ट्रॉय - सा रम्या नगरी आणि तिची कहाणी - २

अरविंद कोल्हटकर

भाग २

श्लीमनचे उत्खनन.


हाइन्रिख श्लीमन

पुरातत्त्वशास्त्र तेव्हा नुकते कोठे जन्माला येऊ घातले होते. श्लीमनला शास्त्रीय उत्खननाची काहीच माहिती नव्हती पण उत्साह आणि भांडवलाचे पाठबळ त्याच्यापाशी बख्खळ होते. अशा ऐन वेळेस त्याची गाठ दुसर्‍या एका हौशी संशोधकाशी पडली. त्याचे नाव होते फ्रॅंक कॅल्वर्ट.

तुर्कस्तानातील डार्डनेल्स सामुद्रधुनीच्या आशियाच्या बाजूच्या पूर्व किनार्‍यावर हिस्सार्लिक नावाची उंचवटयाची जागा हीच ट्रॉयची जागा आहे असा अंदाज १८२०-२२ पासून उत्साही लोक वर्तवत होते. पहिल्या महायुद्धात गाजलेल्या गॅलिपलीच्या समोर सामुद्रधुनीच्या दुसर्‍या बाजूस हिस्सार्लिक आहे. डार्डनेल्सचे पुराणे नाव हेलेस्पॉण्ट. ह्या सर्व परिसरात अनेक प्राचीन अवशेष आणि वसाहती सापडतात. हिस्सार्लिकची भौगोलिक स्थिति होमरने वर्णन केलेल्या ट्रॉयशी खूप मिळतीजुळती आहे. ट्रॉय नगर भरभरटीला येण्याचे एक कारण असे की हेलेस्पॉण्टची रुंदी जेथे अगदी कमी म्हणजे २-३ कि.मी. इतकी होते तेथे ते वसलेले होते. एजियन समुद्रामधून मार्मारा समुद्राच्या मार्गाने काळया समुद्रात आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात, तसेच वोल्गा नदीच्या काठाकाठाने उत्तरेकडल्या प्रदेशात व्यापारासाठी जायचे तर डार्डनेल्स-हेलेस्पॉण्ट हा एकच मार्ग आहे. ट्रॉय नगर ज्याच्या ताब्यात तो सत्ताधीश हा व्यापार नजरेखाली ठेवू शकत होता.

फ्रॅंक कॅल्वर्ट आणि त्याचे दोघे थोरले भाऊ ह्या भागात ब्रिटिश कॉन्सल म्हणून पुष्कळशी कामे, बहुतांशी निर्वेतन अशी करीत असत. हिस्सार्लिकच्या उंचवटयाचा भाग स्थानिक तुर्की शेतकर्‍यांकडून फ्रॅंकच्या थोरल्या भावाने खरेदी केला होता. तेथे फ्रॅंकने थोडेफार जुजबी उत्खनन केलेले होते आणि तेथे सापडलेल्या अवशेषांवरून त्याची खात्री झाली होती की हीच होमरच्या इलियडची जागा आहे. ट्रॉय इकडेतिकडे शोधण्याचे काही प्रयत्न केल्यावर श्लीमनची कॅल्वर्टशी गाठ पडली आणि हिस्सार्लिक हीच जागा ट्रॉयच्या शोधाला योग्य आहे अशी कॅल्वर्टने त्याची खात्री करून दिली.

तुर्कस्तानातील डार्डनेल्स सामुद्रधुनीच्या आशियाच्या बाजूच्या पूर्व किनार्‍यावर हिस्सार्लिक नावाची उंचवटयाची जागा हीच ट्रॉयची जागा आहे असा अंदाज १८२०-२२ पासून उत्साही लोक वर्तवत होते. पहिल्या महायुद्धात गाजलेल्या गॅलिपलीच्या समोर सामुद्रधुनीच्या दुसर्‍या बाजूस हिस्सार्लिक आहे. डार्डनेल्सचे पुराणे नाव हेलेस्पॉण्ट. ह्या सर्व परिसरात अनेक प्राचीन अवशेष आणि वसाहती सापडतात.

मधल्या काळात पहिल्या घटस्फोटानंतर श्लीमनने सोफिया एंगॅस्ट्रोमेनोस नावाच्या ग्रीक तरुणीशी विवाह केला होता. ग्रीक भाषा आणि संस्कृतीच्या प्रेमात तर तो आधीपासूनच पडला होता. सोफिया त्याच्याहून ३० वर्षांनी लहान होती. सोफियाला बरोबर घेऊन श्लीमनने हिस्सार्लिकच्या उंचवटयावर उत्साहाने आपला स्वत:चा पैसा खर्च करून उत्खननाला प्रारंभ केला.

ह्या नंतर जे घडले ते एखाद्या विनोदी नाटकासारखे होते. उंचवटयाचा पूर्व भाग कॅल्वर्टच्या मालकीचा होता आणि पश्चिम भाग दोघा तुर्की शेतकर्‍यांच्या. ते तेथे उपस्थित नाहीत ह्याचा लाभ घेऊन धडाक्याने त्यांच्या भागातही घाईघाईने खणायचे श्लीमनने ठरविले. उत्खननात काही मौलिक चीजा सापडणार आणि त्या पाहिल्यावर तुर्की शेतकर्‍यांचा जो काय विरोध असेल तो मावळणार असा त्याने अंदाज केला. पहिल्याच दिवशी त्याला जुन्या घराच्या पायाचे दगड आढळले. दुसर्‍या दिवशी पूर्ण घर. तेथेच जळलेल्या लाकडांमध्ये त्याला एक नाणेही सापडले. त्याच्यावर कोरले होते ’ट्रॉयचा हेक्टर’ असे शब्द. आपल्याला ट्रॉयचे कोडे उलगडणार असा त्याचा विश्वास बळावला. घाईघाईने त्याने उंचवटयाच्या माथ्यावर पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे दोन चर खणले. पण तेव्हढयात तुर्की मालक जागेवर हजर झाले आणि चालू कामाला त्यांनी आक्षेप घेतला. आपण केवळ शास्त्रीय कार्य करत आहोत असे दुभाष्याच्या मदतीने त्या दोघांना समजावून सांगण्याचा श्लीमनचा प्रयत्न यशस्वी होईना. त्या दोघांना एका नाल्यावर पूल बांधावयाचा होता आणि उत्खननात मिळालेले मोठे दगड त्या कामाला त्यांना हवे होते. ते दगड आणि वरती ४० फ्रॅंक्सची रक्कम देऊन श्लीमनने तात्पुरती शांतता विकत घेतली.

पूल बांधण्यासाठी पुरेसे दगड मिळाल्यावर तुर्की मालकांनी टोपी फिरवली. काम थांबवावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून श्लीमनने त्यांना १०० पाऊंड द्यावेत अशी नवीनच मागणी त्यांनी पुढे आणली. श्लीमनच्या लक्षात आले की उंचवटयाची पूर्ण जागा ताब्यात नाही तोवर निर्वेध मार्गाने उत्खननाचे काम करता येणार नाही. जागा विकत मिळावी ह्यासाठी इस्तनबूलमध्ये सरकारी पातळीवर किल्ल्या फिरवायला त्याने प्रारंभ केला. आपण हे काम सोन्यानाण्याच्या खजिन्यासाठी नाही तर ट्रॉयचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठीच केवळ करू इच्छितो असे तुर्की सरकारला पटवून देण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. मधल्या काळात दोघा मालकांनी १००० फ्रॅंक्स किंमतीला जागा देण्याचे आश्वासन फ्रॅंक कॅल्वर्टला दिले होते पण अखेरीस सरकारनेच जागा ६०० फ्रॅंक्सना विकत घेतली.

वेगवेगळया मार्गांनी तुर्की सरकारवर दबाव आंणल्यानंतर मिळालेल्या चीजांपैकी अर्ध्या सरकारजमा करण्याच्य़ा अटीवर त्याला अखेर हिस्सार्लिकमध्ये उत्खनन करण्याची मुभा तुर्की सरकारने दिली. १८७१ च्या मध्यानंतर उत्खनन वेगाने सुरू झाले. मिळालेल्यांपैकी काही चीजा फ्रॅंक कॅल्वर्टच्या मदतीने त्याने गुपचूप देशाबाहेरही नेल्या. त्यांमध्ये ग्रीक देव अपोलो ह्याचा एक पुतळा होता जो श्लीमनच्या अथेन्समधील घराच्या बागेत बरेच दिवस शोभेसाठी ठेवला होता.

प्रायम राजाचा खजिना आणि हेलनचे दागिने.


सोफिया श्लीमन आणि हेलनचे (तथाकथित) दागिने.

दीड-पावणेदोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर उत्खननाच्या स्थानी एके दिवशी त्याला अचानक जाणवले की जमिनीत काहीतरी धातूची वस्तु असावी. तुर्की मजुरांना तसा काही अंदाज यायच्या आत त्याने अचानक कामाला सुट्टी जाहीर केली. त्यासाठी सबब अशी सांगितली की आज माझा वाढदिवस आहे आणि ती गोष्ट माझ्या आताच ध्यानात आली. उत्खननाच्या जागी उपस्थित असलेला तुर्की सरकारचा प्रतिनिधी अमीन एफ़ेंडी थोडा बुचकळयात पडला खरा पण ही सबब त्याच्याही पचनी पडली. अशा युक्तीने अचानक सुट्टी मिळाल्यामुळे आनंदित झालेल्या कामगारांना तेथून दूर पिटाळल्यावर चाकूचा उपयोग करून श्लीमन आणि सोफिया अशा दोघांनी सर्व धातूच्या वस्तु मातीतून मोकळया केल्या आणि सोफियाच्या शालीत गोळा केल्या. तेथून त्या आपल्या जवळच असलेल्या राहण्य़ाच्या जागी नेल्या. ह्या वस्तूंमध्ये एक तांब्याची ढाल, तांब्याचे भांडे, एक चांदीचे आणि दुसरे तांब्याचे अशी दोन शोभेची भांडी, दोन सोन्याचे चषक, एक सोन्याची कुपी, एक चांदीचे भांडॆ, अजून काही लहानमोठी चांदीची भांडी, चांदीच्या सुर्‍या अशा कित्येक चीजा तर होत्याच पण सोन्याची दोन शिरोभूषणे, ५६ कानात घालायचे अलंकार, ८७५० सोन्याची कडी आणि मणि अशा मौल्यवान चीजा होत्या. शिरोभूषणांपैकी एकाला नव्वद सोन्याच्या साखळया जोडलेल्या होत्या.

श्लीमनला काहीतरी घबाड हाती लागले आहे ह्याची थोडी कुणकुण बाहेर पोहोचलीच. तुर्की सरकारचा प्रतिनिधि अमीन एफ़ेंडी - हे ऑटोमन काळातले उच्च स्थानदर्शक बे अथवा पाशा सारखे बिरुद असे - रातोरात चौकशीसाठी श्लीमनच्या घरी दाखल झाला आणि घराची झडती घेऊन देण्याची त्याने मागणी केली. श्लीमनने त्याला बाहेरच्या बाहेर हुसकावून लावले आणि रातोरात सगळया चीजा फ्रॅंक कॅल्वर्टच्या शेतातल्या घरी हलविल्या. एका दिवसात त्या चीजा तेथूनही हलल्या आणि समुद्रमार्गे गुपचूप ग्रीसमध्ये पोहोचल्या.

अजून काही मौल्यवान चीजा उत्खननाच्या जागी शिल्लक नाहीत इतकी खात्री काही दिवसात करून श्लीमनने काम अचानक संपल्याचे घोषित केले आणि तो ग्रीसमध्य अथेन्सला परतला. मागे राहिली ती वेडयावाकडया खड्ड्यांनी भरलेली एक युद्धभूमी.

| २ |