सूचीशास्त्र : काही अनुभव - ३

डॉ. मीरा घांडगे

साधनसामग्री :

सूचीचे काम करताना त्यासाठी लागणारी कार्डे आणि तयार झालेली कार्डे ठेवण्याची सोय या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकमेकांना न चिकटणारी; पण जास्त जाड नसलेली, पोस्टकार्डासारखा कागद असलेली व त्याच आकाराची कार्डे नोंदीसाठी अपेक्षित असतात. ही कार्डे बाजारात मिळतात; पण खूप महाग मिळतात. कामाचा व्याप पाहता कार्डांची संख्याही खूप अपेक्षित होती. त्यासाठी पुण्यातील शनिपाराजवळील 'गुरुदत्त रद्दी डेपो'मधून कागदाच्या लांब पट्ट्या किलोवर विकत घेऊन घरी नेणे व त्यांची योग्य आकाराची कार्डे कापणे असा उपक्रम सुरू केला. कार्डे कापण्यासाठी माझे कै. आई-वडिलांसह, सौ. वहिनी, लहान भाचा-भाची सर्वच मदत करीत. कारण एकावेळी पंधरा ते वीस किलो रद्दी डेपोमधील पट्ट्या विकत घेणे भाग पडे; पण ती ठेवणार कुठे? चप्पलच्या दुकानातून बुटांची खोपी यासाठी विकत आणली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सूचीसाठी पंधरा खोकी कमी पडली होती. बाकी दोन सूचीसाठी वेगळी खोकी. कार्डे तयार झाल्यानंतर ती उतरवून काढली. छापल्यानंतर मुद्रिते शोधणे इ. सर्वच कामे स्वतःला बैठक मारून करावी लागली. यासाठी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सूचीचा खर्च साहित्य परिषदेने दिला, तर अनुष्टुभ्, अस्मितादर्शच्या सूचीचा खर्च पदरमोड करून केला.

ही कार्डे बाजारात मिळतात; पण खूप महाग मिळतात. कामाचा व्याप पाहता कार्डांची संख्याही खूप अपेक्षित होती. त्यासाठी पुण्यातील शनिपाराजवळील 'गुरुदत्त रद्दी डेपो'मधून कागदाच्या लांब पट्ट्या किलोवर विकत घेऊन घरी नेणे व त्यांची योग्य आकाराची कार्डे कापणे असा उपक्रम सुरू केला. कार्डे कापण्यासाठी माझे कै. आई-वडिलांसह, सौ. वहिनी, लहान भाचा-भाची सर्वच मदत करीत. कारण एकावेळी पंधरा ते वीस किलो रद्दी डेपोमधील पट्ट्या विकत घेणे भाग पडे; पण ती ठेवणार कुठे? चप्पलच्या दुकानातून बुटांची खोपी यासाठी विकत आणली.

प्रकाशनाचा प्रश्न :

यासंदर्भातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा अनुभव फारच अविस्मरणीय आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कै. डॉ. गं. ना. जोगळेकर या कामाची जाण असणारे आणि दखल घेणारे असल्याने सूचीचा देखणा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शताब्दीनिमित्ताने प्रकाशित करून यथोचित सूचीकर्त्याचा सत्कारही केला. ही फार आनंदाची आणि संस्मरणीय घटना होय; पण तरीही या कामाचे जाणकार दखल घेणारे लोक अपवादानेच आढळतात.

'अस्मितादर्श'च्या सूचीचे काम मी स्वेच्छेने वेळ, पैसा व मेहनत करून केले. एका व्यक्तीने ४० वर्षे सातत्य ठेवून चालविलेले मासिक किती महत्त्वाचे आहे. अभ्यासकांच्या सोयीसाठीच हे काम केले एका प्रकाशकांनी ते प्रकाशित करण्याचे मान्य करून ती फाइल तीन वर्षे आपल्या कार्यालयात ठेवून घेतली व शेवटी तिच्यावर चढलेले धूळही न झटकता परत केली. डॉ. पानतावणे सरांनाही त्याचे खूप वाईट वाटले. शेवटी त्यांच्याच मध्यस्थीने उर्वरित वर्षांची भर घालून प्रतिमा प्रकाशनाने ही सूची प्रकाशित केली. चंद्रपूरच्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात सूचीचे प्रकाशन करून या कामाची योग्य ती दखल घेतली.

'अनुष्टुभ्'च्या १९७७-१९९७ या वीस वर्षांच्या सूचीचे काम पूर्ण केले व त्यानंतर मोठा प्रश्न आला तो प्रकाशनाचा. सूचीचे काम करीत असताना 'अनुष्टुभ्'परिवाराने ती प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले होते; पण सूची तयार झाल्यावर मात्र त्यांनी हात झटकले. अनेक सन्माननीय प्रकाशक व प्रकाशनाला अनुदान देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधला. अनुदान देणाऱ्या संस्थांनी सूची हे संशोधन नाही तर संकलन आहे म्हणून अनुदान नाकारले. हे काम ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासकाने केले असते, तर अनुदान दिले असते असा अभिप्राय मिळाला. तर प्रकाशकांनी अशा पुस्तकांची विक्री होत नाही म्हणून फाईलला हातही लावला नाही. अशा प्रकारच्या सूचीची कामे आज कुणीही करीत नाही असे म्हटले जाते. हे रूक्ष, चिवट, चिकाटीचे, तांत्रिक काम आहे याची अनेकांना कल्पना आहे. यासाठी वेळ, पैसा, मेहनत आणि ज्ञान हे सर्वच खर्ची पडते. असे असतानाही अशी कामे करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत नाही किंवा केलेल्या कामाची दखलही घेतली जात नाही, याची खंत वाटली व शेवटी अनुष्टुभ्‌चे हे काम 'बासनात' बांधून ठेवून दिले. त्यानंतर चार वर्षांनी योगायोगाने हे काम एका प्रकाशकाने हाती घेतले. तोपर्यंत आणखी एक वर्ष गेले होते. शेवटी पंचवीस वर्षांचे काम प्रकाशित झाले. (त्याचे ना मान ना धन?)

अशी अवस्था आजकाल सूचीकार्याच्या संदर्भात दिसते. सहाशे एकोणीस पानांच्या ग्रंथांची निर्देशसूची केवळ सहा-सात दिवसांत तयार करून देण्याचा धाक दाखवणारे, सत्ताधारी लोक असतील तर संशोधनाचा पाया असलेले हे क्षेत्र विकसित कसे होणार? जज्ज्ञ व्यक्तीदेखील यासारख्या अनुभवांमुळे आणखी काम करण्याचे धैर्य दाखवणार नाहीत. दोन-चार कविता लिहिणारा-एखादा कवितासंग्रह प्रकाशित झालेला कवी ’प्रसिद्ध-कविश्रेष्ठ’ ठरतो. त्यांना बक्षिसे मिळतात; पण अशी कामे करणाऱ्या व्यक्तींची मात्र कुणीही दखल घेत नाही, याची खंत वाटते. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती महामंडळाकडून (महाराष्ट्र शासनाकडून) ग्रंथांना बक्षिसे दिली जातात. त्यात ललित साहित्यात वैचारिक साहित्यांनाच बक्षिसे आहेत; पण त्यात सूची साहित्याला बक्षीसच नाही. अन्के मान्यवर तज्ज्ञांनी हे विषय सुचवूनही शासन याची दखल घेत नाही, याचे वाईट वाटते.

माझ्या या क्षेत्रातील अनुभवांमुळे ज्यांनी यापूर्वी अशी कामे केली आहेत अशांचे अनुभव शोधण्याचा प्रयत्न केला. बत्तीस हजार ग्रंथांची व नियतकालिकांच्या सूचीचे काम करनारे सूचीकार कै. शं ग. दाते यांना ज्यांनी पाहिले होते त्यांनी ’पायात झिजलेली, प्रसंगी तुटलेली स्लिपर, जुन्या झालेल्या सायकलवर सूचीच्या ध्यासाने फोरणारे कै. दाते यांचे अथक प्रयत्न सांगितले. त्यांच्या पश्चात ’दाते सूची मंडळ’ निघाल्याचे ऐकण्यात आले. त्यांच्या कार्याला मन:पूर्वक नमस्कार केला आणि आता यापुढेही अशी कामे करायची नाहीत असे मनाशी ठरविले, काय करणर?

संदर्भ ग्रंथ :
१) डॉ. वसंत स, जोशी, डॉ. गं. ना. जोगळेकर (संपा.) - भाषा आणि साहित्य संशोधन, खंड २, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, पहिली आवृत्ती. १९८५.
२) डॉ. सु. रा. चुनेकर - सूचींची सूची, प्रतिमा प्रकाशन, पुणे १९९५.
३) प्रा. रा. ग. जाधव (संपा.) - मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड ७, भाग १, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, २००९.

डॉ. मीरा नारायण घांडगे
एम. ए., एम. फिल., पी. एच. डी. (मराठी)
सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

| | ३