कलकत्ता कॅलेडोस्कोप - ३
भाग ३
कलकत्त्यात बंगाली भाषक आज ३७%च आहेत हे कुठेतरी वाचल्याचे आठवते. इतका सगळा बहुभाषिक पसारा असूनही बंगालीला मात्र एक प्रतिष्ठा आहे. स्थानिक लोकच नव्हे, तर बाहेरून आलेले लोकही जिचा वापर करतात; जिचा वापर केल्याने आपले काम होईल, ऐकणार्यावर केवळ शब्दार्थ समजण्यापलीकडे काही परिणाम होईल असे जिच्याबद्दल वाटते, अशा भाषेला 'प्रेस्टीज लँग्वेज' अथवा प्रतिष्ठित भाषा म्हणतात. याच अर्थी, बंगाली संभाषणाचे मुख्य साधनच नसून, प्रतिष्ठित भाषा आहे. ही प्रतिष्ठा नेमकी कशी एका भाषेला जोडली जाते, हा मोठाच प्रश्न आहे. राज्य सरकारचे वजन, आणि भाषावार प्रांतरचनेच्या कल्पनेचे वजन तिच्या मागे असले तरी, मुंबईसारख्या शहरात मराठीला ही प्रतिष्ठा लाभत नाही आणि ती जबरदस्तीने मिळवून देण्याचे अनेक वर्षे प्रयत्न चालू आहेत. पण ही प्रतिष्ठा येतेच कुठून व कशी जोपासली जाते? आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे, भाषेला प्रतिष्ठा हवीच कशाला, ती मिळवण्याचं नक्की मोल काय ? आपले 'वंगचित्र' आठवले, तर भांडवलशाही प्रगती, कारखाने, १९व्या शतकातले वैभव, राष्ट्रीय पातळीवरचे राजकीय महत्त्व हे सगळे गमावून बसल्यावर कलकत्त्यात राहिले काय तर रवींद्रनाथ, आणि रवींद्रसंगीत! तरीच लोक भाषेचा बाऊ करत असतात - हेच पोकळ, उपहासपूर्वक विश्लेषण निघतं.
पण प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्यांची पूर्णपणे उत्तरे द्यायची झाली; तर इतिहासाचा, भाषाशास्त्राचा, राजकीय धोरणाचा आणि भारतातल्या आधुनिक अस्मितांचा खोलवार अभ्यास आणि आधार घ्यावाच लागेल. आजचे पश्चिम बंगाल राज्यच नव्हे तर आधुनिक बंगदेशच भाषेच्या पार्श्वभूमीवर उभा राहिला. ही पार्श्वभूमी म्हणजे भाषिक समूहांचे कमाल-किमान गणित इतकी मर्यादित नसून, भाषेची निस्सीम उपासना ही त्यामागची संकल्पना आहे. १९व्या शतकापासून आजपर्यंत बंगाली भाषेतले वेगवेगळ्या विषयांवरचे लिखाण, वाचन, एकूणच भाषेतले आणि भाषेबद्दलचे चर्चासत्र अफाट आहे. फाळणीच्या वेळी कमाल-किमान समूहांचे राजकारण धार्मिक पातळीवर झाले आणि १९०५मध्ये फेटाळून लावलेला बंग-भंग प्रस्ताव १९४७ मध्ये स्वीकारावा लागला. म्हणूनच की काय, अखंड बंगदेशाच्या प्रादेशिक अस्मितेचा अविभाज्य घटक म्हणून बंगाली भाषेचे महत्त्व जिवंत राहिले आहे. बांग्लादेशमध्ये तर ती पुन्हा १९७१मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य कारणही ठरली. अर्थात या निस्सीम भक्तीचे अतिरेकी रूप म्हणजेच वर उल्लेखल्याप्रमाणे, आसपासच्या समान भाषा-बोलींप्रती तुसडेपणा व स्वतःच्या भाषेबद्दल श्रेष्ठत्वाची भावना. भद्रलोकांच्या विश्वव्यूहातही त्रिवर्णीय भाषिक जातसंस्था आहेच, पण या व्यूहामधली उतरंड ही 'इंडियन' विश्वव्यूहाच्या 'इंग्रजी-हिंदी-प्रांतिक भाषा' सारखी नसून ती 'इंग्रजी-बंगाली-इतर भाषा' अशी आहे. ब्रिटिशकालात एकीकडे संस्कृत, तर दुसरीकडे इंग्रजीच्या प्रचंड छायेत बंगालीचे आधुनिकीकरण झाले; आणि इंग्रजीची कधी बरोबरी, तर कधी अनुकरण हे या आधुनिकीकरणचे ठळक लक्षण राहिले आहे. श्रेष्ठत्वाच्या भावनेसहित या अनुकरणाचा एक परिणाम म्हणजे, बंगाली भाषेत युरोपियन भाषांतून प्रचंड प्रमाणात अनुवाद झाले - इंग्रजीच्या आधारे, बंगालीतूनच जणू जगाचे आकलन करून घेण्याचे प्रयत्न झाले.
भाषेला प्रतिष्ठा मिळवून द्यायला ठराविक वर्णसंस्था वा श्रेष्ठत्वाची भावनाच हवी, हा माझा मुद्दा नव्हे. या घडामोडी भारतीय भाषांच्या इतिहासातल्या, खासकरून त्यांच्या आधुनिक अवतारांच्या इतिहासातल्या पाऊलखुणा आहेत आणि त्या, हे आधुनिकीकरण किती किचकट होते याची कल्पना देतात. पण शेवटी, भाषाप्रेम म्हणजे भाषेचा वापर करणे, बोलून-वापरूनच तिला जपणे, जोपासणे हे बंगाली भाषेचा आधुनिक इतिहास बघितल्यावर जाणवते. भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यात सर्वात आधी ती भाषा बोलणार्या लोकांचाच हात आहे. यात पुढाकार नक्की कोणाचा - राजकीय धोरणाचा; शिक्षणपद्धतीचा; सामाजिक, बुद्धिजीवी नेतृत्वाचा - आणि श्रेय नेमके कोणाचे व किती, हे गणित सोडवणे इतके सोपे नाही. वर, बहुभाषिक वस्तुस्थितीत एखादी स्थानिक भाषा आपले अस्थित्व कसे जोपासते हे सूक्ष्मपणे ओळखणे तर त्याहून कठीण. पण सकृद्दर्शनी असे जाणवते की, कलकत्त्यात ही बहुभाषिक देवघेव काहीशा आत्मविश्वासाच्या भूमिकेतून घडली आहे - क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाले तर बॅकफूटवर झाली नसून, फ्रंटफूटवर झाली आहे. याला कारण प्रादेशिक, भाषिक अस्मितेचे छत्र काही महत्त्वाच्या सामजिक आणि सांस्कृतिक घटकांमुळे, संस्थांमुळे शाबूत आहे: नाटके लिहिणेच नव्हे तर ती आवर्जून बघणे, पुस्तक-मेळा, २००च्या वर लिटल मॅगजीन्स, लहान मुलांसाठी साहित्य, युरोपीय भाषांतून बंगालीत मोठ्या प्रमाणात अनुवाद, दैनंदिन तसेच शास्त्रीय चर्चेसाठी तिचा प्रामाणिक वापर, राजकीय कारभारापासून काहीशी अलिप्त पुरस्कार आणि वितरणाची व्यवस्था इत्यादी. शहरभर निरनिराळ्या संदर्भात तिचा खोलवार वापर होत आला आहे, आणि तिला एक ठसठशीत असे संस्थात्मक अस्तित्व आहे; ती 'प्रतिष्ठा' या संस्थात्मक बालेकिल्ल्यामुळेच अधिक मिळाली आहे, आणि राजकीय भाषेच्या दर्जामुळे वा राजकारणामुळे कमी, असे मला वाटल्यावाचून राहत नाही.
असे असता हिंदी, उडिया, आसामी, मारवाडी या भाषा शहरात कितीही बहरल्या तरी त्या काहीशा आडोशातच राहतात. त्यांची त्यांना स्वतंत्र जागा मिळते. शहराच्या या अन्य भागांत खाण्या-पिण्यासाठी आवर्जून जाणारे बंगाली कलकत्तेकर या अन्य भाषिक विश्वांत नक्की किती भाग घेतात, याची मला खोलवार माहिती नाही. पण शहरात त्यांना जागा मात्र आहे. त्यांच्या या स्वतंत्र बहरण्यातच, खरं तर, त्यांना बहरू देण्यातच बंगाली कलकत्तेकर भद्रलोक अभिमान बाळगतात. त्यात काहीसा पॅटर्नलिझमचा भाग असला, तरी तेवढाच अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील विश्वासाचाही आहे, हे मान्य केलेच पाहिजे. म्हणूनच प्रचंड बहुभाषिक असे हे शहर, खर्या अर्थाने बंगाली शहर आहे असे जाणवते.
आज जागतिकीकरणांतर्गत इंग्रजीचा बंगालीवर नवीन चढा होतोय. एकीकडे राज्याच्या, देशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. दुसरीकडे आंग्लप्रणित आणि हिंदीप्रणित लोकप्रिय मनोरंजनाचा मारा बंगाली भाषकांवर चांगलाच होतोय. या जुन्या बहुभाषिक देव-घेवीच्या कॉस्मोपॉलिटनिझम ऐवजी नवीन, जागतिकीकरणातून आलेला 'हिंग्लिश कॉस्मोपॉलिटनिझम' जोरात आहे. बंगालीतून विश्वाचे आकलन नव्या पिढीला किती जमेल आणि भाषिक घटक किती शाबूत राहतील, हा मोठा प्रश्न आहे. इथेच, शेवटी भाषिक प्रतिष्ठेला महत्त्व आहे. जबरदस्तीने पाट्या बदलायला लावल्याने प्रतिष्ठा मिळत नाही; त्या प्रतिष्ठेला खोलवर सांस्कृतिक संस्थांचा पाया पाहिजे. तो तयार करायला वेळ लागतो व या संस्था नक्कीच राजकीय वस्तुस्थिती व स्थलांतर यासारख्या सामाजिक उलाढालींवर अवलंबून असतात; पण तरी या आंतरिक प्रयत्नांशिवाय गत्यंतर नाही, हा बोधसुद्धा बंगालच्या उदाहरणावरून मिळतो.
बंगाली हिंग्लिशमुळे 'बॅकफूट'वर येवो न येवो; अजून तरी या बंगाली शहराचा बहुभाषिक कॅलेडोस्कोप जिवंत आहे, आणि फारच सुंदर आहे!
समाप्त.