आता या जालयुगात प्रत्येक व्यक्तीबरोबर बदलते असे म्हणावे लागेल.
असे असले तरी प्रमाणभाषा बोलायची, लिहायची की बोलीभाषा लिहायची, बोलायची - यावर सतत चर्चा घडत असतात. प्रमाणभाषेबाबत असे म्हटले जाते की ' ज्या भाषेत ग्रंथनिर्मिती होते, जी शासन व्यवहाराचे माध्यम असते, कायदा व न्याययंत्रणेत असते व जिला बहुसंख्य समाजाने मान्यता दिली आहे, ती प्रमाण भाषा. तर प्रमाणभाषेशी साम्य ठेवणारी परंतु समाजातील लहान घटकांकडून दैनंदिन व्यवहारात केवळ बोलण्यासाठी आणि अपवादात्मक लेखनात वापरली जाणारी भाषा म्हणजे बोली. जी भाषा उच्चारण, शब्दसंग्रह, यांत प्रमाणभाषेपेक्षा वेगळी आहे ती भाषा म्हणजे बोलीभाषा. बोली भाषेतील स्वाभाविकता, जिवंतपणा, आकलनाचे क्षेत्र, लोकव्यवहाराबरोबर अनौपचारिकपणे वापरले जाते. प्रादेशिकतेची मर्यादा ज्या भाषेवर पडते ती "बोली".
प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यात सीमारेषा आखणे कठिण असते. एका बोलीचे संस्कार दुसर्या बोलीवर होत असतात. त्याचा परिणाम प्रमाणभाषेवर होत असतो. बोली ही मौखिक परंपरेने विकसित होत असताना ती केवळ मागासलेल्या लोकांची भाषा, अशिक्षित लोकांची भाषा असा समज करून दिलेला दिसतो. प्रमाणभाषा बोलणारे लोक सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टींनी पुढारलेले असतात. त्यांच्या तुलनेने इतर बोली बोलणारे लोक याबाबतीत मागासलेले असतात. त्यामुळे अशा सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी दृष्टीने मागासलेल्या लोकांच्या बोलीला दर्जेदार मानायला समाजातील प्रभावी गट तयार नसतो. पण भाषाभ्यासाने हे सिद्ध झालेले आहे की, प्रमाणभाषा ही स्थानिक बोलींमुळेच विकसित झालेली असते. म्हणजे मूळच्या बोलीचेच प्रमाणभाषेत रुपांतर झालेले असते. उदा. यादवांच्या राजवटीत मराठीत बोलीला ग्रांथिक भाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता.
प्रमाणभाषा आणि बोली हे एकमेकांच्या साह्याने प्रवास करणारे भाषिक आविष्कार आहेत. समाजातील बहुविध संस्कृतींना जोडणारा एक अनुबंध आहे, म्हणून त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरी प्रमाणभाषेपासून बोलीला वेगळे करता येणार नाही. समाजातील लोक आतल्याआत वेगवेगळे गट करून राहत असतात त्याची कारणे सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक, जातीय अशी कोणतीही असल्यामुळे त्यांची स्वतःची गटापुरती एक भाषा तयार होते. ही भाषा प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते म्हणून त्या भाषेला बोलीभाषा म्हटले जाते. इतिहास पाहता असे दिसते की, राज्यलालसेमुळे किंवा अन्य कारणांमुळे एक समाज जेव्हा दुसर्या समाजावर आक्रमण करतो तेव्हा भाषेची सरमिसळ होते आणि एक वेगळीच बोली जन्माला येते. त्याचबरोबर आपापसातले दळणवळण कमी झाल्याने त्यांची भाषा वेगळी होत जाते आणि बोलीची निर्मिती होते. बोलीभाषा निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे परभाषेचा स्वीकार, व्यावहारीक कारणे, अस्तित्वाचा प्रश्न अशा एखाद्या कारणाने समाज आपल्या भाषेचा त्याग करतो आणि दुसरी भाषा स्वीकारतो. पण अशा स्वीकारलेल्या भाषेबरोबर स्वभाषेतील लकब, उच्चार, काही विशेष तसेच टिकून राहतात. त्याबरोबर त्याची एक नवी बोली तयार होते.
प्रमाणभाषा व बोलीभाषेमध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, शुद्ध, अशुद्ध असा भेदभाव असू नये. कारण दोन्हीही भाषा लोकव्यवहाराचे माध्यम असतात. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा वेग-वेगळ्या स्वरूपाची असली तरी प्रमाणभाषेच्या पोषणाचे काम बोलीभाषा करत असतात. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या बोली बोलणार्यांना आपले भाषिक व्यवहार पूर्णं करण्यासाठी प्रमाणभाषेचीही मदत होते असते.
बोलीच्या बाबतीत असा एक समज आहे की, बोलीचा लेखनासाठी वापर करू नये अशी एक रूढ समजूत आहे. पण जगभर असे दिसून येते की आपापल्या बोलीतून आपले अनुभव समर्थपणे मांडल्याचे दिसून येतात. कोणतेही लेखन पेलण्याची क्षमता बोलीभाषेमध्ये असल्यामुळे आपल्या सामाजिक, व्यावहारिक, व्यावसायिक, कौटुंबिक इत्यादी गरजांच्या परिपूर्ततेसाठी आपल्या बोलीचा वापर करायचा की प्रमाणभाषेचा आश्रय घ्यायचा याचा सारासार विचार करून तसा निर्णय बोली बोलणाऱ्यांनी घ्यायचा असतो.
बोलीभाषेचा उत्तम उपयोग केला जात असेल तर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची ओळख होते. त्यांच्या जीवनमानाची, अनुभवांची ओळख होते. म्हणजेच समाजाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करायचे असेल तर त्या त्या समाजाचा अभ्यास करण्यासाठी त्या बोलीचा उपयोग होतो, कारण भाषा समाजाचा आरसा असते. समाजाची एकूण स्थिती कशी आहे, समाजाची संपन्नता, ज्ञान, अज्ञान, सुसंस्कृतपणा असंस्कृतपणा हे सर्व केवळ भाषेच्या जोरावर जोखता येतात. म्हणून समाजाच्या ओळखीसाठी त्या त्या भाषेच्या विविध बोलींचा उपयोग होतो. समाजातील सर्व घटकांना समान पातळीवर आणायचे असेल तर त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रमाणभाषेमधून देण्याऐवजी त्या त्या बोलींमधून दिले जावे. असे झाले तर बोलीचे आपोआप महत्त्व वाढेल. व्यवसायातील उणीवा दूर व्हाव्यात, व्यवसाय वाढावा, नव्या जगाची ओळख वाढवायची असेल तर व्यवसायनिष्ठ बोलींचा अभ्यास फायदेशीर ठरेल.
बोलीभाषेचा अभ्यास साहित्य-समृद्धीकरता उपयुक्तच राहिला आहे. साहित्य जेव्हा समाजजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते तेव्हा बोलीभाषेचे योगदान मोठे राहिलेलेच आहे. बोलींच्या अभ्यासामुळे मध्ययुगीन व अर्वाचीन वाङमयाच्या संशोधनास व समीक्षेस नवी शक्ती मिळत आहे. बोलींमुळे लोकसाहित्याबरोबर, पूर्वजांच्या वाङमयाकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहण्यासाठी बोलीची मदत होऊ शकेल. केवळ साहित्यच नव्हे तर धर्मशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, नक्षत्रविज्ञान यासारख्या विषयांसाठी बोलीचा उपयोग नक्कीच करून घेता येईल.
शेवटी असे म्हणावे वाटते की, बोलींचा अभ्यास हा समाजातील मानवी आविष्कारांच्या विविधतेचा अभ्यास आहे. तेव्हा खानदेशी, वर्हाडी, पुणेरी, चित्पावनी याबरोबर त्याच्या पोटभाषा, आपल्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अभ्यासकांची वाट पाहत आहेत.
Comments
बोली भाषेला जपले पाहिजे!
I am really impressed by your posting. It is very much authentic 1z0-042 practice exam and useful information. keep up the good work. we need more 1z0-050 practice exam good statements. i have bookmarked your site 220-601 practice exam for future reference. I really appreciate your way of presenting such a excellent suggestion. I want more in to it, Thanks
स्तुत्य पण काही शब्द खटकले
भाषेचे सर्वांगीण प्रेम रुजावे, वेगवेगळ्या प्रादेशिक लकबी शिकल्या जाव्यात, वाङ्मयात उपयोगात याव्यात, याबद्दल प्राध्यापक बिरुटे यांचे विचार पटण्यासारखे आहेत.
पण "भाषा" आणि "बोली" म्हणजे नेमके काय-काय, व्याख्या सुरुवातीला देण्याचा प्रयत्न केला आहे. "प्रमाणबोली" आणि "अन्य बोली" असे म्हटले असते, तर जरा बरे झाले असते. वर्हाडी आणि चित्पावनी या दक्खनीपेक्षा कमी किंवा अधिक मराठी नाही. "मराठी"भाषा म्हणजे सर्व बोलींचा समुच्चय असे मानण्यास हरकत नाही. त्या सर्व बोलींपैकी पैकी एक (दक्खनी ब्राह्मणी) सरकारी कामात, आणि वृत्तपत्रीय व्यवहारात वापरण्यास योग्य मानली जाते आहे, हे खरेच आहे. ती आज प्रमाणबोली आहे. प्रमाण-भाषा म्हटल्यास जरा गडबड होते. जणूकाही तीच मराठी भाषा आहे, बाकी सर्व "मराठी"च्या कनिष्ठ भगिनी असे वाटते - हे लेखाच्या विचाराच्याच्या विरुद्ध आहे.
> समाजातील सर्व घटकांना समान पातळीवर आणायचे असेल तर त्यांचे प्राथमिक शिक्षण
> प्रमाणभाषेमधून देण्याऐवजी त्या त्या बोलींमधून दिले जावे.
यातला मथितार्थ मला पूर्ण मान्य आहे - म्हणजे प्रादेशिक वैशिष्ट्यांनी युक्त भाषेत (किंवा प्रादेशिक बोलीत, म्हणा) शाळेत शिकवणे बहुधा विद्यार्थ्यांना सोयीचे जाईल. पण इथे असे म्हणायचे असावे, की प्रादेशिक बोलींचे प्रमाणीकरण करावे. पाठ्यपुस्तके लिहायची, मुलांकडून त्या प्रकारे लिहून-बोलून घ्यावे, म्हणजे प्रमाणीकरणच होय.
पुनश्च : भाषा बोलणार्या सर्व लोकांचा, त्यांच्या बोलण्याच्या वैशिष्ट्यांचा उपयोग समृद्ध समाजात व्हावा, असा विचार प्रा. बिरुटे यांनी समर्थपणे मांडला आहे. अभिनंदन, आणि हा विचार वाढीस लागो.
(धनंजय)
संदेश स्तुत्य, निष्कर्ष योग्य पण काही गृहीतकांबद्दल मतभेद
सर्वप्रथम, 'बोली भाषेला जपले पाहिजे' हा संदेश अतिशय स्तुत्य आहे आणि 'बोलींचा अभ्यास हा समाजातील मानवी आविष्कारांच्या विविधतेचा अभ्यास आहे. तेव्हा खानदेशी, वर्हाडी, पुणेरी, चित्पावनी याबरोबर त्याच्या पोटभाषा, आपल्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अभ्यासकांची वाट पाहत आहेत' हा लेखाचा निष्कर्ष अतिशय योग्य वाटतो हे नमूद करू इच्छितो. 'बोलीभाषेचा अभ्यास साहित्य-समृद्धीकरता उपयुक्तच राहिला आहे.' हेही विधान अतिशय पटण्यासारखे.
लेखातील बहुतांश मुद्दे पटण्यासारखे आहेत; परंतु काही गृहीतके तितकीशी पटली नाहीत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रमाणभाषा व बोलीभाषेमध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, शुद्ध, अशुद्ध असा भेदभाव असू नये.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रेष्ठकनिष्ठाचा भेदभाव असू नयेच; किंबहुना प्रत्येक भाषा आणि बोली (खरे तर बोली हीही भाषाच!) आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, याबद्दलही दुमत असू नये. मात्र शुद्ध-अशुद्ध याबद्दल हे विधान पटण्यासारखे वाटत नाही. याकरिता मुळात प्रमाणभाषा म्हणजे काय, प्रमाणभाषेचे कार्य आणि गरज काय, 'शुद्ध' आणि 'अशुद्ध' म्हणजे नेमके काय हे तपासणे गरजेचे आहे.
बोली या स्थळ, काळ, समाज (यात जात, धर्म, राष्ट्रीय किंवा प्रादेशिक उगम, किंबहुना कदाचित काही बाबतींत लिंगसुद्धा, हे सर्व आले) यांप्रमाणे बदलतात याबद्दल दुमत नसावे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवहारसंबंधांमुळे अशा भिन्न बोली बोलणार्या समाजांना (किंवा खरे तर अशा समाजांतील असे संबंध ज्यांच्यावर निर्भर आहेत अशा समाजघटकांना) जेव्हा परस्परसंपर्कासाठी सामाईक भाषामाध्यमाची गरज भासते, तेव्हा त्या सामाईक बोलीच्या अशा (कदाचित) ठराविक गटांपुरत्या मर्यादित परंतु व्यापक संबंधांसाठी आवश्यक असलेल्या सतत वापरातून, संदेहाला जागा राहू नये यास्तव, नियम आपोआपच बनत जातात आणि त्यातून प्रमाणित भाषा किंवा प्रमाणभाषा निर्माण होते. अर्थात या प्रमाणभाषेतही काळ, गरज किंवा वर्चस्वातील बदल* यांप्रमाणे बदल होणे शक्य असतेच.
(*दुसर्या महायुद्धापर्यंत जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवहारांत ब्रिटनचे वर्चस्व होते तोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधांत किंवा साहित्यात वगैरे जेथे इंग्रजीच्या वापराचा संबंध येत असावा तेथे इंग्लंडमधील एका विशिष्ट गटाची इंग्रजी ही प्रमाणित इंग्रजी ठरत असे. त्यानंतर हळूहळू जसे ब्रिटनचे वर्चस्व संपुष्टात येऊन अमेरिकेचे वर्चस्व वाढू लागले तशी ती जागा काही प्रमाणात तरी अमेरिकन प्रमाणित इंग्रजी घेऊ लागली. अर्थात या ब्रिटिश किंवा अमेरिकन प्रमाणित इंग्रजींचे इंग्लंडातल्या इंग्रजीच्या बोली, न्यूयॉर्कची बोली, अटलांटाची बोली, टेक्ससची बोली, मिडवेस्टातील बोली, कॅलिफोर्नियातील बोली, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची बोली, ऑस्ट्रेलियातील बोली वगैरेंशी नाते किंवा साधर्म्य असले तरी या सर्वांमध्ये जाणवण्याइतके आणि कधीकधी एकाला दुसर्याची बोली चटकन प्रयासाशिवाय न कळण्याइतकेही फरक आहेत हा आणखी एक मुद्दा.)
परंतु व्याख्येप्रमाणेच एकदा प्रमाण भाषा म्हटले की त्याबरोबर प्रमाणनाचे नियम आलेच. आणि त्याच व्याख्येप्रमाणे जे या नियमांत बसते ते 'प्रमाणित' किंवा 'शुद्ध', आणि जे या नियमांत बसत नाही ते 'प्रमाणबाह्य' किंवा 'अशुद्ध'. अर्थात 'प्रमाणबाह्य' (किंवा 'अशुद्ध') म्हणजे 'चूक' किंवा 'कनिष्ठ' असाच याचा अर्थ व्हावा असे नाही; मात्र असा 'प्रमाणबाह्य' वापर जिच्यात केला जातो तिला व्याख्येप्रमाणे 'प्रमाणभाषा' म्हणता येणार नाही, एवढेच. (उदाहरण घ्यायचे झाले तर I don't know nothingसारखे प्रयोग अर्थात double negation हे इंग्रजी प्रमाणभाषेच्या - ब्रिटिश किंवा अमेरिकन - नियमांप्रमाणे प्रमाणबाह्य आहे. बोलीभाषेत बर्याचदा खपून जाते - बोलणार्याला आणि ऐकणार्याला जोपर्यंत यात काही वेगळे जाणवत नाही तोपर्यंत त्यांच्या बोलीप्रमाणे हे ठीक मानायला हरकत नसावी. परंतु व्यापक प्रमाणभाषेच्या दृष्टिकोनातून हे प्रमाणबाह्य किंवा 'अशुद्ध'च आहे.)
शेवटी भाषा हा एक सर्वमान्य संकेत आहे, कोणतीही बोलीभाषा हीसुद्धा एका कदाचित छोट्या आणि मर्यादित गटाची प्रमाणभाषाच आहे, तिचेसुद्धा त्या गटापुरते काही ठराविक नियम आहेत आणि त्या नियमांपासून काही प्रचलित विचलने (व्हेरिएशन्स) असतीलच तर ती मर्यादित आणि बोलीच्या कक्षेत सहज सामावून घेण्यासारखी आहेत, आणि त्यापेक्षा मोठी विचलने घडल्यास तो त्या बोलीच्या नियमांना आणि स्वरूपाला धक्काच ठरतो (आणि म्हणूनच त्या बोलीच्या नियमांप्रमाणे ते 'अशुद्ध'च ठरते) हे लक्षात घेतले तर 'शुद्ध'/'अशुद्ध' (किंवा 'प्रमाणित'/'प्रमाणबाह्य' किंवा 'संकेताप्रमाणे'/'संकेतबाह्य') या संकल्पनांत काहीही गैर नाही, हे लक्षात यावे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
बोलीचा लेखनासाठी वापर करू नये अशी एक रूढ समजूत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
हाही मुद्दा तितकासा पटत नाही. लेखनाचा उद्देश आणि लेखन कोणासाठी आहे यावर हे बर्याच अंशी अवलंबून आहे. विशाल वाचकवर्गासाठी किंवा विषयातील अभ्यासकांसाठी एखाद्या शास्त्रीय विषयावरील विवेचन लिहिताना बोलीभाषेचा उपयोग कदाचित रास्त ठरणार नाही. मात्र तेच विवेचन एखाद्या मर्यादित गटापुरते असल्यास, त्या गटातील सर्वांची बोलीभाषा एकच असून त्या विषयाला न्याय देण्यासारखा त्या बोलीभाषेत शब्दसंग्रह असल्यास आणि त्या बोलीभाषेचा उपयोग केल्याने त्या वाचकवर्गास तो विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असल्यास अशा लेखी विवेचनासाठी ती बोलीभाषा वापरण्यात काही गैर नसावे. उलटपक्षी एखाद्या नाटकातले किंवा कादंबरीतले संवाद लेखी भाषेत छापल्यास ते हास्यास्पद ठरावे.
प्रस्तुत लेख हा प्रमाणभाषेत लिहिला गेला आहे हा एक विचारात घेण्याजोगा मुद्दा. (अवांतर: 'लिहिला गेला आहे'चे 'लिहिल्या गेला आहे' हे विचलन अथवा व्हेरिएशन समजण्यासारखे किंवा विस्तृत प्रमाणभाषेच्या कक्षेत सामावून घेण्यासारखे आहे.)
तूर्तास एवढेच. अधिक काही सुचल्यास पुढेमागे लिहीनच.
- वेडा मुलगा.
डिस्क्लेमर: या प्रतिसादातील विधाने ही प्रस्तुत प्रतिसादकाची केवळ वैयक्तिक मते असून त्यामागे भाषाशास्त्राचा किंवा अन्य कशाचाही अभ्यास असल्याचा प्रस्तुत प्रतिसादकाचा दावा नाही, तेव्हा चूभूद्याघ्या.
"आम्ही कोण म्हणून काय पुसतां? -आम्ही असूं लाडके-
बिरुटेंच्या प्रास्ताविकात पहिली दोन वाक्ये अशी आहेत:
....................................................................................................................................................................
प्रमाणभाषा आणि बोली हे एकमेकांच्या साह्याने प्रवास करणारे भाषिक आविष्कार आहेत. समाजातील बहुविध संस्कृतींना जोडणारा एक अनुबंध आहे, म्हणून त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरी प्रमाणभाषेपासून बोलीला वेगळे करता येणार नाही.
....................................................................................................................................................................
पहिले वाक्य ठीक आहे. पण त्यांच्या दुसर्या वाक्यातल्या शब्दांच्या "साखळी"त बिरुटेंना नेमेके काय म्हणायचे आहे ते उलगडवून घ्यायला काही बुद्धिमान वाचकांची मती समर्थ असेलही, पण माझी अल्पमती समर्थ नोहे.
त्या एकाच वाक्याबाबत माझे चार विचार मी लिहितो :
१) काही काही लेखकांची "नाते"सारखे साधेसरळ, नेहमीच्या वापरातले शब्द वापरण्याऐवजी "अनुबंध"सारखे "जरा जाडेजुडे" शब्द वापरण्याने आपल्या लिखाणाला "भारदस्तपणा" येतो अशी एक मजेदार कल्पना असते.
२) "समाजातील बहुविध संस्कृतींना जोडणारा एक अनुबंध आहे" ह्या वाक्याला निदान मला तरी काही आगापिछा दिसत नाही. नेमकी कोणती गोष्ट "समाजातील 'बहुविध संस्कृतींना’ जोडणारा एक अनुबंध आहे" असे बिरुटेंना म्हणायचे आहे? तो मुद्दा धुक्यात असल्याने "(म्हणून) त्याचे [म्हणजे "अनुबंधाचे"] स्वरूप वेगवेगळे असले तरी..." हे विधानही "गूढगुंजनात्मक" झाले आहे.
३) "म्हणून" ह्या शब्दाने प्रेरित असलेला कार्यकारणभाव म्यां अल्पमतीला उमजत नाही.
४) "म्हणून त्याचे [म्हणजे "अनुबंधाचे"] स्वरूप वेगवेगळे असले तरी..."मधल्या "तरी"ने त्या सबंध वाक्यातली गूढता आणखीच शिगेला पोचवली आहे.
.........................................................................
"आम्ही कोण म्हणून काय पुसतां? -आम्ही असूं लाडके-
देवाचे, दिधलें तयें शब्द हो आम्हांस खेळावया!"
............................................................................