फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी

प्रकाश घाटपांडे

फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचा सहभाग होता.

 
पृष्ठ १

"फलज्योतिष चिकित्सा मंडळ" या अनौपचारिक संवादी भूमिकेतून कै. माधव रिसबूड व मी १९८८ पासून फलज्योतिषाची चिकित्सा करत असू. त्यातूनच ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाचा २००१ मध्ये जन्म झाला. पुस्तकाच्या निमित्ताने प्रो. नारळीकरांशी माझा संपर्क आला. चर्चा झाली. परदेशात फलज्योतिषाच्या चाचण्या होतात. आपल्याकडेही फलज्योतिषाची एक वैज्ञानिक चाचणी व्हावी अशी इच्छा चर्चेत त्यांनी व्यक्त केली होती. यापूर्वी अर्थतज्ज्ञ कै. वि. म. दांडेकर यांनी मतिमंद मुलांच्या व हुशार मुलांच्या कुंडल्यांवर त्यांना समंजस वाटणा-या ज्योतिषांच्या समन्वयातून १९८९ च्या दरम्यान या अगोदर काम केले होते. परंतु त्याचे स्वरूप हे संस्थात्मक व लोकाभिमुख नव्हते. त्या काळात दांडेकर उत्साही होते. ज्योतिषांच्या सोबत दीर्घ काळ घालवल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यांनी म्हटले, 'जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला? ' अशा पार्श्वभूमीवर नवीन चाचणी ठरवायची होती.

प्रो नारळीकर हे समाजाभिमुख असलेले खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगाला सुपरिचित आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून अनेक समाजकारणी व राजकारणी देखील धडपडत असतात. फलज्योतिष विषयक त्यांची मते ज्योतिषांना मान्य नसली तरी त्यांचा मृदू स्वभाव व स्मित हास्य यामुळे ते ज्योतिष वर्तुळातही लोकप्रिय आहेत. प्रो. नारळीकरांची भूमिका ही पूर्वग्रहदूषित नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून फलज्योतिषाची चाचणी व्हावी अशीच होती. त्यासाठी ज्योतिषांचा सहभाग अपरिहार्य होता. ज्योतिषी स्वत:हून चाचणी तर करणार नव्हते. त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक होते. वैज्ञानिक चाचणीशिवाय फलज्योतिषाला अवैज्ञानिक घोषित करणे हे प्रो नारळीकरांना मान्य नव्हते.

अंनिस व ज्योतिषी यांचा संबंध हा नेहमीच 'आव्हानात्मक' पातळीवर होता. अंनिसच्या मते फलज्योतिष हे थोतांडच आहे. अंनिसचे जाहीर आव्हान असे होते की ज्योतिषांना दहा अचूक जन्मवेळांची माहिती वा कुंडल्या दिल्या जातील. तसेच दहा हातांचे ठसे दिले जातील त्यातून संबंधीत 'व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? ` व 'जिवंत आहे की मृत? ` एवढेच अचूक सांगायचे.

वरीलप्रमाणे दहा कुंडल्या वा हाताचे ठसे दिले जातील त्या आधारे संबंधित व्यक्तीचे शिक्षण, विवाह, अपत्य, अपघात, व्यवसाय व उत्पन्न याबाबत भविष्यकथन करावे. ऐंशी टक्के अचूक उत्तरे आल्यास आम्ही ज्योतिष हे शास्त्र मानू. हे पाच लाखाचे व आता अकरा लाखाचे आव्हान होते. त्यामुळे अंनिसने ही चाचणी घेतल्यास ही बाब पूर्वदूषित ग्रहांमुळे ज्योतिषांना मान्य होणार नव्हती. प्रो नारळीकरांची भूमिका व दाभोलकरांची भूमिका या आपापल्या जागी स्वतंत्रपणे मांडल्या जात होत्या. प्रो नारळीकरांना आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ अशी मान्यता असल्याने अंनिसला ही बाब उपयुक्ततेची होती. मग चाचणीच्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर आली. माझा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क असल्याने मला चाचणी प्रकल्प समन्वयक अर्थात दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी व संधी दोन्ही चालून आल्या. प्रो नारळीकर व डॉ. दाभोलकर यांची भेट घडवून आणल्यावर जन्मकुंडलीवरून मतिमंदत्व वा हुशारी सांगता येते का? ही चाचणी करावयाचे निश्चित झाले. पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाची चाचणीच्या संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी मदत घ्यायचे ठरले. मूलत: ज्योतिष अभ्यासक असल्याने चिकित्सा होताना विषयावर अन्याय होणार नाही ही बाब माझ्या दृष्टीने मूल्यात्मक होती. विषयाच्या मर्यादा, व्याप्ती व व्याहारीकता या बाबी चाचणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. मग आवाहनात्मक पातळीवर चाचणी ही भूमिका एक समंजस मार्ग होता. चाचणीत कमीत कमी त्रुटी राहण्यासाठी पारदर्शकता, विश्वासार्हता व परस्पर समन्वय या बाबी महत्त्वाच्या होत्या. प्रो. नारळीकर पत्रकार परिषद घेऊन चाचणी घोषित करणार असे ठरले.

चाचणीचा आराखडा

चाचणीमध्ये मतिमंद व हुशार शब्दांची व्याख्या खालील प्रमाणे आहे.
१) मतिमंद- जो मुलगा मतिमंद मुलांच्या शाळेत जातो तो.
२) हुशार - जो मुलगा सर्वसाधारण मुलांच्या शाळेत जातो व सातत्याने तीन वर्षे ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतो तो.
संख्या शास्त्र विभागाचे प्रो. अनिल गोरे यांनी प्रत्येकी शंभर कुंडल्यांचा डेटा सध्या संख्याशास्त्रीय चाचणीसाठी पुरेसा आहे असे व्यावहारिक सूचना दिली. चाचणीला मूर्त स्वरूप येईपर्यंत प्रो. गोरे हे निवृत्त झाले व परदेशी गेले. पण तो पर्यंत प्रो. सुधाकर कुंटे हे अत्यंत उत्साही निवृत्त प्राध्यापक हे संख्याशास्त्र विभागाचे भूषण म्हणता येईल असे गृहस्थ आले. विभागप्रमुख प्रा. उत्तरा निंबाळकर यांनी त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. कुंटेसरांनी चाचणीच्या सर्व बाजू समजावून घेतल्या व एक संख्याशास्त्रीय मॉडेल तयार केले. तोपर्यंत फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या आंतरजालीय आवाहनातून उपक्रम संकेतस्थळावरील सन्माननीय सदस्य व अमेरिकेतील बाल्टीमोर येथील हाफकीन युनिव्हर्सिटी मध्ये सहयोगी डॉ. धनंजय वैद्य यांनी एक संख्याशास्त्रीय मॉडेल तयार केले. औषधांची परिणामकारकता या विषयातील संख्याशास्त्रीय चाचणी हा त्यांचा विषय असल्याने त्यांनी आंतरजालीय मैत्रीचा मान राखून अमूल्य सहकार्य केले. प्रो. नारळीकर वेळोवेळी घटनांचे अवलोकन करत होतेच.

चाचणीतील कुंडल्यांची विश्वासार्हता

अंनिस च्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांत जाऊन विहित नमुन्यात माहिती गोळा केली. त्यासाठी शाळाप्रमुखांना पत्र देण्यात आले होते. आमच्याकडील सर्व दोनशे पत्रिकांमधील जन्म टिपण हे त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या सहीनिशी विहित नमुन्यात शाळेच्या प्रमुखांमार्फत पाठवले आहे त्यामुळे ही माहिती या चाचणीकरिता प्रमाण मानली. आलेल्या माहितीतून मी ज्योतिषी भूमिकेतून कुंडल्या तयार केल्या. त्यासाठी खालील मुद्दे विचारात घेतले.
१) सुस्पष्ट अक्षरातील माहिती असलेले फॉर्म ग्राह्य धरले
२) पालकांची सही नसलेले फॉर्म अग्राह्य धरले.
३) फॉर्मांवरील माहितीत अंतर्विसंगती आढळल्यास अग्राह्य धरले
४) शंका आल्यास संबंधित पालकांना फोन करून जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख या माहितीची खात्री केली.
५) कुंडली तयार करण्यासाठी कुंडली २००२ हे व्यावसायिक ज्योतिष सॉफ्टवेअर वापरले.
६) ज्योतिष गणित करून सदर सॉफ्टवेअर अचूक कुंडली तयार करते याची खात्री केली
७) कुंडली ही निरयन पद्धतीची असून सरकारमान्य व ज्योतिषमान्य असलेले चित्रा पक्ष अयनांश घेतले आहेत. थोडक्यात दाते पंचांगानुसार कुंडल्या तयार केल्या आहेत.
८) जन्मस्थळे ही छोटी गावे असल्यास जवळील मोठ्या गावांचे अक्षांश रेखांश घेतले आहेत.
९) जन्मराशी बदल वा जन्मनक्षत्र बदल अशा संधीवर असलेल्या पत्रिका विश्लेषणाला अवघड असल्याचे कारण नको म्हणून अग्राह्य ठरविण्यात आल्या.
१०) स्पष्ट ग्रहांसहित असलेली कुंडली घेतली व जन्मस्थळ, जन्मवेळ व जन्मतारीख ही माहिती सोबत असल्याने ज्योतिषाला स्वत: पत्रिका तयार करायला व केलेली पत्रिकेची अचूकता तपासायला मुभा ठेवली.

थोडक्यात अभ्यासू वृत्तीच्या ज्योतिषाला कुंडलीवरून आडाखे बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्योतिषी डेटाची विश्वासार्हता कायम बाळगली. संगणकाला चुकीचा फीड जाऊ नये यासाठी काम अत्यंत सावकाश केले गेले. कुंडलीचा डेटा हा गुप्त ठेवण्यात आला. डॉ. दाभोलकरांच्या विषयी ज्योतिषांच्या मनात अविश्वास असल्याने चाचणीच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये म्हणून डॉ. दाभोलकरांच्या पासूनही हा डेटा गुप्त ठेवण्यात आला होता. प्रकाश घाटपांडे, प्रो. नारळीकर व डॉ. कुंटे यांनाच या कुंडल्यांबाबत माहिती होती. सांकेतिकीकरण व रँडम सँपलिंग याच पद्धतीने सुमारे ४० पत्रिकांचा संच हा प्रयोगासाठी वापरला जाणार होता. शेवटी १२ मे २००८ ला चाचणी घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यास प्रो. नारळीकरांनी मान्य केले व ज्योतिषांना आवाहन केले

चाचणीचे आवाहन

फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचा सहभाग राहणार आहे. चाचणीचे स्वरूप सरळ व सोपे आहे. मतिमंद शाळेत शिक्षण घेणाऱ्या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या आहेत. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याचप्रमाणे जमा केल्या आहेत. मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तीच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर भाष्य करणाऱ्या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे. नामवंत ज्योतिषी, फलज्योतिष संस्था वा हा व्यवसाय करणारी कोणीही व्यक्ती यांना चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जाहीरपणे करण्यात आले आहे.

 

पुढे: पृष्ठ २