भाग ३
मराठ्यांच्या इतिहासासाठी महत्त्व :
मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने मकेंझीचा इतिहास आणि ही चर्चा रोचक आणि महत्त्वाची आहे. मकेंझीच्या उद्योगाचा विचार करता मराठ्यांच्या आद्य इतिहासकार जेम्स ग्रांट डफची लगेच आठवण होते. डफ ने मकेंझी सारखा व्यापक कारखाना उभारला नाही, आणि त्याच्या कार्याचा उद्देशही संग्रहण नसून लिखाणावर केंद्रित होता. ग्रांट डफनेही "मराठ्यांचा इतिहास" या नवीन संज्ञेद्वारा १७व्या-१८व्या शतकातल्या दक्खनच्या विविध घडामोडींचे व्यापक विवेचन केले. या साठी शेकडो देशी बखरी, शकावल्या, याद्या आणि स्थानिक माहितगारांचा त्याने उपयोग केला. अ.रा.कुलकर्णी "इतिहासाचा कारखाना" म्हणूनच त्याचे वर्णन करतात. (कुलकर्णी १९७१: १५२) पण हस्तलिखित आणि असंबद्ध अशा कच्च्या मालातून प्रथमच एक संपूर्ण सुसंगत इतिहास तयार करत असल्यावर डफचा आत्मविश्वास होता. डफच्या पत्रव्यवहारातून, आणि तत्कालीन सातारा कागदपत्रांतून त्याला साहाय्य करणार्या स्थानिक कारकूनांची झलक दिसते. डफ त्यांच्यावर अवलंबून असूनही त्यांच्या ज्ञानाबद्दल, विश्वासूपणाबद्दल सदैव साशंक असे; ते त्याच्या मागण्या पूर्ण करण्याचा आळस करीत. या महत्त्वाच्या घटनांबद्दल, शासकीय पद्धतींबद्दल त्याच्या सतत प्रश्नांवरून त्यांच्यातही इतिहासाबद्दल वादविवाद उठत. पण त्यांचे तेवढेच संक्षिप्त दर्शन आपल्याला कागदपत्रांत घडते. त्यांच्या ऐतिहासिक जाणीवेत झालेल्या बदलाची, अथवा मतांची डफच्या इतिहासावर नेमकी काय छाप पडली, हे मात्र आपल्याला यापलिकडे कळायला मार्ग नाही.
अर्थात, ऐतिहासिक सामग्रीचा संग्रह म्हटल्यावर वि. का. राजवाड्यांची आठवण होतेच. मकेंझीसारखेच राजवाड्यांनी देखील एक प्रचंड दस्तऐवज उभे केले. दोन्ही प्रकल्पात अनेक दशकांचा फरक तर होताच, पण अजूनही ठळक फरक होते. राजवाड्यांच्या प्रकल्पाला सरकारी आशीर्वाद नव्हता; किंबहुना, तत्कालीन सरकारी संस्थांहून अलिप्त राहूनच, एका अर्थी त्या संस्थात्मक व्यवस्थेविरुद्ध तात्त्विक पातळीवरूनच त्यांनी हे काम केले. त्यांचेही नेटवर्क होते, पण मकेंझीच्या तुलनेत आर्थिक आणि मनुष्यबळाचे साहाय्य प्राय: नव्हतेच. त्यांनी स्वतः अनेक शारिरिक व आर्थिक हाल सोसले. राष्ट्रवाद, इतिहासाभिमान आणि साधनचिकीत्सायुक्त इतिहासपद्धतीवरच्या विश्वासाच्या इंधनावर राजवाड्यांच्या उद्योग अनेक वर्षे चालला. भारतात शास्त्रशुद्ध इतिहासलेखन नव्हतेच, यावर त्यांचे व इंग्रज अधिकार्यांमध्ये एकमत होते. मकेंझीच्या कथानकांप्रती मवाळ दृष्टीकोनावरही कदाचित राजवाडे कोसळले असते! पण इतिहासाच्या उपासनेसाठी चाललेल्या या दोन्ही प्रकल्पांच्या खोल वैचारिक, संस्थात्मक व राजकीय फरकातच आपल्याला वासाहतिक ज्ञानविश्वाच्या विषम सत्तासंबंधांची कल्पना येते. (देशपांडे २००७: १०४-१२५)
विस्लनच्या त्रोटक वर्णनावरून दस्तऐवजातली मराठी हस्तलिखिते विविध स्वरूपाची आहेत असे दिसते - पंचतंत्राच्या प्रती, ऐतिहासिक बखरी, शब्दावल्या, पौराणिक कथा, इत्यादी आहेत. यांच्या वाङ्मयीन स्वरूपाचा, भाषाशैलीचा इतिहास तर अभ्यासणालायक आहेच. वर मराठ्यांवर लिहीलेले अन्य भाषातील कथनकेही आहेत. दस्तऐवजाच्या कारखान्यातील, आणि एकूण तत्कालीन दक्षिणेत मराठीवापराचे स्वरूपही रोचक आहे. मकेंझीच्या सर्व साहाय्यकांना मराठी भाषा, आणि मोडी लिपी येत असे. अनेकांना "मराठा अनुवादक" म्हणूनही नेमले गेले होते. १७-१८व्या शतकात दक्षिणेकडे झालेल्या मराठी भाषिक आणि मराठी कारकूनी कौशल्य असलेल्या गटांच्या स्थलांतराच्या इतिहासाच्या दृष्टीने हे दस्तऐवज अत्यंत मोलाचे आहे. तंजावर मध्ये तर मराठी राज्य होतेच, आणि जिल्हास्तरीय प्रशासनात मोडी-मराठीचा वापर होत असे. पण हे शासकीय, कारकूनी विश्व बहुभाषिक होते, आणि अर्काट सारख्या बिगर मराठी राज्यातही मराठी कारकूनी कसबींची मागणी होती. पण ही भाषा वापरणारे गटही वेगवेगळे होते. कवली बंधूंसारखेच अन्य अनेक नियोगी ब्राह्मण प्रशासनाचा पाया होते. मकेंझीच्या कागदपत्रांत 'राव' असे उपनाव लावणार्या अनेक साहाय्यकांची, माहितगार लोकांची प्राथमिक भाषा बहुतेक तेलुगु होती, पण एकमेकांत ते देखील मराठीत पत्रव्यवहार करत, आणि सुरुवातीच्या कंपनी कागदपत्रांत त्यांना देखील "मराठा कारकून" असेच संबोधले जात. (फ्रिकिनबर्ग १९६९) मोडी लिपीतील फारसीमय मराठीला फारसी-तमिळ-तेलुगु सहित दक्षिणेतल्या दैनंदिन राजकीय भाषांत जागा मिळाली होती, आणि तिचा वापर करणारे "मराठे" म्हणजे जातीने किंवा "मातृभाषे"ने मराठीच होतेच असे प्रथमदर्शनी तरी नक्की सांगता येत नाही. "महाराष्ट्राबाहेर मराठे" म्हणजे मुलुखगिरी, बारगीर, चौथ हे लगेच आठवतात. पण "मराठे" आणि "मराठी" या संज्ञांचे दक्षिणी शासनांत व लोकमानसात तयार झालेल्या विविध अर्थ व संकल्पनांचा, भाषावापराचा, व भाषिक संबंधांचा, थोडक्यात स्थलांतराचा निराळाच, दैनंदिन, रोचक इतिहास मकेंझीच्या कागदपत्रांमध्ये मराठी संशोधकांची वाट पाहत दडला आहे.
तळटीप १: हा फेरविचार इंग्रजांनी गोळा केलेल्या माहितीला खरी-खोटी ठरविण्याचा प्रयत्न नाही. तर विज्ञाननिष्ठ, निष्पक्ष, व आधुनिक म्हणवून घेणार्या, व पौर्वात्य, पराजित देशांचे एकमेव विश्वासू निरूपण करू पाहणार्या या ज्ञानविश्वाच्या मुळाशी असलेल्या सत्ता संबंधांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ब्रिटिश काळात उगम पावलेल्या अनेक आधुनिक ज्ञानक्षेत्रांचा या व्यापक अभिलेखीय इतिहासात समावेश करता येतो - उदा: न्यायसाहायकविज्ञान, नकाशाशास्त्र, वैद्यकशास्त्र, वाग्विद्या, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, आणि अर्थातच इतिहास व मानवंशशास्त्र. आधुनिकतेचे निव्वळ प्रतीक किंवा भारतीय शैक्षणिक इतिहासाचे प्रगत अंग म्हणून यांच्याकडे न पाहता, या ज्ञानशास्त्रांच्या खर्या अर्थाने राजकीय, म्हणजे सत्ता संबंधांचा, व वैचारिक इतिहास तयार होऊ शकतो असा या विचारप्रवाहाचा दावा आहे. यातील संशोधनाची प्राथमिक ओळख व सिंहावलोकन (देशपांडे २०१०) मध्ये वाचता येईल.
संदर्भः
कोह्न, बर्नार्ड (१९९६): कोलोनियलिझम अँड इट्स फॉर्म्स ऑफ नॉलेजः द ब्रिटिश इन इंडिया, प्रिन्स्टन: प्रिन्स्टन युनिवर्सिटी प्रेस
कुलकर्णी, अ. रा. (१९७१): जेम्स कनिंग्हेम ग्रँट डफ, पुणे: पुणे विद्यापीठ
डर्क्स्, निकोलस (२००१): कास्ट्स ऑफ माइंडः कोलोनियलिझम् अँड द मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया, दिल्ली: पर्मनंट ब्लॅक
देशपांडे प्राची (२०१०): "ज्ञानविश्व, वासाहतिक सत्ता आणि भारत", इतिहासलेखनमीमांसा, पुणे: समाज प्रबोधन पत्रिका & लोकवाङ्मय गृह, पृ. 1-25
देशपांडे प्राची (२००७): क्रीयेटिव्ह पास्ट्सः हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया, १७००-१९६०, दिल्ली: पर्मनेंट ब्लॅक
नारायण राव, इ. (२००३): टेक्स्चर्स ऑफ टाइमः राइटिंग हिस्टरी इन साउथ इंडिया, दिल्ली: पर्मनेंट ब्लॅक
फ्रिकिनबर्ग, रॉबर्ट (१९६५): गुंटूर डिस्ट्रिक्टः अ हिस्टरी ऑफ लोकल इंफ्लूएन्स अँड सेंत्रल अथॉरिटी इन साउथ इंडिया, दिल्ली: ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस
मकेंझी, कॉलिन (१८३३): "अ बायोग्राफिकल स्केच ऑफ द लेट कर्नल कॉलिन मकेंझी", जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी, १, पृ. ३३३-३६४.
मंतना, रमा सुंदरी (२००९) "द कवली ब्रदर्सः इंटेलेक्च्युअल लाइफ इन अर्ली कोलोनियल मद्रास", टॉमस ट्रॉटमन संपादित मद्रास स्कूल ऑफ ओरिएंटलिझम: प्रोड्यूसिंग नॉलेज इन साउथ इंडिया, ऑक्स्फर्ड युनिवर्सिटी प्रेस: दिल्ली, पृ.१२६-१५०.
विल्सन, एच. एच (१८२८): मकेंझी कलेक्शनः अ डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ द ओरियेंटल मॅन्युस्क्रिप्ट्स अँड अदर आर्टिकल्स इलस्ट्रेतिव्ह ऑफ द लिटरेचर, हिस्टरी, स्टॅतिस्टिक्स अँड अँटिक्विटिज ऑफ साउथ इंडिया, प्रथम खंड; भाग २; कलकत्ता: एशियाटिक प्रेस.
वॅगनर, फिलिप (२००३): प्रीकोलोनियल इंटेलेक्च्युअल्स अँड थे प्रोडक्शन ऑफ कोलोनियल नॉलेज, कंपॅरेटिव्ह स्टडीज इन सोसायटी अँड हिस्टरी, खंड ४५, अंक ४, पृ ७८३-८१४.
समाप्त.