संपादकीय

उपक्रमच्या सर्व सदस्यांना, वाचकांना आणि हितचिंतकांना दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा!

उपक्रम दिवाळी विशेषांकाचे यंदा पाचवे वर्ष. गेली चार वर्षे अविरत चालू असलेली ही परंपरा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढे चालवू शकलो त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे ऋणी आहोत. यावर्षीचा दिवाळी विशेषांकही, उपक्रम सदस्यांच्या योगदानाने, उपक्रमच्या लौकिकाला साजेसा असाच झाला आहे. या विशेषांकातील लेख वाचकांना निश्चितच दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण वाटतील, त्यांच्या ज्ञानात, माहितीत ते भर टाकतील आणि म्हणूनच त्यांना ते आवडतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

पाच वर्षे हा कोणत्याही उपक्रमासाठी मैलाचा दगड असतो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. उपक्रमाचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे अशी साधारण कल्पना यावरून येते. या टप्प्यावर मागे वळून पाहताना काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात.

फक्त माहितीप्रधान लेखनाला वाहिलेले संकेतस्थळ सपाटीकरण आणि सामान्यीकरणाच्या रेट्यापुढे टिकू शकेल का अशी शंका अनेकांच्या मनात होती. उपक्रमचा आजवरचा प्रवास उपक्रम आणि उपक्रमींच्या या विशिष्ट ध्येयधोरणांवरील विश्वासाची पावतीच होय. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन काही वेगळे करू इच्छिणार्‍या पण अश्या प्रयत्नात कितपत यश मिळेल याविषयी साशंक असणार्‍या अनेकांना 'उपक्रम-स्टोरी' मार्गदर्शक तसेच प्ररणादायी ठरू शकते.

उपक्रमने सुरुवातीपासूनच नव्या योजना, नव्या कल्पना, नवे तंत्र इत्यादींचा स्वीकार व पुरस्कार केला आहे. यावर्षी झालेले उपक्रमचे उर्ध्वश्रेणीकरण, फेसबुक, गुगलप्लस, ट्विटर वगैरेचा प्रथम वापर याद्वारे मराठी संकेतस्थळांच्या मर्यादित सदस्यसंख्येच्या पलिकडे पोहोचण्याचा उपक्रमने प्रयत्न केला आहे. त्याला उत्साहवर्धक यशही मिळाले आहे. मराठी संकेतस्थळांवर वावर असलेल्या लोकांच्या मानाने इथे न येणार्‍या लोकांची संख्या प्रचंड आहे. त्यांच्याकडे असणारी माहिती, अनुभव, ज्ञानाची गोळाबेरीज केली तर ती अमर्याद होईल. या अमर्याद साठ्याला मुकायचे की नव्या तंत्र, साधनांचा उपयोग करून त्यांना आंतरजालीय मराठीच्या प्रवाहात आणायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

पाच वर्षांचा टप्पा जसा सिंहावलोकनाची संधी देतो तसाच भविष्यकाळाच्या योजनांविषयी विचार करण्याची आणि अग्रक्रम ठरवण्याची संधीही देतो. येणार्‍या वर्षात उपक्रम आणि उपक्रमींसाठी, तसेच त्याहून व्यापक अश्या 'ऑडियन्स' साठी, काय काय करता येईल या विषयी विचार करण्याचे आणि विशिष्ट कार्यक्रमांना गती देण्याचे घडेल अशी आम्हाला आशा आहे. आणि त्यादृष्टीने आमचे प्रयत्नही सुरू आहेत. या प्रयत्नात उपक्रम सदस्य, वाचक आणि हितचिंतकांची साथ मिळेल यात आम्हाला जराही शंका नाही.

उपक्रमाच्या सर्व सदस्यांना, वाचकांना, प्रियजनांना आणि हितचिंतकांना ही दिवाळी व येणारे नवीन वर्ष सुखसमाधानाचे, भरभराटीचे व समृद्धीचे जावो हीच सदिच्छा.