संपादकीय

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाजालावर मायमराठीने पाऊल ठेवून आज अनेक वर्षे झाली. विविध संकेतस्थळे, अनुदिन्या, वर्तमानपत्रांच्या जालआवृत्त्या वगैरेंच्या रुपांतून मराठीने जालावर चांगलेच मूळ धरले आहे. आपल्या लेकरांनी दाखवलेल्या या नव्या जगात मोठ्या आत्मविश्वासाने तिची वाटचाल चालू आहे.

केवळ आंतरजालच नव्हे तर दैनंदिन जीवनातही हिंदी-इंग्रजी सारख्या मोठ्या लोकसमूहांच्या भाषांच्या विविध माध्यमांतून होणाऱ्या आक्रमणांमुळे प्रादेशिक भाषांचे अस्तित्त्व धोक्यात येऊ पाहत आहे. भाषेच्या सामाजिक स्थानासोबतच आपली सांस्कृतिक संचिते, पूर्वसूरींच्या ज्ञानाचा ठेवा आणि आपली एकूण ओळखच गमावून बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सांस्कृतिक सपाटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी, जागतिकीकरणाच्या वावटळीत आपली भाषा टिकवून ठेवण्यासाठी आंतरजालावरील मराठीच्या वाढत्या वापराचा वाटा सिंहाचा असेल यात शंका नाही.

महाजालावरील प्रत्येक मराठी संकेतस्थळाने आपले वेगळेपण कायम राखले आहे. या वेगळेपणामुळेच परस्परपूरक असे कार्य ही संकेतस्थळे करत आहेत. महाजालावरील मराठीच्या वाढत्या वापरास साहाय्य करत आहेत. 'मातृभाषेतून व्यक्त होणे' ही भावनिक गरज भागवण्याबरोबरच नवनव्या विषयांवर लेखन करून मराठीला नव्या युगाची भाषा करण्यासाठी तिला समृद्धही करत आहेत.

मराठीला दिवाळी अंकांची कित्येक वर्षांची देदिप्यमान परंपरा आहे. केवळ मनोरंजक आणि ललित लेखनच नव्हे तर शतायुषी, ग्रहांकित यांसारखे एखाद्या विषयाला संपूर्णपणे वाहिलेले अंकही मराठीत प्रकाशित होतात. उपक्रम संकेतस्थळाचा दिवाळी अंक याच परंपरेतले पुढचे पाऊल ठरावे अशी आमची इच्छा आहे.

'उपक्रम'चा पहिला दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे! या संकेतस्थळाची अभ्यासपूर्ण, माहितीप्रधान लेखन, विषयांचे वैविध्य आणि माहितीपूर्ण प्रतिसाद ही वैशिष्ट्ये या दिवाळी अंकामध्येही आपणाला जाणवतील असा विश्वास वाटतो. भाषा, साहित्य, राजकारण, समाजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, गणित, तत्त्वज्ञान, ज्योतिष, इतिहास, प्रवास या विविध विषयांनी हा अंक सजलेला आहे. उपक्रमावरील सदस्यांनी या दिवाळी अंकाला दिलेल्या विविधरंगी लेखांबद्दल उपक्रम त्यांचे आभारी आहे.

अंकाप्रती आमच्या असलेल्या भावना ७०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओळींतून व्यक्त करून 'उपक्रम'चा पहिला दिवाळी अंक आम्ही प्रकाशित करत आहोत.

तरी न्यून ते पुरतें। अधिक तें सरतें।
करूनि घेयावें हें तुमतें। विनवितु असे ||