ढीगभर लक्षणे, की एकसंध व्याधी? - ३

धनंजय वैद्य

भाग ३

मागील उदाहरणांतून आपल्याला दिसते, की वेगवेगळ्या "यशस्वी" संलक्षणांची उपयुक्तला वेगवेगळी असल्याकारणाने त्या उपयोगाच्या अनुषंगाने व्याख्याही वेगळी असायला हवी. कधी मूळ कारण माहीत असते, पण मूळ कारणाची चाचणी करणे सोयीस्कर नसते. उपचार मात्र लक्षणांचा नव्हे कारणावर करायचा असतो. कधी मूळ कारणच माहीत नसते. पण लक्षणांच्या अनपेक्षित एकत्रीकरणाने कुठल्या तरी लक्षणसापेक्ष उपचाराबाबत निर्देश मिळतो. काही ठिकाणी कारणे एक नसून अनेक असल्याचे ठाऊक असते. तरी त्या कारणांनी झालेल्या जोडव्याधीने इजा इतकी अधिक होते, की त्या दोन व्याधी वेगवेगळ्या न मानता जोडव्याधी म्हणूनच उपचार करणे योग्य असते. यावरून आपण संलक्षणाच्या तीन व्याख्या करू शकतो :

(व्याख्या १) : स्वतंत्र व्याधीला कुठलेसे एक विवक्षित आणि ठाऊक असलेले मूळ कारण असते. पण ते कारण थेट ज्ञानेंद्रिय-किंवा-चाचण्यांनी जोखणे कठिण असते. म्हणून सैद्धांतिक व्याख्या त्या मूळ कारणाने ठरत असली, तरी लक्षणांची यादी हीच व्याधीची व्यावहारिक व्याख्या होते. या व्याख्येनुसार निकष : एखाद्या पाहाणीत, कष्टसाध्य प्रयोगांनी का होईना, प्रत्येक रुग्णात व्याधीचे मूळ तपासावे. जर यादीतील अधिकाधिक लक्षणे आढळल्यास त्या रुग्णामध्ये व्याधीचे मूळ कारणही सापडण्याची संभवनीयता क्रमाक्रमाने "पुष्कळ"* वाढत जात असेल, तर तशा लक्षणांच्या यादी ही सुयोग्य व्याख्या मानावी.

(व्याख्या २) : एखाद्या स्वतंत्र व्याधीचे मूळ कारण असेलही, पण ते आपल्याला ठाऊक नसते. मात्र अनेक लक्षणे एका व्यक्तीमध्ये सापडणे इतके अनपेक्षित असते, की या सर्व लक्षणांकरिता एकच मूळ कारण असल्याबाबत अनुमान सयुक्तिक होते. या व्याख्येनुसार निकष : लोकांत यादीमधील प्रत्येक लक्षणाची स्वतःहून टक्केवारी बघता, त्यांच्यापैकी बहुसंख्य लक्षणे एकाच व्यक्तीत योगायोगाने सापडण्याच्या संभवनीयतेचे गणित करता येते. आणि बहुसंख्य लक्षणे एकत्र असलेल्या लोकांची टक्केवारी जर यापेक्षा "पुष्कळ"* अधिक असली, तर आपण म्हणू शकतो की "लक्षणांची ही यादी एकत्रित सापडते, पण ते अनपेक्षित आहे", आणि कदाचित पुढे कधी या यादीच्या मुळाशी एक कारण असल्याचे ढोबळ अनुमान करता येते.

(व्याख्या ३) यादीतील लक्षणांच्या एक-एक कलमाचे मूळ कारण आपल्याला वेगवेगळे म्हणून ठाऊक असते. पण त्या वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येकी होणारे घातक दुष्परिणाम कारणे एकत्र उद्भवल्याने अपेक्षेपेक्षा अधिक (म्हणजे घातक परिणामांच्या साध्या बेरजेपेक्षा अधिक) असल्यास, त्या सर्व लक्षणांची एकत्र यादी करणे उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या व्याख्येनुसार निकष : एकच लक्षण असल्यास निर्लक्षण व्यक्तीच्या मानाने सरासरी दुष्परिणाम (मृत्युदर, किंवा इंद्रियांचा कमकुवतपणा, वगैरे) किती होतो, ते रुग्णांचे निरीक्षण करून नोंदवावे. मग अनेक लक्षणे असली तर सरासरी दुष्परिणाम किती? याबाबत अपेक्षा बेरजेच्या गणिताने करता येते. मग ज्या रुग्णांत खरोखरीच यादीपैकी अनेक लक्षणे आहेत, त्यांच्यामधील सरासरी दुष्परिणाम नोंदवावे : ते अपेक्षेपेक्षा "पुष्कळ"* अधिक असतील तर ती यादी करण्यालायक आहे.

*पुष्कळ म्हणजे काय? पुष्कळ म्हणजे क्रियेस उद्युक्त करण्याइतपत प्रमाण. बहुतेक व्याख्यांमध्ये निरीक्षण "अपेक्षेपेक्षा पुष्कळ वेगळे" असण्याबाबत निकष आहे. कारण अगदी समसमान प्रक्रियांचे निरीक्षण करून दोन आकडे मोजमापाने/सरासरीने घेतले तर ते थोडे तरी वेगवेगळे असण्याची शक्यताच फार असते. एकदा का अपेक्षा काय ते माहीत असले, आणि एका-एका व्यक्तीमध्ये केलेल्या निरीक्षणांमधील परस्परांपासून फरक (व्हेरियन्स) माहिती असेल, तर या शक्यतेबद्दल आडाखा गणिताने काढता येतो. अपेक्षित सरासरी संख्या आणि निरीक्षित सरासरी संख्या यदृच्छेनेच वेगळ्या - म्हणजे निर्णय करण्यापुरत्या सारख्याच - असल्याची संभवनीयता शोधून काढू शकतो. जर संभवनीयता खूपच कमी असेल (५%पेक्षा कमी असेल) तर निरीक्षण अपेक्षेपेक्षा वेगळे असल्याचे ठरवण्याचा वैद्यकाच्या संशोधनातला ठोकताळा आहे.

मुख्य म्हणजे व्याख्यांबरोबर आपल्याला गणिती निकषही मिळाले आहेत. निकषांशिवाय व्याख्यांचा काहीही क्रियाशील उपयोग नाही. "आपल्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत" असे म्हणून विवादाचा संवाद कसा होऊ शकेल? समोर निरीक्षणांची साधनसामग्री असली, तर "अमुक व्याख्येची उपचाराकरिता अमुक उपयुक्तता आहे, आणि निरीक्षणाने मिळवलेल्या साधनसामग्रीचे विश्लेषण करता व्याख्येनुसार उपयुक्तता दिसून येते" अशा क्रियाशील पद्धतीनेच संवादाची प्रगती होऊ शकते.

वरील व्याख्यांबरोबर दिलेले निकष आपण एका वादग्रस्त संलक्षणाला लागू करून बघूया. या संलक्षणाबाबत तीन्ही निकष लावलेले विश्लेषण वैद्य आणि सहकार्‍यांनी "डायबीटीस केअर" या नियतकालिकात प्रसिद्ध केले होते.संदर्भ ९

- - -
मधुमेहाबाबत संशोधन आणि उपचार करणार्‍यांमध्ये मधुमेहपूर्व व्यक्तीमध्ये "मेटाबॉलिक सिन्ड्रोम" हे संलक्षण मानावे का? याबाबत विवाद आहे.संदर्भ १०-१२

मेटाबॉलिक सिन्ड्रोम हे नामकरण करणार्‍या संशोधकांनी दिलेली लक्षणांची यादी येणेप्रमाणेसंदर्भ १३:

(१) कंबरेचा घेर सामान्यापेक्षा अधिक, म्हणजे पुरुषांत १०२ सेमी पेक्षा अधिक, स्त्रियांमध्ये ८८ सेमी पेक्षा अधिक
(२) रक्तदाब सामान्यापेक्षा अधिक, म्हणजे १३०/८५ पेक्षा अधिक
(३) रक्तातील ट्रायग्लिसेराईड्स् सामान्यापेक्षा अधिक, म्हणजे १५० मिग्रॅ प्रति १०० मिली किंवा अधिक
(४) एचडीएल [चांगले] कोलेस्टेरॉल सामान्यापेक्षा कमी, म्हणजे पुरुषांत ४० मिग्रॅ प्रति १०० मिली पेक्षा कमी, स्त्रियांमध्ये ५० मिग्रॅ प्रति १०० मिली पेक्षा कमी
(५) अनशापोटी रक्तातील ग्लुकोझ सामान्यापेक्षा अधिक, म्हणजे १०० मिग्रॅ प्रति १०० मिली किंवा अधिक
या पाचांपैकी तीन किंवा अधिक लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीमध्ये मेटॅबॉलिक सिन्ड्रोम आहे, असे म्हटले जाते.

वेगवेगळ्या निकषांच्या अनुसार विश्लेषण करण्यासाठी वैद्य (दस्तुरखुद्द) आणि सहकार्‍यांनी मल्टिएथ्निक स्टडी ऑफ ऍथेरोस्क्रेरोसिस (MESA मेसा) या अभ्यासप्रकल्पातील साधनसामग्री वापरली. यू. एस. अमेरिकेतील ६ वेगवेगळ्या भागांतील ३१९९ पुरुष आणि ३५८१ स्त्रियांनी या अभ्यासप्रकल्पात भाग घेतला, आणि त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या उपलब्ध होत्या. वरील यादीतील पाच कलमांतल्या चाचण्या तर उपलब्ध होत्याच, पण त्यापेक्षा अधिक चाचण्याही उपलब्ध होत्या - त्यांचा उल्लेख पुढे येईल. या स्त्री-पुरुषांचे वय ४५-८४ वर्षे यादरम्यान होते. चाचण्या इ.स २००० आणि २००२च्या दरम्यान झाल्या. (तपशिलाबाबत संदर्भ ९ बघावा.) स्त्रियांकरिता आणि पुरुषांकरिता सांगितलेल्या लक्षणांत फरक असल्यामुळे पुढील विश्लेषण पुरुषांकरिता आणि स्त्रियांकरिता वेगवेगळे केलेले आहे. त्या आकडेवारीतून स्त्री-पुरुषांत निष्पन्न एकसारखे झाले, तर संलक्षणाबाबत एकत्रित निर्णय करता येईल.

- - -

व्याख्या १ (ज्ञात पण थेट जोखण्यास अव्यवहार्य मूळ कारण) प्रमाणे विश्लेषण :

मेटॅबॉलिक सिंड्रोमच्या मूळ कारणाबाबतही विवाद आहे, पण तरी काही तज्ज्ञांच्या मते पेशी इन्सुलिन या संप्रेरकाला दाद देत नसल्यामुळे () हे संलक्षण उद्भवते. मात्र इन्सुलिनची चाचणी सामान्यपणे केली जात नाही. म्हणून संलक्षण वापरावे. प्रत्येक रुग्णात सोयीचे नसेल, तरी मेसा सारख्या अभ्यासप्रकल्पात या व्याखेचा निकष तपासण्याकरिता इन्सुलिनच्या शरिरातील कार्यक्षमतेबाबत चाचणी करता येते. इन्सुलिनच्या संप्रेरणाने शरिरातील पेशी रक्तातील ग्लूकोझचे प्रमाण कमी करतात. जर पेशी इन्सुलिनला दाद देत नसतील, तर पुढील प्रकार दिसू शकतात : एक तर रक्तातील ग्लुकोझ थोडेतरी कमी होईस्तोवर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढतच राहाते. नाही तर, जर स्वादुपिंड तितक्या मोठ्या प्रमाणात इन्सुलिन निर्माण करू शकत नसेल, तर अनशापोटीसुद्धा ग्लुकोझचे प्रमाण अधिक असते. या दोन्ही प्रकारांसाठी एकत्रित निकष म्हणजे अनशापोटी रक्तातील इन्सुलिन*ग्लुकोझ पातळी हे गुणोत्तर होय. या गुणोत्तराला "एचओएमए" असे म्हणतात (संदर्भ : ). मेसा आकडेवारीवरून आपण जोखून बघूया, की संलक्षणामधील लक्षणांची संख्या अधिक-अधिक होत जाते, तसे "एचओएमए"चे मध्यवर्ती (Median) प्रमाण काय असते? पुढील तक्ता बघावा :

मेटाबोलिक लक्षणे आणि मध्यवर्ती (Median) एचओएमए (HOMA)
लक्षणसंख्या
स्त्रिया ०.६५ ०.८६ १.१७ १.६५ २.२७ २.८४
पुरुष ०.७५ ०.९३ १.३३ १.८१ २.५३ ३.५९

आपल्याला दिसते, की स्रिया व पुरुष, दोहोंतही लक्षणांची संख्या जशी वाढत जाते, तसे एचओएमए ची पातळी देखील वाढत जाते. (दोहोंमध्ये यदृच्छेने हा क्रम दिसण्याची संभवनीयता ५% पेक्षा कमी आहे.) अर्थात आपण या निष्कर्षापाशी पोचतो, की लक्षणांच्या संख्येवरून इन्सुलिन शरिरातील पेशींवर कमी-कमी परिणाम करत आहे. एचओएमए ची पातळी सामान्यपणे तपासत नाहीत. त्यामुळे ३ किंवा अधिक लक्षणे असल्यास पातळी साधारणपणे >१.६५ असते, ती अत्यधिक की काय ते आपण निर्विवादपणे सांगू शकत नाही. पण सकृद्दर्शनी या निकषाप्रमाणे लक्षणांवरून थेट चाचणीकरिता आलेल्या अव्यवहार्य मूळ कारणाचे निदान करता येते.