संस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - २

अरविंद कोल्हटकर

भाग २

पक्षिगणातील राजहंस, कोकिळ, चक्रवाक आणि चकोर ह्या अन्य चौघांवरतीहि संकेत बेतले आहेत. राजहंस हा मानससरोवरात राहतो आणि तेथील सुवर्णकमळांचा चारा खातो, तसेच दुधात पाणी मिसळले तर ते तो वेगळे करू शकतो असे दोन संकेत राजहंसाविषयी आहेत.

अस्ति यद्यपि सर्वत्र नीरं नीरजमण्डितम्।
रमते न मरालस्य मानसं मानसं विना॥

कमलपुष्पांनी मंडित असे पाणी सर्वत्र असले तरी हंसाचे मन मानस सरोवराव्यतिरिक्त कोठेच रमत नाही.

कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो हंस: कुतो मानसात्।
किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्भ: सुधासन्निभम्।
रत्नानां निचया: प्रवालमणयो वैडूर्यरोहा: क्वचित्।
शम्बूका: किमु सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम्॥

(बगळे आणि हंस ह्यांच्यामधील संवाद.) ’रक्तवर्णाचे नेत्र, मुख आणि पाय असलेला तू कोण?’ ’मी राजहंस.’ ’तू कोठून आलास?’ ’मानस सरोवरापासून.’ ’तेथे काय मिळते?’ ’सुवर्णकमळांची वने, अमृतासमान जल, रत्नांचे खच, कोठेकोठे प्रवालमणि आणि वैडूर्य.’ ’कवडया मिळतात का?’ ’नाही.’ हे ऐकल्यावर बगळे खीखी करून हसले.

अम्भोजिनीवनविलासनमेव हन्त
हंसस्य हन्तु नितरां कुपितो विधाता।
न त्वस्य दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां
वैदग्ध्यकीर्तिमपहर्तुमसौ समर्थ:॥

रागावलेला ब्रह्मदेव हंसापासून त्याचा कमलवनातील विहार छिनावून घेऊ शकेल पण दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याच्या विद्येची त्याची ख्याति तो काढून घेऊ शकत नाही.

हंस: शुक्लो बकः शुक्लः को भेदो बकहंसयो:।
नीरक्षीरविभागे तु हंसो हंसो बको बक:॥

हंस पांढरा, बगळाहि पांढरा. तर मग हंस आणि बगळा ह्यांच्यात भेद काय? दूध आणि पाणी वेगळे करण्याची वेळ आली की कळते की हंस तो हंस आणि बगळा तो बगळा.

कोकिळ पक्षी आपली अंडी कावळ्यांच्या घरटयात ठेवून त्यांच्याकडून आपल्या पिलांचे पालनपोषण घडवून आणतात हा एक प्रख्यात संकेत आणि त्यामुळे कोकिळ पक्षी ’परभृत’ ह्या नावानहि ओळखला जातो. शाकुन्तलात कालिदासाने दोनदा ह्या शब्दाचा प्रयोग केला आहे.

पोटामध्ये दुष्यन्ताचे मूल असलेली शकुन्तला आश्रमातून दुष्यन्ताकडे येते पण ऋषीच्या शापाचा परिणाम म्हणून तो तिला ओळखत नाही आणि तिचा स्वीकार करण्याचे नाकारतो. शेवटचा उपाय म्हणून दुष्यन्ताने तिच्याजवळ ठेवलेली खुणेची आंगठी दाखविण्याचा ती प्रयत्न करते पण अंगठी तिच्या बोटातून शचीतीर्थावरच गळून पडली असे तिच्याबरोबर आलेली तापसी सांगते. दुष्यन्ताला हा सगळा रचलेला डाव वाटतो आणि तो म्हणतो:

स्त्रीणामशिक्षितपटुत्वममानुषीषु
संदृश्यते किमुत या: प्रतिबोधवत्य:।
प्रागन्तरिक्षगमनात्स्वमपत्यजातं
अन्यैर्द्विजै: परभृता: खलु पालयन्ति॥

अशिक्षित असूनहि चलाखी दाखविणे हे मानवी बुद्धि नसलेल्या कोकिळांनाहि जमते, तर मग बुद्धि असलेल्या स्त्रियांचे काय बोलावे? अंतराळात जाण्यापूर्वी कोकिळा अन्य पक्षांकडून आपल्या पिल्लांचे पालनपोषण करवतातच ना?

कण्वमुनि आपल्या शिष्यांसह दुष्यन्ताकडे निघालेल्या शकुन्तलेची पाठवणी करण्यासाठी अरण्याच्या सीमेपर्यंत येतात. तेथे त्यांना कोकिळेचा आवाज कानावर पडतो आणि ते म्हणतात:

अनुमतगमना शकुन्तला तरुभिरियं वनवासबन्धुभि:।
परभृतविरुतं कलं यथा प्रतिवचनीकृतमेभिरीदृशम्॥

वनातले बान्धव असे जे वृक्ष त्यांनी कोकिळेच्या मधुर आवाजाने जणू उत्तर देऊन शकुन्तलेच्या जाण्याला आपले अनुमोदन दिले आहे.

तत्किं स्मरसि न भुक्तं यत्पिक रे काकमन्दिरे पूर्वम्।
सहकारकुसुमकाले हठेन कुरुषेऽधुना रावम्॥

अरे कोकिळा, आंब्याला मोहर यायच्या वेळी इतका आवाज करतोस? पूर्वी कावळ्यांच्या घरात खाल्लेले तुला आठवत नाही का?

चक्रवाक आणि चक्रवाकी रात्रभर एकमेकांस साद घालत बसलेले असतात. ते वस्तुत: एकाच कमलवेलीवर बसलेले असतात पण मध्ये वेलीचे पान आल्याने ते एकमेकांस पाहू शकत नाहीत. त्यांचा हा भ्रम सकाळी सूर्य उगवल्यावर दूर होऊन त्यांचे मीलन होते हा संकेत.

त्यज चक्रवाकि शोकं बधान धैर्यं सहस्व समयममुम्।
अयमेव वासरमणिर्हरिष्यते शापमूर्च्छा ते॥

(सूर्य अस्ताला गेल्यामुळे चक्रवाकीला आपला प्रियकर दिसेनासा होतो आणि ती आक्रोश करू लागते, तेव्हा:)
हे चक्रवाकि, शोक सोड, धीर धर आणि ही वेळ काढ. हाच दिवसमणि सूर्य (पुन: उगवल्यानंतर) तुझी शापामुळे झालेली स्थिति दूर करणार आहे.

अस्तंगतोऽयमरविन्दवनैकबन्धु-
र्भास्वान्न लङ्घयति कोऽपि विधिप्रणीतम्।
हे चक्र धैर्यमवलम्ब्य विमुञ्च शोकम्
धीरास्तरन्ति विपदं न तु दीनचित्ता:॥

कमलवन फुलवणारा सूर्य अस्तंगताला गेला आहे कारण ब्रह्मदेवाने लिहिलेले कोणी टाळू शकत नाही. अरे चक्रवाका, धीराने घे आणि शोक सोड. धैर्यवान् व्यक्ति संकटावर मात करतात, दुबळ्या मनाचे नाही.

रामदासस्वामींची ’मनाच्या श्लोका’तील उक्तीहि येथे आठवते:

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥

चकोर पक्ष्याभोवती दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें-। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टि पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो.

त्विषं चकोराय सुधां सुराय।
कलामपि स्वावयवं हराय।
ददज्जयत्येष समस्तमस्य।
कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥
उत्तरनैषधचरित २२.६५.

(चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात् हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे.

मृषा निशानाथमह: सुधा वा
हरेदसौ वा न जराविनाशौ।
पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा
विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥
उत्तरनैषधचरित २२.१०२.

चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ति देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत?

स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां
चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा।
अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय:
पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥
सौंदर्यलहरी ६३.

तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात.

पक्ष्यांच्याकडून आता भ्रमरांकडे वळू. ह्या भ्रमरांना ’षट्पद’, षडङ्घ्रि’ (सहा पायांचे), ’द्विरेफ’ (नावात दोन रकार असलेले - ’भ्रमर’ ह्या शब्दात दोन ’र’ आहेत) असेहि म्हणतात. कमलपुष्पाभोवती घोंघावणारे भ्रमर सूर्य मावळल्यावर कमलपुष्पाच्या पाकळ्या मिटल्यामुळे आत बंद होतात. त्या पोखरून त्यातून बाहेर पडायचे त्यांच्याने करवत नाही आणि ते सकाळी सूर्योदयानंतर पाकळ्या पुन: उमलण्याची वाट पहात आत बसून राहतात.

बन्धनानि किल सन्ति बहूनि प्रेमरज्जुमयबन्धनमन्यत्।
दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रि: निष्क्रियो भवति पङ्कजबद्ध:॥

बंधने अनेक प्रकारची असतात पण प्रेमरज्जूचे बंधन काही वेगळेच असते. लाकूडहि पोखरू शकणारा भुंगा कमळात अडकला तर निष्क्रिय होतो.

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री:।
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार॥
अप्पय्यदीक्षितकृत कुवलयानन्द.

’रात्र संपेल, सुप्रभात उजाडेल, सूर्य वर येईल, कमळांचे सौंदर्य खुलेल,’ कळीच्या आत अडकलेला भ्रमर असा विचार करत असतांना अरे! अरे! हत्तीने कमळाची वेलच उपटली!
(बगळे आणि हंस ह्यांच्यामधील संवाद.)
'रक्तवर्णाचे नेत्र, मुख आणि पाय असलेला तू कोण?'
'मी राजहंस.'
'तू कोठून आलास?'
'मानस सरोवराहून.'
'तेथे काय मिळते?'
'सुवर्णकमळांची वने, अमृतासमान जल, रत्नांचे खच, कोठेकोठे प्रवालमणी आणि वैडूर्य.'
'कवडया मिळतात का?'
'नाही.'
हे ऐकल्यावर बगळे खी खी करून हसले.

अम्भोजिनीवनविलासनमेव हन्त
हंसस्य हन्तु नितरां कुपितो विधाता।
न त्वस्य दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां
वैदग्ध्यकीर्तिमपहर्तुमसौ समर्थ:॥

रागावलेला ब्रह्मदेव हंसापासून त्याचा कमलवनातील विहार छिनावून घेऊ शकेल, पण दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याच्या विद्येची त्याची ख्याती तो काढून घेऊ शकत नाही.

हंस: शुक्लो बकः शुक्लः को भेदो बकहंसयो:।
नीरक्षीरविभागे तु हंसो हंसो बको बक:॥

हंस पांढरा, बगळाही पांढरा. तर मग हंस आणि बगळा ह्यांच्यात भेद काय? दूध आणि पाणी वेगळे करण्याची वेळ आली की कळते की हंस तो हंस आणि बगळा तो बगळा.

कोकिळ पक्षी आपली अंडी कावळ्यांच्या घरटयात ठेवून त्यांच्याकडून आपल्या पिल्लांचे पालनपोषण घडवून आणतात, हा एक प्रख्यात संकेत. त्यामुळे कोकिळ पक्षी 'परभृत' ह्या नावानेही ओळखला जातो. शाकुन्तलात कालिदासाने दोनदा ह्या शब्दाचा प्रयोग केला आहे.

पोटात दुष्यन्ताचे मूल असलेली शकुन्तला आश्रमातून दुष्यन्ताकडे येते पण ऋषीच्या शापाचा परिणाम म्हणून तो तिला ओळखत नाही आणि तिचा स्वीकार करण्याचे नाकारतो. शेवटचा उपाय म्हणून दुष्यन्ताने तिच्याजवळ ठेवलेली खुणेची आंगठी दाखविण्याचा ती प्रयत्न करते, पण अंगठी तिच्या बोटातून शचीतीर्थावरच गळून पडली; असे तिच्याबरोबर आलेली तापसी सांगते. दुष्यन्ताला हा सगळा रचलेला डाव वाटतो आणि तो म्हणतो:

स्त्रीणामशिक्षितपटुत्वममानुषीषु
संदृश्यते किमुत या: प्रतिबोधवत्य:।
प्रागन्तरिक्षगमनात्स्वमपत्यजातं
अन्यैर्द्विजै: परभृता: खलु पालयन्ति॥

अशिक्षित असूनहि चलाखी दाखविणे हे मानवी बुद्धी नसलेल्या कोकिळांनाही जमते, तर मग बुद्धी असलेल्या स्त्रियांचे काय बोलावे? अंतराळात जाण्यापूर्वी कोकिळा अन्य पक्षांकडून आपल्या पिल्लांचे पालनपोषण करवतातच ना?

कण्वमुनी आपल्या शिष्यांसह दुष्यन्ताकडे निघालेल्या शकुन्तलेची पाठवणी करण्यासाठी अरण्याच्या सीमेपर्यंत येतात. तेथे त्यांना कोकिळेचा आवाज कानावर पडतो आणि ते म्हणतात:

अनुमतगमना शकुन्तला तरुभिरियं वनवासबन्धुभि:।
परभृतविरुतं कलं यथा प्रतिवचनीकृतमेभिरीदृशम्॥

वनातले बान्धव असे जे वृक्ष, त्यांनी कोकिळेच्या मधुर आवाजाने जणू उत्तर देऊन शकुन्तलेच्या जाण्याला आपले अनुमोदन दिले आहे.

तत्किं स्मरसि न भुक्तं यत्पिक रे काकमन्दिरे पूर्वम्।
सहकारकुसुमकाले हठेन कुरुषेऽधुना रावम्॥

अरे कोकिळा, आंब्याला मोहोर यायच्या वेळी इतका आवाज करतोस? पूर्वी कावळ्यांच्या घरात खाल्लेले तुला आठवत नाही का?

चक्रवाक आणि चक्रवाकी रात्रभर एकमेकांस साद घालत बसलेले असतात. ते वस्तुत: एकाच कमलवेलीवर बसलेले असतात, पण मध्ये वेलीचे पान आल्याने ते एकमेकांस पाहू शकत नाहीत. त्यांचा हा भ्रम सकाळी सूर्य उगवल्यावर दूर होऊन त्यांचे मीलन होते हा संकेत.

त्यज चक्रवाकि शोकं बधान धैर्यं सहस्व समयममुम्।
अयमेव वासरमणिर्हरिष्यते शापमूर्च्छा ते॥

(सूर्य अस्ताला गेल्यामुळे चक्रवाकीला आपला प्रियकर दिसेनासा होतो आणि ती आक्रोश करू लागते, तेव्हा:)
हे चक्रवाकी, शोक सोड. धीर धर आणि ही वेळ काढ. हाच दिवसमणी सूर्य (पुन: उगवल्यानंतर) तुझी शापामुळे झालेली स्थिती दूर करणार आहे.

अस्तंगतोऽयमरविन्दवनैकबन्धु-
र्भास्वान्न लङ्घयति कोऽपि विधिप्रणीतम्।
हे चक्र धैर्यमवलम्ब्य विमुञ्च शोकम्
धीरास्तरन्ति विपदं न तु दीनचित्ता:॥

कमलवन फुलवणारा सूर्य अस्तंगताला गेला आहे कारण ब्रह्मदेवाने लिहिलेले कोणी टाळू शकत नाही. अरे चक्रवाका, धीराने घे आणि शोक सोड. धैर्यवान व्यक्ती संकटावर मात करतात, दुबळ्या मनाचे नाही.

रामदासस्वामींची 'मनाच्या श्लोका'तील उक्तीही येथे आठवते:

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥

चकोर पक्ष्याभोवती दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टी पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो.

त्विषं चकोराय सुधां सुराय।
कलामपि स्वावयवं हराय।
ददज्जयत्येष समस्तमस्य।
कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥
उत्तरनैषधचरित २२.६५.

(चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे.

मृषा निशानाथमह: सुधा वा
हरेदसौ वा न जराविनाशौ।
पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा
विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥
उत्तरनैषधचरित २२.१०२.

चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ती देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत?

स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां
चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा।
अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय:
पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥
सौंदर्यलहरी ६३.

तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात.

पक्ष्यांच्याकडून आता भ्रमरांकडे वळू. ह्या भ्रमरांना षट्पद, षडङ्घ्रि (सहा पायांचे), द्विरेफ (नावात दोन रकार असलेले - 'भ्रमर' ह्या शब्दात दोन र आहेत) असेही म्हणतात. कमलपुष्पाभोवती घोंघावणारे भ्रमर सूर्य मावळल्यावर कमलपुष्पाच्या पाकळ्या मिटल्यामुळे आत बंद होतात. त्या पोखरून त्यातून बाहेर पडायचे त्यांच्याने करवत नाही आणि ते सकाळी सूर्योदयानंतर पाकळ्या पुन: उमलण्याची वाट पहात आत बसून राहतात.

बन्धनानि किल सन्ति बहुनि प्रेमरज्जुमयबन्धनमन्यत्।
दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रि: निष्क्रियो भवति पङ्कजबद्ध:॥

बंधने अनेक प्रकारची असतात पण प्रेमरज्जूचे बंधन काही वेगळेच असते. लाकूडही पोखरू शकणारा भुंगा कमळात अडकला तर निष्क्रिय होतो.

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री:।
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार॥
अप्पय्यदीक्षितकृत कुवलयानन्द.

'रात्र संपेल, सुप्रभात उजाडेल, सूर्य वर येईल, कमळांचे सौंदर्य खुलेल' कळीच्या आत अडकलेला भ्रमर असा विचार करत असताना अरे! अरे! हत्तीने कमळाची वेलच उपटली!

नोंदः सदर लिखाण मराठी प्रमाणलेखनाच्या अधिकॄत नियमांनुसार नाही.

| २ |