पसायदानातील प्रक्षिप्त ओवी

य. ना. वालावलकर

पसायदान हे एक अपूर्व आणि उदात्त असे मागणे आहे. 'आता विश्वात्मके देवे...' या ओवीपासून या दानयाचनेची उदात्तता ओवीगणिक वाढत जाते. ती 'किंबहुना सर्व सुखी' या सातव्या ओवीत परिसीमा गाठते. इथे किंबहुनाचा अर्थ 'याहून अधिक काही मागण्याचे कारणच उरले नाही' असा होतो. या ओवीनंतर आता सर्वात्मक देवाचे दानप्रसादवचन व्हावे हे क्रमप्राप्त वाटते. पण तसे न होता, आणि ग्रंथोपजीविये॥ विशेषे लोकी इये। दृष्टादृष्टविजये। होवावे जी ॥ ही ओवी येते आणि रसभंग होतो.

बहुतेक धर्मग्रंथांच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते. म्हणजे त्या ग्रंथाचे श्रवण केल्याने काय लाभ होतो ते लिहिलेले असते. 'दासबोधा'च्या प्ररंभीच त्याची फलश्रुती लिहिली आहे: "नासे अज्ञान, दु:ख,भ्रांती । शीघ्रचि होते ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फलश्रुती, इये ग्रंथीं।"

ज्ञानेश्वरीत अशी कसली फलश्रुती सांगितलेली नाही. ग्रंथसमाप्तीच्या वेळी ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाकडे कृपाप्रसाद मागतात, ते सर्वश्रुत पसायदान अनेकांना मुखोद्गत आहे. ते असे:

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे।
तोषोनी मज द्यावे । पसायदान हे ॥१॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रति वाढो।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥२॥

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥३॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मंदियाळी।
अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥४॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥

चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन।
ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतू ॥६॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिही लोकीं।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥७॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्ट विजये । होवावे जी ॥८॥

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥९॥

..........................................................................................

पसायदान हे एक अपूर्व आणि उदात्त असे मागणे आहे. 'आता विश्वात्मके देवे...' या ओवीपासून या दानयाचनेची उदात्तता ओवीगणिक वाढत जाते. ती 'किंबहुना सर्व सुखी' या सातव्या ओवीत परिसीमा गाठते. इथे किंबहुनाचा अर्थ 'याहून अधिक काही मागण्याचे कारणच उरले नाही' असा होतो. या ओवीनंतर आता सर्वात्मक देवाचे दानप्रसादवचन व्हावे हे क्रमप्राप्त वाटते. पण तसे न होता,

आणि ग्रंथोपजीविये॥ विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्टविजये। होवावे जी ॥८॥>>

ही ओवी येते आणि रसभंग होतो. पसायदानाचा अर्थ समजून घेत, ते लक्षपूर्वक ऐकताना ही आठवी ओवी मला नेहमी खटकते. त्रैलोक्यातील यच्चयावत सर्वजण सुखी व्हावेत असे दान मागितल्यावर आणखी काही मागायचे राहते का? सातव्या ओवीतील 'किंबहुना' शब्दावरून आता मागणे संपले असा अर्थ सुस्पष्टपणे प्रतीत होतो. यानंतर ग्रंथोपजीवी लोकांसाठी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे काही विशेष मागणी करतील हे संभवत नाही. 'किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिही लोकी' असे मागून झाल्यावर, "हां! आणखी एक राहिलेच. इथले ते ग्रंथोपजीवी (आहेत ना) त्यांना दृष्टादृष्ट भयावर विजय मिळावा हो!", असे ज्ञानेश्वर म्हणतील का? छे:! पसायदानातील ही ओवी प्रक्षिप्तच असली पाहिजे.

या ओवीची प्रक्षिप्तता दर्शविणारे कळीचे दोन शब्द पसायदानात आहेत.ते म्हणजे १)किंबहुना २) आठव्या ओवीतील आरंभीचा शब्द 'आणि'. 'किंबहुना' या संस्कृत शब्दाचा अर्थ ,'बहुना किम्?' यापेक्षा अधिकाचे काय प्रयोजन ? - म्हणजे याहून अधिक मागण्याचे काही कारणच उरले नाही असा होतो. म्हणजे तो तसा आहेच. किंबहुना शब्दावरून सातव्या ओवीत मागणे संपले हे स्पष्ट होते. तर आठव्या ओवीतील 'आणि' या आरंभीच्या शब्दावरून मूळ पसायदानात भर घातली जात आहे हे दिसते. ओवी क्र.२ ते ७ यांत अधिकाधिक व्यापक होत जाणारी जी सात दाने मागितली आहेत त्यांच्या पंक्तीत आठव्या ओवीतील संकुचित याचना विशोभित दिसते. ती सात दाने अशी:

  • दुर्जनांचे दुष्ट विचार जाऊन त्यांच्या ठिकाणी सत्कृत्यांविषयी आवड निर्माण व्हावी.
  • सर्व प्रणिमात्रांची परस्परांशी मैत्री जडावी.
  • पापाचा अंधार नाहीसा होऊन जगात स्वधर्मसूर्याची पहाट उजाडावी.(म्हणजे प्रत्येकाला आपल्या कर्तव्यकर्माची जाणीव व्हावी.)
  • प्रत्येक प्राणिमात्राला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही लाभावे.
  • जगातील सर्व माणसांना ईश्वरनिष्ठ संत सदैव भेटावे.
  • सर्व माणसांनी सज्जनांशी नाते जोडावे.
  • त्रैलोक्यातील सर्वजण सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची (परब्रह्म परमात्म्याची) अविरत भक्ती करावी.[याहून अधिक काय मागायचे?]

....

या सर्व गोष्टींचा विचार करता - आणि ग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।दृष्टादृष्ट विजये । होवावे जी ॥८॥ - ही ओवी प्रक्षिप्त ठरते.

सोनोपंत दांडेकरांच्या सार्थ ज्ञानेश्वरीत या ओवीचा अर्थ असा दिला आहे:--

"आणि या मृत्युलोकात विशेंषेकरून हा ग्रंथच ज्यांचे जीवन होऊन रहिला असेल, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे."

साखरे महाराजांनी या ओवीचा अर्थ :

"आणि विशेषकरून या ग्रंथावरच ज्यांची उपजीविका असेल त्यांना इहलोकीचे तसेच परलोकीचे सुख प्राप्त होवो." असा दिला आहे.

या दोन्हीत 'हा ग्रंथ' याचा अर्थ ज्ञानेश्वरी असा दिसतो. हे दोन्ही सांप्रदायिक अर्थ संदिग्ध आणि न पटणारे आहेत. ते जरी खरे धरले तरी त्यांतील दानयाचना अगदीच संकुचित आहे, हे उघड दिसते.

....

आता या आठव्या ओवीतील 'ग्रंथोपजीवी' आणि 'दृष्टादृष्ट' या सब्दांचे अर्थ पाहू.

ग्रंथोपजीवी:-- पुस्तकव्यवहारांवर ज्यांचा योगक्षेम चालतो असे व्यावसायिक लोक. सांप्रतकाळीं प्रकाशक, पुस्तकविक्रेते, लेखक. (रद्दी दुकानदारांचा यात समावेश करणे योग्य ठरेल काय? असो.)
{अवांतर:-- लेखनाच्या मानधनावर ज्यांची उपजीविका चालते अशा मराठी लेखकांची संख्या नगण्य आहे. मराठी लेखकांना मिळणार्‍या मानधनाविषयी एक अटकळ अशी आहे की लेखकांना मानधन देण्याच्या रीतीचा प्रकाशनव्यवसायात जेव्हा प्रारंभ झाला तेव्हापासून आजपर्यंत यच्चयावत सर्व मराठी लेखकांना मिळालेले एकूण सर्व मानधन हे हॅरी पॉटर पुस्तकमालिकेच्या लेखिकेला मिळालेल्या एकूण मानधनाच्या साधारणपणे ४२% भरावे. अवांतर समाप्त.}

पूर्वीच्या काळातील ग्रंथोपजीवी कोण? त्याकाळी मुद्रणकला ज्ञात नव्हती. पण ग्रंथनिर्मिती होत असे. गावातील एखादा धनिक या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती करून घेई. त्यासाठी सुवाच्य हस्ताक्षर असलेल्या लेखनिकाची नेमणूक करीत असे. गावातील देवळात पठणासाठी (वाचण्यासाठी) ही प्रत उपलब्ध होत असे. पाठक/निरूपक ग्रंथाचे वाचन करीत. ते ऐकण्यासाठी श्रोते देवळात जमत. अशा प्रकारे ग्रंथाचा प्रसार होई. पाठकांना त्यांच्या कामाप्रीत्यर्थ काही धन,वस्तू इ. प्राप्ती होई. याप्रमाणे ग्रंथलेखनिक आणि ग्रंथपाठक, निरूपक, प्रवचनकार हे त्या काळचे ग्रंथोपजीवी होते असे म्हणता येते.

ओव्या लिहिता लिहिता तो ओवी छंद एखाद्या लेखनिकाच्या मनात भिनतो. भाषा मनात घोळते. मग तो एखाद दुसरी ओवी स्वत: रचून आपल्या हस्तलिखितात घुसडतो. याप्रमाणे ग्रंथात प्रक्षेपण होऊ शकते. ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या ओव्या नकलून काढताना आपणासाठी काहीतरी विशेष मागावे असे वाटून कोण्या लेखनिकाने 'आणि ग्रंथोपजीविये...' ही ओवी प्रक्षिप्त केली असावी. अंगात ओवी छंद भिनला पण त्याच्या मनाला पसायदानाच्या उदात्ततेचा स्पर्श झाला नाही.

दृष्टादृष्ट:---

या शब्दाचे तीन अर्थ संभवतात.

१) नजरानजर, डोळ्याला डोळा भिडविणे. हा अर्थ इथे प्रस्तुत नाही म्हणून सोडून देऊ.

२) दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे, ऐहिक, या जगातले, वास्तविक. उदा.: घरदार, शेतीवाडी, आसन, भोजन, शय्या इ. अदृष्ट म्हणजे इथे न दिसणारे, पण परलोकात आहेत असे मानीव (मनोकल्पित) उदा.: स्वर्ग, नंदनवन, अमृत, अप्सरा, कामधेनू इ. यावरून दृष्टादृष्टविजय = या सर्व भोगांचा निग्रहपूर्वक त्याग.

३) दृष्ट:- दृश्य स्वरूपातील भय. उदा. चोर, हिंस्त्र श्वापदे, साप इ. तर अदृष्ट:- अदृश्य स्वरूपातील भय. उदा. भूत, पिशाच्च, समंधइ. भूतबाधेसाठी 'अदृष्टाची भीती' असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. यावरून दृष्टादृष्टविजय = या भयांपासून मुक्ती.

'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी'(लेखक म.वा.धोंड) या पुस्तकात '...आणि ग्रंथोपजीविये' हा लेख आहे. त्यात वरील क्र. ३) चा अर्थ गृहीत धरून आठवी ओवी प्रक्षिप्त नाही, असे समर्थन केले आहे. या प्रतिवादाचे कारण असे की 'श्री ज्ञानेश्वर' या पुस्तकात लेखक माधव दामोदर अळतेकर यांनी 'ही आठवी ओवी प्रक्षिप्त आहे की काय?' अशी शंका व्यक्त केली आहे. यावर म.वा.धोंड यांचा युक्तिवाद असा की लेखनिक, पाठक, निरूपक, प्रवचनकार या ग्रंथोपजीवींद्वारेच लेखकाचा ग्रंथ जनसामान्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांचे हे महत्त्व जाणून ज्ञानदेवांनी त्यांच्यासाठी विशेष दान मागितले आहे. यांतील पूवार्ध खरा असला तरी निष्कर्ष पटण्यासारखा नाही.

माझ्या मते या ओवीचा अन्वय आणि अर्थ पुढीलप्रमाणे:

"आणि विशेषें ग्रंथोपजीविये इये लोकीं दृष्टादृष्टविजये होवावे जी."

"आणि विशेषेकरून, ग्रंथांच्या प्रती लिहून उपजीविका चालविणार्‍या (आम्हांसारख्या) ग्रंथोपजीवींना दृष्ट संकटे तसेच अदृष्ट भीती यांची बाधा होऊ नये."

(ओवी प्रक्षिप्त मानून प्रक्षेपकाच्या दृष्टिकोनातून अर्थ लिहिला आहे.) वरील दोहोपैकी कोणताही अर्थ घेतला तरी ते मागणे संकुचितच ठरते. ते अन्य सात मागण्यांच्या पंक्तीत बसत नाही.

या सर्व ऊहापोहाचा निष्कर्ष असा की (माझ्या मते) ही ओवी प्रक्षिप्त आहे. ती ज्ञानेश्वरांनी रचलेली नाही.