बेट्याने अगदी बेसिकपासून सुरवात केली.
"फोन चालू असला तर तो जनरली लॉक असतो त्याला अन्लॉक करायचा"
"ते कसं? " मलाही हा प्रश्न होता पण नातवाला कसं विचारायचं... हिने विचारलं ते बरं केलं
"आधी हे डावीकडचं कोपर्यातलं बटण दबायचं आणि मग लगेच "*". प्रत्येक कंपनीच्या मोबाईलमध्ये अन्लॉक करायची वेगळी स्टाईल असते. या सेटमध्ये असा करायचा. "
"हुश्श! झाला एक प्रवास. या मुंबईत यायचं म्हणजे गर्दीच्या वेळा चुकवून यायला लागतं" वगैरे विचार करत मी मुलाच्या घरचे जिने चढत होतो. मुलाने सामान वर नेलं होतंच. तसं त्याचं घर अगदी पहिल्या मजल्यावर आहेत. पण पूर्वीपासूनच मला जिना चढायचा कंटाळा. मी वर पोचल्यावर नजर मुलापेक्षा नातवाला शोधू लागली.
मोठे साहेब बाहेर गेले होते, धाकटे साहेब अगदी मस्त अंघोळ उरकून बसले होते. आजी रंभेचा खरवस देत होती त्याचं तिच्या भोवती घुटमळणं चालू होतं. अचानक काय झालं काय ठाऊक. स्वारी येऊन एकदम बिलगली. आताच त्याने आजीकडून बंबाबद्दल ऐकलं आणि आला.. बंब म्हणजे काय ते विचारत. लहान आहे, पण हुशार आहे चांगला.
दिवस जाऊ लागले तसे मुंबईत रुळू लागलो होतो. एका मंगळावारी सिद्धिविनायकाला जाऊन येतो असं म्हटलं तर मुलगा लगेच
"अहो कशाला इतक्या दूर? असं करू रविवारी मी जातो घेऊन. "
"नको मंगळवारीच जाईन, दुपारी जाईन गाड्यांना गर्दी कमी झाली की. तिथे सुरेशकडे राहीन नि बुधवारी सकाळी परत. "
"बरं मग एक काम करा. तो मोबाईल जवळ ठेवा! "
"काय उपयोग त्याचा.. त्यांना कुठे येतोय वापरता" कोणत्याही कर्तव्यदक्ष पत्नीप्रमाणे आमचा गाढवपणा हिने सगळ्यांसमोर उघड केलाच.
"अहो त्यात काय एवढं. अगदी अभीही वापरतो. अभी!, आजोबांना शिकवशील ना सेल वापरायला? "
धाकटे वीर काय एका पायावर तय्यार!
दुसऱ्या दिवशी आमचे मोबाईल कसा वापरावा यावर क्लास चालू झाले. ही देखील दुसऱ्या बाजूला बसून समजून घेऊ लागली. अभी आजी-आजोबांना अगदी मन लावून शिकवत होता. फार गोड वाटत होता.
"हे बघा आजोबा, इथे जे बटण असतं ना त्याने मोबाईल चालू करता येतो. आणि तेच बटण दाबलं की बंद! "
बेट्याने अगदी बेसिक पासून सुरवात केली.
"फोन चालू असला तर तो जनरली लॉक असतो त्याला अन्लॉक करायचा"
"ते कसं? " मलाही हा प्रश्न होता पण नातवाला कसं विचारायचं... हिने विचारलं ते बरं केलं.
सिम कार्ड
"आधी हे डावीकडचं कोपऱ्यातलं बटण दबायचं आणि मग लगेच "*". प्रत्येक कंपनीच्या मोबाईलमध्ये अन्लॉक करायची वेगळी स्टाईल असते. या सेटमध्ये असा करायचा. "
"बरं मग? नंबर कसा लावायचा. एक तर तुमचे ते मोठाले नंबर लक्षात राहणं मुष्किल"
नातवाने काय आजोबा इतकी माहीत नाही? असा दृष्टिक्षेप टाकला आणि सांगू लागला
"आबा! सेलमध्ये नावं स्टोअर करता येतात. म्हणजे साठवता येतात. नंबर न शोधता नावच शोधायचं. समजा तुम्हाला घरी फोन करायचाय तर मग 'होम' साठी इथे ज्यावर एच लिहिलं आहे तो नंबर दाबायचा. बघा बरं कुठे एच लिहिलं माहे "
"पोरगा हाडाचा शिक्षक आहे हो" आजीने कौतुक सुरू केलंच
मला एच दिसला होताच "हा बघ चारच्या आकड्याखाली GHI आहे. "
"राइट! म्हणून एच साठी चार दोनदा दाबायचा एकदा जी आणि मग एच. असं करत होम लिहीत असतानाच होमचा नंबर दिसेल मग हे कॉलचं बटण दाबायचं की लागला फोन! "
"आणि फोन झाल्यावर बंद करायचा का? "
"नाही फक्त एंड कॉलच बटण दबायचं. फोन लॉकही आपोआप होतो. "
"अरे वा.. हाताळणं अगदी कठीण नाही आहे. पण काय रे मोबाईलमुळे आपल्याला ऐकू कसं येतं? त्याच्या आत काय असतं? "
"मला नाही माहीत.. दादाला विचारूया... ए दादा.. ए ऽऽ दाऽऽदाऽऽ"
"काये" दादा वैतागत बाहेर आला
"मोबाईलच्या आत काय असतं.. आवाज कसा येतो? वगैरे त्याला विचारत होतो तर त्याने तुला बोलावलं"
"आबा! मोबाईलला ऊर्जा बॅटरीतून मिळते म्हणून ती सतत चार्ज करतो ते तुम्ही पाहिलं असेलच.. मोबाईलच्या आत मध्ये सिम कार्ड असतं. हे बघा"
"सिम म्हणजे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्युल. साधारणतः सिमकार्डात सबस्क्रायबरला, म्हणजे सेवादात्याच्या प्रणालीला समजेल अश्याप्रकारे मोबाईलची ओळख असते. या सिम वरून मोबाईलचा क्रमांक, त्याचे स्थान वगैरे या सेवादात्याच्या प्रणालीला कळते. साधारणतः सिमकार्डात आपले नाव, स्थान, फोन क्रमांक, परवलीचा विदा, विदा सुरक्षा प्रणाली असते. याशिवाय काही प्रमाणात मेमरी असल्याने संपर्काचे क्रमांक, मेसेजेस साठवता येतात. "
मोबाईलचे अंतरंग
"अच्छा म्हणजे हे सिम मोबाईलची ओळख असते तर"
"बरोबर.. नुसती ओळख नाही तर बाहेरच्या जगाशी संपर्काचा दुवा देखील. "
"बाकी तुला मोबाईलचे पार्टस माहीत आहेत का"
"हो बरेचसे आहेत. तुम्हाला एक चित्र दाखवतो... "
"यात वर ब्रासची एरियल दिसते आहे. याचा उपयोग सिग्नल्स पकडण्यासाठी होतो. त्याखाली स्क्रीनचा पडदा आहे व त्याच्याच खाली त्या पडद्याला कंट्रोल करणारा विभाग आहे. बॅटरी कनेक्टर आणि सिम कनेक्टरचा वेगळा उपयोग सांगायला नकोच. हे जे आर एक युनिट आहे ना हे आपल्या मोबाईलचं तोंड आणि कानही. हा सिग्नल बाहेर पाठवताना रेडियो फ्रिक्वेंन्सीमध्ये परिवर्तित करतो तर आलेले सिग्नलची उकल करून समजूनही घेतो. उरला सीपीयू,, मेंदूप्रमाणे सगळ्या मोबाईलच्या भागांवर नियंत्रण ठेवणे, विदाव्यवस्थापन हे त्याचं काम. "
"पण काय रे आपण बोलतो ते काय बोलतो हे आर एफ ला कसं समजतं? "
"बरं झालं प्रश्न विचारलात. हा आहे एडी विभाग. म्हणजे ऍनालॉग / डिजीटल कन्व्हर्टर. आपला आवाज ऍनालॉग तरंगांमध्ये असतो त्याला हा विभाग डिजीटल तरंगांमध्ये परिवर्तित करतो. तसंच आलेले डिजीटल तरंगांना आपल्याला समजेल अश्या आवाजात आणण्यासाठी पुन्हा ऍनालॉग रूप देतो. आता हे सगळं कसं होतं ते सांगत बसलो ना आबा तर माझा क्लास बुडेल.. "
"नाही रे बास झालं.. बाकी नंतर बोलू.. तू पळ क्लासला"
बाजूला छोटे महाशय नव्हतेच.. ते केव्हाच पळाले होते बाहेर.
त्यादिवशी पोरांनी शिकवल्यावर मला मोबाईल किती चालवता येईल हे सांगणं तेव्हा कठीण होतं.. पण नव्या तंत्रज्ञानाने भरलेलं नातवांचं हे जग मात्र मला अजूनही शिका म्हणत खुणावत होतं..
दिवाळी अंकात या मालिकेतील पहिले पुष्प देत आहे. या मालिकेतील पुढील भाग उपक्रमावर वेळोवेळी प्रसिद्ध होतीलच.