संपादकीय
भावनेला येऊ दे गा...
बुद्धी आणि मनाचे द्वंद्व नेमके कधी सुरू झाले असावे, ते सांगता येणे अवघड आहे. मात्र प्राचीन कालापासून 'धियो यो न: प्रचोदयात्' ची आस मानवी मनाला लागली आहे. मधली काही शतके लुप्त झाल्यासारखी झालेली ही भावना युरोपात सतराव्या शतकात पुन्हा 'एज ऑफ एनलायटनमेंट'च्या रुपाने जोमाने प्रकट झाली. देकार्तचे गणित आणि तत्त्वज्ञानावरील ग्रंथ; न्यूटनचे 'प्रिंसिपिया मॅथेमॅटिका'; बेंजामिन फ्रँकलिन, इम्यॅनुएल कान्ट, अॅडम स्मिथ यांसारखे वेगवेगळे दिग्गज यांनी याच काळात प्रस्थापित मतांना, सिद्धांताना धक्का देत होते. नचिकेताच्या चिकाटीने आणि धैर्याने नवनवे प्रश्न उभे करून त्यांची उत्तरे शोधीत होते. तीच परंपरा समर्थपणे चालवणार्या चार्ल्स रॉबर्ट डार्विन बरोबर दोनशे वर्षांपूर्वी जन्मला. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या 'द ओरिजिन ऑफ स्पीशिज्' या पुस्तकाच्या प्रकाशनाला पुढच्याच महिन्यात दीडशे वर्षे पूर्ण होतील.
नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतासह डार्विनने या पुस्तकात मांडलेले अनेक मूलगामी विचार आज सुपरिचित आहेत. 'ज्या कल्पनेची वेळ जवळ आली आहे, तिला जगातलं कुठलंही सैन्य रोखू शकत नाही', ह्या व्हिक्टर ह्यूगोच्या प्रसिद्ध वचनाप्रमाणे या पुस्तकामुळे विज्ञानाचे एक नवीन दालन अपरिहार्यपणे खुले झाले, यात शंकाच नाही. केवळ 'देवाने सात दिवसांत जग तयार केले' ह्या ओल्ड टेस्टामेंटमधल्या प्रतिपादनाला या पुस्तकाने धक्का दिला असं नाही तर 'आम्ही असू लाडके, देवाने दिधले असे जग आम्हांस खेळावया' सारख्या आपण कुठल्यातरी दैवी प्रेरणेने भूतलावर आहोत; या माणसाच्या सूक्ष्म अहंकारालाही कुठेतरी तडा दिला.
विज्ञानाला काय अभिप्रेत असते याचे यापेक्षा अधिक परिपूर्ण उदाहरण सापडणे अवघड आहे. पहिले म्हणजे डार्विनने आपल्या मगदुराप्रमाणे आणि याआधी झालेल्या संशोधनाला गॅलापॅगोस बेटांवर व अन्यत्र केलेल्या निरीक्षणांतून, अभ्यासातून केलेल्या संशोधनाची जोड दिली आणि जे पुराव्यांनी सिद्ध करता येऊ शकतात असे काही सिद्धांत मांडले. यातले सगळेच बरोबर होते अशातला भाग नाही. डोळ्यांसारख्या गुंतागुंतीच्या अवयवाची रचना विशिष्ट तर्हेनेच का व्हावी यामागची त्याची कारणीमीमांसा पूर्णपणे खरी नाही. मात्र वैज्ञानिक वृत्तीचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग इथे येतो; तो म्हणजे उपलब्ध ज्ञानात किंवा सिद्धांतात काही त्रुटी असल्यास अथवा पूर्वी केलेल्या प्रतिपादनाला खोटे ठरवणारे काही पुरावे सापडल्यास ते स्वीकारून पुढे जाणं. मर्ढेकर म्हणतात तसे 'धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे | वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे ||' आईनस्टाईनने न्यूटनच्या नियमांचा केलेला विस्तार काय किंवा अगदी दोन आठवड्यांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या 'आर्डिपिथिकस रॅमिडस'च्या जीवाश्माबद्दलच्या संशोधनाने मानवी उत्क्रांतीबद्दलच्या ठोकताळ्यांना दिलेलं नवीन वळण काय - अगदी मान्यवर शास्त्रज्ञांनी सांगितलेलं म्हणणं 'बाबा वाक्यं प्रमाणम्' म्हणून गृहीत न धरता नवीन ज्ञानाच्या कसोटीवर घासून ते पडताळून पाहणं, त्यात बदल करणं हीच ती वैज्ञानिक वृत्ती.
आजच्या माहितीस्फोटाच्या आणि आंतरजालाच्या प्रसाराच्या युगात या प्रश्नाला एक वेगळे परिमाण मिळाले आहे. कारण खरी-खोटी, बरी-वाईट सगळ्याच प्रकारची माहिती एका क्लिकसरशी उपलब्ध आहे. कृतीची जोड न देता केवळ दैवावर अथवा कोण्या स्वामींवर हवाला ठेवून राहणे ही ढोबळ पातळीवरची अंधश्रद्धा असेल तर व्यावहारिक फायद्यासाठी, आपले म्हणणे किंवा वस्तू ही वैज्ञानिक पायावर आधारित आहेहे लोकांच्या गळी उतरवण्याचे फसवे प्रयत्न, ही त्याची सूक्ष्म पातळी झाली. खर्याखोट्या माहितीच्या गोंधळातून सत्य काय आहे याचा नीरक्षीरविवेक करणे सोपे काम नाही. कुणा एका व्यक्तीपेक्षा परस्परांशी चर्चा करून, इतरांची मतं विचारात घेऊन समाजाने ते ठरवणे कधीही हितावह. या प्रक्रियेला समाजाच्या पातळीवर चालना देण्याचे काम अर्थातच अवघड आहे. मात्र ते छोट्या समूहाच्या पातळीवर का होईना, उपक्रमासारखे मराठी संकेतस्थळ गेली अडीच वर्षे निष्ठेने करत आहे. हा प्रयत्न असाच चालत राहून अनेकांना यापासून प्रेरणा मिळावी; भावनेला शास्त्रकाट्याची कसोटी यावी अशी दीपावलीच्या मुहूर्तावर आम्ही आशा व्यक्त करतो आणि उपक्रमाचा दुसरा दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करतो.