सा रम्या नगरी: बाली

विशाल कुलकर्णी

इंडोनेशिया म्हणजे लांबच लांब पसरलेलं आणि जवळपास अठरा हजार छोट्यामोठ्या बेटांनी बनलेलं राष्ट्र. त्यातील जावा, सुमात्रा, कालिमांतान, सुलावेसी ही मोठी आणि महत्वाची बेटं आणि बाली, लोंबाक, कोमोदो, रिंका ही तुलेनेने लहान. पण या सर्वांमध्येही चिमुरड्या बालीचं महत्त्व जरा जास्तच. कारण तिथल्या सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीमुळे त्याला प्राप्त झालेलं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचं स्थान. बाली बेटाच्या नावाचा रामायणातील सुग्रीव आणि बालीशी काहीतरी संबंघ असावा असे मला वाटत होते. पण बाली हे नाव एका संस्कृत शब्दापासून बनले आहे हे नंतर कळले. इंडोनेशिया जरी पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र असले तरी बाली आपली पुरातन हिंदू संस्कृती टिकवून आहे. इथे जवळजवळ ९० टक्के लोक हिंदू आहेत आणि अजूनही आपल्या पुरातन चालीरीती जपून आहेत.

 
भाग १

लहानपणी पु.लं.च्या पूर्वरंग मध्ये इंडोनेशियातील बाली बेटाविषयी वाचलं होतं. बालीचे निसर्गसौंदर्य आणि तिथल्या हिंदू संस्कृतीविषयी पुलंनी अगदी भरभरून लिहिल्यामुळे बालीला जाण्याची ओढ मला आधीपासूनच होती. आणि 'इट प्रे लव्ह' हा ज्युलिया रॉबर्टस् चा चित्रपट पाहिल्यापासून आमच्या सौंभाग्यवतींनाही अचानक बालीचे आकर्षण वाटू लागले. सुदैवाने गेल्या एक वर्षभरापासून सिंगापूरात वास्तव्यास असल्यामुळे 'बाली'भेटीचा योग जुळून आला.

इंडोनेशिया म्हणजे लांबच लांब पसरलेलं आणि जवळपास अठरा हजार छोट्यामोठ्या बेटांनी बनलेलं राष्ट्र. त्यातील जावा, सुमात्रा, कालिमांतान, सुलावेसी ही मोठी आणि महत्वाची बेटं आणि बाली, लोंबाक, कोमोदो, रिंका ही तुलेनेने लहान. पण या सर्वांमध्येही चिमुरड्या बालीचं महत्त्व जरा जास्तच. कारण तिथल्या सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीमुळे त्याला प्राप्त झालेलं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचं स्थान. बाली बेटाच्या नावाचा रामायणातील सुग्रीव आणि बालीशी काहीतरी संबंघ असावा असे मला वाटत होते. पण बाली हे नाव एका संस्कृत शब्दापासून बनले आहे हे नंतर कळले. इंडोनेशिया जरी पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र असले तरी बाली आपली पुरातन हिंदू संस्कृती टिकवून आहे. इथे जवळजवळ ९० टक्के लोक हिंदू आहेत आणि अजूनही आपल्या पुरातन चालीरीती जपून आहेत. सिंगापूरहून बालीला थेट विमानाने जाता येतं. राजधानी जाकार्ता असलेलं जावा बेट सोडून साधारण पन्नास मिनिटांनी विमानातून छोटी छोटी पाचूची बेटं दिसू लागली की समजावं बाली जवळ आलं. बालीच्या विमानतळासाठी मात्र एकदम छान जागा निवडली आहे. दोन छोट्या बेटांमधील चिंचोळ्या भागावर बनलेली धावपट्टी विमानातील दोन्ही बाजूच्या लोकांना निळंशार पाणी आणि छान नजारा बघण्याची समान संधी देते.


नुसा दुआ बीच

आमचे होटेल बालीला दक्षिणेकडून जोडलेल्या एका छोट्या बेटावरील बेनोआ या भागात होते. हा भाग नुसा दुआ या बीचजवळ येतो. हा बीच बालीमधल्या प्रसिध्द बीचेसपैकी एक आहे. निळंशार पाणी आणि थोडाश्या उथळ खोलीमुळे वॉटरस्पोर्टचा आनंद लुटणाऱ्यांची इथे बरीच गर्दी असते.
पण नुसा दुआ शिवायही बालीमध्ये अनेक नयनरम्य बाचेस् आहेत आणि आपल्याकडच्या गोव्याप्रमाणे इथेही प्रत्येक बीचचे आपले असे एक वैशिष्ट्य आहे. बालीच्या उत्तरेला असणारा लोवीना बीच डॉल्फिन पाहणाऱ्यांसाठी पर्वणी, तर पूर्वेकडे काळ्या रेतीपासून बनलेल्या सानुर बीचचे आपलेच असे एक सौंदर्य. संध्याकाळी आम्ही हॉटेलपासून जवळच असलेला सर्वात प्रसिध्द कुटा बीच पाहण्यासाठी गेलो. इथे असते. बीचच्या कडेने रिसॉर्टस् आणि रेस्तरॉंची रेलचेल आहे. संध्याकाळी समुद्रकिनारी या रेस्तरॉंमध्ये बसून खास बालनीज् सॉसमध्ये घोळवलेले ताजे सीफूड आणि आपल्या आवडत्या मद्याचा आस्वाद घेत सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच. म्हणूनच ऑस्ट्रेलियन आणि इतर पाश्चिमात्य पर्यटकांचा हा सर्वात आवडता बीच असावा. या बीचच्या मागे असणारा सेमिन्याक हा भाग हॉटेल्स, दुकाने आणि रेस्टॉरंटनी गजबजलेला आहे त्यामुळे बरेच पर्यटक या मध्यवर्ती भागात राहणे पसंत करतात.

वेळ कमी असल्यामुळे गाडी ठरवून पुढील तीन दिवस बालीचा एकेक भाग पाहण्याचे आम्ही ठरवले. सकाळी आठ वाजताच आमचा ड्रायव्हर वायान् हजर झाला. त्याचे वय साठीकडे झुकलेले होते. पण त्याच्याकडे पाहणे मोठे गंमतीदार होते. त्याने कपाळावर नाम ओढला होता आणि दोन्ही कानावर एकेक फूल ठेवलेले होते. त्याविषयी त्याला विचारले असता त्याने सांगितले की सकाळीच त्याने पूजा केली होता आणि पूजेचा एक भाग म्हणून त्यांच्याकडे कानावर दोन फुले ठेवतात. शिवाय त्याने गाडीतही चौकोनी आकाराच्या तळहाताएवढ्या केवड्याच्या पानांच्या द्रोणात काही फुले आणि चॉकलेटस् ठेवली होती. हे द्रोण नंतर बालीमधील प्रत्येक घर, दुकान, हॉटेल, गाडी अशा ठिकठिकाणी ठेवलेले पाहायला मिळाले. रोज सकाळी या द्रोणांमधून देवाला नैवेद्य अर्पण करुन दिवसाची सुरुवात करण्याची इथे पध्दत आहे. एकंदरीत लोक फारच धार्मिक आणि आणि जुन्या परंपरा, चालीरीती जपणारे आहेत.

पहिल्या दिवशी आम्ही बालीचा मध्य आणि उत्तरेकडील काही भाग पाहण्याचे ठरवले. देंपासार हे राजधानीचे मुख्य शहर पार केले की निसर्गसौंदर्याने नटलेल्या खऱ्या बालीचे दर्शन घडायला सुरुवात होते. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी भाताची शेतं, उंच नारळाची झाडं, मसाल्यांचे वेल, मध्येच काही घरं असं खेड्यांच दिसणारं दृश्य आपल्या कोकणाची आठवण करुन देणारं. काही मोजकी शहरे सोडली तर बरेचसे बाली हे अश्या छोट्या छोट्या खेड्यांनीच बनलेलं आहे. इथल्या घरांची रचना अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. कौलारू घरांच्या दोन्ही बाजूच्या टोकांवर एखादी मूर्ती किंवा छोटेसे शिखर असते. कौलारु छपरे निमुळती असली तरी उताराच्या शेवटी चिनी पॅगोडाप्रमाणे छपरे थोडीशी वर उचललेली असतात. प्रत्येक घराभोवती काळ्या दगडांची तटबंदी असते आणि घराबाहेर त्याच धर्तीचे एक छोटेसे दगडी देऊळ पाहायला मिळते. इथले लोक त्याला फॅमिली टेम्पल म्हणतात. काही ठिकाणी हे देऊळ इतके मोठे असते की घर कोणते आणि देऊळ कोणते हेच कळत नाही. तसे पाहिले तर बालीमध्ये मंदिरांची काही कमी नाही. आणि इथली मंदिरे हे बालीचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. तानाह लॉट, बेसाखी, तामान् आयून्, आणि उलूवाटू ही इथली काही प्रसिध्द आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे एकदा तरी नक्कीच भेट द्यावी अशी.


बालीमधील मंदिरांचे प्रवेशद्वार

देंपासारपासून उत्तरेकडे थोड्याच वेळात मेंगवी भागात असलेले तामान् आयून् या मंदिर लागते. हे मंदिर तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. सुरुवातीला एक मोठे प्रवेशद्वार आणि पुढे छान हिरवळ पार केल्यावर मुख्य मंदिर लागते. इथल्या मंदिरांची प्रवेशद्वारे कमानीसारखी नसतात. दोन्ही बाजूंना दोन नक्षीदार शिल्प असलेल्या भिंती आणि त्यांच्या मध्ये असलेला आत जाण्यासाठीचा भाग एकदम सपाट. त्यावर काहीच नक्षीकाम नाही. असं वाटतं की कोणीतरी एक पूर्ण नक्षीदार भिंत बांधून मधला भाग कापून घेऊन गेलं असावं. मंदिराच्या तटबंदी असलेल्या मुख्य भागात पर्यटकांना प्रवेश नाही. पण कमरेपर्यंत असलेल्या तटबंदीतून आतील मंदिराचे अवशेष पाहता येतात. बालीमधल्या बहुतेक मंदिरांना लांबून आपल्याकडील दीपमाळेप्रमाणे दिसणारी गोपूरे दिसतात. आणि बहुतांश गोपूरांना आठ ते दहा उंच टप्पे असतात. पण जवळून पाहिल्यावर त्यावर चीनी पॅगोडाची छाप दिसते. या गोपूरांना आणि एकूणच मंदिरांच्या निमुळत्या छपरांना नारळाच्या पानांचे जाड अावरण असते आणि त्यापासून येणारा काळपट रंग या मंदिरांना एक वेगळीच शोभा देऊन जातो.

१ | |