संस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - १
भाग १
संस्कृत भाषेतील अभिजात वाङ्मय हे अभिजनांनी अभिजनांसाठी लिहिले होते आणि बहुजन समाजाचे त्याच्याशी विशेष देणेघेणे नसावे असे म्हणता येईल. ’विद्वत्कवय: कवयः केवलकवयस्तु केवलं कपय:’ - विद्वान् कवि तोच खरा कवि, अविद्वान् कवि म्हणजे केवळ कपि अशी धारणा अभिजात संस्कृत वाङ्मयव्यापारात कवि म्हणून वा रसिक म्हणून रुचि असणार्यांची धारणा होती. ह्या कारणाने आपोआपच संस्कृत वाङ्मयात भाषाप्रभुत्वाचे आणि पांडित्याचे प्रदर्शन आणि त्याच्या मागोमागच काही प्रमाणात कृत्रिमता ह्यांचा प्रवेश होणे क्रमप्राप्तच होते. ही कृत्रिमता अनेक प्रकारांनी दृग्गोचर होते, त्यांपैकी एकीचे काही दर्शन घडविण्याचा हा प्रयत्न आहे.
संस्कृत वाङ्मयात काही ठराविक संकेत आहेत आणि वाङ्मयाच्या रसिक आस्वादकर्त्याला हे संकेत माहीत असतात किंवा असावेत अशी अपेक्षा असते. अशा संकेतांमागे कसल्याहि प्रकारची तर्कसंगतता वा शास्त्रीय अर्थ शोधणे म्हणजे काळाचा अपव्यय आहे कारण ह्या संकेतांमागे कसलेच शास्त्र नाही. हे संकेत आहेत तसे मान्य करून पुढे गेल्यासच त्या पुढील कलाकृतीचा आस्वाद घेता येईल. अशा सर्वसामान्यपणे माहीत असलेल्या काही संकेतांचे संकलन करून प्रत्येकाच्या उदाहरणांचे प्रसिद्ध वा अप्रसिद्ध श्लोक त्यांच्या काहीशा स्वैर भाषान्तरांसहित येथे एकत्रित केले आहेत.
येथे विचारात घेतलेले संकेत केवळ वाङ्मयाशी निबद्ध असे आहेत. ह्यांपलीकडे पुराणे आणि तत्सम धर्माशी संबंधित लेखन-पठन आणि भक्तिवाङ्मयाशी निबद्ध असेहि अनेक संकेत आहेत. नाना देवीदेवतांची रूपे, त्यांची कृत्ये, त्यांची वाहने ह्यांच्याशी निगडित असे हे संकेत आहेत आणि त्यांवर आधारून अनेक रचना आणि त्यांचे उल्लेख पहावयास मिळतात. अतिविस्तारभयामुळे त्यांचा आढावा येथे घेण्यात आलेला नाही.
ह्या वाङ्मयीन संकेतांपैकी जवळजवळ प्रत्येकास माहीत असलेला संकेत म्हणजे पावसाचे दिवस जवळ आले म्हणजे दूरदेशी गेलेला पति/प्रियकर परत येणार अशा अपेक्षेने विरहिणीने त्याची वाट पाहणे आणि वियोगामुळे तिची अवस्था कातर आणि पर्युत्सुक झालेली असणे. कालिदासाचे मेघदूत हे संपूर्ण लघुकाव्य ह्याचा उत्तम नमुना आहे. कुबेराच्या शापामुळे एक वर्षासाठी प्रियपत्नीपासून दूर राहावे लागलेल्या यक्षाला ’आषाढस्य प्रथमदिवसे’ आकाशात मेघ दिसतो आणि त्या दर्शनाने प्रियतमेची व्याकूळ करणारी आठवण त्या मेघाबरोबर तिला संदेश पाठवायला त्याला उद्युक्त करते.
अलकानगरीत एकाकी दिवस कंठणार्या यक्षपत्नीची अवस्थाहि करुणाजनक आहे. मेघाला ती कशी दिसेल हे यक्ष त्याला सांगतो:
उत्सङ्गे वा मलिनवनसे सौम्य निक्षिप्य वीणाम्।
मद्गोत्राङ्कं विरचितपदं गेयमुद्गातुकामा।
तन्त्रीमार्द्रां नयनसलिलै: सारयित्वा कथंचिद्।
भूयो भूय: स्वयमपि कृतां मूर्च्छनां विस्मरन्ती॥
उत्तरमेघ २६.
मलिन वस्त्र ल्यालेली अशी ती मांडीवर वीणा घेऊन बसलेली दिसेल, माझे नाव गोवलेले गाणे गायचा ती प्रयत्न करीत असेल, गातांना वीणेच्या तारांवर पडलेले अश्रु ती कसेबसे पुसत असेल आणि एकदा घेतलेली तान विसरून पुन:पुन: गात असेल.
शेषान् मासान् विरहदिवसस्थापितस्यावधेर्वा
वियन्यस्यन्ती भुवि गणनया देहलीदत्तपुष्पै:।
संयोगं वा हृदयनिहितारम्भमास्वादयन्ती
प्रायेणैते रमणविरहेष्वङ्गनानां विनोदा:॥
उत्तरमेघ २७.
उंबरठयावर फुले ठेवून विरहाचे किती महिने राहिले अशी गणती करतांना किंवा मनातल्या मनात माझ्या भेटीच्या चित्राचा आस्वाद घेतांना ती तुला दिसेल कारण प्रियकरापासून विरह झालेल्या ललनांचा असाच विरंगुळा असतो.
(हाच ’मेघ-विरही जीव’ संकेत अद्यापहि शास्त्रीय संगीतातील अनेक चीजांचा विषय असतो.)
पावसाळा येऊ घातल्यावर विरही जनच व्याकूळ होतात असे नाही तर अरण्यात वा उद्यानात राहणार्या मोरांचीहि तीच स्थिति होते आणि ते उच्च केकारव करून मेघाला आवाहन करतात.
मण्डलीकृत्य बर्हाणि कण्ठैर्मधुरगीतिभि:।
कलापिन: प्रनृत्यन्ति काले जीमूतमालिनि॥
पिसारा गोल फुगवून आणि कंठांनी मधुर गीते गात मेघमालांच्या दिवसांत मोर नाचतात.
उत्पश्यामि द्रुतमपि सखे मत्प्रियार्थं यियासो:।
कालक्षेपं ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते।
शुक्लापाङ्गै: सजलनयनै: स्वागतीकृत्य केका:।
प्रत्युद्यात: कथमपि भवान् गन्तुमाशु व्यवस्येत्॥
पूर्वमेघ २२.
यक्ष मेघास म्हणतो: मित्रा, माझ्या कार्यासाठी तू त्वरेने निघाला असलास तरी ककुभपुष्पांनी सुगन्धित अशा प्रत्येक पर्वतशिखरावर तुझा वेळ जाणार आहे. डोळ्यात पाणी आणून मयूरांकडून केकारवांनी आमन्त्रण केला जाणारा तू कसा बरे त्वरेने जाऊ शकशील?
मोराप्रमाणेच चातक पक्षीहि मेघाची आतुरतेने वाट पहात असतो. त्याच्या चोचीमध्ये मेघामधील पाणी पडेपर्यंत तो तहानेलाच रहाणारा असा जीव आहे. तो म्हणतो:
अन्ये ते विहगा: पयोदपरितो धावन्ति तृष्णातुरा:।
वापीकूपतडागसागरजले मज्जन्ति दत्तादरा।
मामद्यापि न वेत्सि चातकशिशुं यच्छुष्ककण्ठोऽपि सन्।
नान्यं वाञ्छति नोपसर्पति न च प्रस्तौति न ध्यायति॥
तहानेने व्याकूळ झालेले अन्य पक्षी पाण्याकडे धावतात आणि विहीर, हौद, तलावा अथवा समुद्राच्या पाण्यात आनंदाने जलविहार करतात. चातक म्हणून जन्मलेल्या मला तू ओळखत नाहीस - जो घशाला कोरड पडली तरी (मेघाशिवाय) दुसर्या कशाची इच्छा धरत नाही, कोणाकडे जात नाही, कोणाची स्तुति वा प्रार्थनाहि करत नाही.
अर्थात् मेघाची निष्फल प्रार्थना करण्याविरुद्ध चातकालाहि जागे करावे लागते.
रे रे चातक सावधानमनसा मित्रं क्षणं श्रूयताम्।
अम्भोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैकादृशा:।
केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:।।
हे चातका, सावध चित्ताने एक क्षणभर ऐक. आकाशात मेघ खूप असतात पण ते सगळे एकासारखे नसतात. त्यांपैकी काहीजण आपल्या वृष्टीने पृथ्वीला भिजवून टाकतात तर काही दुसरे नुसताच गडगडाट करतात. तेव्हा ज्या ज्या मेघाला पाहतोस, त्या त्या प्रत्येकापुढे दीनवाणे उद्गार काढू नकोस.
चातक धूमसमूहं दृष्ट्वा मा धाव वारिधरबुद्ध्या।
इह हि भविष्यति भवतो नयनयुगादेव वारिणां पूर:॥
अरे चातका, हा नुसता धूर आहे, मेघ समजून त्याच्याकडे धावू नकोस. येथे केवळ तुझ्या डोळ्यातील पाण्याचा पूर येणार आहे.
दम्भोलिस्फूर्जदम्भोधरविपुलतडिद्दम्भगम्भीरनादै-
रम्भ:संभारसंभावनकुतुकिकुलं चातकानां प्रनृत्यत्।
ऊर्ध्वं विन्यस्तचञ्चूपुटमुपरि परिभ्राम्यदुत्पातवातै-
रम्भोदोन्मुक्तमम्भ: कणमपि न चिरात्प्राप्य नम्रं मिथोऽभूत्॥
इंद्राच्या वज्राने चालना दिलेल्या मेघांच्या विजांच्या गडगडाटाने ’आता पुष्कळ पाऊस पडेल’ असे मानणारा आणि चोची वर करून बसलेला चातकांचा थवा नृत्य करता झाला. पण मेघांनी सोडलेले पाणी वादळी वार्याने इकडेतिकडे उडविल्याने चातकांच्या थव्याला पाण्याचा एक कणहि मिळाला नाही आणि त्याची नम्रता वाया गेली.
नोंदः सदर लिखाण मराठी प्रमाणलेखनाच्या अधिकॄत नियमांनुसार नाही.