संस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - ३

अरविंद कोल्हटकर

भाग ३

उडणार्‍यांकडून आता चालणार्‍या प्राण्यांकडे वळू. सिंह आणि हत्ती ह्या दोन प्राण्यांना ह्या संकेतविश्वात विशेष स्थान आहे. सिंह हे नेहमी शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून दिसतात. त्यांचे आणि हत्तीचे वैर असून तो हत्तींवर चाल करून त्यांच्यावर विजय मिळवतात. असे हत्ती विशेषेकरून मदोन्मत्त असतात. अशा वेळी त्यांच्या गंडस्थलांमधून मद वाहत असतो. त्या मदाच्या वासाने आकृष्ट झालेले भुंगे हत्तींना अंध बनवतात आणि ते हत्ती सैरावैरा इकडेतिकडे धावू लागतात. हत्तींच्या गंडस्थलांमध्ये मोती असतात आणि हत्तींना सिहाने मारल्यावर हे मोती विखुरतात.

स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥
भामिनीविलास - जगन्नाथ पंडित.

गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी।
मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरुतर शिला भेदुनि करीं।
भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥

हे वासुदेवशास्त्री खरे ह्यांचे वरील श्लोकाचे समश्लोकी भाषान्तर आहे, जे त्यांनी ’केसरी’ वृत्तपत्राच्या शीर्षकासाठी तयार केले होते.

न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना-
गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बा: करिटिन:।
लुठन्मुक्ताभारे भवति परलोकं गतवतो
हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकल:॥

ज्यांच्या गंडस्थलांच्या उद्रेकांभोवती भुंग्यांचे थवे गुंजत आहेत असे मत्त हत्तीहि जेथे भीतीमुळे डोळे फिरवीत होते आणि उभे राहू शकत नव्हते अशा सिंहाच्या (हत्तींच्या गंडस्थलातील) मोत्यांनी खचाखच भरलेल्या प्रांगणात आता तो सिंह आता परलोकी गेल्यामुळे कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकावी लागत आहे. शिव! शिव!

सिंह: शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु।
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतु:॥

सिंहाचा छावा जरी असला तरी तो मदाने गंडस्थलांच्या भिंती ओल्या झाल्या आहेत अशा हत्तींवर हल्ला करतो. पराक्रमी पुरुषांचा हा स्वभावच असतो. त्यांच्या पराक्रम वयावर अवलंबून नसतो.

नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगै:।
विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥

सिंहाचा राज्याभिषेक वा अन्य काही संस्कार प्राण्यांकडून केला जात नाही. पराक्रमाने राज्य मिळविलेल्या त्याचे प्राण्यांवरील राज्य स्वयंसिद्ध असते.

सर्पांभोवतीहि असेच संकेत आहेत. सर्प वायुभक्षण करून जगतात, त्यांच्याहि मस्तकात मणि असतो आणि ते सुवासाने आकर्षित होऊन चंदनवृक्षाला विळखे घालून बसलेले असतात.

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति।
रूक्षाशनेन मुनयः क्षपयन्ति कालं सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम्॥

सर्प वायु पिऊन जगतात, तरीहि ते दुर्बल नसतात. सुके गवत खाऊनच वनातील हत्ती बलवान् होतात. रूक्ष भोजनानेच ऋषींची कालक्रमणा होते. सन्तोष हाच पुरुषाचा सर्वश्रेष्ठ ठेवा आहे.

दुर्जनः परिहर्तव्यः विद्ययालंकृतोऽपि सन् ।
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयंकरः ॥
(भर्तृहरि)

विद्याभूषित असला तरीही दुष्ट दूरच ठेवावा. सर्पाला मणि हा अलंकार आहे म्हणून तो भयकारक नसतो असे आहे काय?

भ्रमरशिखिकण्ठवर्णो दीपशिखासप्रभो भुजङ्गानाम्।
भवति मणि: किल मूर्धनि योऽनर्घ्येय: स विज्ञेय:।।
(वराहमिहिर)

भुंग्याच्या अथवा मोराच्या कंठाच्या वर्णाचा, दीपज्योतीप्रमाणे तेजस्वी असा मणि सर्पांच्या मस्तकात असतो आणि ती मूल्य करण्याच्या पलीकडचा असतो असे जाणावे.

मूलं भुजङ्गै: शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहङ्गै: कुसुमानि भृङ्गै:।
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्त्वभरै: समन्तात्॥

मुळाभोवती सर्प, शिखरावर मर्कट, फांदीवर पक्षी, फुलांवर भुंगे - चंदनाच्या वृक्षाचा असा कोठलाच भाग नाही जेथे कोणी प्राण्याने आश्रय घेतलेला नाही.

भ्रातश्चन्दन किं ब्रवीमि विटप स्फूर्जत्फणाभीषणा
गन्धस्यापि महाविषा फणभृतो गुप्त्यै यदेते कृता:।
दैवात्पुष्पफलान्वितो यदि भवानत्राभविष्यत्तदा
नो जाने किमकल्पयिष्यदधिकं रक्षार्थमस्यात्मन:॥

बाबा चंदन वृक्षा, आम्ही आता काय म्हणावे? केवळ गंधाच्या रक्षणासाठी मोठया फणा असलेले महाविषसर्प तू ठेवलेले आहेत. तुझ्या दैवाने भविष्यात तुला फुले आणि फळे मिळाली तर आपले रक्षण करण्यासाठी तू अधिक काय करशील हे आम्हाला माहीत नाही.

चंदन आणि सर्प ह्यावरून आता अन्य काही वृक्षांकडे वळू. वृक्षांना फुले लागणे - कुसुमप्रसूति - हा मोठा आनंदाचा प्रसंग आणि त्यासाठी वेगवेगळ्या वृक्षांचे आपापले डोहाळे असतात. एका श्लोकात ह्या सार्‍यांचे उल्लेख आहेत:

स्त्रीणां स्पर्शात् प्रियङ्गुर्विकसति बकुलः सीधुगण्डूषसेकात्।
पादाघातादशोकः तिलककुरबकौ वीक्षणाऽलिंगनाभ्याम्।
मन्दारो नर्मवाक्यात् पटुमृदुहसनाच्चम्पको वक्त्रवाता-
च्चूतो गीतान्नमेरुर्विकसति च पुरोनर्तनात् कर्णिकार:॥

(प्रियंगु - पिंपळी, बकुल, अशोक, तिलक - अरणी, कुरबक - तांबडा माठ, मन्दार - पांगारा, चम्पक - चाफा, चूत - आंबा, नमेरु - रुद्राक्ष, कर्णिकार - अमलतास.)
पिंपळीला स्त्रीच्या स्पर्शाने, बकुळाला तिने टाकलेल्या मद्याच्या चुळीने, अशोकाला तिच्या लत्ताप्रहाराने, अरणीला तिच्या दृष्टिक्षेपाने, माठाला तिच्या आलिंगनाने, पांगार्‍याला तिच्या गोड बोलाने, चाफ्याला तिच्या स्मिताने, आंब्याला तिने घातलेल्या फुंकरीने, रुद्राक्षाला तिच्या गायनाने आणि अमलतासाला तिच्या नर्तनाने कुसुमप्रसूति होते.

रक्ताशोक कृशोदरी क्व नु गता त्यक्त्वानुरक्तं जनम्।
नो दृष्टेति मुधैव चालयसि किं वातावधूतं शिर:।
उत्कण्ठाघटमानषट्पदघटासंघट्टदष्टच्छद-
स्तत्पादाहतिमन्तरेण भवत: पुष्पोद्गमोऽयं कुत:॥

(सोत्कंठ प्रियकर आणि अशोक वृक्षामधील संवाद:) ’हे रक्ताशोक वृक्षा, ती कृशोदरी प्रियतमा अनुरक्त अशा मला सोडून कोठे गेली?’ ह्या प्रश्नाला ’मी पाहिली नाही’ असे खोटे उत्तर वार्‍याने आपले मस्तक हलवून तू का देत आहेस? तसे असेल तर अधीर झालेल्या भुंग्यांच्या ज्याचे अस्तरण चावले जात आहे असा हा तुझा फुलांचा बहार तिच्या पावलाच्या लत्तप्रहाराविना कोठून आला?

रक्ताशोकश्चलकिसलय: केसरश्चात्र कान्त:।
प्रत्यासन्नौ कुरबकवृतेर्माधवीमण्डपस्य।
एक: सख्यास्तव सह मया वामपादाभिलाषी।
काङ्क्षत्यन्यो वदनमदिरां दोहदच्छद्मनास्या:॥
उत्तरमेघ १८.

(यक्ष अलकानगरीतील आपल्या घराचे वर्णन मेघास सांगत आहे:)
कुरबकाने वेढलेल्या माधवीच्या वेलीच्या मंडपाजवळ एक पाने हलत असलेला रक्त अशोक आणि आणि एक बकुल (केसर) वृक्ष आहेत. त्यांपैकी एकाला तुझ्या सखीच्या वामपादप्रहाराची मजप्रमाणेच अभिलाषा आहे आणि दुसर्‍याला त्याचे डोहाळे पुरविण्यासाठी तिच्या मुखातील मदिरेची आकांक्षा आहे.

अनेन तनुमध्यया मुखरनूपुराराविणा
नवाम्बुरुहकोमलेन चरणेन संभावित:।
अशोक यदि सद्य एव मुकुलैर्न संपत्स्यसे
वृथा वहसि दोहदं ललितकामिसाधारणम्॥
मालविकाग्निमित्र ३.१७.

नूपुरांचा आवाज करणार्‍या आणि नवोदित कमळासारख्या कोमल अशा ह्या कृशोदरीच्या पायाने संभावना केलेला तू जर आता कळ्यांनी भरला नाहीस तर, हे अशोका, कामी जनांचे हे डोहाळे उगीचच बाळगतो आहेस.

सर्व प्रकारच्या रत्ने समुद्रातून बाहेर पडतात असा संकेत आहे.

हारांस्तारांस्तरलगुटिकान् कोटिशः शङ्खशुक्ती:।
शष्पश्यामान्मरकतमणीनुन्मयूखप्ररोहान्।
यस्यां दृष्ट्वा विपणिरचितान्विद्रुमाणां च भङ्गान्।
संलक्ष्यन्ते सलिलनिधयस्तोयमात्रावशेषा:।
पूर्वमेघ ३३.

(उज्जयिनीवर्णनाच्या श्लोकांमधील एक श्लोक: ) जिच्यामध्ये दुकानात विक्रयासाठी ठेवलेले आणि तरल हिरे ज्यांच्या मध्यभागी गुंफलेले आहेत असे हार, कोटयवधि शंख-शिंपले, गवताच्या कोवळ्या कोंबासारखे आणि हिरवे किरण फेकणारे पाचू, प्रवालाचे खंड पाहून समुद्रात केवळ पाणीच उरले आहे असे वाटते (अशी ती उज्जयिनी नगरी...)

समुद्रेणान्त:स्थस्तटभुवि तरङ्गैरकरुणै:।
समुत्क्षिप्तोऽस्मीति त्वमिह परितापं त्यज मणे।
अवश्यं क्वाऽपि त्वद्गुणपरिचयाकृष्टहृदयो -
नरेन्द्रस्त्वां कुर्यान्निजमुकुटकोटिप्रणयिनम्॥

हे रत्ना, ’समुद्राच्या आत असलेल्या मला निर्दय लाटांनी तटावर आणून फेकले’ अशी खंत टाकून दे. तुझे गुण ज्याच्या हृदयाने ओळखले आहेत असा कोणी राजा अवश्य तुला आपल्य मुकुटात स्थान देईल.

मेघांचे पाणी शिंपल्यात पडले की त्याचा मोती होतो हा संकेत कोठे कोठे आढळतो.

पात्रविशेषे न्यस्तं गुणान्तरं व्रजति शिल्पमाधातु:।
जलमिव समुद्रशुक्तौ मुक्ताफलतां पयोदस्य।।
मालविकाग्निमित्र १.६

(तिचा शिक्षक गणदास मालविकेच्या संदर्भात म्हणतो:) निर्मात्याची कला विशिष्ट पात्राप्रमाणे गुण घेते, जसे की मेघाचे पाणी समुद्रातील शिंपल्यात पडले की त्याचा मोती होतो.

सूर्यकांत मणि सूर्याच्या किरणांमुळे प्रज्वलित होतो आणि चंद्रकान्त मणि चंद्राच्या किरणांमुळे पाझरू लागतो.

यदचेतनोऽपि पादै: स्पृष्ट: प्रज्वलति सवितुरिनकान्त:।
तत्तेजस्वी पुरुष: परकृतविकृतिं कथं सहते।।

(सूर्याच्या) पायांनी स्पर्शिलेला सूर्यकांत मणि अचेतन असूनहि पेटून उठतो. अर्थातच तेजस्वी पुरुष दुसर्‍याने केलेला अवमान कसा सहन करेल?

सुधाकरकरस्पर्शाद्बहिर्द्रवति सर्वत:।
चन्द्रकान्तमणेस्तेन मृदुत्वं लोकविश्रुतम्॥

चंद्राच्या किरणांच्या स्पर्शाने तू सगळीकडून द्रवतोस. हे चंद्रकांतमणे, ह्यावरून तुझे मार्दव सर्व जगाला कळते.

समुद्राच्या पोटात ’वडवानल’ नावाचा न विझणारा अग्नि आहे अशी समजूत आहे.

तेजांसि यस्य प्रथमं प्रयान्ति वारां प्रवाहेण स वह्निरन्य:।
अयं पुनर्वाडवनामधेय: समुद्रमापीय बिभर्ति तेज:॥

पाणी पडल्यावर ज्यांचे तेज प्रथमच निघून जाते असे अग्नि कोणी अन्य आहेत. हा ’वाडव’ नावाचा अग्नि समुद्र पिऊनहि तेजाळ राहतो.

गंगेचे जल शुभ्र वर्णाचे आणि यमुनेचे कृष्ण वर्णाचे असून त्यांच्या संगमात हे दोन प्रवाह निरनिराळे दिसतात अशी धारणा.

गाङ्गमम्बु सितमम्बु यामुनं कज्जलाभमुभयत्र मज्जतः।
राजहंस तव सैव शुभ्रता चीयते न च न चापचीयते॥

गंगेचे पाणी शुभ्र आणि यमुनेचे काजळाच्या रंगाचे. हे राजहंसा, दोन्हींमध्ये जलविहार करणार्‍या तुझी शुभ्रता मात्र तशीच राहते, ती कमीहि होत नाही वा वाढतहि नाही.

कमळ सूर्यामुळे आणि कुमुद चंद्रामुळे उमलते असा संकेत आहे.

कुमुदान्येव शशाङ्क: सविता बोधयति पङ्कजान्येव।
वशिणां हि परपरिग्रहसन्तोषपराङ्मुखी वृत्ति:।।

चंद्र कुमुदांनाच फुलवतो आणि सूर्य कमळांनाच. आपल्या मनावर ताबा असणार्‍यांची परपत्नीकडे न पाहण्याची वृत्ति असते.

समाप्त.

नोंदः सदर लिखाण मराठी प्रमाणलेखनाच्या अधिकॄत नियमांनुसार नाही.

| | ३