पृष्ठ १
निसर्गाने सढळ हस्ताने दान दिलं असलं तरी विकासाच्या बाबतीत कोकण तसा मागासच राहिला. परंतु इथल्या लाल मातीत बहारदार शेती जरी फुलली नसली तरी परिस्थितीशी झगडून उत्तुंग उंची गाठणारी असंख्य नररत्ने मात्र जन्मास आली. ही कथा आहे अशाच एका नायकाची. मागील शतकाच्या शेवटच्या दशकात सुरू झालेली ही कथा या शतकामध्ये एका रोमहर्षक वळणावर येऊन ठेपली आहे. या कथेला जसा नायक आहे तशी नायिकाही आहे. आणि खलनायकाच्या रुपात आहे मागासलेपणा, दारिद्र्य, व्यसनाधीनता व नैराश्याने ग्रासलेली परिस्थिती.
१९९६ च्या सुमारास प्रसाद देवधर या तरुण डॉक्टरने कोकणातील झाराप या गावी वैद्यकीय व्यवसायास नुकताच प्रारंभ केला होता. सोबत त्याची पत्नी डॉ. हर्षदा देवधरसुद्धा त्याच्या जोडीला होती. असेच काही दिवस जाता या डॉक्टर जोडप्याच्या लक्षात आलं की, त्यांच्याकडे येणार्या रुग्णांच्या रोगाचं खरं कारण वेगळंच आहे. दारिद्र्याने खचलेल्या मनांना शारीरिक व्याधींनी पोखरायला सुरूवात केली होती, आणि शरीराच्या वेदना विसरण्यासाठी या लोकांनी व्यसनांना कवटाळले होते. यावर काहीतरी केलं पाहिजे या तळमळीतून या डॉक्टर दांपत्याने व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले.
समाजकार्याचा हा घेतला वसा अर्धवट टाकू नये म्हणून डॉ. प्रसादने परिस्थितीच्या मुळाशी जाऊन रोग नष्ट करण्याचा निश्चय केला. या तरुण डॉक्टरने आपला दवाखाना सोडून गावोगाव भटकायला सुरूवात केली. अशावेळी पत्नी हर्षदाने खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहून दवाखाना चालविण्याची जबाबदारी स्वीकारली.
शालेय विद्यार्थी शेतीविषयक निरीक्षणे नोंदविताना
इकडे प्रसाद कधी सायकलवरुन तर कधी पायी सुकलेली भातखेचरं तुडवू लागला. अशाच एका सुकलेल्या भातखेचरात एके दिवशी त्याला काही तरुण क्रिकेट खेळताना दिसले. त्यांचे शिस्तबद्ध खेळणे, आयोजनातला नीटनेटकेपणा प्रसादच्या चाणाक्ष नजरेने हेरला. त्याला त्याचे साथीदार सापडले होते. या तरुणांना हाताशी धरुन त्याने गावाच्या समस्या सोडविण्यास सुरूवात केली. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचा जन्म झाला. भगीरथाला पृथ्वीवर गंगा आणण्यासाठी जशी कठोर तपश्चर्या व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली तशीच कठोर मेहनत तळकोकणातल्या या गावांमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी करावी लागणार, हेच जणू प्रसादला या नावातून सुचवायचे होते. झाराप व त्याच्या पंचक्रोशीतील दहा गावांमध्ये भगीरथने काम करायचे ठरविले.
आता गावकर्यांच्या साथीने संघटितपणे कामाला सुरूवात झाली होती. समस्या सोडवायच्या, काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे आधी कळलं तर पुढचा मार्ग सुकर होतो. रोगाचं एकदा नीट निदान झालं की औषधोपचार करायला सोपे जाते हे पेशाने डॉक्टर असलेल्या प्रसादला ठाऊक होतं. तरुणांच्या सोबत त्याने गावाचा बेसलाईन सर्व्हे करण्यास सुरूवात केली. माणसांपासून ते अगदी गुराढोरांपर्यंत आणि शेतीभातीसहित, सर्वांची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली.
माहितीचं विश्लेषण करता इथल्या परिस्थितीचे मूळ कारण प्रसादच्या लक्षात येऊ लागले. इथलं मुख्य पीक म्हणजे भात. परंतु भात काही नगदी पीक नव्हे. त्यातच ही शेतीही पारंपरिक पद्धतीने होत होती. तिला कुठेही आधुनिकतेची जोड नव्हती. शेतकर्यांचा शेतीचा दृष्टिकोनही नकारात्मक होता. करायला दुसरं काही नाही म्हणून ते शेती करत होते. त्यामुळे शेतीला प्रतिष्ठा नव्हती. म्हणूनच शेतकर्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करायचा असेल तर सर्वप्रथम त्याच्या शेतीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे, याची प्रसादला जाणीव झाली. याकरीता शेती कष्टाधारित न करता ज्ञानाधारित करावी लागेल हे त्याच्या अनुभवाने समजण्यास त्याला वेळ लागला नाही.
दूध संकलकांचा बचतगट
आपल्याला गावकर्यांमध्ये काम करायचे असेल तर शेतीचं शास्त्रीय ज्ञान हवं हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं. मग त्याने शेती विषयक वाचनाचा धडाका लावला. हे वाचन करताना एक गोष्ट त्याला समजली - ती म्हणजे, विद्यापीठांचे ज्ञान व संशोधन कितीही चांगले असले तरी ते सामान्य शेतकर्याला समजणार्या भाषेत उपलब्ध नव्हते. शेतकर्याला ते त्याच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी त्याने संबंधित विषयाचा बेअरफूट तज्ञ तयार केला. शेतकर्यांमधूनच एकाला शेतीचे शास्त्रीय प्रशिक्षण द्यायचे व त्याने ते ज्ञान अन्य शेतकर्यांना सोप्या भाषेत समजावून सांगायचे असा प्रयोग सुरू झाला. शेतीला आधुनिकतेची जोड देतानाही पारंपरिक ज्ञानाकडे भगीरथने दुर्लक्ष केले नाही. शेती परवडणारी व्हावी म्हणून सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. भाताबरोबरच आता या गावांमधून विविध प्रकारचा भाजीपालाही पिकू लागला.
वर्षाला सुमारे ३००० मिमी. पाउस पडूनही उन्हाळ्यात कोकणातील गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. वरवर मलमपट्टी करण्यापेक्षा समस्येच्या मुळाशी घाव घालायचा ही भगीरथच्या कामाची पद्धत असल्याने त्यांनी समृद्धीचे विविध प्रयोग राबविण्याआधी लोकसहभागातून कमी खर्चाचे बंधारे बांधण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर गावातली जुनी तळीसुद्धा तरुणांच्या मदतीने साफ करुन घेतली. या कामाचा परिणाम असा झाला की जागतिक बॅंकपुरस्कृत जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भगीरथच्या कार्यक्षेत्रातील चार गावांची निवड केली.
शरीर विकारग्रस्त राहिलं तर मानसिक आरोग्यही सुदृढ राहणार नाही आणि त्याचा ग्रामविकासाच्या कामावर परिणाम होऊ शकतो याचा धोका प्रसादने वेळीच ओळखला होता. कारण औषधोपचारांचा खर्च व कामाचे वाया जाणारे तास त्यांना परवडणारे नव्हते. भगीरथने आरोग्य शिबीरं घेण्यास सुरूवात केली. रूग्णांना तपासताना प्रसादच्या असं लक्षात आलं की, इथल्या गावकर्यांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण अधिक आहे. तसेच गरिबीमुळे कुपोषणही वाढीस लागण्याचा धोका होता. याला वेळीच आळा घालण्यासाठी भगीरथने ऍनिमिया हटावची मोहीम सुरू केली. प्रत्येक रूग्णाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना हेल्थ कार्डे देण्यात आली. कुपोषणाला दूर ठेवण्यासाठी भगीरथने परसबागेची निवड केली. पपई, लिंबू, शेवगा, चिकू, सुरण, आले इत्यादी रोपांचे गावकर्यांना वाटप करण्यात आले. त्याच बरोबर शेतकर्यांना सूर्यफुलाच्या लागवडीचे धडे देण्यात आले. याचा परिणाम असा झाला की प्रत्येकाच्या परसबागेत स्वस्त परंतु पौष्टिक खाद्य उपलब्ध झाले. तसेच सूर्यफुलाच्या शेतीतून किमान स्वत:ला पुरेल इतके तेल गावकर्यांकडे जमू लागले. या तेलाच्या स्निग्धतेतून कुपोषणाच्या धोक्यावर मात करण्यात भगीरथला यश मिळाले.
जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिरीचे बांधकाम
गावाचा विकास करायचा असेल तर स्त्रीशक्तीला विसरुन कसं चालेल? परंतु चूल आणि मूल यामध्ये गुंतलेली ग्रामीण महिला सामाजिक कामात वेळ कसा देणार, हा मोठा प्रश्न होता. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन तिचा अभ्यास करुन मगच त्या समस्येला हात घालायचा ही प्रसादच्या कामाची पद्धत. त्यामुळे पुन्हा अभ्यास सुरू झाला आणि उत्तरही सापडलं. घरोघरी बायोगॅस स्थापनेच्या प्रयोगास सुरूवात झाली. अनेक गावकर्यांकडे गुरं होती पण बायोगॅस नव्हता. भगीरथने स्वत:च्या हमीवर बायोगॅस उभारण्यासाठी गावकर्यांना बॅंकेकडून कर्जं मिळवून दिली. ज्यांची बॅंकेकडूनही कर्ज मिळविण्याची ऐपत नव्हती अशांना भगीरथने स्वत:च्या निधीतून बिनव्याजी कर्ज दिले. प्रत्येकाच्या गरजेनुसार विविध प्रकारचे व तंत्राचे बायोगॅस प्लँट्स उभारण्यात आले. शेणाची उपलब्धता हव्या त्या प्रमाणात नसल्याने अनेक ठिकाणी बायोगॅस प्लँटला शौचालये जोडण्याचा प्रयोग करण्यात आला. सुरूवातीस गावकरी या प्रयोगास अनुत्सुक होते. मग भगीरथने गावातील भटाला पटवून त्याच्या घरच्या बायोगॅसला शौचालय जोडले. त्याचबरोबर प्रसादने स्वत:च्या घरच्या बायोगॅसलाही शौचालय जोडून घेतले. साहजिकच याने लोकांच्या मनातील अढी दूर होण्यास मदत झाली.
घरोघरी बायोगॅस येऊ लागले. चुलीला सुट्टी मिळाली आणि गॅसवर कुकरची शिट्टी वाजू लागली. महिलांना कामातून थोडी उसंत मिळाली. या मोकळ्या वेळेचं उत्पादक वेळेत रुपांतर करण्यासाठी भगीरथने बायोगॅसमधून निघणार्या स्लरीचा उपयोग करुन स्त्रियांना गांडूळखत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
बायोगॅस आल्याने आता सरपण (लाकडाचे भारे) ठेवण्याची जागा मोकळी झाली होती. प्रसादचे या जागेवर लक्ष गेले. भगीरथने या मोकळ्या झालेल्या जागेत कोंबडीपालन करण्याचे प्रशिक्षण गावकर्यांना दिले. याचा दुसरा फायदा असा झाला की कोंबडीपालनातून मिळालेल्या पैशातून बायोगॅसच्या कर्जाचे हप्ते फिटू लागले. कोंबडी सोबतच भगीरथने गावकर्यांना शेळीपालनासाठीसुद्धा प्रोत्साहित केले.
पुढे: पृष्ठ २