पंप - सर्वंकष माहिती १

आनंद घारे

'पंप' हा इंग्रजी शब्द आता आपल्या इतक्या ओळखीचा झाला आहे की तो मराठी भाषेतलाच वाटतो. 'क्षेपक', 'उदंचक' यासारखे पर्यायी शब्द सुचवले गेले आहेत, पण मला ते 'पाचक, रेचक' या पठडीतले वाटतात. आंग्लभाषा न शिकलेल्या माझ्या आईकडून लहानपणी मिळालेला 'पंप' हाच शब्द मी या लेखात सगळीकडे वापरला आहे. पंप जरी सर्वांच्या ओळखीचा असला आणि घरात, कार्यालयात किंवा रस्त्यातून जाता जाता त्याचे दर्शनही होत असले तरी तो नेमका कसा चालतो, हे अनेकांना ठाऊक नसेल. ते थोडक्यात सांगण्याचा हा एक प्रयत्न.

 
पंप (पूर्वार्ध)

'पंप' हा इंग्रजी शब्द आता आपल्या इतक्या ओळखीचा झाला आहे की तो मराठी भाषेतलाच वाटतो. 'क्षेपक', 'उदंचक' यासारखे पर्यायी शब्द सुचवले गेले आहेत, पण मला ते 'पाचक, रेचक' या पठडीतले वाटतात. आंग्लभाषा न शिकलेल्या माझ्या आईकडून लहानपणी मिळालेला 'पंप' हाच शब्द मी या लेखात सगळीकडे वापरला आहे. पंप जरी सर्वांच्या ओळखीचा असला आणि घरात, कार्यालयात किंवा रस्त्यातून जाता जाता त्याचे दर्शनही होत असले तरी तो नेमका कसा चालतो, हे अनेकांना ठाऊक नसेल. ते थोडक्यात सांगण्याचा हा एक प्रयत्न.

'पंप' हा शब्द मला समजायला लागल्यापासून माझ्या थोडा ओळखीचा होता. आमच्या घरात दोन लहानसे पंप असायचे, पण त्यातल्या एकाचाही पाण्याशी काही संबंध नव्हता. किंबहुना त्यांचा पाण्याशी स्पर्शसुद्धा होता कामा नये, अशी काळजी घेतली जात असे. त्या काळात चार गॅलनच्या टिनाच्या चौकोनी डब्यातून केरोसीन किंवा घासलेट घरी आणले जात असे. एका पंपाचा उपयोग करून ते रॉकेल रोजच्या उपयोगासाठी एका उभ्या बाटलीत काढले जात असे. डब्यातून केरोसीन उपसण्यासाठी लागणा-या पंपाची रचना अगदी साधी सोपी असते. (आकृती - १ पहा) एका उभ्या नळकांडीच्या तळाला एक भोक ठेवलेले असते. त्यावर एक साधी झडप ठेवलेली असे. ती एकाच बाजूने उघडली जात असल्यामुळे पंपात आलेले रॉकेल डब्यात माघारी जात नाही. त्या पंपाच्या आत एक दट्ट्या असतो. एका बारीकशा सळीच्या तळाला एक पत्र्याची चकती जोडून तो तयार केलेला असतो. चिमटीत पकडून धरण्यासाठी ती सळी वरच्या टोकाला वाकवलेली असते. पंपाच्या वरच्या बाजूला एक तोटी बसवलेली असते. पंपाने वर खेचलेले तेल या तोटीतून बाहेर पडते.


आकृती १

आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे डब्यातून रॉकेल काढण्यासाठी डब्याच्या शेजारी बाटली ठेवून तिच्या तोंडावर नरसाळे बसवले जाते. डब्याच्या वरच्या बाजूच्या एका कोप-यात असलेल्या लहानशा तोंडावरील झाकण उघडून तो पंप त्यातून आत सोडला की त्या पंपाच्या नळकांडीच्या तळाशी असलेल्या भोकामधून डब्यातले तेल पंपात शिरते. हाताने दट्ट्या वर उचलल्यावर त्याला जोडलेल्या चकतीच्या वर असलेला रॉकेलचा स्तंभ वर उचलला जातो आणि तोटीमधून ते तेल नरसाळ्यात पडून बाटलीत जाते. दट्ट्या झटक्यात ओढल्यास बरेचसे रॉकेल त्याच्यासोबत वर उचलून बाहेर काढता येते. तो सावकाशपणे ओढला तर मात्र सर्व रॉकेल दट्ट्याच्या बाजूने असलेल्या फटीमधून खाली पडून जाईल आणि नरसाळ्यात काहीच येणार नाही. दट्ट्या खाली ढकलताना मात्र याच्या उलट परिस्थिती असते. तो झटक्यात खाली ढकलला तर नळकांड्यामधील रॉकेलचा त्याला विरोध होतो आणि तो मोडून काढण्यासाठी जास्त जोर लावला तर पंपाच्या दट्ट्याची सळी वाकण्याचा किंवा तिला जोडलेली चकती निसटण्याचा धोका असतो. त्यामुळे तो किंचित कमी गतीने जरा जपून खाली ढकलायचा आणि झटक्यात वर ओढायचा अशा प्रकारचे थोडे कौशल्य या कामात लागते. डब्यातून बाटलीत रॉकेल काढण्याचे काम नेहमी घरातल्या मुलांकडेच असायचे. त्यामुळे मला रॉकेलचा दुर्गंध सहन करून ते काम बरेच वेळा करावे लागत असे.

आमच्या घरात असलेला दुसरा पंप हा घरातल्या प्रायमस स्टोव्हचा एक भाग होता. आकृती - २ मध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रायमस स्टोव्हमध्ये एक पितळेची टाकी असते. तिच्यात रॉकेल भरायचे. त्या टाकीच्या मधोमध असलेल्या उभ्या नळीतून ते वर येऊन तिच्या तोंडाशी बसवलेल्या नॉझल्समधून त्याचा फवारा पसरतो. त्यापूर्वीच त्या रॉकेलचे बाष्पीभवन झालेले असल्यामुळे तो फवारा लगेच पेट घेतो आणि रॉकेलचे पूर्ण ज्वलन होऊन तीव्र उष्णता देणा-या ज्वाला त्यातून निघतात. टाकीला जोडलेल्या तीन उभ्या सळ्यांवर एक तबकडी ठेवलेली असते. त्या तबकडीवर स्वयंपाकाचे भांडे ठेवले जाते. टाकीतल्या रॉकेलला नळीतून वर चढवण्यासाठी टाकीतल्या रॉकेलवर हवेचा दाब दिला जातो. हवेचा दाब जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने रॉकेल वर ढकलले जाते आणि त्या प्रमाणात ती ज्वाला प्रखर होते.


आकृती २

टाकीतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी पंपाचा उपयोग केला जातो. या पंपातसुध्दा एक लहानसा सिलिंडर (नळकांडे) आणि त्यात मागे पुढे सरकणारा पिस्टन (दट्ट्या) असतो. त्या दट्ट्याच्या तोंडाशी चामड्याचा खोलगट आकाराचा वायसर (वॉशर) बसवलेला असतो आणि सिलिंडरच्या दुस-या टोकाला फक्त आतल्या बाजूला उघडणारा व्हॉल्व्ह असतो. पिस्टन बाहेर ओढतांना बाहेरील हवा वायसरच्या बाहेरच्या बाजूने सिलिंडरमध्ये खेचली जाते आणि पिस्टन पुढे ढकलताना खोलगट आकाराचा वॉशर पसरतो आणि सिलिंडरच्या आतल्या अंगाशी घट्ट दाबला जातो. त्यामुळे आतली हवा बाहेर पडू शकत नाही आणि तिचा दाब वाढत जातो. जेव्हा तो टाकीमधील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो त्यानंतर व्हॉल्ह उघडून जास्त दाबाची हवा टाकीत जाऊन तेथील हवेचा दाब अधिक वाढवते. अशा प्रकारे हवेचा दाब वाढवून स्टोव्हची आच वाढवली जाते. स्टोव्हची आच कमी करायची असेल तर टाकीमधील हवेचा दाब कमी करण्यासाठी एक चावी ठेवलेली असते. ती थोडी सैल करताच आतली थोडी हवा बाहेर पडून तिचा दाब कमी होतो. त्यानंतर ती लगेच पुन्हा आवळून बंद केली नाही तर हवेचा सगळा दाब नाहीसा होऊन स्टोव्ह बंद पडतो. काम संपल्यानंतर या चावीचा उपयोग करूनच स्टोव्ह विझवला जातो.

स्टोव्हमधील रॉकेल जळून कमी होत जाते तसतशी टाकीतली रिकामी जागा वाढत जाते आणि त्यामुळे तिच्यात असलेल्या हवेचा दाब कमी होतो. व्हॉल्व्ह आणि चावीमधून सूक्ष्म प्रमाणात हवा लीक होऊन बाहेर पडण्यामुळेसुद्धा हवेचा दाब कमी होत असतो. त्यामुळे जळत असलेल्या स्टोव्हला अधून मधून पंप मारावाच लागतो. तसे नाही केले तर हवेचा दाब कमी झाल्यामुळे पुरेसे रॉकेल नळीतून वर चढणार नाही आणि स्टोव्हची आच मंद होत होत तो विझून जाईल. हा पंप मारण्यासाठी एका हाताने स्टोव्हची टाकी घट्ट धरून ठेवावी लागते आणि दुस-या हाताने थोडा जोर लावावा लागतो. स्टोव्ह हा प्रकारच थोडा धोकादायक असल्यामुळे लहान मुलांना त्याच्या जवळ जाऊन आगीशी खेळण्याची परवानगी नसे. या पंपाबद्दल माझ्या मनात बरेच कुतूहल असले तरी तो हाताळण्यासाठी मला मोठा होईपर्यंत वाट पहावी लागली.


आकृती ३

आमच्या घराजवळच एक सायकलचे दुकान होते. तिथे काम करणारी मुले पंपाने सायकलींच्या चांकांमध्ये हवा भरताना दिसायची. स्टोव्हची आग प्रखर करणे आणि सायकलची चाके टणक बनवणे हे त्या दोन कृतींचे अगदी वेगवेगळे उपयोग आहेत. पण वातावरणामधील हवेला एका बंदिस्त जागेत कोंबून तिचा दाब वाढवणे हे मात्र या दोन्हीं पंपांचे समान उद्दिष्ट असते. त्यामुळे त्यांची रचना आणि कार्यपद्धती या दोन्हींमध्ये खूप साम्य आहे. स्टोव्हचा पंप जेमतेम बोटभर असतो आणि तोही टाकीच्या आत घुसवून ठेवलेला असल्यामुळे त्याचे बारके टोक तेवढे बाहेरून दिसते. त्या टोकाशी असलेल्या नॉबला चिमटीत पकडून तो पंप मारायचा असतो. सायकलचा पंप चांगला हातभर लांब आणि मनगटाएवढा रुंद असतो, शिवाय त्याला रबराच्या नळीचे दोन हात लांब शेपूट जोडलेले असते. त्या पंपाच्या स्टँडवर दोन्ही पाय भक्कमपणे रोवून उभे राहिल्यावर दोन्ही हातांनी त्या पंपाचा दांडा वर खाली करून हवा भरायची असते. ते काम करतांना अंगाला घाम फुटतो. (आकृती ३ पहा.)