विज्ञानाची अपरिहार्यता

निखिल जोशी

सजीवांच्या पुनरुत्पादनादरम्यान जी म्यूटेशन घडतात त्यांचेही काही विवेकी 'कारण' नसते. "त्या सजीवाला केवळ असे 'वाटते' की पिल्लांना नवा जनुक अधिक फायदेशीर ठरेल" असे त्या म्यूटेशनचे वर्णन शक्य आहे. हे म्यूटेशन मूळ जनुकापेक्षा निराळी भाकिते करते. उदा., मूळ जनुक मेलॅनिन कमी बनविणारे असेल आणि नवे जनुक अधिक मेलॅनिन बनविणारे असेल तर मूळ जनुकाने असे भाकित केलेले असते की "ऊन वाढणार नसून त्वचेच्या कर्करोगाची भीती नाही" आणि नव्या जनुकाचे भाकित असते की "ऊन कमी होणार नसून ड जीवनसत्वाची कमतरता भासण्याची भीती नाही". ज्या जनुकाचे भाकित योग्य ठरते त्याची धारक पिल्ले अधिक संख्येने टिकतात. परंतु, पराभूत जनुक कमी संखेने टिकून राहिल्यास जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा त्याची भाकिते खरी ठरू लागतात आणि त्याच्या धारक पिल्लांची संख्या पुन्हा वाढू लागते.

'श्रद्धा विरुद्ध बुद्धिप्रामाण्य' या वादात कधीकधी "विज्ञानावरतरी तुमची श्रद्धा आहेच ना?" असा प्रतिप्रश्न केला जातो. त्यामागे पुढीलप्रमाणे युक्तिवाद असतो:

जर आत्मा नाही, जर आपण केवळ अणुरेणूंचे बनलेलो असू तर आपले सर्व विचारही निर्जीव रासायनिक/भौतिक अभिक्रिया आहेत. त्यांना सुचलेल्या मतांना 'योग्य/अयोग्य, सत्य/असत्य ठरविणे निरर्थक आहे. उदा., जर "मेंदूत एका मज्जापेशीने तिच्या डावीकडील मज्जापेशीत विद्युत संदेश पाठविला तर आपल्याला २+२>३ वाटते आणि तिने तिच्या उजवीकडील मज्जापेशीत विद्युत संदेश पाठविला तर आपल्याला २+२<३ वाटते" इतकाच आपल्याला काहीही 'वाटण्याचा' अर्थ असेल तर "२+२>३ हे विधान योग्य आणि २+२<३ हे विधान चूक" असे वाटण्याला काहीच अर्थ उरणार नाही. "२+२<३" आणि "२+२>३" यांपैकी विजेत्याची निवडही एक तितकाच निर्जीव विद्युतप्रवाह करीत असेल तर त्याची विश्वासार्हताही तितकीच संशयास्पद असेल. म्हणूनच, जडवादी विचारसरणीने बुद्धिप्रामाण्याचे समर्थन शक्य नाही.

या युक्तिवादाचा प्रतिवाद करण्यासाठी हा लेख आहे. ऑकॅमचा वस्तरा या संकल्पनेची अपरिहार्यता मांडणे हा दुसरा उद्देश आहे.

विज्ञानाचे उद्दिष्ट

'अभ्युपगम-परीक्षा-निष्कर्ष' अशी विज्ञानाची व्याख्या केली तर विज्ञान हे केवळ मानवजातीचे वैशिष्ट्य नाही. कार्ल सगान, कार्ल पॉपर यांच्यामते सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीसोबतच वैज्ञानिक प्रक्रियेला सुरुवात झाली. उत्क्रांतीच्या प्रक्रियेची वैज्ञानिक दृष्टिकोनाशी तुलना करण्याआधी प्रचलित वैज्ञानिक प्रक्रियेचे एक उदाहरण पाहू. एखादा अभ्युपगम एखाद्या वैज्ञानिकाला का सुचतो याचे काहीही कारण नसते. तो योग्य असावा असे त्याला केवळ 'वाटते' म्हणून त्याची परीक्षा घेतली जाते. परीक्षेच्या सर्वात सोप्या प्रकारात, 'तो अभ्युपगम योग्य नाही' या पर्यायी अभ्युपगमासोबत त्याची शर्यत लावली जाते. त्यासाठी, त्या दोन्हींचा वापर करून काही भाकिते केली जातात. ज्याची भाकिते कमी चुकतील तो योग्य असल्याचा निष्कर्ष काढला जातो. परंतु, पराभूत अभ्युपगम योग्य असण्याची शक्यता खुली ठेवण्यात येते आणि तशी तपासणी वारंवार केली जाते.

याच धर्तीवर, सजीवांच्या पुनरुत्पादनादरम्यान जी म्यूटेशन घडतात त्यांचेही काही विवेकी 'कारण' नसते. "त्या सजीवाला केवळ असे 'वाटते' की पिल्लांना नवा जनुक अधिक फायदेशीर ठरेल" असे त्या म्यूटेशनचे वर्णन शक्य आहे. हे म्यूटेशन मूळ जनुकापेक्षा निराळी भाकिते करते. उदा., मूळ जनुक मेलॅनिन कमी बनविणारे असेल आणि नवे जनुक अधिक मेलॅनिन बनविणारे असेल तर मूळ जनुकाने असे भाकित केलेले असते की "ऊन वाढणार नसून त्वचेच्या कर्करोगाची भीती नाही" आणि नव्या जनुकाचे भाकित असते की "ऊन कमी होणार नसून ड जीवनसत्वाची कमतरता भासण्याची भीती नाही". ज्या जनुकाचे भाकित योग्य ठरते त्याची धारक पिल्ले अधिक संख्येने टिकतात. परंतु, पराभूत जनुक कमी संखेने टिकून राहिल्यास जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा त्याची भाकिते खरी ठरू लागतात आणि त्याच्या धारक पिल्लांची संख्या पुन्हा वाढू लागते. (प्रकाशाचा वेग सांत असल्याचे गॅलेलिओचे भाकित तुटपुंज्या उपकरणांमुळे पराभूत ठरले, नव्या परिस्थितीत रोमर आणि फिजाऊ यांनी ते विजयी ठरविले ही तुलना येथे समर्पक आहे.) अशा प्रकारे, प्रत्येक पिढी काही भाकिते करते आणि टिकून राहण्याच्या निकषावर ती भाकिते जनुकांमध्ये स्वीकारली जातात. सजीवांची सर्व वागणूक ही त्या जनुकांनी नियमित असल्यामुळे ती सर्व वागणूक ही 'परिस्थिती समजून घेतल्यासारखी', म्हणजेच 'सत्याचे ज्ञान झाल्यासारखी' असते. ("२+२<३" हे विधान जगण्यासाठी आवश्यक असेल तेच योग्य वाटेल.)

अशा प्रकारे, निर्जीव प्रक्रियांतून सजीवांना 'सत्याचे ज्ञान' होते. जनुकांच्या पातळीवर घडणारी ही वैज्ञानिक प्रक्रिया खूपच मंदगती असते कारण एका सजीवाच्या आयुष्यात एकच प्रयोग केला जातो. त्यानंतर, पिल्लांच्या आयुष्यभर ती पिल्ले 'प्रचलित वैज्ञानिक सिद्धांतावर' श्रद्धा ठेवून जगतात. मेंदूमुळे मात्र, एकाच मेंदूधारी सजीवाच्या आयुष्यात लाखो वेळा अभ्युपगम तपासता येतात असा बदल हल्लीच्या विज्ञानात घडलेला आहे. त्यामुळे, एकाच सजीवाच्या आयुष्यात परिस्थिती बदलल्यास जुने सिद्धांत(=श्रद्धा) टाकून देऊन टिकून राहण्याची शक्यता वाढविता येते.

अशा प्रकारे, टिकून राहण्याच्या स्पर्धेत 'अभ्युपगम-परीक्षा-निष्कर्ष' या प्रक्रियेला काहीही पर्याय नसला तरी वैज्ञानिक दृष्टिकोन ही काही एक विशिष्ट विचारपद्धती नाही, "जे कृत्य स्वसंरक्षण करेल, अधिक पिल्ले बनवेल, ते कृत्य करावे" या धोरणाचे 'वैज्ञानिक दृष्टिकोन' हे केवळ लघुरूप आहे. अधिक संसाधने जमविणे ही कृती पिल्ले बनविण्यास मदतीची असल्यामुळे 'फायदा मिळविणे' असेही वैज्ञानिकतेचे उद्दिष्ट असू शकते. किंबहुना, हल्ली वैज्ञानिक दृष्टिकोनाचे थेट उद्दिष्ट पिल्ले बनविणे नसून फायदा देणारे सत्य शोधणे हेच असते. म्हणजेच, मूळ आक्षेपाचा विचार करता, "वैज्ञानिक दृष्टिकोनावर श्रद्धा आहे" असे नसून "फायदा हवा, टिकून रहावे, पिल्ले बनवावी" इ. सजीवत्वाच्या व्याख्या (=श्रद्धा) आहेत आणि (त्यांना नाकारणे शक्य असते परंतु) ज्या श्रद्धा टाळण्याची कुवत नसेल त्यांच्या परिपूर्तीच्या दिशेने केलेले प्रयत्न म्हणजे वैज्ञानिकता होय.

फायदा

वरील वर्णनातून असे दिसते की टिकून राहण्याची क्षमता किंवा फायदा हेच विज्ञानाचे उद्दिष्ट असते. त्यामुळे, अधिक फायदा देणार्‍या सिद्धांताला अधिक अचूक, अधिक वैज्ञानिक म्हटले पाहिजे. परंतु हा निकष अपुरा आहे. प्रतिस्पर्धी सिद्धांताच्या भाकितांमुळे होणारा फायदा समान असला तरी मुळात ती भाकिते करण्यास लागणारा वेळ भिन्न भिन्न असू शकतो. कोणत्याही सिद्धांतात किमान एकतरी समीकरण असतेच. हे समीकरण सोडवून भाकित केले जाते. उदा., फेकलेला दगड किती दूर पडेल याचे भाकित करण्यासाठी २*v*cosθ*sinθ/g हे समीकरण वापरता येते. यासाठी, समजा, आधी θ या कोनाची अर्धज्या शोधावी लागेल, मग कोज्या शोधावी लागेल, मग गतीचा वर्ग करावा लागेल आणि शेवटी तीन गुणाकार आणि एक भागाकार करावे लागतील. परंतु, जर कोणत्याही एका कोनाची अर्धज्या शोधण्यासाठी समानच वेळ लागणार असेल तर v*sin२θ/g हे समीकरण अधिक वेगाने सोडविता येईल. हा वेगांतील फरक कदाचित काही नॅनोसेकंदांचा असला तरी प्रतिस्पर्धी देशांच्या ICBM मधील संगणकाच्या कार्यक्षमतांच्या काही नॅनोसेकंद तफावतीवर विजय अवलंबून असू शकतो. विज्ञानामध्ये कोणताही सिद्धांत हा तत्कालीन परिस्थितीपुरताच स्वीकारला जातो. त्यामुळे, जोवर भाकिते करण्यात समान यश मिळत असेल तोवर किमान घटक आणि किमान पायर्‍या असलेल्या सिद्धांतानुसार समीकरणे सोडविण्यातच सर्वाधिक फायदा असतो आणि तो सिद्धांतच सर्वोत्तम म्हटला जातो. या निकषाला ऑकॅमचा वस्तरा म्हटले जाते.

भाकिते करण्याव्यतिरिक्त, उपलब्ध माहितीची 'नीट' सोय लावण्यासाठीही ऑकॅमच्या वस्तर्‍याचा वापर होऊ शकतो. उपलब्ध माहिती अशी असेल की "अवकाशात एका बिंदूभोवती काही ग्रह फिरताना दिसतात परंतु त्या बिंदूतून काहीही प्रकाश येत नाही" तर अशा परिस्थितीत तेथे कृष्णविवर असण्याची शक्यता मानली जाते. वास्तविक, तेथे कृष्णविवराऐवजी डायसनचे कवचही असू शकते. परंतु डायसनचा गोळा गृहीत धरण्यासाठी तेथे अतिप्रगत सजीवांचे अस्तित्वसुद्धा गृहीत धरावे लागते. त्यामुळे ही शक्यता सत्य असल्याची संभाव्यता कमी असते. त्याउलट, कृष्णविवर मदतीशिवाय तयार होऊ शकते. कुत्र्याने गृहपाठ फाडण्याची शक्यता कमी असल्यामुळे शिक्षक विश्वास ठेवत नाहीत. वैद्यकात एक म्हण आहे की दुर्मीळ रोगाचे निदान केलेत तर ते क्वचितच योग्य ठरेल. हा वापर ऍड हॉकिजमला विरोध करतो. "३ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर, १७ ऑक्टोबर, २४ ऑक्टोबर, आणि ३१ ऑक्टोबर या तारखांना सर्वात कमी प्रदूषण झाले" या निरीक्षणातून, "ऑक्टोबरच्या रविवारी सर्वात कमी प्रदूषणे झाली" असा 'नियम' शोधावा असे ऑकॅमचा वस्तरा सांगतो. नियम शोधल्यामुळे उपलब्ध माहितीला कमी शब्दांत साठविता येते हा फायदा असतो.

नाकारलेल्या शक्यता सत्य असल्याचे नव्या माहितीच्या उपलब्धतेनंतर सिद्ध होऊ शकते. त्यामुळे, ऑकॅमचा वस्तरा खात्रीचा नसल्याचा गैरसमज होऊ शकतो. परंतु, ऑकॅमच्या वस्तर्‍याचे ध्येयच मुळी 'उपलब्ध माहितीची सर्वोत्तम नियमबद्ध सोय लावणे' असे आहे. 'अंतिम सत्य' सापडल्याचा दावा मुळात विज्ञानच कधी करीत नाही, त्यामुळे ऑकॅमच्या वस्तर्‍याला 'अधिक बेभरवशाचा' ठरविणे निरर्थक आहे.