ध्यानम् सरणम् गच्छामी

भाग २

ताण-तणाव

ध्यानधारणेमुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो व असाधारण परिस्थितीचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते असा पुरस्कर्त्यांचा दावा असतो. इतरांच्या तुलनेत ध्यानोपासक जास्त खंबीरपणे परिस्थिती हाताळू शकतात यावर त्यांचा विश्वास असतो. ध्यानधारणेसाठीच म्हणून पगारी रजा देण्याची आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍यांच्या मागणीमुळे महाराष्ट्र शासनाने रजा देण्यास अनुमती दर्शविली. जबाबदार पदावर काम करत असताना ताण वाढू नये, मनस्वास्थ्य लाभावे, मनाचा समतोल बिघडू नये, योग्य निर्णय घेता यावे व त्यासाठी विपश्यना या ध्यानधारणा मार्गाचा अंगीकार करावा अशीही शासनाची सूचनावजा आज्ञा होती.

ध्यानधारणेमुळे मानसिक ताण तणाव कमी होतो याबाबतीत मात्र सर्व प्रकारच्या ध्यानांच्या पुरस्कर्त्यात एकमत आहे. हायपरटेन्शन, दमाविकार, दाढदुखी, व्यसनाधीनता, निद्रानाश, मधुमेह, इत्यादी विकारावर ध्यानधारणा एक उपचार पद्धती म्हणून सुचवली जाते. सुरुवातीच्या काही चाचण्यामध्ये ध्यानामुळे हृदयाचे ठोके, घाम, श्वासोच्छ्वास, रक्तदाब इत्यादी शारीरिक लक्षणावर परिणाम होऊ शकतो हे आढळले. परंतु या प्रयोगात काही त्रुटी होत्या. यात प्रामुख्याने ध्यानाच्या अगोदर व ध्यानानंतर या लक्षणांची मोजणी केली होती. विज्ञान प्रयोगात अगदी महत्वाची मानलेली नियंत्रित प्रयोगाची पद्धत वापरली नव्हती. नियंत्रित प्रयोग करताना ध्यान करणारे व ध्यान न करणारे अशा दोन्ही गटांना विश्रांती घेण्यास सांगितले. त्यानंतर ताण तणावाच्या लक्षणांचे मोजमाप करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही गटांच्या लक्षणात काही फरक दिसून आला नाही. यावरून थोडीशी विश्रांती घेतल्यास ध्यानाची गरज भासणार नाही असे निष्कर्ष काढण्यात आले. व्यसनाधीनता वा दम्यासारख्या रोगांसाठी दिवसातून काही वेळा विश्रांती घ्या असा सल्ला दिल्यास कुणी ऐकून घेतील का?

या वैज्ञानिक प्रयोगाचे निष्कर्ष स्वीकारणे ध्यानोपासकांना जड वाटू लागले. परंतु आणखी काही प्रयोग केल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा काढलेल्या निष्कर्षांनाच पुष्टी मिळाली. तरीसुद्धा ध्यान जरी ताण तणाव कमी करत नसले तरी ध्यान असाधारण परिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्ती देते असा दावा ध्यानोपासक करू लागले. याबद्दलच्या तपासणीसाठी काही प्रयोग सुचवण्यात आले. एका प्रयोगात ध्यानधारकांना व ध्यान न करणाऱ्यांना एक चित्तथरारक चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपट पाहून झाल्यानंतर त्यांच्या मनस्थितीचा अंदाज घेणारे काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या बुद्ध्यांकाची चाचणी घेण्यात आली. त्यानी दिलेल्या उत्तरावरून काही निष्कर्ष काढण्यात आले. चित्रपट बघत असताना ध्यानधारकांची प्रतिक्रिया ध्यान न करणाऱ्यांच्या तुलनेने सौम्य होती. परंतु प्रत्यक्ष चित्रपट बघण्यापूर्वी ध्यानधारकांची प्रतिक्रिया तीव्र होती हे मात्र संशोधकांना बुचकळ्यात टाकणारे वाटले. ध्यानधारकांची अस्वस्थता कमी होती हे जरी खरे मानले तरी त्यांच्या अजिबात अपेक्षा नव्हत्या असे म्हणणे रास्त वाटणार नाही.

दुसर्‍या एका प्रयोगात तीन गट निवडण्यात आले. एक गट नित्या नियमाने ध्यान करणार्‍यांचा होता. दुसरा गट चार महिने स्नायूंच्या शिथिलतेसंबंधी व्यायाम करणार्‍यांचा होता. व तिसरा गट मात्र या दोन्ही प्रकारात न बसणार्‍यांचा होता. या तिन्ही गटांना प्रयोगाच्या वेळी कानठळ्या बसवणारा मोठा आवाज ऐकवण्यात आला. आवाज ऐकवण्यापूर्वी, आवाजाच्या वेळी व आवाजानंतर गटातील सर्वांच्या हृदयाचे ठोके मोजण्यात आले. ध्यानधारकांच्या गटातील ध्यानस्थांच्या हृदयाचे ठोके आवाज ऐकण्यापूर्वी व आवाज ऐकून झाल्यानंतर जास्त जोरात होते. परंतु प्रत्यक्ष आवाज होताना मात्र इतरांपेक्षा अगदी कमी प्रमाणात पडत होते. यावरून ध्यानधारकामध्ये ताण तणावाच्या प्रसंगात अस्वस्थता व चिंतेची भावना कमी आहे असे वाटत असले तरी ताण तणावामुळे उद्भवलेल्या शारीरिक लक्षणामध्ये काही फरक पडत नाही हेच दिसून येते. ध्यान धारणा ताण तणावापासून आपल्याला मुक्त करू शकत नाही हेच यावरून सिद्ध होते.

बौद्ध ध्यानपद्धतीचा हिरीरीने पुरस्कार करणारे वर उल्लेख केलेले निष्कर्ष वाचून आपलेच तत्वज्ञान बरोबर असल्याचे जाणून कदाचित सुखावत असतील. कारण त्यांच्या ध्यानपद्धतीत जग जसे आहे तसे स्वीकारणे अपेक्षित असते. ध्यान केल्यामुळे काही तरी मिळू शकते याची अपेक्षा करणे निरर्थक असते असा त्यांचा सिद्धांत आहे. जग आहे तसे स्वीकारल्यामुळे मानसिक गोंधळ नाही, कुठलाही भ्रम नाही, असे बौद्ध ध्यानोपासकांना वाटते. दु:खाचे मूळ शोधण्यास ध्यानाचा हातभार लागतो असेही त्यांना वाटते. परंतु जग आहे तसे स्वीकारणे म्हणजे नेमके काय हे स्पष्ट होत नाही. मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसांचा मेंदू ज्ञानेंद्रियांच्या इनपुट्सवरून जगाचे प्रतिरूप (मॉडेल) तयार करतो. हे प्रतीरूप त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणार्‍या असतात. म्हणजेच त्यातील बहुतेक गोष्टी सकारात्मक असतात. त्यांच्या आवाक्याबाहेरची कुठलीही गोष्ट त्या प्रतिरूपात नसते. ते एक त्यांचे स्वतंत्र जग असते. परंतु याचा अर्थ बाहेर असलेल्या वास्तव परिस्थितीतील खर्‍या जगाचे ते प्रतीरूप असते असे म्हणता येणार नाही. या प्रतीरूपाचा पाया इंद्रियगम्य माहितीवर आधारित असल्यामुळे इंद्रियांना - त्यांच्या न कळत - त्यांना न जाणवलेल्या माहितींची त्यात सरमिसळ होऊ शकते. म्हणजेच त्या व्यक्तीला समजलेले जग व वास्तवात असलेले जग यामध्ये नक्कीच तफावत असते.

यासंबंधी एक प्रयोग करताना रोज 15-16 तास नियमितपणे ध्यान करणारे व फक्त 2 तास ध्यान करणारे असे दोन गट निवडण्यात आले. त्यांना लांबून 2 ते 4 वेळा प्रखर दिव्याची ज्योत दाखवण्यात आली. काही वेळा दिव्याची उघड झाप करण्यात येत होती. परंतु या दोन्ही गटात प्रकाशाच्या आकलनाविषयी विसंगती आढळली. म्हणजेच इंद्रियाद्वारे मिळालेली सर्व माहिती अचूक असेलच याची खात्री देता येणार नाही.

जगाचे मॉडेल

माणूस नेहमीच आपल्याला जे जग हवे त्याचेच प्रतीरूप मनात साठवत असतो. त्यात त्या व्यक्तीची जाण, समज, अनुभव वैचारिक कुवत यांचेच प्रतिबिंब उमटलेले असते. त्याच्यातील मर्यादा व वैशिष्ट्ये यांचा शोध त्या प्रतीरूपात घेता येते. उदाहरणार्थ लहान मुलं परिकथेच्या जगात वावरत असतात. तरुण-तरुणींचे रोमॅंटिक जग इतराहून वेगळे असते. .....तसेच त्या प्रतीरूपात त्या त्या व्यक्तीच्या पूर्वानुभवाचा संग्रहही असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला उमजलेले जग हे वास्तवापासून शेकडो कोस दूर असते.

याबाबतीतही एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात एका गल्लीतील रस्त्याचे, त्यातील घरांचे व झाडा-जुडपांचे एक चित्र काहींना दाखवण्यात आले. व असेच एक हुबेहूब रेखाचित्र काढण्यास सांगितले. यातील बहुतेकांच्या रेखाचित्रात दारे खिडक्या, घरांचे छप्पर, झाडे इत्यादींचे प्रमाण मऊळ चित्राप्रमाणे नव्हत्या. चित्र काढणारे आपापल्या मनात साठलेल्या दारे-खिडक्यांचे चित्र काढत होते. मनात साठवलेल्या कल्पनांनाच चित्ररूप देण्याचा तो प्रयत्न होता. म्हणून त्यात अनेक लहान मोठे चुका राहिल्या होत्या.

इतरापेक्षा ध्यानोपासकांच्यात एकाग्रता जास्त असतो हा दावाही फोल ठरला आहे. मुळात एकाग्रता म्हणजे नेमके काय याचा अर्थ बोध होत नाही. एका शोधनिबंधात याविषयी माहिती आलेली आहे. या संशोधकाच्या मते इंद्रियाद्वारेच आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो. परंतु असे करताना एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाग्र चित्त होण्याचा संभव फारच कमी असतो. कारण आपण नेहमीच एका वेळी अनेक गोष्टी (मल्टी प्रोसेसिंग) हाताळत असतो. मुळात आपली एकाग्रता आपल्या मानसिक जडण - घडणीवर जास्त करून अवलंबून असते. शेक्सपियरच्या मॅकबेथ नाटकातील मॅकबेथला 'आपण राजा होणार' ही वाणी कुठल्याही शारीरिक हालचालीविना पटली होती. म्हणूनच त्याच्या यानंतरच्या सर्व शारीरिक व मानसिक हालचाली, प्रतिक्रिया त्याच दिशेने होत होत्या. स्पर्धात्मक परीक्षेला बसलेला एखादा विद्यार्थी परीक्षा संपेपर्यंत शारीरिक व मानसिकरित्या तादात्म्य पावतो. त्यासाठी मानसिक तयारी असते. व त्याची मानसिक जडण - घडण त्याला मदत करते. अशा प्रकारे आपली मानसिक जडण घडण महत्वाची ठरत असून ध्यान करणारी व्यक्ती डोळे मिटते की डोळे उघडे ठेवते याला काही अर्थ उरत नाही.

ध्यान करण्यात व न करण्यात ध्यान सोडल्यास इतर कुठल्याही प्रकारे तुलना करण्यासारखे काहीही नसते, असा निष्कर्ष काढता येईल. पाश्चात्य देशातून आपल्या येथे ध्यान शिकण्यासाठीच आलेले व त्याच देशातील इतर यांची तुलना केल्यास फार वेगळे चित्र दिसणार नाही. या उलट ध्यान धारणा करणाऱ्या परदेशातील व्यक्ती चिंताग्रस्त असतात असेच आढळले. इतरापेक्षा ध्यानधारणेसाठी उत्सुक असणारे जास्त समस्याग्रस्त असतात. इतरापेक्षा दुप्पट प्रमाणात ही मंडळी मादक पदार्थांचे सेवन करतात, असे दिसून आले आहे.

ध्यानधारणेचे दावे

गंभीर समस्यांची हाताळणी: ध्यानोपासक एखादी गंभीर समस्या कशी हाताळतात याचाही काही संशोधकांनी अभ्यास केला आहे. यासाठी अनुभवी ध्यानधारक व अननुभवी ध्यानोपासक यांच्यातील अनुभवांची तुलना करणे योग्य ठरेल असे संशोधकांना वाटत होते. परंतु यातही गोची होती. कारण जरी ध्यानाची सुरुवात करणार्‍यांची संख्या भरपूर मोठी असली तरी मध्येच कुठेतरी सोडून जाणार्‍यांची संख्याही तितकीच मोठी असते. फारच कमी लोक शेवटपर्यंत टिकून राहतात. व ध्यानाचा सराव करतात. त्यामुळा ध्यानधारकांचा फार मोठा गट ध्यानानुभवापासून वंचितच राहतो. ध्यानाच्या परिणामाचा स्पर्षही त्यातील अनेकाना झालेला नसतो. मनोवैज्ञानिकांच्या मते ध्यानोपासनेतील अनियमितता ही मानसिक अनारोग्याचे लक्षण होय.. अशा व्यक्ती अंतर्मुख, ध्यानापासून फार कमी अपेक्षा ठेवणारी, अत्यंत टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करणारी, प्रत्येक घटनेच्या कारणाचे बाह्य जगात शोध घेणारी असू शकते. अजून एका अभ्यासानुसार कादंबरी, चित्रपट वा दिवास्वप्न यामध्ये रमणाऱ्यासारखी या अर्धवटपणे ध्यान करणाऱ्यांची असते.सायकोसिस वा विषण्णता (डिप्रेशन) यांची लक्षणं असलेले ध्यानोपासना पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यांच्यावर ध्यान पूर्ण करण्याची जबरदस्ती केल्यास आत्महत्या वा विमनस्क वर्तणुकीत पर्यावसान होण्याची शक्यता असते. या तुलनेने स्थिरचित्त प्रकृती असलेलेच ध्यान पूर्ण करू शकतात. यावरून एखादी गंभीर समस्या हाताळताना ध्यानधारणेचा उपयोग कितपत होतो याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही असे संशोधकांना वाटते. कारण ध्यानधारकांची प्रतिक्रिया व इतर स्थिरचित्त असलेल्या सामाऩ्यांची प्रतिक्रिया सारखीच असण्याचा संभव जास्त.

ध्यानोपासक: ध्यानोपासक जास्त सुखी असतात असेही सांगितले जात असते. ध्यानधारणेपासून खरोखरच सुख मिळत असेल का? मानसशास्त्रज्ञांच्या मते ध्यान हे सुख मिळवण्याचे तंत्र नसून एक प्रकारची भान निर्माण करणारी प्रक्रिया असते. सुख हे मानण्यावर अवलंबून असते. त्यात पैसा, प्रतिष्ठा, वंश, लिंग, प्रदेश, इत्यादींचा काहीही संबंध नसतो. अतीव दुखाच्या प्रसंगातून माणूस गुजरताना बाह्य परिस्थितीपेक्षा त्याच्या मनातील आंतरिक शक्तीच त्याला उभारी देत असते. व्यक्तीच्या शारीरिक - मानसिक जडण घडणीतच सुखाचा शोध घेता येतो. ध्यानधारणा वेगळे काहीतरी करू शकते अशी समजूत करून घेणे भाबडेपणाचे ठरेल.

ध्यानधारणा: ही उपचार पद्धती म्हणून योग्य आहे का? असा प्रश्नही अनेक वेळा विचारला जात असतो. काही मानसोपचारतज्ञ ध्यानाचा उपयोग आपल्या उपचार पद्धतीत करून घेत असतात. परंतु त्याच्याही काही मर्यादा आहेत. गंभीर मानसिक आजारावर ध्यानधारणेमुळे आजार कमी होण्याऐवजी आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. दाबून ठेवलेले आणि संघर्षात्मक विचार व भावना यांना तोंड देण्यासाठी यशस्वी न झालेल्यानी ध्यानाच्या मागे लागल्यास या गोष्टी उफाऴून येण्याची शक्यताच जास्त असते. व त्यातून शारीरिक - मानसिक यातनाच जास्त होतात. मानसशास्त्रीयदृष्ट्या स्थिरचित्त प्रकृतीच्या लोकानाच ध्यानधारणेचे सकारात्मक परिणाम दिसतात. परंतु हे कितपत, कुठल्या व्यक्तीत, व केव्हा दिसतात हे अजूनही गूढ आहे.

 

पुढे: पृष्ठ ३