भगीरथाचे वारसदार

जयेश जोशी


सामुदायिक गायन वर्ग

गुजरात व पश्चिम महाराष्ट्रातील दूधसंपन्नता कोकणात का येऊ नये, या प्रश्नातून 'घर तेथे पंढरपुरी म्हैस' प्रकल्प आकारास आला. आज गावातील दहा बारा तरूण नजीकच्या कुडाळ शहरात सायकलवरुन दूध पोहचवतात. या सर्व प्रकल्पांना संघटित रुप देण्यासाठी भगीरथने बचत गटांची स्थापना केली. गांडूळ खत करणार्‍यांचा, कोंबडीपालकांचा, दूध संकलकांचा, शेळी पालकांचा असे विविध व्यवसायानुरुप बचत गट स्थापण्यात आले. दूध संकलकांच्या बचत गटाला आज वार्षिक ६ ते ७ लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे.

भौतिक विकासाने माणसाचे जीवन सुसह्य होत असले तरी त्याचा मानसिक व वैचारिक विकास घडवून आणणे हे भगीरथच्या कामाचे ध्येय आहे. मन चांगल्या गोष्टींमध्ये गुंतून राहिलं तर व्यक्ती वाईट गोष्टींकडे वळणार नाही, याची जाणीव झाल्याने भगीरथने भजन स्पर्धांचे आयोजन, शाळांमध्ये संगीत प्रशिक्षण वर्ग, मुलींना व्हॉलीबॉल व सायकल चालविण्याचे प्रशिक्षण देणे इत्यादी गोष्टी करण्यास सुरूवात केली.

भगीरथने जेव्हा कामास सुरूवात केली, तेव्हा दहा गावांचे कार्यक्षेत्र निश्चित केले होते. परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले की सर्व गावांमध्ये एकाच वेळी काम करण्याएवढी आपली क्षमता नाही. त्यामुळे भगीरथने बिबवणे या गावावर सर्वप्रथम लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. आज बिबवणे गावाचे पथदर्शक गावामध्ये (डेमो व्हिलेज) रुपांतर करण्यात भगीरथला यश आले आहे. २००६ साली बिबवणे गावास महाराष्ट्र शासनाच्या 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना'त सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.


कोंबडी पालन प्रकल्प

संन्याशाने एका गावात तीन दिवसांपेक्षा अधिक राहू नये अन्यथा मोह उत्पन्न होतो असे म्हणतात. भगीरथनेही या उक्तीनुसार कोणत्याही गावात तीन वर्षांपेक्षा अधिक थांबायचे नाही असा नियम केला आहे. आज भगीरथने बिबवणे गावातून एक्झिट घेतली आहे. आता त्यांचा मुक्काम हुमरस गावात आला आहे.

स्वयंसेवी संस्थेची भूमिका 'कॅटालिस्ट' सारखी असावी असं प्रसाद म्हणतो. मी केलं हा भाव असू नये. त्याने उभ्या केलेल्या या कामाचे श्रेयही प्रसाद स्वत:ला किंवा भगीरथला नव्हे तर गावकर्‍यांना देतो. त्याला भेटायला येणार्‍या पत्रकारांनाही तो आवर्जून सांगतो, की डॉ. देवधरांचे 'भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान' असे लिहू नका तर भगीरथचे डॉ. प्रसाद देवधर असा उल्लेख करा. प्रसादसोबत त्याची डॉक्टर पत्नी हर्षदा हिच्या कामाचाही येथे आवर्जून उल्लेख करणे भाग आहे. प्रसादने जेव्हा सामाजिक कार्यास सुरूवात केली तेव्हा हर्षदा केवळ त्याच्या पाठीशी उभी राहिली नाही, तर त्याच्याच एवढ्या जोमाने तीसुद्धा भगीरथचे काम करु लागली. सामाजिक काम करताना वेळेची अडचण भासू नये म्हणून तिने प्रसादला डॉक्टरकीच्या व्यवसायातून मुक्त केले आणि स्वत:वर दवाखान्याची जबाबदारी घेतली. कदाचित प्रसादपेक्षा तिचे काकणभर अधिक कौतुक अशासाठी की ती जशी दवाखाना व कुटुंब चालविते तशीच भगीरथचे कामही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे करते. गावातल्या तरूण मुलींसाठी हर्षदा आरोग्यजिज्ञासा उपक्रम चालविते. तसेच महिलांच्या बैठका घेणे आणि भगीरथचे बॅक ऑफिस सांभाळण्यात तिचा मोठा सहभाग असतो.


मुलींचा व्हॉलीबॉल सामना

अडतीस वर्षांच्या डॉक्टर प्रसादशी जेव्हा तुम्ही गप्पा मारता, तेव्हा त्याच्या कामाप्रमाणेच त्याचे सोप्या भाषेतील तत्त्वज्ञान ऐकून तुम्ही दंग होता. तो म्हणतो, विकासाकडे बघण्याची आपली दृष्टी नकारात्मक आहे. प्रत्येकजण हे करू नका, ते करू नका असे म्हणतो. पण काय केलं पाहिजे हे मात्र कुणी सांगत नाही. सेझच्या मुद्यावर तो म्हणतो की पर्यायी विकासाचे मॉडेल आपण जर तयार केले नाही तर धनदांडगे येऊन आपली जमीन बळकावतील. यावर उत्तर म्हणून तो सोशल सेझची संकल्पना मांडतो. पंचक्रोशी, दशक्रोशीतल्या गावांनी एकत्र येऊन उत्पादनांची निर्मिती करावी, सेवा पुरवाव्यात. अशी गावं ग्राहक न बनता विक्रेते होतील. असं झालं तर देश महासत्ता बनेल. अन्यथा केवळ महानगरांमधून डोळे दिपवणार्‍या भौतिक प्रगतीवरच आपण महासत्ता होण्याचे पोकळ स्वप्न बघत राहू. अपुरे शिक्षण, व्यावसायिक कौशल्यांचा अभाव आणि पारंपरिक व्यवसायांबद्दल अनास्था असणार्‍या खेड्यातील तरूणांचे महासत्तेच्या चित्रात काय स्थान असणार असा परखड सवाल प्रसाद विचारतो.

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान गेली पाच वर्षे शाश्वत ग्रामविकासांच्या प्रयोगांतून अशा पिचलेल्या तरूणांमध्ये चेतना जागविण्याचा प्रयत्न करीत आहे. विकासाच्या या प्रयत्नांना विविध संस्थांद्वारे पुरस्काररूपी पावती मिळाली आहे. पुण्यात 'गो.नी. दांडेकर स्मृती पुरस्कार' सोहळ्यात प्रसादचे भाषण संपल्यावर एक व्यक्ती इतकी भारावून गेली की त्या व्यक्क्तीने तडक घरी जाऊन एक लाख रुपये आणून प्रसादकडे सोपविले. आज जिल्ह्यातल्या बॅंका भगीरथचे पत्र म्हणजेच जामीन समजून शेतकर्‍यांना कर्ज देतात. 'नॅशनल बॅंक फॉर रुरल डेव्हलपमेंट' म्हणजेच नाबार्डने त्यांच्या मॉडेल व्हिलेज डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी हुमरस गावाची निवड केली आणि त्याकरिता सपोर्ट एजंसी म्हणून अधिकृत जवाबदारी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानकडे सोपविली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या नामवंत संस्थेच्या संस्था बांधणी सहाय्य प्रकल्पामध्ये निवड झालेल्या महाराष्ट्रातील पाच संस्थांमध्ये भगीरथचा समावेश होता. भगीरथच्या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सतत नावीन्याचा व प्रयोगशीलतेचा ध्यास धरला. छोट्या छोट्या प्रयोगातून आर्थिक परिणाम घडवून आणण्यावर भर दिला. 'कामासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येकासाठी काम' हे तत्त्व बाळगले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मभान हरवून बसलेल्या ग्रामीण समाजामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे ध्येय ठेवले.

तुम्हांला 'रंग दे बसंती'मधला संवाद आठवतो का? "कोई भी देश परफेक्ट नहीं होता है, उसे परफेक्ट बनाया जा सकता है." डॉक्टर प्रसाद, हर्षदा आणि भगीरथचे कार्यकर्ते त्यांच्या परीने या देशाला परफेक्ट बनविण्याचे कार्य करीत आहेत.