पृष्ठ २
ज्यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद लाभेल त्यांना सर्वसाधारणपणे चाळीस जन्मपत्रिका व जन्मवेळेचा तपशील या दोन्ही बाबी पाठवल्या जातील. या तपशिलामुळे आवश्यक वाटल्यास चाचणी देणारी संबंधित व्यक्ती स्वत:देखील कुंडली बनवू शकेल. त्या कुंडलीद्वारे संबंधित कुंडली ही मतिमंद मुलाची आहे की बुद्धिमान मुलाची आहे एवढेच सांगावे अशी अपेक्षा आहे. चाचणी साठी दिलेल्या पत्रिकांतील काही पत्रिका या मतिमंद मुलांच्या तर काही पत्रिका या हुशार मुलांच्या असतील. ज्योतिषांनी कोणती पत्रिका कोणाची हे ९०% अचूक ओळखल्यास फलज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणून पाहण्यास मर्यादित अनुकूलता प्राप्त होईल. ७०% पेक्षा कमी प्रमाणात उत्तरे बरोबर आली तर फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपोआपच सिद्ध होईल. ७०% ते ९०% प्रमाणात ज्योतिषाची भाकिते अचूक ठरल्यास आणखी मोठ्या सँपलसह चाचणी घेण्यात येईल.
कुंडलीच्या आधारे आपले निष्कर्ष पाठवण्यास संबंधितांना पूर्ण एक महिना देण्यात येईल. ही चाचणी पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी याच पत्त्यावरून कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पूर्णत: विनामूल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॉक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ११'' * ९'' आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला लिफाफा पाठवणे गरजेचे आहे. याच स्वरूपाच्या आणखी काही चाचण्या पुढील काळात घेण्याचा मनोदय आहे. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक पाया आहे का? यावर अधिक प्रकाश पडू शकेल.
चाचणीवर बहिष्कार
या जाहीर आवाहनानंतर ज्योतिष वर्तुळात एकच खळबळ माजली. जणू काही हे एक ज्योतिषांवर मोठे संकट कोसळले असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणून ज्योतिष परिषद पुणे चे अध्यक्ष श्री व. दा. भट यांनी १८ मे २००८ रोजी पुण्यात एक परिषद आयोजित केली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे श्री. श्री. भट होते. परिषदेत समस्त ज्योतिर्विदांना चाचणीवर आपले विचार व्यक्त करण्याचे आवाहन केले.
सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ ज्योतिर्विद श्री श्री भट यांनी शेवटी एक ठराव पारित केला. ठराव पुढीलप्रमाणे होता -
डॉ. जयंत नारळीकर व अंनिस यांनी दिलेले आव्हान आम्हा सर्व ज्योतिषांना अमान्य आहे. ज्योतिषशास्त्राकडे पूर्वग्रहदूषितपणे पाहणाऱ्या अंनिसने व तिच्याबरोबर असणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी जनतेची विश्वासार्हता गमावली आहे. ही चाचणी संशयास्पद असून तिला कोणीही प्रतिसाद देऊ नये.
चाचणीचा निकाल
दि. ७ ऑक्टोबर २००८ रोजी प्रो. नारळीकरांनी पत्रकार परिषद घेतली. तोपर्यंत माध्यमांना निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली होती. माध्यमांचे प्रतिनिधी बातम्या मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. प्रथितयश ज्योतिषांनी चाचणीवर बहिष्कार घातल्याने या चाचणीचा खूपच बोलबाला झाला होता. या पार्श्वभूमीवर चाचणीचे समन्वयक प्रकाश घाटपांडे यांनी खालील अहवाल घोषित केला.
फलज्योतिष चाचणीचा अहवाल
फलज्योतिष चाचणी प्रसिद्ध झाल्यावर १-२ दिवसातच आम्हाला अंदाजे १५० दूरध्वनी आले. विचारणा करणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या. आम्ही त्यांना पोस्टाची तिकिटे असलेला लिफाफा व विहित नमुन्यातील स्वत:बद्दलची माहिती पाठवण्यास सांगितले.
दरम्यान एक ज्योतिषांचे मंडळ श्री सुधाकर कुंटे यांना भेटले. या मंडळात प्रमुख श्री श्री श्री भट अध्यक्ष महाराष्ट्र ज्योतिष परिषद, श्री व. दा. भट अध्यक्ष पुणे ज्योतिष परिषद व अन्य काही ३-४ ज्योतिषी होते. श्री नरेंद्र दाभोलकर यांचा या चाचणीत सहभाग असल्याने या ज्योतिषी लोकांचा चाचणीच्या विश्वासार्हतेवर आक्षेप होता. प्रा. कुंटे यांनी चाचणीबाबतची सर्व माहिती दिली. तसेच डॉ. नारळीकर व डॉ. दाभोलकर यांचा या चाचणीतील प्रत्यक्ष सहभाग वा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुढे असेही सांगितले की ही चाचणी संख्याशास्त्रज्ञ या नात्याने व जबाबदारीने ते स्वत:च हाताळणार आहेत. ही चाचणी जास्तीत जास्त निरपेक्ष व 'डबल ब्लाईंड' या पद्धतीने हाताळली जाणार आहे. परंतु हे स्पष्टीकरण ज्योतिषी मंडळास पुरेसे समाधानकारक वाटले नाही व दि. १८ मे रोजी झालेल्या पुण्यातील ज्योतिषांच्या सर्वसाधारण सभेत चाचणीवर बहिष्कार घोषित केला. या सभेचे अध्यक्ष श्री श्री भट हे होते. हा बहिष्कार असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ५१ ज्योतिषी मंडळींनी आम्हाला तिकिटे लावलेला लिफाफा पाठवून पत्रिकांचे संच मागवून घेतले. या सर्व मंडळींनी संच मिळाल्यापासून एक महिन्यात उत्तरे पाठवावीत ही अपेक्षा होती.
दरम्यान १ जून २००८ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात श्री नंदकुमार जकातदार यांनी ज्योतिष विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच विषय "ज्योतिषशास्त्राला चाचणीची आवश्यकता आहे काय? " असा होता. या परिसंवादात काही ज्योतिषी मंडळींबरोबरच प्रा. कुंटे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आमंत्रित केले होते. डॉ. दाभोलकरांनी "फलज्योतिष हे विज्ञान का नाही? " या विषयावर विवेचन केले. प्रा कुंटे यांनी प्रस्तुत चाचणीसंबंधी संख्याशास्त्रीय अंगाने असलेली सर्व माहिती दिली. त्यांनी पुढे असेही सांगितले की फलज्योतिषाला विज्ञान म्हणून मान्यता हवी असल्यास अशा प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावेच लागेल. याला पर्याय नाही. फक्त हीच चाचणी अंतिम न धरता अशा प्रकारच्या अनेक चाचण्या अनेक लोकांनी अनेक वेळी अनेक मुद्द्यांसंबंधी घेणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले की आताच्या चाचणीत सहभाग घेण्याकरिता वर्तमानपत्राच्या माध्यमातून ज्योतिषप्रेमींना आवाहन केले होते. त्यामुळे स्वत:ला ज्योतिषी समजणारा कोणीही यात सहभागी होऊ शकेल. त्यामुळे या चाचणीचे निष्कर्ष हे ज्योतिष नियमांचे न राहता ज्योतिषी मंडळी ज्या प्रकारे समाजात वावरतात त्या समूहाचीच चाचणी असेल. ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी समारोपाच्या भाषणात असे सांगितले की ते कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाबद्दल निष्कर्ष काढण्याकरिता ज्योतिषातील दहा नियमांचा संच देऊ शकतात. या संचातील नियम वापरून कोणत्याही पत्रिकेबाबत निर्णय घेता येईल. त्यांनी अशा प्रकारच्या चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त ज्योतिषी मंडळींनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. फक्त या चाचण्या निष्पक्षपातीपणे व ज्योतिषी मंडळींच्या सल्ला मसलतीने तयार केलेल्या असाव्यात.
लागलीच दुसऱ्या दिवशी प्रा. कुंटे श्री जकातदारांना भेटले व त्यांनी सुचवलेल्या चाचण्यांबद्दल चर्चा केली. या भेटीत एक सूचना समोर आली ती अशी की संस्थात्मक पातळीवर एक समांतर चाचणी घ्यावी. ज्यात सर्व दोनशे पत्रिका संस्थांना दिल्या जातील. या पत्रिका सांकेतिक क्रमांक दिलेल्या असतील. संस्थांच्या सदस्यांनी संयुक्तपणे त्या पत्रिकांबाबत अनुमान कळवावे. ज्यायोगे ज्योतिषशास्त्रीय नियमांची जास्त चांगल्या प्रकारे तपासणी करता येईल असे वाटते. श्री. जकातदार यांनी या प्रस्तावास स्वत: मान्यता दिली व इतर ज्योतिष संस्थांचा सहभाग मिळवण्याबद्दल पण आश्वासन दिले. या प्रकारच्या समांतर चाचणी बद्दल एक परिपत्र एक विविध संस्थांकडे पाठवण्यात आले. दुर्दैवाने या उपक्रमास फक्त दोनच ज्योतिषसंस्थांची संमती मिळाली. त्या संस्था म्हणजे श्री मारटकर यांची ज्योतिषप्रसारक मंडळ व श्रीमती सुनंदा राठी यांचे चिरंजीव ऍस्ट्रो रिसर्च इन्स्टिट्यूट या होत. श्री नंदकुमार जकातदारांची संस्था कुठलेही स्पष्टीकरण न देता यात सहभागी झाली नाही.फक्त मारटकरांच्या ज्योतिष प्रसारक मंडळानेच सर्व दोनशे पत्रिकांचा संच तपासून वेळेत उत्तरे पाठवली. श्रीमती सुनंदा राठी यांच्या संस्थेने कोणतेही स्पष्टीकरण न देता उत्तरे पाठवली नाहीत.
श्री श्री भटांनी घातलेला बहिष्कार कायम ठेवून देखील ते प्रो. कुंटेंशी संपर्कात राहिले. त्यांनी आपले एक पुस्तक जे त्यांच्या म्हणण्यानुसार काही विद्यापीठात क्रमिक पुस्तक म्हणून वापरले जाते ते प्रो. कुंटे यांना भेट दिले. या पुस्तकातील एका नियमाप्रमाणे पत्रिकेवरून व्यक्तीचे लिंग ओळखता येते. या नियमाची सत्यता कमीत कमी ६०% तरी आहे. आम्ही हा नियम आमच्या कडील दोनशे पत्रिकांना लावून पाहिला असता त्यातील ९४ पत्रिकांतच फक्त अचूक निदान मिळाले. अचूक नियमाची शक्यता ६०% तरी असल्यास दोनशे पैकी ९४ च अचूक उत्तरे येण्याची शक्यता ५% पेक्षाही कमी असते. एका दुसऱ्या मुलाखतीत श्री भटांनी प्रो. कुंटे यांना तीन नियमांचा एक संच दिला जो पत्रिकेसाठी वापरून व्यक्ती हुशार आहे का? हे ठरविता येते. हा नियमांचा संच आमच्या दोनशे पत्रिकांवर लावल्यावर त्यातील दीडशे जण हुशार निघाले. या दीडशे पैकी ७५ खरेच हुशार होते. व बाकीचे ७५ हे मतिमंद होते. हे सर्व आकडे स्वत:च बोलके आहेत.
पुढे: पृष्ठ ३