फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी

पृष्ठ ३

आता आपण प्रस्तुत चाचणीच्या निष्कर्षांबद्दल माहिती घेऊ. ५१ ज्योतिषी मंडळींनी जरी पत्रिकांचे संच मागवून घेतले असले तरी शेवटी फक्त २७ मंडळींनीच त्यांची उत्तरे परत पाठवली. बाकी २४ मंडळींनी उत्तरे न पाठवण्याबद्दल काही खुलासाही केलेला नाही. या सत्तावीस ज्योतिषांपैकी २६ जणांनी त्यांची व्यक्तिगत माहिती पुरवली आहे. त्या माहितीचे विश्लेषण खालील प्रमाणे.
१५ ज्योतिषी छंद म्हणून ज्योतिष पाहतात तर ८ जण हे व्यावसायिक ज्योतिषी आहेत. अन्य ३ जणांनी ही माहिती पुरवली नाही. ८ व्यावसायिक ज्योतिषांचा सरासरी अनुभव १४. ४ वर्षे एवढा आहे.
११ ज्योतिषी निरयन पद्धती वापरतात. त्यातील तीन जण कृष्णमुर्ती पद्धतही वापरतात. ७ जण सायन पद्धती व एक जण फक्त कृष्णमुर्तीच पद्धत वापरतो. उर्वरित आठ जणांनी त्यांच्या पद्धतीबाबत माहिती पुरवली नाही
खालील तक्ता ज्योतिषांच्या अनुभवाबद्दल माहिती देतो.

५ वा त्यापेक्षा कमी वर्षे ६-१० ११-१५ १६-२० २१-२५ २६-३०

या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचूक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासून जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे. एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे विसापेक्षा कमी बरोबर आहेत. सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७. २५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत. एका ज्योतिषाच्या मतानुसार पाठवलेल्या ४० पत्रिकांपैकी ३७ हुशार व तीन अनिश्चित होती. या ज्योतिषाची अर्थातच १७ उत्तरे बरोबर आली. श्री मारटकर हे एकमेव ज्योतिषी असे होते की ज्यांनी संस्थात्मक पातळीवर सहभाग घेऊन उत्तरे वेळेत पाठवली. ही उत्तरे त्यांनी संस्थेच्या सभासदांशी चर्चा विनिमय करून दिली होती. त्या उत्तरांची सत्यता डॉ. प. वि. वर्तक या अध्यात्मातील जाणकार व्यक्तीसमक्ष पडताळली होती. त्यांच्याकडील दोनशे पत्रिकांपैकी फक्त १०२ पत्रिकांचेच अचूक निदान झाले होते. या १०२ पत्रिकांपैकी ५१ खरेच हुशार व ५१ मतिमंद मुलांच्या पत्रिका होत्या. या प्रकारचा निष्कर्ष जवळपास नाणे उडवून छापा/काटा पद्धतीने केले तरी मिळण्याची शक्यता असते.

सारांश असा की फक्त पत्रिका पाहून व्यक्तीच्या हुशारी वा मतिमंदत्वाबद्दल ज्योतिषी नियम वापरून निष्कर्ष काढता येणे शक्य होत नाही. ज्योतिषी मंडळी पत्रिका वापरून माणसाच्या व्यक्तिमत्त्व व वर्तणुकीबद्दल विविध प्रकारचे निष्कर्ष काढत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे किंवा नाही हे ठरविण्याकरिता एकच चाचणी निर्णायक ठरू शकत नाही. अशा प्रकारच्या विविध चाचण्या विविध प्रश्नांवर घेण्याची आवश्यकता आहे. या चाचणी पुरते बोलायचे झाल्यास असेच म्हणावे लागेल की ही चाचणी फलज्योतिष हे विज्ञानच आहे या मतास पुष्टी देत नाही. खरं पाहता या चाचणीचा निष्कर्ष हा फलज्योतिषाला विज्ञान म्हणण्याच्या विरोधात जातो.

निकालांवर प्रतिक्रिया

या चाचणीच्या निकाला नंतर लगेचच पुढच्या तासाला श्री सिद्धेश्वर मारटकर यांच्या ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेत ज्योतिषी विजय जकातदार, उदय साने, सुहास डोंगरे हे हजर होते. त्यात त्यांनी या निकालाचा जाहीर निषेध केला. ज्योतिर्विदांनी बहिष्कार टाकल्यानंतर प्रो. कुंटे यांनी चाचणी ऐवजी परीक्षण मान्य केले होते. त्यासाठी अटी खालीलप्रमाणे होत्या
१) अंनिस चा सहभाग नसावा.
२) परीक्षणाद्वारे बरोबर येण्याचे प्रमाण ६० % पेक्षा अधिक येऊ शकते. या बरोबर येणाऱ्या वा चुकणाऱ्या निष्कर्षांचा ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर कोणताही परिणाम होणार नाही.
३) चुकलेल्या पत्रिकांची माहिती (नाव व पत्ते ) खात्री करण्यासाठी द्यावी. तोपर्यंत परीक्षणाचा निकाल जाहीर करू नये.
परंतु या अटींचे पालन न करता निकाल जाहीर करण्यात आला. इतर शास्त्रांप्रमाणेच ज्योतिषशास्त्राला काही मर्यादा आहेत अशा प्रकारच्या चाचण्यांतून ते शास्त्र आहे की नाही हे सिद्ध होत नाही. परिषदेत अन्य ज्योतिषांनी आपापली खालीलप्रमाणे मते व्यक्त केली.
१) हे दैवी शास्त्र आहे. हे पुनर्जन्मावर आधारित आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रातील मूळ तत्त्वेच अंनिसला मान्य नाहीत.
२) चाचणीचा फक्त गणिती पद्धतीने विचार करण्यात आला आहे.
३) विषयाला विद्यापीठात सुद्धा ३५ किंवा ५० टक्क्यांना पासिंग असते.
४) ही शास्त्राची परीक्षा नसून ज्योतिर्विदांची आहे.
इत्यादी प्रकारची मते मांडून परिषद संपली.
असो! तर चाचण्या चालूच राहतील पण जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकीत!

या विषयावर उपक्रमावर झालेल्या चर्चा
http://mr.upakram.org/node/1286
http://mr.upakram.org/node/1281
http://mr.upakram.org/node/1267
http://mr.upakram.org/node/1268
http://mr.upakram.org/node/1276