एक डॉलरचे रहस्य

प्रियाली

पृष्ठ २

त्यानंतर इ.स. १७१७ साली किंवा त्या सुमारास इंग्लंडमध्ये फ्रीमेसन्स संस्थेचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मेसन्स हे दगड कापणारे, घडवणारे आणि शिल्पकाम करणारे पाथरवट असले तरी १८ व्या शतकात या संस्थेचे पुनरुत्थान काही राजकारणी, उमराव, साहित्यिक, व्यावसायिक आणि कलाकारांनी केल्याचे सांगितले जाते. १८ व्या फ्रीमेसनरीची घटना, विधी,

फ्रीमेसनरीचे बोधचिन्ह

गुपिते, कूटशब्द इतकेच नव्हे तर नवी लिपी तयार करण्यात आली. कूटशब्द आणि गुपिते राखून ठेवण्यासाठी प्राणांची शपथ घालण्याची प्रथा निर्माण करण्यात आली. मुख शहरांत फ्रीमेसन्सची आलिशान आणि ऐश्वर्यसंपन्न सभागृहे आहेत. यांना ग्रँड लॉजेस म्हणून ओळखले जाते. स्थापत्यशास्त्राची उपकरणे वापरून त्या मध्यभागी G लिहिलेले शेजारील चित्रातील हे बोधचिन्ह पाश्चात्य जगतात कुठेना कुठे नजरेस पडते. या अक्षराचे गूढही कोणाला सुटलेले नाही. God, Goodness, Geometry अशा अनेक अटकळी बांधल्या जातात. तरी, जगातील सर्वश्रेष्ठ स्थापत्यकार ईश्वराला मानवंदना देण्यासाठीच G हे अक्षर येते असे अनेकजण मानतात. युरोपातील आणि प्रामुख्याने अमेरिकन सरकारवर या संघटनेचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. फ्रीमेसनरी ही तिच्या राजकारणातील सहभागामुळे बऱ्यापैकी कुप्रसिद्धही गणली जाते. राजकीय हत्या, हल्ले, स्थित्यंतरे यांत या संस्थेचा सहभाग असल्याच्या वदंता प्रसिद्ध आहेत.

परंतु, या सर्व सांगोवांगीच्या कथा आहेत की यात काही तथ्यांशही आहे याचा मागोवा घेताना तज्ज्ञ ही कॉन्स्पिरसी थिअरी अर्थातच मोडीत काढतात. त्यांचे काही ठोस मुद्दे असे -
अमेरिकेचा शिक्का निश्चित करण्यात बेंजामीन फ्रँकलीन हे एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत इतर अनेक होते आणि ते फ्रीमेसन असल्याचे पुरावे नाहीत. अमेरिकन शिक्क्यातील फ्रँकलीन यांनी सुचवलेला काही भाग नाकारण्यातही आला होता. बॉस्टन टी पार्टीची आखणी सर्वस्वी फ्रीमेसन्सनी केली होती याला पुष्टी देणारे संदर्भ सापडत नाहीत. फ्रीमेसन्स आणि इजिप्त व इजिप्तमधील पिरॅमिडस यांचा कोणताही संबंध असल्याचे दाखले नाहीत. हायरम अबीफच्या खुनाचा ऐतिहासिक पुरावा मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्राणांची शपथ घालण्याचा विधी फ्रीमेसन संस्थेत रुजू झाल्याची कथा केवळ दंतकथा आहे. फ्रीमेसनरी ही कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाची संस्था असल्याचे सिद्ध झालेले नाही. काही विद्वानांनी एकत्र येऊन सुरू केलेली आणि स्वयंप्रेरणेने ज्यांना या संस्थेत सहभागी व्हावे असे वाटते त्यांना सभासदत्व देणारी ही संस्था आहे इतकेच.

याचप्रमाणे, एक डॉलरच्या रहस्याचा मागोवा घेता, या नोटेवरील १३ पायऱ्यांच्या पिरॅमिडमधील १३ हा आकडा अमेरिकेच्या १३ मूळ वसाहती दर्शवतो. हा अपूर्ण पिरॅमिड राष्ट्रबांधणीचे आणि एकजूटीचे काम अद्याप बाकी आहे असे सांगतो. या पिरॅमिडच्या पायथ्याशी असणारा MDCCLXXVI हा रोमन क्रमांक १७७६ हे वर्ष दर्शवतो. १७७६ मध्ये अमेरिकेच्या "डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडस"वर शिक्कामोर्तब झाले होते. Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ आहे "नव्या युगाची व्यवस्था" कारण ते १७७६ सालापासून सुरू झाले असे गणले जाते.
रहस्य, गुपिते, थरार यांचे मानवी मनाला अनादी कालापासून आकर्षण आहे. दंतकथा या सत्यापेक्षा अधिक आकर्षक असतात आणि लोकांच्या मनात घर करून राहतात. त्या सर्वस्वी खऱ्या असतीलच असे नाही पण तथ्यांश नक्कीच असू शकतो. आपल्याला विश्वासाचा कोणता धागा पकडून पुढे जायचे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, इतरांपेक्षा आपल्याला काकणभर अधिक ज्ञान आहे, वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि आपण त्या इतरांपासून सुरक्षित ठेवू शकतो ही भावना माणसाला लहानपणापासूनच सुखावत असते. इतिहासात अनेकदा अशा गुप्तसंस्थांचा उल्लेख आढळतो. प्रायॉरी ऑफ झायन नावाची राजवंशाचे किंवा येशूच्या वंशाचे पुरावे जपून ठेवणारी आणि त्यांना संरक्षण देणारी गुप्तसंथा, भक्त आणि श्रद्धाळूंच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली नाइट टेंप्लार ही संघटना, रहस्यांचे राखण करून राजकारणात आपला ठसा उमटवणारी फ्रीमेसन्स ही संघटना आणि यापेक्षा थोड्या वेगळ्या गुन्हेगारी वाटेने जाणाऱ्या असॅसीन किंवा हश्शाशीन ही हशीशाच्या अंमलाखाली सदस्यांकडून गुन्हे करवून घेणारी संघटना आणि खुद्द भारतातील ठग या नावाने प्रसिद्ध पावलेली गुन्हेगारी संघटना अशा अनेक गुप्त संघटना जगाच्या इतिहासात कार्यरत असल्याचे आढळून येते. या संघटनांत सामील होण्यासाठी लागणारी सदस्य पात्रता, त्यांचे शपथविधी, गुप्त ठिकाणी गुप्ततेत पार पाडले जाणारे विधी, त्यांची कार्यपद्धती या सर्वांनी समाजाला वर्षानुवर्षे भुऱळ पाडली आहे. डॅन ब्राऊनची नवी कादंबरी लवकरच येत आहे आणि ती सुलेमान राजाने बांधलेले प्राचीन मंदिर आणि फ्रीमेसन्स या गुप्तसंस्थेवर आधारित आहे. त्या कादंबरीच्या निमित्ताने फ्रीमेसनरीवर पुनश्च चर्चा सुरू होईल. नवी माहिती बाहेर येईल. नवी संशोधने केली जातील. तूर्तास, ही संस्था अद्यापही जगभरात कार्यरत आहे आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष फ्रीमेसन्स होते एवढे सत्य एक डॉलरच्या नोटेवरच्या या चिन्हामागील रहस्याचे गूढ कायम राखण्यास पुरेसे आहे.


लेखासाठी वापरलेली सर्व चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.
संदर्भः

Comments

एक डॉलरचे रहस्य

Good website, I discover very good and informative 350-001 practice exam post! keep up the good work. we need more good statements. Keep it up. i have bookmarked 350-040 practice exam your site for future reference I really appreciate your way of presenting 352-001 practice exam such an excellent suggestion. I want more and i will come back here, regards

रोचक लेख

डॉलरबद्दल गमतीदार माहिती आवडली.

योगायोगाने मी सध्या उंबेर्तो एको यांचे "फूको'ज पेंड्युलम" हे पुस्तक वाचत आहे.
देवालयाचे शिलेदार (नाइट्स टेम्प्लार), गुलाबी क्रूस संस्था (रोझिक्रुशियन्स), फिदायीन (इस्माइली हशीशी = असॅसिन), झायनवादी यहूदी, ..., या सर्व कट-संशयांचा (कॉन्स्पिरसी थियरींचा) मोठा मनोरंजक गोपाळकाला केलेला आहे.

(डॅन ब्राउन याचे अर्धशिक्षित इंग्रजी लेखन, पण थरारक कथावस्तूनिर्मिती, असे वैशिष्ट्य आहे. एको यांची कादंबरी त्या मानाने लेखनाच्या बाबतीत उजवी आहे, पण कथावस्तू "क्लासिक" आहे, त्यामुळे डॅन ब्राउन यांच्या कादंबर्‍यांइतकी लोकप्रिय होण्याची काहीच शक्यता नाही.)

-धनंजय
("निनावी")

योगायोगाची कथा

>>योगायोगाने मी सध्या उंबेर्तो एको यांचे "फूको'ज पेंड्युलम" हे पुस्तक वाचत आहे.

योगायोगानेच गुरुवारी मी उंबेर्तो एको यांच्या "द नेम ऑफ द रोज" या कादंबरीची ऑडिओ सीडी आणली होती. या आठवड्यापासून ऐकायला सुरुवात करावी म्हणून अद्याप बॉक्स उघडलेला नाही. :-)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रोचक

लेख आवडला.

सुरेख

मस्त लेख

-आजानुकर्ण

छान

माहितीपूर्ण आणि रोचक लेख. आवडला.
-वरदा