चांदण्या अवतरल्या राष्ट्रध्वजांवरती!

अंजली

दिवाळी जवळ आली की बाजारात विविध आकाराचे छान छान कलात्मक आकाशकंदील बघायला मिळतात. बाजारपेठ ह्या विविध आकारांच्या आकाशकंदीलांनी उजळून निघते.

पण आकाशकंदील म्हटले की डोळ्यांसमोर येतो, तो चांदणीचाच आकार. मग त्यात पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी असे विविध प्रकार, विविध रंगांत दिसतात. जणू काही आकाशातल्या चांदण्या धरतीवर आपल्याला भेटायला आल्या आणि आपले आयुष्यच लखलखीत प्रकाशात उजळून जात आहे, असे वाटते.

दिवाळी जवळ आली की बाजारात विविध आकाराचे छान छान कलात्मक आकाशकंदील बघायला मिळतात. बाजारपेठ ह्या विविध आकारांच्या आकाशकंदीलांनी उजळून निघते.

पण आकाशकंदील म्हटले की डोळ्यांसमोर येतो, तो चांदणीचाच आकार. मग त्यात पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी असे विविध प्रकार, विविध रंगांत दिसतात. जणू काही आकाशातल्या चांदण्या धरतीवर आपल्याला भेटायला आल्या आणि आपले आयुष्यच लखलखीत प्रकाशात उजळून जात आहे, असे वाटते.

लहान असताना आम्हा भावंडांची आकाशातल्या चांदण्या मोजण्याची पैज लागायची. चांदण्या मोजताना खूप दमछाक होत असे. पण खूप मजाही येत असे. चंद्रकोरीच्या शेजारी ठळक दिसणारी चांदणी ही शुक्राची चांदणी असते हे कोणीतरी सांगितले होते.

आजकाल चांदणीचा वापर वर्गवारी, एखाद्या वस्तूचा 'दर्जा' दाखवण्यासाठी केला जातो. शाळेतल्या लहान लहान मुलांना त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा १ चांदणी, २ चांदण्या .... ५ चांदण्या देऊन करतात. हॉटेल किती चांदण्यांचे (स्टार) आहे हे पाहून त्यातल्या सुखसोयी कोणत्या असतील हे ठरवतात. चांदणीला किती कोन असतात असे कोणी आपल्याला विचारले तर जास्तीत जास्त ५, ६, ७ कोन असे आपले उत्तर असेल.

विविध देशांच्या ध्वजांवर चांदण्याचा वापर कलात्मकरीत्या केलेला आपल्याला पहायला मिळतो. त्यात एक चांदणी ते ५० चांदण्यांचा वापर केलेला पहायला मिळतो. चांदणीचा रंग, कोन/टोक वेगवेगळे असतात. चांदणी आणि चंद्रकोर ही दोन प्रतीके सोबत ध्वजावर असलेले देश बहुतेक मुस्लिम धर्माचा वर्चस्व असलेले देश असतात. क्रॉस आणि चांदण्या ही दोन प्रतीके सोबत असलेले देश बहुतेक ब्रिटिश राजवटीखाली होते.

आपण एक एक करून ह्या ध्वजांवरच्या चांदण्यांची माहिती करून घेऊ.

१) अरूबा

अरूबा हा कॅरिबियन मधील नेदरलँड्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर ४ कोन असलेली चांदणी आहे. ध्वज तयार करणार्‍या शास्त्राच्या मते ही ४ कोन असलेली चांदणी आगळीवेगळी आहे. हे चार कोन चार दिशांचे प्रतीक आहे. हे चार कोन अरूबाच्या चार मुख्य भाषांचे - पापिआमेंटो(Papiamento), स्पॅनिश(Spanish), इंग्रजी(English) आणि डच(Dutch) भाषांचे प्रतीक आहे. ही चांदणी अरूबा बेटाचेही प्रतीक आहे. चांदणीचा लाल रंग हा ह्या बेटावरच्या मातीच्या रंगाचे प्रतीक आहे, तर चांदणीच्या बाहेरील पांढरा रंग हा निळ्या समुद्रच्या किनार्‍याचे प्रतीक आहे. लाल रंग हा अरूबीयानी स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताचेसुद्धा प्रतीक आहे. पांढरा रंग हा शुद्धता व प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.

२) बर्किना फासो

बर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरची चांदणी पाच कोन असलेली चांदणी आहे. ही पिवळ्या रंगाची चांदणी खनिज संपत्तीची द्योतक आहे

३) कामेरून

कॅमेरून (Cameroon) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. कॅमेरूनच्या ध्वजावरची चांदणी ही ध्वजाच्या मध्यभागी आहे. ती ५ कोनांची सोनेरी पिवळ्या रंगाची आहे. ह्या चांदणीला एकात्मकतेची चांदणी (the star of unity) असे संबोधले जाते.

४) घाना

घाना (Ghana) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी काळ्या रंगाची ५ कोनी चांदणी आहे. ही काळ्या रंगाची चांदणी आफ्रिकेचे स्वातंत्र आणि त्या देशातल्या देशवासीयांचे प्रतीक आहे.

५) सेनेगाल

सेनेगाल (Senegal) सेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरची चांदणी हिरव्या रंगाची ५ कोनी चांदणी आहे.

६) सुरिनाम

सुरिनाम (Suriname ): सुरिनाम दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरिनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझिल हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. ह्या देशाच्या ध्वजावर मध्यभागी एक पिवळ्या सोनेरी रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे. ही चांदणी देशातल्या जुन्या जमातीच्या एक्याचे प्रतीक आहे.

७) व्हियेतनाम

व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर मध्यभागी ५ कोन असलेली चांदणी आहे. ती सोनेरी पिवळ्या रंगाची आहे. ही चांदणी कष्टकर्‍यांची एकता, उल्हासता, बुद्धिमता आणि समाजवाद घडवण्यासाठी ज्या लोकांनी हातभार लावले होते त्या सगळ्या लोकांचे प्रतीक आहे.

८) सोमालिया

सोमालिया (Somalia) सोमालिया (सोमाली: Soomaaliya; अरबी: الصومال ) हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर एक पांढर्‍या रंगाची ५ कोन असलेली चांदणी ध्वजाच्या मध्यभागी आहे. ही चांदणी देशातल्या ५ प्रमुख प्रदेशांचे प्रतीक आहे. ऑगाडेन्, नॉर्थन फ्रंटियर जिल्हा, जिबोटि, आधीचे ब्रिटिश सोमालियन प्रदेश आणि इटालियन सोमालियन प्रदेश असे हे ५ प्रदेश आहेत.

९) मोरोक्को

मोरोक्को ( Morocco मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या ध्वजावरची चांदणी ५ कोनी/टोक
चांदणी आहे . ह्या चांदणी ला black-bordered green interwoven star असे म्हणतात. चांदणीचे मुख्य रेखाटन काळ्या रंगात आहे. कोनाच्या आतला रंग व मध्ये तयार झालेल्या पंचकोनात लालरंग आहे जो ध्वजाचा मुख्य रंग आहे.

१०) उत्तर कोरिया

उत्तर कोरिया ( North Korea ) उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी ही ५ कोनी चांदणी आहे. ही चांदणी लाल रंगाची आहे. ही चांदणी कम्युनिझम, समाजवादाचे प्रतीक आहे.

११) लायबेरिया

लायबेरिया (Liberia) लायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी ५ कोनी असून पांढर्‍या रंगाची आहे. ही चांदणी स्वातंत्राचे प्रतीक म्हणून रेखाटलेली आहे.

१२) केंद्रिय आफ्रिका गणराज्य

केंद्रिय आफ्रिका गणराज्य: ह्या देशाच्या ध्वजावर एक सोनेरी पिवळ्या रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे.

१३) चिली

चिली हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरिल चांदणी पांढर्‍या रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे.

१४) काँगो

काँगो ( Congo) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरची चांदणी ही सोनेरी पिवळी ५ कोन असलेली चांदणी आहे. देशाचे भविष्य उज्वल आहे हे दाखवण्यासाठी ही चांदणी रेखाटलेली आहे.

१५) क्युबा

क्युबा ( Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी ५ कोन असलेली चांदणी आहे. तिचा रंग पांढरा आहे. स्वातंत्रेचे प्रतीक म्हणून ही चांदणी ह्या देशाच्या ध्वजावर रेखाटलेली आहे.

१६) जिबूती

जिबूती (Djibouti) हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी ही लाल रंगाची असून तिला ५ कोन आहेत. ही चांदणी ह्या देशात राहाणार्‍या सोमाली जमातीचे प्रतीक आहे. तसेच ही चांदणी एकात्मकतेचेपण प्रतीक आहे.

१७) पूर्व तिमोर

पूर्व तिमोर (East Timor) किंवा तिमोर-लेस्ते हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. ह्या देशाचा ध्वज हा २१व्या शतकातला ध्वज आहे. 20 मे 2002 पासून हा ध्वज अस्तित्वात आला आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी पांढर्‍या रंगाची असून तीला ५ कोन आहेत. ह्या चांदणीला 'the light that guides' असे ही म्हणतात. शांततेचे प्रतीक म्हणून ही चांदणी ह्या ध्वजावर रेखाटलेली आहे.

१८) गिनी-बिसाउ

गिनी-बिसाउ (Guinea-Bissau) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी ही काळ्या रंगाची, ५ कोन असलेली चांदणी आहे. ह्या चांदणीला आफ्रिकेची काळी चांदणी असे ही म्हणतात. ही चांदणी आफ्रिकेच्या एकात्मकतेचे प्रतीक आहे.

१९) टोगो

टोगो (Togo) टोगो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. टोगोच्या पश्चिमेला घाना, पूर्वेला बेनिन, उत्तरेला बर्किना फासो तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी पांढर्‍या रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे.

२०) पोर्तो रिको

पोर्तो रिको हा अमेरिकेचा कॅरिबियनच्या अँटिल्स भागातील एक प्रांत आहे. ह्या देशाच्या ध्वजावर पंचकोनी पांढर्‍या रंगाची मोठी चांदणी आहे.

२१) उत्तर मेरियाना द्वीपसमूह

उत्तर मेरियाना द्वीपसमूह : उत्तर मेरियाना द्वीपसमूह हे पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचे एक राष्ट्रकूल आहे. ह्या देशाच्या ध्वजावर पंचकोनी पांढर्‍या रंगाची एक चांदणी आहे.

२२) सोमालीलँड

सोमालीलँड (Somaliland) सोमालीलँड हा पूर्व आफ्रिकेच्या सोमालिया देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९१ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने सोमालीलँडच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही. १८८४ ते १९६० दरम्यान हा भाग ब्रिटीश सोमालीलँड ह्या नावाने ओळखला जात असे. ह्या देशाच्या ध्वजावर मध्यभागी काळ्या रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे. ही काळी चांदणी सोमालीलँड मोठे होण्याच्या स्वप्नाचे प्रतीक आहे.

२३) मोझांबिक

मोझांबिक (Mozambique) मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली. ह्या देशाच्या ध्वजावर AK-47 ही आधुनिक बंदुक रेखाटलेली आहे. हा जगातला पहिला ध्वज आहे की ज्याच्यावर असे आधुनिक शस्त्र रेखाटलेले आहे. ध्वजावरची चांदणी ही पिवळ्या रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे. ही चांदणी मार्कस्-वाद आणि जागतिकतेच प्रतीक म्हणून रेखाटलेली आहे. ह्याच चांदणीवर बंदूक, फावडे आणि पुस्तक रेखाटलेले आहेत.

२४) झिम्बाब्वे

झिम्बाब्वे (Zimbabwe) झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर लाल रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे. त्यावर एक पक्षी आहे. ही चांदणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि शांततेसाठी लोकांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. तसेच ती देशाची आशा आणि प्रेरणेचेपण प्रतीक आहे.

२५) अंगोला

अंगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.
ह्या देशाच्या ध्वजावर सोनेरी पिवळ्या रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे. ह्या चांदणी सोबत कोयता आणि मशिनचे गीयर (कोग्-व्हिल)आहेत.

२६) पाकिस्तान

पाकिस्तान ( Pakistan http://en.wikipedia.org/wiki/Flag_of_Pakistan). पाकिस्तान हा भारताचा शेजारील देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर चंद्रकोर आणि चांदणी आहे. ह्या ध्वजावरील पांढर्‍या रंगातली चांदणी देशाच्या प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. ही चांदणी ५ कोन असलेली चांदणी आहे.

२७) ट्युनिसिया

ट्युनिसिया (Tunisia) हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जिरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणी लाल रंगाची ५ कोन असलेली आहे. चंद्रकोर आणि चांदणी ओटामन ध्वजाची आठवण करून देतात.

२८) तुर्कस्तान

तुर्कस्तान (Turkey) तथा तुर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोप व आशिया) विस्तारित आहे.
ह्या देशाच्या ध्वजावर चंद्रकोर आणि चांदणी आहे. ह्या देशाचा प्रमुख धर्म मुस्लिम आहे. लाल रंगाच्या ध्वजावर पांढर्‍या रंगात चंद्रकोर आणि ५ कोन असलेली चांदणी आहे.

२९) उत्तर सायप्रस

उत्तर सायप्रस (Northern Cyprus ): उत्तर सायप्रस हा सायप्रस देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. उत्तर सायप्रसला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय, युरोपियन संघ उत्तर सायप्रसला सायप्रस देशाचा एक सार्वभौम भाग मानतात. उत्तर सायप्रस आर्थिक, राजकीय व लष्करी मदतीसाठी पूर्णपणे तुर्कस्तानवर अवलंबुन आहे.
ह्या देशाचा ध्वज, तुर्कस्तान देशाच्या ध्वजाशी मिळता जुळता आहे. ध्वजावरची चंद्रकोर आणि ५ कोन असलेली चांदणी ही तुर्की लोकांचे प्रतीक आहे.

३०)सिंगापूर

सिंगापूर (Singapore) हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. ह्या देशाच्या ध्वजावर पंचकोनाच्या आकारात ५ कोन असलेल्या ५ चांदण्या आहेत. ह्या चांदण्यांन सोबत चंद्रकोरपण आहे. ह्या चांदण्या शांतता, भरभराटी, न्याय आणि समता ह्यांचे प्रतीक आहेत.

३१) पश्चिम सहारा

पश्चिम सहारा (Sahrawi Arab Democratic Republic ) ह्या देशाच्या ध्वजावर लाल रंगात चंद्रकोर आणि ५ कोन असलेली चांदणी आहे. चंद्रकोर आणि चांदणी हे मुस्लिम धर्माचे प्रतीक आहे.

३२) मॉरिटानिया

मॉरिटानिया (Mauritania) : मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर चंद्रकोर आणि चांदणी आहे. ह्या देशाचा प्रमुख धर्म मुस्लिम हा आहे. ५ कोन असलेली चांदणी व चंद्रकोरीचा रंग सोनेरी पिवळा आहे.

३३) साओ टोमे आणि प्रिन्सिप

साओ टोमे आणि प्रिन्सिप समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनार्‍यापासून साधारण २२५ किमी अंतरावर आहेत. ह्या देशाच्या ध्वजावरील २ काळया रंगाच्या ५ कोन असलेल्या चांदण्या देशाच्या २ प्रमुख बेटांचे प्रतीक आहेत.

३४) सिरीया

सिरीया (Syria) सिरीया मध्य-पूर्वेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर २ चांदण्या आहेत. ह्या दोन चांदण्या इजिप्त आणि सिरिया या दोन देशाने सयुंक्त अरब प्रजास्ताक स्थापन करण्यासाठी केलेल्या योगदानाचे प्रतीक आहे. ह्या चांदण्यांचा रंग हिरवा आहे. ह्या चांदण्या ५ कोन असलेल्या आहेत.

३५) सेंट किट्स आणि नेव्हिस

सेंट किट्स आणि नेव्हिस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका खंडातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर २ चांदण्या आहेत ह्या २ चांदण्या पांढर्‍या रंगाच्या आहेत. ह्या पांढर्‍या रंगाच्या चांदण्या आशा व स्वातंत्राचे प्रतीक आहेत. ह्या चांदण्या पंचकोनी चांदण्या आहेत.

३६) पनामा

पनामा (Panama) पनामा हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. येथील पनामा कालवा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडतो. ह्या देशाच्या ध्वजावर दोन चांदण्या आहेत. ह्या चांदण्या ५ कोन असलेल्या आहेत. एका चांदणीचा रंग लाल आहे तर दुसर्‍या चांदणीचा रंग निळा आहे. निळा रंग हा पुरोगामित्वाचे प्रतीक आहे तर लाल रंग हा स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

३७) फिलिपाईन्स

फिलिपाईन्स (Philippines) फिलिपाईन्स हा आग्नेय आशियातील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर हा देश वसला आहे. पूर्व एशियातील एक देश. ह्या देशाच्या ध्वजावर ३ चांदण्या आहेत. ह्या चांदण्या सोनेरी पिवळ्या रंगाच्या पंचकोनी चांदण्या आहेत. ह्या ३ चांदण्या ह्या देशाच्या ३ प्रमुख भौगोलिक प्रदेशाचे लुझोन(Luzon), विसयास (the Visayas), and मिनडानो (Mindanao)चे प्रतीक आहेत.

३८) व्हॉयव्होडिना

व्हॉयव्होडिना (सर्बियन: Аутономна Покрајина Војводина) हा सर्बिया देशाचा एक स्वायत्त प्रांत आहे. हा प्रांत सर्बियाच्या उत्तर भागात आहे. ह्या देशाच्या ध्वजावर तीन पंचकोनी पिवळ्या रंगाच्या चांदण्या आहे. ह्या तीन चांदण्या व्हॉयव्होडिनाच्या तीन प्रमुख विभागाचे - बाका (Bačka), बांत (Banat) आणि सरेम (Srem)प्रतीक आहे.

३९) मायक्रोनेशिया

मायक्रोनेशिया (Micronesia) हा प्रशांत महासागरातील एका छोट्या बेटावर वसलेला देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर ४ चांदण्या आहेत. ह्या ४ चांदण्या शंकरपाळ्याच्या आकारात मांडलेल्या आहेत. चांदण्यांना पंचकोन आहेत. चांदण्यांचा रंग पांढरा आहे. ४ चांदण्या ह्या चूक, पोहंपेई, कोसरे आणि याप (Chuuk, Pohnpei, Kosrae and Yap) या ४ बेटांच्या समूहचे प्रतीक आहे.

४०)चीन

चीन ( China) हा आशियातला सगळ्यात मोठा अणि जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
ह्या देशाच्या ध्वजावर ५ सोनेरी पिवळ्या रंगाच्या चांदण्या ५ कोन असलेल्या आहेत. एक चांदणी मोठी आहे व ४ छोट्या चांदण्या ह्या मोठ्या चांदणीच्या उजव्या बाजुला अर्ध्या गोलाकार आकारात मांडल्या आहेत. ह्या ५ चांदण्या चायनिज् लोकांच्या एकात्मकेचे द्दोतक आहे. ही एकात्मकता चीनच्या कमुनिस्ट पार्टिच्या नेतृत्वा खाली आहे. चीनच्या ध्वजाला लाल ५ चांदण्यांचा ध्वज "Five Star Red Flag" असे ही संबोधतात.

४१) होन्डुरास

होन्डुरास (Honduras ) हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर मध्य भागाच्या पांढर्‍या पट्ट्यावर मध्यभागी X आकारात निळ्या रंगाच्या ५, ५ कोनी चांदण्या आहेत. ह्या ५ चांदण्या मध्य अमेरिकेच्या ५ राज्यांचे (El Salvador, Costa Rica, Nicaragua, Honduras, and Guatemala) प्रतीक आहेत. त्याच बरोबर त्यांना आशा आहे की, हे ५ देश परत एकदा एकत्र येतील.

४२) सॉलोमन द्वीपसमूह

सॉलोमन द्वीपसमूह (Solomon Islands) सॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील ५ पंचकोनी चांदण्या देशाच्या ५ प्रमुख बेटसमूहाचे प्रतीक आहेत.

४३) पापुआ न्यू गिनी

पापुआ न्यू गिनी हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला व इंडोनेशियाच्या पूर्वेला वसला आहे. ह्या देशाच्या ध्वजावर ५ चांदण्या आहे. ह्या चांदण्याला ५ कोन आहेत. हा ध्वजावरच्या चांदण्यांला Southern Cross Flag, 'तारका पुंज' असे ही म्हणतात.

४४) हाँग काँग

हा चीन देशातील एक स्वायत्त प्रदेश आहे. १९९७ साली ग्रेट ब्रिटनने हाँग काँग बेटाची मालकी चीनच्या स्वाधीन केली. ह्या देशाच्या ध्वजावर कलात्मकरित्या काढलेले हाँग काँग मध्ये दिसणारे एक बाउहिनियाचे (bauhinia)फूल आहे. ह्या फूलाला ५ पाकळ्या आहे. प्रत्येक पाकळीत एक पंचकोनी चांदणी आहे. ह्या चांदण्या हाँग काँगच्या लोकांचे आपल्या मातृभूमिवर असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे.

४५) कोमोरोस

कोमोरोस (Comoros) कोमोरोस हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील एक द्वीप-देश आहे. ह्या देशाचा ध्वज २१व्या शतकातला (January 7, 2002) ध्वज आहे. ह्या देशाच्या ध्वजावर ४ चांदण्या आहेत. ध्वजावर चंद्रकोर आहे. चंद्रकोरीच्या २ टोकांच्या मध्ये ह्या ४ चांदण्या आहेत. ह्या चांदण्यांचा रंग पांढरा आहे. ह्या देशात मुस्लिम धर्माचे वर्चस्व असल्यामुळे ध्वजावरील चंद्रकोर आणि चांदण्या ह्या मुस्लिम धर्माचे प्रतीक म्हणून रेखाटलेले आहे. ह्या चांदण्या पंचकोनी चांदण्या आहेत.

४६) तुर्कमेनिस्तान

तुर्कमेनिस्तान (Turkmenistan) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. पांढर्‍या रंगातली चंद्रकोर आणि चांदण्या ह्या तुर्कचे प्रतीक आहेत. ह्या चांदण्या पंचकोन असलेल्या आहेत. ह्या चांदण्या देशाच्या ५ प्रमुख प्रदेश - अहल (Ahal), बालकन् (Balkan), डाछोऊझ् (Dashhowuz), लेबप(Lebap) आणि मारी (Mary) चे प्रतीक आहेत.

४७) सामो‌आ

सामोआ (Samoa): सामोआ हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर तारकापुंज आहे. ह्या तारका पुंजात ४ मोठ्या व १ लाहान चांदणी आहे. ह्या चांदण्या ५ कोनी असून पांढर्‍या रंगाच्या आहेत.

४८) कोसोव्हो

कोसोव्हो (Kosovo) हा बाल्कन प्रांतातील एक वादग्रस्त व स्वायत्त प्रदेश आहे. कोसोव्होने १७ फेब्रुवारी २००८ रोजी सर्बियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही. कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा सर्बियाने केला आहे. आजच्या घडीला संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकुण ६२ सदस्य राष्ट्रांनी स्वतंत्र कोसोव्हो देशाला मान्यता दिलेली आहे. भारत देशाने मात्र ह्या बाबतीत सर्बियाला पाठिंबा दर्शवला आहे.
ह्या देशाच्या ध्वजावर ६ चांदण्या आहेत. ह्यांचा रंग पां ढरा असुन त्या ५ कोनी चांदण्या आहेत. ह्या चांदण्या ध्वजावर रेखाटलेल्या देशाच्या सोनेरी रंगाच्या नकाक्षाच्यावर कमानीच्या आकारात रेखाटलेल्या आहेत. ह्या चांदण्या देशाच्या ६ प्रमुख सांस्कृतिक गटाचे प्रतीक आहेत.

४९) ग्रेनेडा

ग्रेनेडा ( Grenada) : हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर ७ चांदण्या आहेत. एक मोठी चांदणी ध्वजाच्या मध्यभागी आहे. बाकीच्या ६ चांदण्या ध्वजाच्या बाहेरील वरच्या व खालच्या लाल पट्टीवर ३-३ आहेत. ह्या चांदण्या ५ कोनी आहेत. लालपट्टीवरच्या ६ चांदण्या ह्या ६ प्रमुख प्रदेशांचे प्रतीक आहेत आणि मधली मोठी चांदणी ही राजधानी संत जॉर्जचे प्रतीक आहे.

५०) उझबेकिस्तान

उझबेकिस्तान (Uzbekistan) हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तान व किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत.
ह्या देशाच्या ध्वजावर चंद्रकोर आणि चांदण्या आहेत. १२ चांदण्या ह्या १२ शहराचे प्रतीक आहे. ह्या १२ चांदण्यांची मांडणी आकर्षक आहे. ५, ४ आणि ३ च्या समूहाने केलेली आखणी वेगळी वाटते. ह्यां चांदण्याचा रंग पांढरा असून त्या पंचकोनी चांदण्या आहेत.

५१) बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरच्या चांदण्या पांढर्‍या रंगातल्या आहेत. पंचकोनी चांदण्या आहेत व त्यांची संख्या ७ आहे व रांगेच्या वरती व खाली २ अर्ध्या चांदण्या आहेत. ह्या चांदण्यांच्या रांगेची मांडणी तिरकी आहे. ह्या ध्वजावरील चांदण्या युरोपचे प्रतीक आहे. युरोप म्हणजे असंख्य. त्यामूळे ह्या चांदण्यांची रांग वरून खाली अशी रांगेत दाखवली आहे व २ अर्ध्या चांदण्या ह्या असंख्य असल्याचे प्रतीक आहे.

५२) ताजिकिस्तान

ताजिकिस्तान (Tajikistan) ताजिकिस्तान मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत ताजिकिस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. ह्यादेशाच्या ध्वजावरच्या ७ चांदण्या मुकूटावर गोलाकार आकारात रेखाटलेल्या आहेत. ह्यांचा रंग सोनेरी पिवळा आहे. ह्या चांदण्या पंचकोनी चांदण्या आहेत. ध्वजावरचा मुकूट हा ताजिक लोकांचे प्रतीक आहे. जावरच्या चांदण्या ह्या मुकूटावर गोलाकार रेखाटलेल्या आहेत. ताजिक संस्कृतीत ७ ह्या संख्येला खूप मह्त्व आहे. ७ ही संख्या 'अचूकता' दाखवते. ताजिक लोकांच्यामते, मुस्लीम धर्माचा स्वर्ग हा ७ सुरेख ऑर्किड फूलांनी बनलेले आहे. ही फुले ७ पर्वतांनी विभागले गेले आहे. ह्या ७ पर्वतांच्यावर ७ चांदण्या आहेत. आणि ह्या स्वर्गाचेच प्रतीक ह्या ध्वजावर रेखाटलेले आहे.

५३) अबखाझिया

अबखाझिया (Abkhazia)अबखाझिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली अबखाझियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व अबखाझिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी अबखाझिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत. ह्या देशाच्या ध्वजावर ७ चांदण्या आहेत. ह्या ध्वजाच्या मध्यभागी असलेल्या पंजाच्यावर गोलाकार रेखाटलेल्या आहेत. ह्या ७ चांदण्या ह्या देशाच्या ७ विभाग -साडेझेन (Sadzen), बाझेप् (Bzyp), गुमा (Gumaa), अबझायवा(Abzhywa), सामुर्झां (Samurzaqan), दल-टसाबल (Dal-Tsabal ) आणि पस्खुय -ऐबगा (Pskhuy-Aibga) चे प्रतीक आहेत.

५४) डॉमिनिका

डॉमिनिका ( Dominica) : डॉमिनिका हा कॅरिबियन मधील एक छोटा द्वीप-देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर गोलाकार आकारात पंचकोनी चांदण्या आहेत. गोलाच्या आत राष्ट्रपक्षी पोपट रेखाटलेला आहे. ह्या चांदण्या 'आशा' आणि 'समता' दाखवण्यासाठी रेखाटलेल्या आहेत. १० चांदण्या हे १० गावांचे/ विभागांचे (St. Andrew, St. David, St. George, St. John, St. Joseph, St. Luke, St. Mark, St. Patrick, St. Paul, St. Peter) प्रतीक आहेत.

५५) ब्रह्मदेश

ब्रह्मदेश - म्यानमार ( Burma): ह्या देशाच्या ध्वजावर ह्या देशाचे चिन्ह/प्रतीक आहे. ह्या प्रतीकात १४ पंचकोनी चांदण्या आहेत. ह्या १४ चांदण्या गोलाकार आकारात यंत्रचाकाच्या (कॉग व्हिलच्या) बाहेरील बाजूला मांडल्या आहेत. ह्या १४ चांदण्या १४ राज्यांच्या 'एकात्मकतेचे' व 'समतेचे' प्रतीक आहे.

५६) न्यू झीलँड

न्यू झीलँड (New Zealand) न्यू झीलंड हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय दिशेला २००० किमी अंतरावर २ प्रमुख बेटांवर वसलेला एक देश आहे. उत्तर बेट व दक्षिण बेट ही दोन मुख्य बेटे आहेत. ह्या देशाच्या ध्वजावर ब्रिटिशांचा युनियन क्रॉस आणि ४ लाल रंगाच्या, पांढरी बॉर्डर असलेल्या पंचकोनी चांदण्या आहेत. ह्या चांदण्या तारकापूंजाचे ('constellation of Crux') प्रतीक म्हणून रेखाटलेल्या आहेत.

५७) तुवालू

तुवालू (Tuvalu) हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू देशावर कधीकाळी ब्रिटिशांचे साम्राज्य होते, हे ह्या देशाच्या ध्वजाकडे पाहून सहजरीत्या समजते. ह्या ध्वजात ९ चांदण्या आहेत ह्या ९ चांदण्या ९ बेटांचे प्रतीक आहे. ज्या पद्धतिने ह्या ध्वजावर मांडल्या आहेत त्याच पद्धतीने हे बेटे ९० अंशाने घडाळ्याप्रमाणे फिरवल्यास महासागरात दिसतात. ह्या चांदण्यांचा रंग सोनेरी पिवळा असून त्या पंचकोनी चांदण्या आहेत.

५८) अमेरिका

अमेरिका ह्या देशाचा ध्वज जवळ जवळ सगळ्यांनाच माहित आहे. ह्या ध्वजात सगळ्यात जास्त चांदण्या आहेत. ५० चांदण्या!!. ह्या ५० चांदण्या पांढर्‍या रंगाच्या पंचकोनी चांदण्या आहेत. ५० हा आकडा ५० राज्यावरून आलेला आहे. ह्या ५० चांदण्या ९ रांगांमध्ये आहे. पहिल्या रांगेत ६ तर दुसर्‍या रांगेत ५ व तिसर्‍या रांगेत परत ६, अशाप्रकारे ह्या ९ रांगा आहेत.

५९) व्हेनेझुएला

व्हेनेझुएलाच्या ध्वजाला सप्तचांदण्यांचा ध्वज म्हणतात. हा ध्वज १९३० ते २००६ पर्यंत अस्तित्वात होता. ७ वसाह्तींचे ( प्रतीक म्हणून ह्या ७ चांदण्या रेखाटलेल्या आहेत. बार्सिलोना (Barcelona), बारिनास (Barinas), कारकास(Caracas), कूमाना(Cumaná), मार्गारिता(Margarita), मेरिडा(Mérida), आणि ट्रूजिल्लो( Trujillo) ह्या सात वसाहती एकत्र झाल्या आणि त्यांनी स्पेनच्या विरूद्ध लढा दिला.
२००६ नंतर सायमन बोलिवर ह्याने नव्यानेच स्वातंत्र झालेल्या गुयानाच्या वसाहतीचे प्रतीक म्हणून ध्वजावर अजून एक चांदणी रेखाटली. अशाप्रकारे आताच्या ध्वजावर एकूण पंचकोनी ८ चांदण्या आहेत.

६०) केप व्हर्दे

केप व्हर्दे हा पश्चिम आफ्रिकेच्या किनार्‍याजवळचा एक द्वीप-देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर १० पंचकोनी सोनेरी पिवळ्या रंगाच्या चांदण्या आहेत. ह्या गोलाकारात रेखाटलेल्या आहेत. ह्या १० चांदण्या ह्या देशाच्या १० प्रमुख बेटांचे प्रतीक आहेत.

६१) कूक द्वीपसमूह (Cook Island)

कूक द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील अनेक बेटांवर वसलेला एक देश आहे. रारोटोंगा हे कूक द्वीपसमूहातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. राजधानी अव्हारुआ ह्याच बेटावर स्थित आहे.
कूक द्वीपसमूह व न्युए ह्या दोन देशांचे न्यू झीलंड सोबत खुले संबंध (फ्री असोसिएशन) आहेत. ह्या देशाच्या ध्वजावर पंचकोनी १५ चांदण्या गोलाकार रेखाटलेल्या आहे. ह्या १५ चांदण्या कूक देशाच्या १५ प्रमुख बेटाचे प्रतीक आहे.

६२) ब्राझिल

ब्राझिल (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil, मराठी: ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक) हा दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठा देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर पंचकोनी पांढर्‍या रंगाच्या २७ चांदण्या आहेत. ह्या २७ चांदण्या ५ वेगवेगळ्या आकारात रेखाटलेल्या आहेत. ह्या चांदण्याचा समूह दक्षिण गोलार्धातल्या चांदण्याचे प्रतीक आहे.ह्या ध्वजावर ९ चांदण्यांचे समूह आहे. ह्या चांदण्या ब्राझिलच्या २७ राज्यांचेपण प्रतीक आहे.

६३) मकाओ

मकाओ (किंवा मकाउ) हा चीन देशाच्या दोन विशेष शासकीय प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा प्रदेश: हाँग काँग). मकाओ हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. ह्या देशाच्या ध्वजावर पंचकोनी सोनेरी पिवळ्या रंगाच्या ५ चांदण्या अर्धगोलाकारात ध्वजावरच्या कमळावर रेखाटलेल्या आहेत. मध्यभागातील चांदणीचा आकार इतर ४ चांदण्यांपेक्षा मोठा आहे.

६४) इथियोपिया

इथियोपिया हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक देश आहे. इथियोपिया हा जगातील सर्वात प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. जगातील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत. ह्या देशाच्या ध्वजावर मध्यभागी देशाचे प्रतीक आहे. ह्या प्रतीकात पंचकोनी चांदणी आहे. तीचे कड सोनेरी पिवळ्या रंगाचे आहे. ह्या चांदणीच्या बाहेरील कोनांमध्ये सूर्यकिरण आहेत. ते पण सोनेरी पिवळ्या रंगाने रेखाटले आहे. चांदणी ही 'वेगळेपणा' आणि 'एकात्मकते'चे प्रतीक म्हणून ह्या देशाच्या ध्वजावर रेखाटलेली आहे.व सोनेरी सूर्यकिरण हे 'भरभराटिचे' प्रतीक म्हणून रेखाटलेले आहे.

६५) बुरुंडी

बुरुंडी ( Burundi) हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर मध्यभागी ३ चांदण्या आहेत. ह्या ३ चांदण्या ह्या देशाच्या प्रमुख ३ उद्देशाचे प्रतीक आहेत. हे ३ उद्देश म्हणजे समता, काम आणि वाढ. तसेच ह्या ३ चांदण्या ह्या देशाच्या ३ सांस्कृतिक गटांचे द्दोतक आहेत. हे ३ गट म्हणजे हुतु (the Hutu), त्व(the Twa) आणि तुत्सि (the Tutsi). ह्या चांदण्या ६ कोनी चांदण्या आहेत.

६६) इस्रायल

इस्रायल (Israel) अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनार्या)ला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरच्या चांदणीला 'स्टार ऑफ डेव्हिड' असे म्हणतात. ही चांदणी निळ्या रंगाची आहे. ही चांदणी आता पर्यंत पाहीलेल्या चांदणी पेक्षा थोडी वेगळी आहे. आकाशकंदिल तयार करतांना अशी ६ कोनी/टोक चांदणी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते.

६७) इक्वेटोरीयल गिनी

इक्वेटोरीयल गिनी (A Equatorial Guinea) : किंवा विषुववृत्तीय गिनी हा मध्य आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: खंडीय भाग जो कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला आहे, व अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे.
ह्या देशाच्या ध्वजावर ह्या देशाचे प्रतीक ध्वजाच्या मध्यभागी रेखाटलेले आहे. ह्या प्रतीकात चांदण्या आहेत. ६ कमानीच्या आकारात ६ कोनी चांदण्या आहेत. चांदण्यांचा रंग सोनेरी पिवळा आहे. ह्या चांदण्या 'रायो मुनि' चे प्रतीक आहेत.

६८) जॉर्डन

जॉर्डन ( Jordan) हा मध्यपूर्वेचा एक देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरची चांदणी ही पांढर्‍या रंगाची असून तिला ७ कोन आहेत. ही ७ कोन असलेली चांदणी कुराणातील ७ ऋचा आहेत. तसेच ही चांदणी अरब लो़कांच्या एकात्मकतेचे प्रतीक आहे. काहीजण ही चांदणी अम्मण प्रदेशातल्या ७ टेकड्यांचे प्रतीक आहेत असे ही मानतात.

६९) ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया (Australia) : ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. ह्या देशाच्या ध्वजावर ६ चांदण्या आहेत. ह्या चांदण्यांचा आकार वेगवेगळा आहे. एक मोठी ७ कोनी चांदणी आहे ती ब्रिटिश चौकोनाच्या खाली आहे. ह्या चांदणीला 'कॉमनवेल्थ चांदणी' असे संबोधतात. एक छोटी पंचकोनी चांदणी व ४ थोड्या मोठ्या ७ कोनी चांदण्या ह्या ध्वजावर आहेत.

७०) क्रिसमस द्वीप

क्रिसमस द्वीप हे हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. क्रिसमस द्वीप ऑस्ट्रेलियाच्या २,६०० किमी नैऋत्येला व इंडोनेशियाच्या ५०० किमी दक्षिणेला आहे. ह्या देशाच्या ध्वजावर सप्तकोनी ४ चांदण्या व एक छोटी पंचकोनी चांदणी आहे ह्या चांदण्यांचा रंग पांढरा आहे.

७१) कोकोस द्वीपसमूह

कोकोस द्वीपसमूह हा हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखालील एक भूभाग आहे. कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्येला व श्रीलंकेच्या आग्नेयेला वसला आहे. ह्या देशाच्या ध्वजावर सोनेरी पिवळ्या रंगात चंद्रकोर व ५ चांदण्या आहेत. ४ चांदण्या ह्या सप्तकोनी आहेत व त्यांचा आकार हा एका पंचकोनी चांदणी पेक्षा मोठा आहे. हा ध्वज ६ एप्रिल २००४ पासून अस्तित्वात आला आहे.

७२) अजरबैजान

अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते. अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व शिया मुस्लिम वंशाची आहे. ह्या देशाच्या ध्वजावर पांढर्या रंगाची चंद्रकोर व ८ कोन/टोक असलेली चांदणी आहे.

७३) नौरू

नौरू ( Nauru) नौरू हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. नौरू दक्षिण प्रशांत महासागरामधील एका लहान बेटावर वसला आहे. हा जगातील सर्वात लहान द्वीप-देश व सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही. ह्या देशाच्या ध्वजावरची चांदणी ही १२ कोन असलेली चांदणी आहे. ह्या द्विपावर असलेल्या मूळ १२ जमातींचे प्रतीक म्हणून १२ कोन असलेली चांदणी ध्वजावर रेखाटलेली आहे. चांदणी ध्वजाच्या ज्या भागात रेखाटलेली आहे, ती ह्या द्विपाची प्रशांत महासागरात कुठे वसलेला आहे ते दाखवते. चांदणीचा पांढरा रंग हा फॉसफेट (phosphate) खनिजाचे प्रतीक म्हणून रेखाटलेली आहे. ह्या खनिज संपत्तिमुळे देशाला आर्थिक लाभ होतो.

७४) मलेशिया

मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियातील देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावर चंद्रकोर आणि चांदणी आहे. ही चांदणी १४ कोनी आहे. ह्या चांदणीला फेडरल चांदणी 'Federal Star' असे ही म्हणतात. ही चांदणी १४ राज्यांमधील एकतेचे प्रतीक म्हणून ह्या ध्वजावर रेखाटलेली आहे. चांदणी आणि चंद्रकोरीचा रंग सोनेरी पिवळा आहे. ह्या सोनेरी पिवळा रंग मलेशियाच्या राज्य करणार्‍या राजांचा राजरंग आहे. ह्या देशाचा प्रमुख धर्म मुस्लिम आहे.

७५) मार्शल द्वीपसमूह

मार्शल द्वीपसमूह (Marshall Islands) हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. ह्या देशाच्या ध्वजावरील चांदणीला २४ कोन आहेत आणि ही चांदणी देशाचे २४ जिल्हांचे प्रतीक आहे. त्यातील ४ लांब असलेले टोक हे राज्यांचे मु़ख्य ४ सांस्कृतिक विभाग माजुरो, जलयुत, ओटजे आणि ईबेइ (Majuro, Jaluit, Wotje and Ebeye) ह्यांचे प्रतीक आहे.

अबब! चांदण्याचे किती हे प्रकार? ६३ देशांच्या ध्वजावर पंचकोनी चांदणी आपल्याला बघायला मिळते.

१७७७ मध्ये प्रथम पंचकोनी चांदणीचा वापर देशाच्या ध्वजावर रेखाटण्यासाठी झाला आणि तो देश म्हणजे अमेरिका.

५ सारख्या रेषा ३६ कोन करून एकमेकांना जोडून जी आकृती तयार होते त्याला पंचकोनी चांदणी असे म्हणतात ☆. ही पंचकोनी चांदणी जगात सगळीकडे बघायला मिळते. अमेरिकेत पंचकोनी चांदणीही स्वर्गाचे प्रतीक आहे.

लाल रंगाची पंचकोनी चांदणी ही जवळ जवळ सगळ्याच देशात समाजवाद आणि कामगाराचे प्रतीक आहे.

चंद्रकोर आणि चांदणी हे मुस्लिम धर्माचे प्रतीक मानले जाते.

षष्टकोनी चांदणीचा वापर पाश्चिमात्य देशात जास्त केला जातो. षष्टकोनी चांदणी पासून जर एकमेकांमध्ये गुंफलेले २ त्रिकोण तयार झाले की त्या षष्टकोनी चांदणीला 'स्टार ऑफ डेव्हिड' म्हणतात. ह्या प्रकारच्या चांदणीचा वापर ख्रिचन धर्मात प्रामुख्याने केलेला आढळतो.
अष्टकोनी चांदणीचा वापर अरब राज्यात जास्त केला जातो. ह्या चांदणीला हिंदू धर्मात 'लक्ष्मीची चांदणी' असे ही म्हणतात तर मुस्लिम धर्मात 'रब-इल-हिझब' म्हणतात.

आपल्याला ४ कोन ते २४ कोन/टोक असलेली चांदणी ध्वजावर रेखाटलेली दिसते. एक चांदणी, दोन चांदण्या, तीन चांदण्या, चार चांदण्या ते ५० चांदण्यांचा समूह ही आपल्याला ध्वजावर दिसतात. उन्हाळ्यात गांवाकडे बाहेर आंगणात झोपतात. झोपतांना लक्ष आकाशाकडे सहज जातंच! त्यावेळी आकाशातल्या चांदण्या बघायला खूप छान वाटतं.

मग काय मंडळी ध्वजावर जशा चांदण्या दिसतात तशा आकाशात दिसणार्‍या चांदण्या पाहाणार नं!