सूचीशास्त्र : काही अनुभव - २

डॉ. मीरा घांडगे

नियतकालिकांची सूची करताना नियतकालिकांची सूची, त्यातील लेखांची सूची आणि नियतकालिकांतील लेखांची वर्णनात्मक सूची अशा पद्धतीने करता येते. फक्त नियतकालिकांची सूची करणे त्यामानाने सोपे असते. पाश्चात्य देशांमधून यासारख्या सूचींच्या उपक्रमांना प्रोत्साहन व महत्त्व फार पूर्वीपासून दिले गेले. आजही दिले जाते. मराठी भाषेच्या बाबतीत इ.स.१९६५ नंतर या कार्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी इ.स.१९१५ मध्ये भारत नियतकालिकदीपिकेमध्ये अनेक भाषांतील वृत्तपत्रे व मासिकांची माहिती दिलेली आहे. इ.स.१९१९ मध्ये य. रा. दाते व रा. त्र्यं. देशमुख यांनी महाराष्ट्रीय वाङ्मयसूचीत मराठी मासिकांची व त्यामधील निवडक लेखांची सूची प्रसिद्ध केली होती. इ.स.१९२१ मधील महाराष्ट्रदीपिकेत त्यावेळच्या साहित्य संमेलनात पुस्तकप्रदर्शनात मांडलेल्या नियतकालिकांची यादी दिलेली आहे. इ.स. १८८६ ते १९१७ या काळात जी मराठी मासिके उपलब्ध होती त्यांची यादी इ.स. १९२७ मध्ये संक्षिप्त अर्वाचीन मराठी वाङ्मय (१८०५-१९२७) या ग्रंथात प्रसिद्ध झाली. इ.स. १८०० ते १९५० या कालखंडातील प्रसिद्ध झालेल्या नियतकालिकांतील लेखांची सूची शं. ग. दाते यांनी त्यांच्या हयातीत तयार केली होती. तिच्यात भर घालून मुंबई मराठी संग्रहालयाच्या दाते सूचीमंडळाने मराठी नियतकालिकांची सूची (१८०० - १९५०), प्रथमखंड कालिकावर्णन कोश (१९६९) या नावाने प्रसिद्ध केली. या कोशात १०४९ नियतकालिकांची संपूर्ण सूची दिली आहे, तर ३४० नियतकालिकांची अपूर्ण माहिती दिली आहे. इ.स. १९६२ मध्ये दलितांची वृत्तपत्रे (१८८८ - १९६२) मधील पाचव्या परिशिष्टात नियतकालिकांची यादी दिली आहे.

प्रत्यक्ष कार्डे करीत असतान अंक पूर्ण वाचून त्यातील लेखांच्या नोंदी करणे गरजेचे होते. बर्‍याचवेळा काही लेख विषयांच्या संदर्भात फसवे वाटतात. अनेक विषयांची अनेक संदर्भासह मांडणी असे लेख करतात. अशावेळी नेमका विषय समजून घेऊन त्या विषयात, त्या लेखाची नोंद करणे कठीण जात असे. प्रत्येक लेखाची अंकाच्या संदर्भानुसार कार्डांवर नोंद केल्यानंतर त्या लेखाची विषयानुसार त्यानंतर उपविषयानुसार नोंद त्या कार्डाच्या मागील बाजूस करावी लागत असे. म्हणजे कार्डाच्या मागील बाजूवरील विषयानुसार नोंदी वेगळ्या केल्या नंतर ती कार्डे वर्णानुक्रमे लावणे शक्य होऊ लागले.

प्रेस अँड रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टनुसार वृत्तपत्रे व नियतकालिके यांची एक प्रत मुद्रक/प्रकाशकाला शासनाकडे पाठवावी लागते. भारत सरकारतर्फे नियतकालिके व वृत्तपत्रे यांच्या सूची प्रकाशित केल्या जातात. महाराष्ट्र शासनानेही अशी सूची १९८४ मध्ये प्रकाशित केली आहे. त्याशिवाय मराठी ख्रिस्ती नियतकालिके (१९८१), गोमंतकीय नियतकालिके (१९९६), दलितांची नियतकालिके (१९८५) अशा सूची प्रकाशित झाल्या आहेत.

नियतकालिकांच्या लेखांची सूची करणे जास्त जिकिरीचे असते. केसरी शताब्दीसूची (१९८१), विविधज्ञानविस्तार सूची (१९६८), युगवाणी (१९९९), पंचधारा (२०००), मराठी संशोधनपत्रिका (१९६५), रत्नाकर (१९८७), अनुष्टुभ् (१९७७-२००२), (२००३), महाराष्ट्र साहित्य पत्रिका (१९१३-१९२५, १९२८-२००४), (२००६), अस्मितादर्श (डिसें. १९९७ - डिसें. २००७), (२००८) इ. सारख्या सूची प्रकाशित झाल्या आहेत.

ग्रंथालयशास्त्र व सूची :

माझी व ग्रंथालयशास्त्राची ओळख मी बी.ए.च्या द्वितीय वर्षात असताना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ग्रंथालयशास्त्राच्या 'प्रमाणपत्र' वर्गाच्या निमित्ताने झाले. तीन महिन्यांचा हा वर्ग पूर्ण केल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात ग्रंथालय सहायक म्हणून काम करीत असताना सूचीशास्त्राचे प्रात्यक्षिक समजले. जयकर ग्रंथालयाच्या पाच वर्षांच्या सेवेत वेगवेगळ्या प्रकारचे कोश आणि सूची पहावयास मिळाल्या आणि प्रत्यक्ष सूचीप्रकल्पात काम करण्याची, शिकण्याची संधीही मिळाली. मी ग्रंथालयात काम करीत असताना ग्रंथालयातील हस्तलिखितांच्या सूचीचे काम सुरू झाले होते. त्या प्रकल्पात मदतनीस म्हणूनही काम केले. त्यामुळेच ग्रंथालयशास्त्र आणि सूचीशास्त्राची आवड निर्माण झाली.

पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात 'अधिव्याख्यात्री' म्हणून काम करीत असताना 'अनुष्टुभ्'सूचीचे काम हाती घेतले. इतर कोणत्याही प्रकारच्या सूचीपेक्षा नियतकालिकांच्या लेखांच्या सूचीचे काम करणे जबाबदारीचे असते. केवळ मराठी भाषेतील नियतकालिक व मराठीचा अभ्यासक इतके जुजबी ज्ञान अशावेळी अपुरे पडते. एखादे नियतकालिक अनेक विषयांना आपल्या अंकांतून स्थान देते. विविध विषयांवरील विविध संदर्भांचे लेख नियतकालिकांमधून येत असतात. लेखांचे सूचीशास्त्राच्या तंत्रानुसार कार्डे करणे तसे सोपे असते; पण त्यांचे विषयानुसार वर्गीकरण करणे अवघड असते. काही लेख एकापेक्षा अनेक विषयांकडे निर्देश करतात. अशा वेळी त्या लेखाचे मुख्य विषयातील स्थान समजण्यासाठी मराठीच्या अभ्यासकाला मराठीच्या समग्र ज्ञानासह धर्म, इतिहास, भूगोल, गणित, वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र, सामाजिक व कृषी शास्त्रे इ. अनेक विषयांचे ज्ञान असणे गरजेचे असते. एखादा लेखक टोपणनावाने लेखन करतो, त्या नावासह मूळ नावावरील नोंदीही वाचकाला सहजपणे उपलब्ध होतील, असे तंत्र सूची तयार करणार्‍या व्यक्तीला अवगत असणे गरजेचे असते.

नियतकालिकांची उपलब्धी :

'अनुष्टुभ्'च्या सूचीचे काम करीत असताना पुण्यातच राहत असल्यामुळे पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, फर्ग्युसन महाविद्यालयाचे ग्रंथालय, शासकीय विभागीय ग्रंथालय, गुरुवर्य डॉ. मु. श्री. कानडे सर, डॉ. कल्याण काळे सर अशा सर्वांकडून अंक उपलब्ध झाले. खरे आव्हान होते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सूचीचे; कारण त्यावेळी मी औरंगाबादमध्ये असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे ग्रंथालय व शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे याठिकाणी एकूण ९३ वर्षांचे अंक मिळाले. अस्मितादर्शच्या प्रारंभकाळापासूनच डॉ. गंगाधर पानतावणे संपादक असल्याने, औरंगाबादमध्ये मी त्यांच्या घराजवळच राहत असल्याने डॉ. पानतावणे सरांनी सर्व ४० वर्षांचे अंक सूचीपुरते उपलब्ध करुन दिले.

नियतकालिकांच्या लेखांचे वर्गीकरण :

नियतकालिकातील लेखांची सूची करताना त्यांच्या नोंदीचे स्वरुप निश्चित करुन घेणे गरजेचे असते. त्या प्रमाणे लेखकाचे नाव, लेखाचे/ कलाकृतीचे नाव, वर्ष, अंक, महिना, (विशेषांक) प्रकाशन वर्ष व पृष्ठक्रमांक अशा स्वरुपाच्या ग्रंथालयशास्त्राच्या नियमानुसास नोंदी तयार केल्यानंतर त्यांचे वर्गीकरण करणे महत्वाचे ठरते. नोंदीच्या कार्डाच्या मागील बाजूस नोंदीचे स्वरुप लिहिल्यास ते पाहून कार्डे (उदा. कविता, कथा, आत्मचरित्र, ग्रंथपरीक्षण इ.) वेगळी करता येतात. अनुष्टुभ्-मासिक मराठी ललित लेखन व समीक्षा या विषयांसाठी प्रासिद्ध आहे. त्यामुळे वर्गीकरण करताना फारशी अडचण येणे शक्य नव्हते.

'अनुष्टुभ्'च्या सूचीचे काम पाहून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष गुरुवर्य कै. गं. ना. जोगळेकर सरांना मी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे काम करेन अशी खात्री वाटली असवी. मी महाराष्ट्र साहित पत्रिकेची सूची करण्यापुर्वी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने अनेक व्यक्तींच्या सहाकार्याने ४४ वर्षांची (१९२७-१९७१) सूची केली होती; पण त्यात काही त्रुटी राहिलेल्या होत्या. परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. जोगळेकर सरांच्या हे लक्षात आले होते. त्यांनी हे अत्यंत जबाबदारीचे काम माझ्यावर सोपवले.

’अस्मितादर्श’ मधून दलित साहित्यासह अनेक विषयांच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे व संशोधनाला चालना देणारे लेखन प्रकाशित झाले आहे. ही सूची दलित साहित्य, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, संस्कृती, समीक्षा, तत्त्वज्ञान इ. अनेक विषयास उपयुक्त आहे. ललित वाङ्मयाबरोबरच गौतम बुद्ध, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांचे तत्त्वज्ञान व वैचारिक लेखन प्रसिद्ध झाले आहे. अस्मितादर्शने अनेक दलित व दलितेतत लेखकांना नावारूपाला आणले. अनेक लेखक अस्मितादर्शमधून लेखन करून प्रस्थापित झाले. अस्मितादर्शची मुखपृष्ठे आणि रेखाटने सामाजिक जाणिवेने प्रतिबिंबित झालेली दिसतात. दलित विद्रोही चित्रकला प्रतीकात्म रूपातून आपले अस्तित्व शोधत असल्यामुळे ती चित्रे जास्त बोलकी वाटतात. सूचीत या चित्रांचीही दखल घेतली आहे.

प्रत्यक्ष कार्डे करीत असतान अंक पूर्ण वाचून त्यातील लेखांच्या नोंदी करणे गरजेचे होते. बर्‍याचवेळा काही लेख विषयांच्या संदर्भात फसवे वाटतात. अनेक विषयांची अनेक संदर्भासह मांडणी असे लेख करतात. अशावेळी नेमका विषय समजून घेऊन त्या विषयात, त्या लेखाची नोंद करणे कठीण जात असे. प्रत्येक लेखाची अंकाच्या संदर्भानुसार कार्डांवर नोंद केल्यानंतर त्या लेखाची विषयानुसार त्यानंतर उपविषयानुसार नोंद त्या कार्डाच्या मागील बाजूस करावी लागत असे. म्हणजे कार्डाच्या मागील बाजूवरील विषयानुसार नोंदी वेगळ्या केल्या नंतर ती कार्डे वर्णानुक्रमे लावणे शक्य होऊ लागले. हे सर्व पाहता सूचीचा आवाका लक्षात येऊ लागला. पत्रिकेच्या प्रारंभकाळापासून ते २००४ पर्यंत २५ संपादकांनी पत्रिका संपादन केली होती. प्रत्येक संपादकाचा संपादनाचा दृष्टीकोन आणि भूमिका वेगळी त्यामुळे प्रत्यक्ष सूची करीत असताना कार्डांची (नोंदीची) संख्या जशी वाढत होती तसे अनेक विषयांचे स्वरुपही गुंतागुंत निर्माण करीत होते. वर्गीकरण करुन कार्डांची जुळणी करणे कठीण होत असल्याची जाणीव होऊ लागली. त्यामुळे नोंदींची संख्या (कार्डे) वाढली की मी ती विषयानुसार वेगळे करुन वर्णानुक्रमे लावून ठवणे सोईचे होत असे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील विषय लक्षात घेता हा अंदाज येऊ शकेल. अदा. ललित वाङ्मय, भाषाविषयक, कोश, समीक्षा, इतिहास, भूगोल, गणित, नभोवाणी, चित्रपट इ. पत्रिकेच्या सूचीच्या अनुक्रमणिकेवर प्रकाश टाकल्यास या सर्व विषयाचे वैविध्य समजते. त्याशिवाय महाराष्ट्र साहित्य पत्रिकेने अनेक विशेषांक काढले. अदा. न. चि. केळकर, भा. रा. तांबे, ज्ञानेश्वर इ. अभासकाच्या हाती सूची पडल्यबरोबर त्याला योग्य तो संदर्भ मिळने आवाश्यक असते. त्यासाठी पहिल्या अंकापासून ते २००४ पर्यंतच्या अंकांचा स्वतंत्र तक्ता तयार केला. त्यामुळे पत्रिकेच्या ९३ वर्षांच्या अंकाचे स्वरुप कमी वेळात वाचकांसमोर स्पष्ट होते.

’अस्मितादर्श’ मधून दलित साहित्यासह अनेक विषयांच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे व संशोधनाला चालना देणारे लेखन प्रकाशित झाले आहे. ही सूची दलित साहित्य, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, संस्कृती, समीक्षा, तत्त्वज्ञान इ. अनेक विषयास उपयुक्त आहे. ललित वाङ्मयाबरोबरच गौतम बुद्ध, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांचे तत्त्वज्ञान व वैचारिक लेखन प्रसिद्ध झाले आहे. अस्मितादर्शने अनेक दलित व दलितेतत लेखकांना नावारूपाला आणले. अनेक लेखक अस्मितादर्शमधून लेखन करून प्रस्थापित झाले. अस्मितादर्शची मुखपृष्ठे आणि रेखाटने सामाजिक जाणिवेने प्रतिबिंबित झालेली दिसतात. दलित विद्रोही चित्रकला प्रतीकात्म रूपातून आपले अस्तित्व शोधत असल्यामुळे ती चित्रे जास्त बोलकी वाटतात. सूचीत या चित्रांचीही दखल घेतली आहे. अस्मितादर्श साहित्य संमेलनातील भाषणे व इतर साहित्य वाचल्यास एकास संपादकाचे चाळीस वर्षांचे काम थक्क करणारे आहे. इवल्याशा रोपट्याचा ’वटवृक्ष’ केल्याचे जाणवते. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेप्रमाणेच अस्मितादर्शचा दर वर्षी एक विशेषांक काढला जातो. त्यामुळे अस्मितादर्शच्या चाळीस वर्षांच्या अंकांचा तक्ता करणे महत्त्वाचे वाटले. अस्मितादर्श सूचीची अनुक्रमणिका व अस्मितादर्शचे स्वरूप सांगणारा तक्ता कर्तृत्वाची साक्ष देतात. हे सर्व लक्षात घेऊन मी अस्मितादर्शची सूची करण्यास प्रवृत्त झाले.

| २ |