ध्यानम् सरणम् गच्छामी
भाग ३
दहा दिवसाचे विपश्यना शिबिर
ध्यानधारणेच्या वैज्ञानिक प्रयोगांच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास विपश्यना या ध्यानप्रकारातील फोलपणा सहजपणे लक्षात येईल. विपश्यना हा ध्यानप्रकार बौद्ध काळात विकसित झालेला असून मनाला घडवणारा संस्कार म्हणून बौद्ध धर्माचे अभ्यासक त्याकडे बघतात. डोळे उघडे ठेवून मन:पूर्तीचा ध्यानानुभव घेण्याचाच हा प्रकार त्या काळी होता. आधुनिक युगातील ध्यानोत्सुकांना सुलभरित्या उपासना करता यावी यासाठी मूळ विपश्यना पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत. सत्यनारायण गोएंका हे म्यानमार येथील गृहस्थ भारत व इतर देशात गेली अनेक वर्षे या आधुनिक विपश्यना पद्धतीचा प्रचार करत आहेत.
विपश्यनेची प्राथमिक माहिती, ध्यान करण्याची पद्धत, ध्यान करताना पाळावे लागणारे नियम, ध्यानानुभव येण्यासाठी कराव्या लागणार्या शारीरिक हालचाली व विपश्यनेची जुजबी तात्विक मीमांसा यासाठी ठिकठिकाणी दहा दिवसाचे विपश्यना शिबिरं घेतली जातात. अशा शिबिरात अनेक ध्यानोत्सुक वेगवेगळे उद्धेश साध्य करण्यासाठी येतात. काहींना वैफल्यातून बाहेर पडायचे असते; काहींना ताण तणावापासून मुक्ती हवी असते; विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त गुण मिळवण्याची कला हस्तगत करून घ्यायची असते; पहिलटकरणीला आपले मूल आइन्स्टाइनच्या तोडीची हवी असते; काहीना दैनंदिन जीवनातील तोचतोचपणा टाळायचा असतो; काहींचा 'हवा पालट' हा उद्देश असतो. काही पालक मुलगा वांड आहे म्हणून (जबरदस्तीने) मुलांना शिबिरात पाठवत असतात. छोट्टा मोठ्या मानसिक रोगांच्या उपचाराच्या अपेक्षेने काही येतात. ध्यानानुभवाकडे सर्व समस्यांचे रामबाण उपाय म्हणून बघितले जाते. तुमच्या उद्देशाची येथे चर्चा केली जात नाही. तुम्ही येथे का आलात याची विचारपूस केला जात नाही. शिबिराशेवटी उद्देश सफल झाला की नाही हेही विचारले जात नाही. कारण विपश्यना हा चर्चेचा वा अभ्यासाचा विषय (वाणीविलास वा बुद्धीविलास) नसून प्रत्यक्ष अनुभवानीच तो कळतो असा दावा विपश्यनेचे प्रचारक करत असतात. पहिल्या शिबिरात अपेक्षित फळ मिळाले नाही म्हणून दुसऱ्या-तिसऱ्यांदा येणाऱ्यांची संख्या पण कमी नसते.
विपश्यनेच्या शिबिर काळात संपूर्ण मौन (आर्य मौन!) पाळण्याची अट असून 10 दिवसातील 9 दिवस हा नियम अत्यंत काटेकोरपणाने पाळला जातो. सकाळच्या 4 पासून ते रात्रीच्या 10 पर्यंतच्या या दिनचर्येत, सकाळ संध्याकाळ मर्यादित नाष्टा, दुपारचे फक्त एक वेळ जेवण (रात्री काही नाही!), दिवसातून 8-10 तास (सक्तीची!) साधना (प्रात:साधना, सामूहिक साधना, सायंसाधना, निर्देशानुसार साधना) 2 तास व्हिडीओवरून गोएंकाचे प्रवचन, असा भरगच्च कार्यक्रम असतो. पहिले तीन दिवस (आनपान) श्वासप्रकाराकडे लक्ष वेधण्याचा सराव शिकवला/ केला जातो. नंतर मात्र विपश्यना हा प्रकार शिकवला जातो. यात श्वासामुळे शरीरावर होणाऱ्या संवेदनाची (सूक्ष्म व स्थूल संवेदन!) नोंद घेण्याच्या अनुभवावर भर दिला जातो. प्रत्येक ध्यानधारक आपापल्या कुवतीप्रमाणे हा अनुभव घेऊन शेवटच्या दिवशी मौन सोडतो (हुश्श....) व इतराशी अल्प परिचय (मंगल मैत्री!) करून घेत घरी निघुन जातो. या प्राथमिक परिचयात्मक शिबिरानंतर रोज सकाळी व संध्याकाळी किमान एक तास डोळे मिटून मौन राखून हे ध्यान करावे अशी अपेक्षा असते. आठवड्यातून एखादा तास सामूहिक ध्यान करावे, रोज उठताना व झोपताना 5-10 मिनिटे ध्यान करावे अशी अपेक्षा पण बाळगली जोते. विपश्यनेच्या अनुभवांच्या विस्तारासाठी 20, 30, 60, 90 दिवसांचे शिबिराचे आयोजन पण केले जाते.
गोएंकाच्या व्हिडीओ प्रवचन
गोएंकाच्या व्हिडीओ प्रवचनात मन, सुख - दु:ख, पुनर्जन्म, जन्म जन्मांतरीचे संचित, त्रयस्थपणे जगाकडे बघण्याची दृष्टी, सर्व दिवस सुखात (!), अनिच्छा (अनिच्च) असणे अशा अनेक विषयावर भाष्य केले जाते. बुद्धीपेक्षा अनुभवावर आधारित ज्ञान (अनुभूती), सत्य (आर्यसत्य!), जाणीव, संवेदना, प्रतिक्रिया इत्यादी विषयावर गोएंका भाष्य करत असतात. कुदरत का करिष्मा, विश्व का बिधान, निसर्ग का नियम, 121 चित्त (!), 52 चित्तवृत्ती (!), शील, समाधी, प्रज्ञा या प्रकारच्या बौद्ध संकल्पनांची पेरणी त्यांच्या प्रवचनात असते. मन व शरीर, संवेदनांचा मनोविकाराशी असलेला संबंध, दु:खाचे मूळ कारण इत्यादींचा शोध त्यांच्या भाषणातून घेतला जातो. अनित्यबोध, दु:खचक्र, अनुभूती इत्यादी संकल्पनांचे महत्व काय आहे हे सांगितले जाते. यातील कित्येक शब्द पहिल्यांदाच आपल्या कानावर पडत असतात. प्रश्न विचारायची सोय नाही. अळीमिळी गप्प चिळी!. अर्धवट उपाशी पोटी असताना ऐकलेले तत्वज्ञान कितपत भावते ते फक्त गोएंकाच सांगू शकतील.
उदास वातावरण
निसर्गरम्य ठिकाणी विपश्यना शिबिर भरत असले तरी या संपूर्ण दहा दिवसांच्या शिबिराच्या कालावधीत एक प्रकारचा उदासपणा जाणवत असतो. वेगवेगळ्या ठिकाणातीन उद्योग-व्यवसायातून, संस्कारातून (संखारा), वयोगटातून आलेला समूह किती उत्साहवर्धक असायला हवा. येथे मात्र सर्वच उलटे. मौन व्रतामुळे बोलायला बंदी, देवाण घेवाण नाही, साधक बाधक चर्चा नाही, खेळी मेळीचे वातावरण नाही, हसणे खिदळणे नाही. शिवाय अपेक्षित अनुभव मिळेल का याची खात्री नाही. मिळत असल्यास कधी मिळेल याची निर्दिष्ट कालमर्यादा नाही. जसे जमेल तसे, जमेल तितके, मिळेल तसे हा सर्व व्यवहार असतो. सर्व काही दु:खमय आहे, दु:खाचे निवारण (आमच्याच) ध्यानामुळे होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीकडे निरिच्छेने बघावे. असे काही सांगत असल्यामुळे उत्साहवर्धक असे काही वाटत नाही. सगळीकडे सुतकी चेहरे. विशेषकरून 18 ते 30 वयोगटातील जीवनात नुकतेच पदार्पण करणाऱ्या युवक - युवतींना हे सर्व अशा पद्धतीने सांगितलेले ऐकताना त्यांची कीव कराविशी वाटते. अजून त्यांना जीवनानुभव नाही, दु:खाचा स्पर्श नाही, जीवनाकडे बघण्याची त्यांची दृष्टी सकारात्मक असते. अशा वेळी काही काल्पनिक धोक्याची माहिती सांगून भीतीचे बुजगावणे उभे करणे, त्यांच्या अदम्य उत्साहावर टिप्पणी करणे कितपत योग्य आहे, हा विचार मनात आल्याशिवाय राहणार नाही. खरे पाहता या वयात नैराश्येच्या भावनेपेक्षा परिस्थितीत बदल करण्यासाठी झोकून घ्यायला हवे. राग यायला हवा. यामुळेच प्रत्यक्ष कृती होऊ शकते. परिस्थिती बदलता येते. संघर्षात्मक पवित्रा घेता येते. कातडीबचाऊ धोरणातून काहीही साध्य होणार नाही. विपश्यना मात्र असले काही होऊ देणार नाही.
विपश्यनेचा अनुभव घेत असताना आपण अजूनही चिकित्सक दृष्ट्या विचार करू शकत नाही हे जाणवते. साधारण जीवन जगणारी सामान्य माणसं थोडीफार चौकस झालेली आहेत हे खरे. परंतु विषयाच्या खोलात शिरून चिकित्सकपणे विषय समजून घेण्याची तसदी त्यांच्याकडून घेतली जात नाही. अगदी उच्चशिक्षित पदवीधरसुद्धा यास अपवाद नाहीत. या कच्चेपणाचा फायदा घेण्यासाठी लोकं टपून बसलेली असतात. आधुनिक जाहिरात तंत्र वापरून हे लुच्चे संघ संस्था स्थापून सामान्याना फसवत असतात. ही एका प्रकारे आधुनिक बुवाबाजीचीच आवृत्ती आहे. यांच्या तथाकथित पांडित्यावर, लालित्यपूर्ण भाषणबाजीवर सामान्य माणसं मुग्ध होतात. यांच्या पांडित्याची छाप पडते. ऐटबाज नखऱ्यात समाजशास्त्र, अणुविज्ञान, क्वांटम मेकॅनिक्स, जीवविज्ञान, मानसशास्त्र, इत्यादी विषयांची जुजबी, प्राथमिक माहितीद्वारे समोरछ्याना मंत्रमुग्ध करून जाळ्यात पकडण्याची कला त्यांना अवगत झालेली असते. उतारे, वचने, अभंग, संदर्भ, मोठमोठ्या पुस्तकांची, (पाश्चात्य) लेखकांची नावे, श्रोत्यांच्या अंगावर धबधब्यासारखे फेकण्यासाठी लागणारी स्मरणशक्ती त्यांच्याकडे असते. स्मरणशक्ती व वक्तृत्वकला म्हणजेच शास्त्रीय दृष्टिकोन व संपूर्ण चिंतन अशी समजूत श्रोते करून घेत असतात. त्यामुळे गोएंकांचे भाषण (तेही 10 दिवस) ऐकून सर्वजण भारावलेल्या अवस्थेत घरी जातात. जाताना चकचकित मुखपृष्ठ असलेली पुस्तकं, कॅसेट्स् विकत घेतात. कॅसेट्सची विक्रमी विक्री होते.
अंधश्रद्ध नसलेल्याचा आभास
विपश्यना शिबिरांचे आयोजन सूत्रबद्ध असते. आधुनिक सुविधा वापरल्या जातात. यात भाग घेणारेही सुशिक्षित मध्यमवर्गीय अशा असतात. मंत्र -तंत्र, ताईत-गंडे - दोरे, रुद्राक्ष, नवस- जपजाप्य, पूजा - भजन, सत्संग, अशा गोष्टी नाहीत. कर्मकांडे नाहीत. कर्मठपणा नाही. त्यामुळे आम्ही अंधश्रद्ध नाही व सर्व काही शास्त्रीय दृष्ट्या ठीक आहे असा भास निर्माण केला जातो. ताण-तणाव, वैफल्य, नैराश्य, अगतिकता इत्यादीमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे किंवा पुढे मागे कधीतरी बिघडल्यास त्यावर विपश्यना हा एकमेव उपाय आहे अशी समजूत करून दिली जाते, ठसवली जाते. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या याचा प्रत्यय येतो की नाही याचा विचारच केला जात नाही. सामाजीक दृष्ट्या याचे काय परिणाम होऊ शकतात याची पर्वा नाही. व्यक्तीकेंद्रित विचार ठसवल्यामुळे समाजाशी बांधिलकी, समाजाचे देणे-घेणे याचा येथे कुठेही संबंध येत नाही. व्यक्तीच्याच सुख-दुखाना, दुखाच्या विश्लेषणाला, दुख परिहाराच्या एकतर्फी मार्गाला महत्व दिल्यामुळे समाजाचा घटक म्हणून परिस्थिती, अन्याय, विषमता, शोषणावस्था इत्यादीमुळे काही दुखे आपल्यावर लादल्या जात असतात, याची कल्पनाच या शिबिराच्या संयोजकांना हिरीरीने भाग घेणाऱ्याना वा अशा गोष्टींचे उधोउधो करणाऱ्यांना नसते. परिस्थिती शरणता हाच एकमेव मार्ग असल्यासारखे वाटू लागते.
मुळात माणूस हा सामाजिक प्राणी आहे. कितीही प्रयत्न केले तरी तो एकटा कधीच जगू शकत नाही. आणि काही काळ जगला तरी त्याला मनुष्याचे गुणधर्म प्राप्त होऊ शकत नाहीत. परस्पर सहकार्य, जिज्ञासा, विचार, कल्पकता, उत्सुकता, धाडस, धोका पत्करणे, राग, लोभ इत्यादींना पर्याय नाही. फाषाण युगापासून आजपर्यंतच्या इतिहासाची पाने उलटल्यास धाडस, शौर्य, धैर्य, मर्यादित धोका पत्करणे, उद्दिष्टांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, जीव ओतून काम करणे, कार्यसिद्धीसाठी झोकून काम करत राहणे, यांना पर्याय नाही असेच दिसेल. विचारासाठी मेंदू, व विचारविनिमयासाठी भाषा, असताना कपोल कल्पित व्यक्तिगत अनुभूतीसाठी या गोष्टींचा त्याग करणे मानवाला शोभणारे नाहीत. जीवनानुभव घेणे जीवनानुभवांचा लाभ घेणे, त्यातून शिकत जाणे, त्यांची चिकित्सा करणे व त्यातून प्रगती करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून चिकित्सा केल्यास विपश्यनेचे अजब तत्वज्ञान व त्याचे तंत्र अशा गोष्टींना उपकारक नाही असे वाटते.
शेवटी आपण आपला वेळ कशा प्रकारे घालवावा हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सामाजिक प्राणी म्हणून प्रत्येकावर काही जवाबदार्या आहेत. काही कर्तव्य आहेत. यांची जाण ठेऊनच विपश्यनेच्या आहारी जावे की नाही याचा निर्णय घेणे योग्य ठरेल. माकडाबरोबर झाडाखाली बसून फळे खावीत. परंतु माकडांच्या सारखे झाडावर चढून एका फांदीवरून दुसर्या फांदीवर उड्या मारण्याच्या फंदात पडू नये हेच शहाणपणाचे ठरेल.
समाप्त
लेखक इंग्रजी थॉट ऍण्ड ऍक्शन नियतकालिकाचे संपादक, एआरडीई मधून निवृत्त शास्त्रज्ञ.