सा रम्या नगरी: बाली - २

विशाल कुलकर्णी

बेसाखी हे इथलं सर्वात मोठं आणि सर्वात जुनं मंदिर. आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर माउंट अगुंग या ज्वालामुखीच्या पायथ्याशी आहे.


बेसाखी मंदिर (छायाचित्र सौजन्य: राहुल दत्ता)

आठ टप्यांमध्ये असलेल्या मंदिराच्या परिसरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांची मंदिरं आहेत. पण त्यातही शिवमंदिराला विशेष महत्व आहे. भगवान शिव, गणेश ही बालीवासियांची आराध्य दैवतं. इथल्या सणासमारंभातही संपूर्ण गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा बांबूच्या कमानींवर शंकराचा प्रतिमेची उपासना केलेली आढळते. पण याशिवाय बेसाखीमध्ये हनुमान आणि इतर अनेक देवतांचीही मंदिरे आहेत. जवळजवळ ७०-८० पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य मंदिर लागतं. पण इथेही मंदिराच्या आवारात प्रवेश मिळाला तरी देवदर्शन झालं नाही. मंदिराचे दरवाजे सदैव बंद असतात. फक्त पुजाऱ्यांनाच काय तो मंदिरात प्रवेश. महिन्यातून एकदा पौर्णिमेच्या दिवशी मात्र मंदिर सर्वांना खुलं होतं. त्या दिवशी बालीमधील समस्त लोक इथल्या मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आमच्या दुर्दैवानं पौर्णिमा आम्ही बालीतून निघायच्या दिवशी असल्यानं मंदिरात प्रवेशाचा योग आला नाही.


उलुवाटू मंदिर

बालीमधल्या बहुतेक मंदिरांमध्ये जाताना आपल्याकडील सोवळ्याप्रमाणे सारोन् नावाचं पारंपारिक वस्त्र कमरेला गुंडाळल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. बालीमध्ये राहणारे बहुतांश लोक पारंपारिक सारोन् आणि वरती एखादा अंगरखा अशा पारंपारिक पोशाखातच दिसतात. स्रिया आणि पुरुष दोघांचाही पोशाख साधारण सारखाच. पुरुषांच्या डोक्यावर 'उदेन' नावाचे एक वस्त्र नागाच्या फण्याप्रमाणे गुंडाळलेले दिसते. आम्ही बेसाखी मंदिराच्या आवारात आम्हाला अंत्यकर्मानंतरच्या सोपस्कारांसाठी आलेले काही स्थानिक लोक दिसले. पूर्वरंग मध्ये बालीमध्ये अंत्यविधीसाठी लग्नापेक्षाही जास्त खर्च येतो असं वाचल्याचं आठवत होतं. आमच्या बरोबर असलेल्या गाईड ला विचारलं असता त्याने त्याविषयी अधिक माहिती दिली. इथला अंत्यविधी आपल्याप्रमाणेच असतो. लाकडापासून तयार केलेल्या बैलाच्या आकारामध्ये पार्थिव ठेवून दहन केले जाते. त्यांनंतरचे रक्षाविसर्जनासारखे सोपस्कार आपल्यासारखेच असतात. शेवटच्या दिवशी संपूर्ण गावाला जेवण दिले जाते. कोणीही गोंधळ करत नाही, रडत नाही. या लोकांच्या मते हा नाश तात्पुरता असतो. उच्चवर्णियांमध्ये या सगळ्याला तीन दिवस आणि इतर वर्णियांमध्ये दोन दिवस लागतात. "म्हणजे बालीमध्ये अजूनही वर्णव्यवस्था आहे तर" असे त्याला विचारल्यावर त्याने होकार दिला. पण अलिकडे वर्णव्यवस्था फक्त मंदिरांपुरतीच आणि नावालाच आहे असेही त्याने सांगितले.


केच्याक नाट्यातील काही प्रसंग:
कथेतील एक राक्षस

पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेलं तानाह् लॉट हे मंदिरही इथल्या प्रसिध्द मंदिरांपैकी एक. मुख्य भूमीपासून समुद्राला जोडणाऱ्या एका खडकावर तानाह् लॉट बांधलेले आहे. पश्चिम किनाऱ्यावर असल्याने इथला सूर्यास्तही प्रसिध्द आहे. याशिवाय बालीच्या दक्षिण टोकावरील पेकाटू गावामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून तीन-चारशे फूट उंच कड्यावर असलेलं उलुवाटू मंदिर हे इथलं आणखी एक आकर्षण. खोल खाली फेसाळणारा समुद्र, खडकांवर आदळणाऱ्या उंचच उंच लाटा आणि त्याच्यासमोरच मावळतीचा सूर्य असं सूर्यास्ताचं मोठं विहंगम दृश्य इथून दिसतं. पर्यटकांच्या दिमतीला इथे मोठी वानरसेना असतेच. मंदिराच्या परिसरात या वानरसेनेच्या तावडीतून आपला कॅमेरा आणि इतर गोष्टी सांभाळण्याची मोठी कसरत करावी लागते.

रोज संध्याकाळी उलुवाटू मंदिरात रामायणावर आधारित प्रसिध्द केच्याक नृत्याचा कार्यक्रम असतो. या नृत्याबद्दल बऱ्याच आधीपासून ऐकलं असल्यामुळे त्याची वेळ साधून आम्ही उलुवाटू मंदिराच्या भेटीचा कार्यक्रम आखला. केच्याक हा नृत्यप्रकार रामायणातील सीताहरण आणि लंकादहन या प्रसंगांवर आधारित आहे. यामध्ये मुख्यत्वे पुरुष कलाकारच भाग घेतात, पण अलिकडे महिलाही काही पात्रे साकारतात. केच्याकचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वाद्याची किंवा संगीताची साथ न घेता फक्त मौखिल लयीच्या साथीने साधारण ५०-६० पुरुष संपूर्ण सीताहरण आणि लंकादहनाचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. हे सगळे पुरुष म्हणजे रामायणातील वानरसेना. ही वानरसेना एक गोल फेरा करुन तोंडाने फक्त च्याक् च्याक् केच्याक असा आवाज काढत ताल धरते आणि त्यांच्या सोबतीने राम, लक्ष्मण, सीता, रावण, हनुमान अशी एकेक पात्रे येऊन रामायणातील ही कथा घडते. यामध्ये राम, रावण, सीता, जटायू यांची वेशभूषा, त्यांची देहबोली, हावभाव, हनुमानाचा प्रवेश, त्याच्या मर्कटलीला आणि अग्नीच्या साथीने रंगवलेला लंकादहनाचा प्रसंग हे खास वाखाणण्याजोगे. हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी पाश्चिमात्यांबरोबरच जपानी पर्यटकही मोठ्या संख्येने आले होते. भारतीय असल्यामुळे या सगळ्या कथेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते. पण परदेशी पर्यटकांसाठी त्या त्या भाषेत ह्या नाट्याची पार्श्वभूमी आणि प्रसंग सांगणारे माहितीपत्रक मिळतं. पण कितीही माहितीपत्रक दिले तरी हिंदू संस्कृती आणि रामायणाचा गंध नसलेल्या परदेशी पर्यटकांना यामध्ये काय विशेष वाटतं याचं मला कुतुहल होतं. पण या सर्व नाट्यामध्ये सोबतीला असलेला च्याक् च्याक् केच्याक् चा तालच सारे वातावरण भारुन टाकतो आणि बरोबर आपल्यालाही एक ठेका धरायला लावतो. इतका की नाटक संपल्यावर परत जाताना लहान मुलांबरोबरच मोठ्यांच्या तोंडातही च्याक् च्याक् चा आवाज घोळत राहतो आणि तो ऐकताना क्षणभर आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीचा अभिमान वाटून जातो.


केच्याक नाट्यातील काही प्रसंग:
हनुमानाचा प्रवेश

केच्याक नाट्यातील काही प्रसंग:
सीता आणि लक्ष्मण यांच्यातील एक प्रसंग

| २ |