सा रम्या नगरी: बाली - ३

विशाल कुलकर्णी

केच्याक शिवाय लेगॉंग आणि बारोंग हे बालीमधले स्थानिक नृत्याविष्कारही बालीला भेट दिल्यावर एकदा तरी आवर्जून पाहावेत असे. यापैकी लेगॉंग हा तुलनेने नवीन असलेला आणि प्रामुख्याने हाताच्या बोटांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांनी साकारलेला नृत्यप्रकार.


बारोंग नृत्यातील एका नर्तिकेची मुद्रा (छायाचित्र सौजन्य: राहुल दत्ता)

हा फक्त १४ वर्षाच्या आतील मुलीच करतात, याचे प्रशिक्षण पाचव्या वर्षापासून दिले जाते, आणि हा शिकणाऱ्या मुलींना फार महत्त्व असून त्यांचे लग्न राजघराण्यातील किंवा श्रीमंत लोकांशी होते असे कळले. जपानमध्ये असताना माझ्या ओळखीच्या अनेक जपानी मुली बालीला खास तिथले नृत्य शिकण्यासाठी भेट देतात असे त्यांच्याकडून ऐकले होते. या लेगॉंग नृत्यप्रकाराची महती ऐकून हेच तर त्याचे कारण नसावे ना असे वाटून गेले. वेळेअभावी हा लेगॉंग आम्हाला पाहता आला नाही, पण एका दिवशी बारोंग हा आणखी एक प्रसिध्द नृत्यप्रकार पाहण्याची संधी मिळाली. हा नृत्य आणि संगीताच्या साथीने साकारला जाणारा प्रकार काही प्रमाणात महाभारतावर आधारित आहे. यामध्ये बारोंग हे सिंहासदृश काल्पनिक पात्र सत्प्रवृत्तींचे प्रतिक तर रंगदा हे एक राक्षस पात्र दुष्प्रवृत्तींचे प्रतिक आहे. कुंती आणि सहदेव हे एकत्र जात असताना रंगदा कुंतीवर आपल्या वाईट शक्तींचा प्रभाव पाडतो आणि ती सहदेवास अटक करुन मारुन टाकण्याचा आदेश देते. नंतर सहदेव बारोंगच्या मदतीने सुटका करुन घेतो आणि या नाट्याचा शेवट बारोंग आणि रंगदा यांच्या युध्दातील बारोंगच्या विजयाने होतो अशी या नाट्याची सर्वसाधारण कथा आहे.


बारोंग नाट्यातील सिंहाचे पात्र (छायाचित्र सौजन्य: राहुल दत्ता)

यातील बारोंग हे दोन कलाकारांनी अंगावर झूल पांघरुन साकारलेले सिंहाचे पात्र चीनी ड्रॅगनच्या नृत्याची आठवण करुन देते. पण एकंदर सगळ्या पात्रांची वेशभूषा अप्रतिम आहे. शिवाय सिंहाच्या लयदार हालचाली आणि कुंती, सहदेव यांचा अभिनय लक्षात राहण्याजोगा. पण मध्येमध्ये येणारे कुंतीचे आणि रंगदाचे विदूषकरुपी सेवक आणि त्यांनी पाश्चात्य लोकांना खूष करण्यासाठी इंग्रजीतून केलेले संभाषण आणि सवंगपणा यांनी मात्र कथेच्या लयीचा आणि एकूणच नाट्याचा थोडा विचका करुन टाकला असे वाटले. बालीला गेल्या काही वर्षांत अचानक गवसलेल्या प्रसिध्दीचा तो एक परिपाक असावा.


माउंट बातूर (किंतामणी) (छायाचित्र सौजन्य: राहुल दत्ता)

एकंदरच बालीमध्ये गोष्टींचे फारच बाजारीकरण झाल्यामुळे पुलंनी त्या काळात अनुभवलेल्या बर्‍याच गोष्टी आता पाहायला मिळत नाहीत. पण त्या काळातील आपले अस्तित्व आजही टिकवून असलेल्या काही गोष्टींपैकी एक म्हणजे इथले ग्रामीण जीवन. दुपारच्या कडक उन्हातही उतारावर दिसणारी टप्प्याटप्प्यांनी बनलेली हिरवीगार भातशेते डोळ्यांना एक वेगळंच सूख देऊन जातात. नारळाच्या झावळ्यापासून बनलेली खास बाली पध्दतीची टोपी घातलेले शेतकरी आजही या शेतांमधून काम करताना दिसतात. पण इथेही काही ठिकाणी या उतारावरील शेतांच्या समोरच इथल्या लोकांनी पर्यटकांसाठी रेस्तरॉं उघडलेली आहेत. भर दुपारी डोंगरावरील शेतांमधून चढउतार करुन थकून आल्यावर विसाव्यासाठी थांबावे आणि आपल्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारत समोरच्या दृश्याचा आस्वाद घेण्याची इथे चांगली सोय आहे. बालीला जसा निसर्गाकडून सौंदर्याचा वरदहस्त लाभला आहे तसाच त्याच्या प्रकोपाचाही. इथे दोन मोठे जागृत ज्वालामुखी आहेत. त्यापैकी माउंट बातूर किंवा स्थानिक भाषेतील किंतामणी ह्या ज्वालामुखीचा १९७४ साली तर माउंट अगुंग ह्या सर्वात उंच आणि मोठ्या ज्वालामुखीचा १९३० साली उद्रेक झाला होता. शिवाय २००४ सालातील त्सुनामीच्या आठवणी अजूनही इथल्या लोकांच्या मनात ताज्या आहेत. असं असलं तरी या दोन्ही पर्वतांवर चढाई करणारे साहसी वीर कमी नाहीत. माउंट अगुंगसाठी दोन दिवसांचा गिर्यारोहणाचा ट्रेक आहे. या दोन्ही ज्वालामुखी पर्वतांच्या पायथ्याशी मोठी सरोवरे आहेत. यापैकी बेडुगुल भागात असलेले बेरांतान सरोवर आणि किंतामणीच्या पायथ्याशी असलेले बाटुल सरोवर ही थंड हवेची दोन प्रसिध्द ठिकाणं आहेत.


डोंगर उतारावरील शेती (छायाचित्र सौजन्य: राहुल दत्ता)

बालीच्या चार दिवसांच्या वास्तव्यात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे फक्त चार-पाच दिवस राहण्यासारखं ठिकाण नाही. इथे पाहण्यासारखं, करण्यासारखं इतकं काही आहे की एक दोन आठवडेही कमी पडावेत. इथे सर्व प्रकारच्या पर्यटकासांठी काही ना काहीतरी आहेच. गिर्यारोहकांसाठी दोन मोठे ज्वालामुखी आहेत, डोंगरामधून खळाळणाऱ्या पाण्यात राफ्टींगची सोय आहे, भटकंतीसाठी अनेक जंगलं, अभयारण्यं आहेत, कलासक्तांसाठी शिल्पकला, चित्रकला, चांदीची कलाकुसर असणारी उबुड, बाटुबुलान सारखी ठिकाणं आहेत, स्कूबा डायव्हींग आणि स्नोर्केलिंगसाठी निळंशार पाणी आणि तळ दिसणारे किनारे आहेत, संस्कृतीची आवड असणाऱ्यांसाठी प्रसिध्द मंदिरं, नृत्याविष्कार आहेत. म्हणूनच मला वाटतं एकदा तरी बालीची सफर करावीच. सहलीचा हेतू काहीही असो, बाली तुम्हाला निराश करणार नाही.

| | ३