कलकत्ता कॅलेडोस्कोप - २

भाग २

कलकत्त्यातले दोन मोठे हिंदी भाषक समाज म्हणजे बिहारी व मारवाडी. यात भोजपुरी, मैथिली आणि खुद्द मारवाडी भाषांचाही समावेश आहेच. दोन्ही समाज कलकत्त्यात १००-१५० वर्षांपासून स्थायिक आहेत आणि ढोबळ मानाने आर्थिक स्पेक्ट्रमच्या दोन टोकांना आहेत. या दोन्ही टोकांच्या बरोबर मध्ये बंगाली सुशिक्षित मध्यमवर्ग - हिंदू भद्रलोक - स्वत: ला बसवतो. पावसाळ्यात चिखलातून चालताना साडी जपावी, तसा हा वर्ग स्वत:ला आणि स्वत:च्या भाषेला, या दोन्ही टोकांच्या हिंदीपासून वाचवू पाहतो. युरोपच्या कानाकोपर्‍यातल्या भाषा मोठ्या अभिमानाने शिकणारे भद्रलोक, 'मला हिंदी अजिबात येत नाही!' हेही तितक्याच अभिमानाने सांगतात. यात काहीसा वाटा केंद्र सरकारच्या हिंदी-राष्ट्रभाषा धोरणाविरुद्ध जागृत झालेल्या प्रांतिक, भाषिक अस्मितेचा आहे. पण बिहारी रिक्षाचालकांना, कर्मचार्‍यांना बंगाल्यांहून 'नीच', आणि मारवाडी व्यापारी वर्गाला 'तुच्छ' आणि 'भडक' लेखण्याचाही तेवढाच वाटा आहे. पण हिंदी भाषा शहरात बाजारपेठ आणि रस्त्यापलीकडेही चांगलीच नांदते. हिंदी प्रकाशनाचे हे शहर नेहमीच एक महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे. हिंदुस्थानी वाचकांसाठी बंगाली साहित्याचा हिंदीत अनुवाद करण्याचे काम बरीच दशके हे प्रकाशनाचे जगत करत असे; मात्र गेल्या काही वर्षांत त्याचा एक निराळाच कलकत्तेकर आवाज तयार झाला आहे. अलका सरावगी, प्रभा खेतान वगैरे कलकत्तेकर मारवाडी लेखकांनी हिंदी साहित्यात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. सरावगींच्या गोष्टी शहराच्या जुन्या उत्तर-मध्य भागात, जुन्या मारवाडी समाजात, काहीशा बंगाली-मिश्रित भाषेत बसतात- कुठलाही ठळक दावा न करता त्या ठामपणे या समाजाची कलकत्तेकर स्थानिकता वाचकाला पटवून देतात.

एका चिनी डॉक्टरच्या दवाखान्याच्या चिनी पाटीसमोर उभी राहून मी १९व्या शतकात हा परिसर कसा दिसत असेत, याचा विचार करत राहिले. एकीकडे हाँगकाँग मार्गे चीन, दुसरीकडे एडनमार्गे युरोपहून जाणारी-येणारी जहाजं, कर्मचारी, माल; इंग्रजीसहित चिनी, मलाय, बर्मीज, तमिळ आणि आर्मेनियन ज्यू भाषांचा कलकलाट! कलकत्त्यात चिनी समाजही जुना, मोठा व प्रसिद्ध आहे, व शहरातल्या 'टँग्रा' या इलाक्याचे चिनी जेवण आज भारतभर 'देसी चाइनीज' म्हणून प्रसिद्ध झाले आहे. एकेकाळी शहरात अनेक चिनी वर्तमानपत्रे चालत. पण देशी-विदेशी स्थलांतराने आता कलकत्तेकर चिनी लोकांसारखीच त्यांची ही संख्या कमी होत चालली आहे.

बडाबजार हा जुना शहराच्या उत्तरेकडचा व्यापारी इलाखा. बंगाली पुस्तके आणि शाळा-कॉलेजच्या पुस्तकांसाठी असलेल्या कॉलेज स्ट्रीटहून जवळच, शिवणमशीन आणि मिठाईच्या दुकानांच्या मधोमध हिंदी पुस्तकांची काही दुकाने दडून बसली आहेत. बहुतेक करून धार्मिक पुस्तकांची विक्री जास्त होते, असे जाणवले. पण एका दुकानदाराशी गप्पा मारत बसले, तेव्हा त्याने हिंदी सभा, पारितोषिक-वितरण समारोह, साहित्यिक चर्चासत्रांची एक यादीच माझ्यापुढे ठेवली. आता हे विश्व फक्त कागदावर किती आणि खरोखर अस्तित्वात किती आहे, हे पाहायची मला उत्सुकता लागली आहे.

मारवाडी-हिंदी चालीच्या, अगदी आमच्या सासरच्या बिल्डिंगमध्ये राहणार्‍या मिसेस चोप्रांच्या पंजाबी थाटाच्या बंगालीमध्ये काही ठरावीक वैशिष्ट्ये आहेत. कितीही शुद्ध, व्याकरणबद्ध बंगाली येत असले, तरी बोलताना तिचा विशिष्ट 'ऑ' उच्चार सहसा टाळणे, ही या मिश्रित बोलींची लकब आहे. यामुळे संस्कृतोत्पन्न शब्दांच्या बाबतीत फारशी गडबड होत नसली, तरी मूळ बंगाली शब्द या उच्चार-पद्धतीत वेगळेच, गमतीदार ऐकू येतात. 'जॉखोन' (जेव्हा), 'तॉखोन' (तेव्हा) हे बंगाली शब्द 'जक्खन-तक्खन' होतात. ऐ, ऑ, ऍ, शॉ ह्या गोल-गोल वळणदार बंगाली उच्चारांचे अ, ए, ओ, स असे काहीसे सपाटीकरण होते. पण त्यातही एक ठराविकपणा, एक माधुर्य आहे. याचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सत्यजित राय यांच्या 'जय बाबा फेलूनाथ' चित्रपटातील उत्पल दत्त यांनी केलेली मगनलाल मेघराज या मारवाडी पात्राची भूमिका! नुसती बघण्यासारखीच नव्हे, तर ऐकण्यासारखी!

या हिंदी साहित्यजगात बिहारी कष्टकर्‍यांच्या विश्वाला काही स्थान आहे असे जाणवत नाही. त्याची चाहूल टॅक्सीत ऐकू येणार्‍या भोजपुरी गाण्यांत व शहराच्या अनेक चित्रपटगृहांत लागणार्‍या भोजपुरी सिनेमांत लागते. उर्दू भाषक हिंदुस्थानी मुसलमान समाज कलकत्त्यात फार जुना नि मोठा आहे. या उर्दू भाषकांमध्ये, हिंदी भाषक बिहार्‍यांमध्ये आणि पूर्वेकडच्या मुसलमान बंगाली बोलींमध्ये अरबी-फार्शी शब्दांच्या मोठ्या प्रमाणातल्या वापरासंबंधीचे साम्य आहे. या समाजांतील धार्मिक-सांस्कृतिक फरकांच्या स्पष्ट रेषांना हे शब्द सदा पुसट करत असतात. खरं तर, गेल्या शंभर वर्षांत बंगाली मध्यमवर्गीय प्रमाण भाषा या सगळ्या भाषिक प्रवाहांपासून, प्रभावांपासून अलिप्त आणि संस्कृतोत्पन्न वाट काढूनच तयार झाली आहे. तरी हा अलिप्तपणा काहीसा कृत्रिमच राहिला आहे. फार्शी, उर्दू, हिंदींचे ठसे पूर्वेकडच्या व बिहारला लागून प्रदेशाच्या बोलींतच नव्हे, तर साधारण कलकत्तेकर बंगालीत चांगलेच जाणवतात. परवा काही कामासाठी कलकत्ता बंदराजवळच्या 'ऑफिस पाड़्यात" गेले होते - कस्टम्स एजंट, जुन्या आयात-निर्यात व्यापार्‍यांच्या दगडी इमारती, चहा-ताग्याच्या व्यापाराच्या जुन्या कंपन्या. इथे मी कमीत कमी पाच भाषांतल्या पाट्या बघितल्या - हिन्दी-देवनागरी, उर्दू-नस्तालीक़, इंग्रजी, बंगाली, आणि चिनी. 'अस्सल चिनी खाद्यपदार्थांचे ठोक विक्रेते' अशी बरीच दुकाने. एका चिनी डॉक्टरच्या दवाखान्याच्या चिनी पाटीसमोर उभी राहून मी १९व्या शतकात हा परिसर कसा दिसत असेत, याचा विचार करत राहिले. एकीकडे हाँगकाँग मार्गे चीन, दुसरीकडे एडनमार्गे युरोपहून जाणारी-येणारी जहाजं, कर्मचारी, माल; इंग्रजीसहित चिनी, मलाय, बर्मीज, तमिळ आणि आर्मेनियन ज्यू भाषांचा कलकलाट! कलकत्त्यात चिनी समाजही जुना, मोठा व प्रसिद्ध आहे, व शहरातल्या 'टँग्रा' या इलाक्याचे चिनी जेवण आज भारतभर 'देसी चाइनीज' म्हणून प्रसिद्ध झाले आहे. एकेकाळी शहरात अनेक चिनी वर्तमानपत्रे चालत. पण देशी-विदेशी स्थलांतराने आता कलकत्तेकर चिनी लोकांसारखीच त्यांची ही संख्या कमी होत चालली आहे.

पश्चिम बंगाल व पूर्व बंग, अर्थातच आजचा बांग्लादेश, यांच्या बंगाली बोलीमध्ये बरेच ठळक फरक आहेत. या प्रदेशांतल्या फाळणीचा ढोबळ इतिहास माहित असला तरी, भाषा-साहित्य-कला-संगीतातील दोन्ही प्रदेशांची देवाण-घेवाण इतकी व्यापक आहे की तिला फक्त फाळणीच्याच इतिहासाच्या चौकटीत बसवता येत नाही.

पश्चिम बंगाल व पूर्व बंग, अर्थातच आजचा बांग्लादेश, यांच्या बंगाली बोलीमध्ये बरेच ठळक फरक आहेत. या प्रदेशांतल्या फाळणीचा ढोबळ इतिहास माहित असला तरी, भाषा-साहित्य-कला-संगीतातील दोन्ही प्रदेशांची देवाण-घेवाण इतकी व्यापक आहे की तिला फक्त फाळणीच्याच इतिहासाच्या चौकटीत बसवता येत नाही. मला पूर्वेकडची 'बांगाल' भाषा लगेच समजत नाही, पण कलकत्त्याच्या प्रमाणभाषेपेक्षा ती किती गोड आहे, हे कोणीतरी सारखं पटवून द्यायचा प्रयत्न करतच असतो. पूर्वेकडच्या माणसांचे लोंढे दोनदा कलकत्त्यात आले - १९४७ आणि १९७१ मध्ये. शहराचे दक्षिणकडचे नवीन भाग 'बांगाल इलाका' म्हणून इकडचे जुने 'घोटी' कलकत्तेकर नाक मुरडून, कमी लेखू लागले. घरी आई-वडिलांशी बांगाल बोली बोलणारे व बाहेर मित्रांबरोबर, शाळेत प्रमाणभाषा बोलणारे माझे बरेच स्नेही आहेत. त्यांचे हे 'घरे-बाहिरे' प्रयोग ऐकले की मला आमच्या कानडीची आठवण येते. एरवी घरी फाडफाड धारवाडी कानडी बोलणारी मी; बंगलोर-म्हैसूरकडचा कोणी आला की माझ्या तोंडून प्रमाण कानडी निघता निघत नाही.

आमच्या सासरी स्वयंपाकी महाराज गोपालदा उडिस्साचे आहेत. हीदेखील या भागात घडलेल्या स्थलांतराची एक विशिष्ट बाब आहे. पश्चिमेतले 'घोटी' हिंदू भद्रलोक पूर्वेकडच्या 'बांगाल' लोकांना व दक्षिणेकडच्या उडिया लोकांना जितके कमी लेखत, तितकीच त्यांची पाककला त्यांना हवीहवीशी वाटत असे. बांगाल व उडिया स्वयंपाक्यांना त्यामुळे शहरात चांगलीच मागणी असे. आमच्या लहानशा स्वयंपाकघरात बंगाली 'चींडे पुलाव' आणि मराठी कांदेपोह्यांमधला नेमका फरक गोपालदांना समजावून देण्यात मला घाम फुटतो. त्यांना नवीन, वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ शिकायची भारी हौस. तेरा वर्षाचे असताना पुरीजवळचे गाव सोडून आलेले. आमच्याकडे येण्याआधी गेली ४० वर्षं त्यांनी एका मारवाडी घरात बंगाली-मारवाडी-गुजराती असा मिश्र निरामिष स्वयंपाक केला होता. असा चांगला अखिल भारतीय सराव आपला आहे, असे त्यांनी मला सांगितले. पण आमच्या संभाषणाची गाडी एका मुद्द्यावर अडकली. 'मराठी' म्हणजे मारवाडीचाच एक प्रकार व मुंबई-पुणे-धारवाड ही जयपुरच्याच आसपासची गावं, असे त्यांनी गृहीत धरले. पोळी-भाकरी म्हणजे मारवाडी रोटलेच, हे तेच मला पटवून द्यायचा प्रयत्न करू लागले!

एकूण त्यांच्या मोडक्या उडिया-बंगाली मिश्रित हिंदीची आणि माझ्या मोजक्या बंगालीची छान खिचडी तयार होत असते. उडिया-बंगाल्यांतला फरक हा त्यांचा आवडता चर्चेचा विषय. बंगाली-उडिया-आसामी भाषांमध्ये जितके साम्य आहे, तितकाच त्यांच्यातला 'भाऊबंदकी'चा इतिहास रंगीत व विविध आहे. बंकिमचंद्रांच्या काळी तर बंगाली उच्च्भ्रू वर्गाने या दोन्ही भाषांना केवळ बंगालीच्या बोलींचा दर्जा द्यायचा प्रयत्न केला होता. त्याचे परिणाम दोन्ही भाषिक अस्मितांवर ठळक उमटलेले आहेत. याच वादातून, गढूळ वस्तुस्थितीतून, तिन्ही भाषांचे निराळे आधुनिक अवतार तयार झाले आहेत. अर्थात या वादाचे केंद्रस्थान १९व्या शतकापासून कलकत्ता राहिले आहे! रस्त्यावर नियमितपणे उडिया आणि कमी प्रमाणात आसामी ऐकू येतं. या तिन्हींपैकी नेमकी कुठली भाषा बोलली जात आहे, हे ओळखण्यात माझा मात्र अजूनही मधून मधून घोळ होतो. ब्यूटी पार्लरमध्ये मध्ये हिंदीसहित नेपाळी पुष्कळ ऐकू येतं. अजून उत्तरेच्या व ईशान्येकडच्या अनेक भाषा-बोली कानावर पडतात - पण त्यांच्यातला फरक ओळखण्याची क्षमता मात्र माझ्यात नाही.

 

पुढे: पृष्ठ ३