"नाही! नाही म्हणजे काय?"

धनंजय वैद्य

बाळ अगदी सुरुवातीला 'आई', 'बाबा' शब्द शिकते, पण त्यानंतर खूपच लवकर "नाही!" हा शब्द शिकते. दीड-दोन वर्षांच्या वयात "नाही-नको" हे शब्द वापरून बाळ पालकांना किती प्रभावीरीत्या बेजार करते, त्याची वैयक्तिक आठवण नसली, तरी असा प्रसंग आपणा सर्वांच्या समोर जरूर घडलेला असतो. इतक्या जुन्या ओळखीचा हा "नाही" शब्द आहे, तर त्यामागच्या संकल्पनेशी आपली ओळख अगदी घट्ट असणार, नाही का? आणि खरेच, या शब्दाबद्दल रोजव्यवहारात संदिग्धता फारशी वाटत नाही. इतके की "नाही" म्हटल्यानंतर अपेक्षेवेगळे करणारा मुद्दामून खोटेपणा करत आहे, याबद्दल आपल्याला यत्किंचित शंका वाटत नाही. तरी या शब्दामागली संकल्पना गुंतागुंतीची असू शकेल, सोडवण्यालायक काही संदिग्धता असू शकेल, अशी कुणकुण आपल्याला बाक्या प्रसंगी येते

नकार आणि अभाव संकल्पनांबद्दल विचार

प्रास्ताविक

बाळ अगदी सुरुवातीला 'आई', 'बाबा' शब्द शिकते, पण त्यानंतर खूपच लवकर "नाही!" हा शब्द शिकते. दीड-दोन वर्षांच्या वयात "नाही-नको" हे शब्द वापरून बाळ पालकांना किती प्रभावीरीत्या बेजार करते, त्याची वैयक्तिक आठवण नसली, तरी असा प्रसंग आपणा सर्वांच्या समोर जरूर घडलेला असतो. इतक्या जुन्या ओळखीचा हा "नाही" शब्द आहे, तर त्यामागच्या संकल्पनेशी आपली ओळख अगदी घट्ट असणार, नाही का? आणि खरेच, या शब्दाबद्दल रोजव्यवहारात संदिग्धता फारशी वाटत नाही. इतके की "नाही" म्हटल्यानंतर अपेक्षेवेगळे करणारा मुद्दामून खोटेपणा करत आहे, याबद्दल आपल्याला यत्किंचित शंका वाटत नाही. तरी या शब्दामागली संकल्पना गुंतागुंतीची असू शकेल, सोडवण्यालायक काही संदिग्धता असू शकेल, अशी कुणकुण आपल्याला बाक्या प्रसंगी येते. उदाहरणार्थ :

ती : "नाही, माझे तुझ्यावर प्रेम नाही!"
तो : "मग कोणावर प्रेम आहे?"

'त्या'चा प्रश्न अभावितपणे येतो - पण तिने तर दुसर्‍या कोणाबद्दल उल्लेखही केलेला नाही! तरी "नाही"मध्ये दुसरा कोणी प्रेमी आहे, हा अर्थ त्याला स्पष्ट जाणवतो. ती मात्र त्रासून म्हणते, असा कुठला अर्थ मुळीच नाही...

असे भावुक प्रसंग सोडा. अगदी कोरडा उल्लेख बघू -

"त्याच्या शाळेमध्ये संस्कृत हा विषय ऐच्छिक म्हणून निवडता येतो."

हे अगदी साधे वाक्य वाटते - काहीच संदिग्ध नाही. पण त्यानंतर वाक्य जोडले :-

"तिच्या शाळेमध्ये मात्र असे नाही."

तर यातून दोन अतिशय वेगळे अर्थ निघू शकतात -

१. "तिच्या शाळेमध्ये संस्कृत विषय शिकणे सक्तीचे आहे."

२. "तिच्या शाळेत इच्छा असून संस्कृत शिकता येत नाही."

आपल्याला असे दिसते की की "न"काराचा अर्थ आधी वाटावा इतका स्पष्ट नाही. वरकरणी कोरड्या तात्त्विक चर्चेखाली भावुकता असली म्हणजे कधीकधी मोठाच अनर्थ होतो - "सश्रद्ध नाही" म्हणजे "अश्रद्ध" की "अंधश्रद्ध"? पैकी कुठलाही शब्द वापरला तर संवादकांमध्ये अर्थाचा बेबनाव असू शकतो, पण अर्थ स्पष्ट असल्याचा आभास झाल्यामुळे विवाद वांझ, निष्फळ होऊ शकतो.

आपण या समस्येचा दोन अंगांनी विचार करूया : (अ) अर्थाच्या या वैविध्याबद्दल काही भाषिक निर्देश आपल्याला मिळतात का? (आ) भाषिकच नव्हे, पण तथ्याबद्दल विचार करता नकाराचे वेगवेगळे वस्तुनिष्ठ संदर्भ असू शकतात का?

(अ) भाषिक विचार

ही गुंतागुंत सोडवण्याबाबत संस्कृत वैयाकरणांचे विवेचन मूलगामी आहे. पैकी नागेशभट्ट काळे या संस्कृत पंडिताच्या "परमलघुमंजूषा" ग्रंथामधील काही ठळक मुद्दे बघूया.

नागेशाने प्राचीन वैयाकरण भर्तृहरीच्या वाक्यपदीयातली एक कारिका उद्धृत केलेली आहे -
"सारखेपणा, अभाव, वेगळेपणा, कमी प्रमाण, निंदा आणि विरोध हे नकाराचे सहा अर्थ होत."
त्याची उदाहरणे अशी :

१. साम्य : पोलीस खात्यात "बिनतारी विभाग" आहे, त्याचे "तार विभागा"शी [संदेशवहनाच्या बाबतीत] साम्य आहे, पण तो तार विभाग नाही, असा अर्थ कळतो. तारविभागाशी कसलेच साम्य नसलेला वेगळा कुठलाही विभाग - उदाहरणार्थ वाहतूक नियंत्रण विभाग वगैरे - कळून येत नाही.

२. अभाव : अभावाचे दोन प्रकार नकाराने कळतात :
२अ. अत्यंताभाव : "घरात बाईमाणूस नाही" म्हणजे बाईमाणूस घरात केवळ आणि पुरते नसणे.
२आ. अन्योन्याभाव : "बाई म्हणजे बुवा नाही" - बाई आणि बुवा यांच्यात एकामेकांशी "तादात्म्या"चा अभाव आहे. व्यक्ती बाई असली तर बुवा नाही, आणि बुवा असला तर बाई नाही. मात्र कोणी बाईच नाही, किंवा कोणी बुवाच नाही, असा काही अर्थ नसतो. हे अत्यंताभावापेक्षा वेगळे आहे.

३. वेगळेपणा : "मनुष्य नसलेला प्राणी" म्हटले तर मनुष्यापासून वेगळेपणा कळतो.

४. कमी प्रमाण : "नायकिणीला कंबरच नाही", येथे नायकिणीची कंबर अतिशय लहान असल्याचे सूचित होते.

५. निंदा : पुरुषाला उद्देशून "नामर्द" म्हटले तर निंदा कळून येते.

६. विरोध : "अधर्म" शब्दामध्ये "धर्माचा विरोध" असा अर्थ कळतो.

वरीलपैकी अनेक अर्थ लाक्षणिक आहेत. संदर्भ बघितल्यावरच लाक्षणिक अर्थ समजून येतात. "संदर्भ" हा प्रकार इतका वैविध्यपूर्ण आहे, की "इतक्या प्रकारचे वैविध्य असते" असे म्हणण्यापलीकडे विश्लेषण दुरापास्त आहे. आपण थेट असलेल्या वाच्यार्थाकडे लक्ष केंद्रित करूया.

थेट-अर्थप्रक्रियेत म्हणावे तर दोनच प्रकार विश्लेषणायोग्य आहेत. नागेश म्हणतो : "नञ् [संस्कृतातला नकारार्थी शब्द] दोन प्रकारचा असतो. पर्युदास (वेगळेपणा) आणि प्रसज्यप्रतिषेध (निषेध)." नागेशाच्या ग्रंथावरील टिप्पणीत श्री. वा. बा. भागवत यांनी उदाहरणे दिलेली आहेत : पर्युदास - "अमांसं भक्षयेत् ।=निरामिष खावे", येथे मांसावेगळे काहीतरी खायचा अनुरोध आहे. उलटपक्षी प्रसज्यप्रतिषेध - "मांसं न भक्षयेत् ।"="मांस खाऊ नये" मध्ये केवळ काय खाऊ नये त्याबद्दल प्रतिषेध सांगितलेला आहे.

नागेशाने हे दोन अर्थ वेगळे काढले आहेत, कारण याचे पदाच्या अर्थान्वयाच्या दृष्टीने विश्लेषण होऊ शकते.

"पर्युदास-वेगळेपणा"त नकाराचा अन्वय नामाशी लावायचा असतो. उदाहरणार्थ : समोरच्या जेवणामध्ये शोधण्यापुरती भारतीयत्वाची कल्पना करून, मग त्यापेक्षा वेगळे म्हणून तात्पुरत्या कल्पनेचा निषेध करायचा. "ते भारतीय जेवण नव्हते" म्हटले तर भारतीयावेगळे (परदेशी) जेवण होते, असे कळते.

"प्रसज्यप्रतिषेध-निषेधा"त नकाराचा अन्वय क्रियापदाशी असतो. "तेथे भारतीय जेवण मिळाले नाही", म्हटले तर कोणी भारतीय जेवणापेक्षा वेगळे काहीतरी मिळाले असा अर्थ मुळीच कळत नाही. भारतीय जेवण मिळाल्याचा नकार सांगितला होतो, इतकेच.

हल्लीच "भाषा आणि जीवन" मासिकातील संपादकीयामध्ये नीलिमा गुंडी यांनी हा विषय हाताळलेला आहे. संस्कृतात सांगितलेल्या पर्युदासाचे-वेगळेपणाचे सामांतर्य त्यांच्या "विरुद्धार्था"शी दिसते (उदाहरण : ऐच्छिक विरुद्ध सक्तीचे), तर प्रसज्यप्रतिषेधाचे-निषेधाचे सामांतर्य त्यांच्या "अभावार्था"शी दिसते (उदाहरण : ऐच्छिक विरुद्ध अनैच्छिक). "विसंवाद घडला" म्हणजे बोलण्यात संवाद आहे अशी तात्पुरती कल्पना करायची, आणि मग त्याचे खंडन करायचे - "संवादाच्यापेक्षा वेगळा असा वाद घडला" - "कडवट वाद घडला". लक्षात घ्यावे, येथे काहीतरी घडल्याचा नकार नव्हे. उलट काहीतरी घडलेच आहे. नकाराने नामाचा अर्थ बदलतो, म्हणून नकार हे नामविशेषण आहे. "असंवाद घडला" मध्ये मात्र "संवाद नाही घडला" असा अर्थ कळतो. येथे नकाराचा अर्थान्वय वाक्यातील क्रियापदाशी होतो. काही घडल्याचा नकार आहे. नामाचा अर्थ मात्र जसाच्या तसा आहे. येथे नकार [अर्थप्रक्रियेमध्ये] क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण असूनही नामाशी समास होऊ शकतो, हे नञ्-समासाचे वैचित्र्य आहे.

नीलिमा गुंडी यांचे संपादकीय पुढे सांगते की अर्थवलयांच्या धूसरतेमुळे तात्त्विक पेच निर्माण होतात. त्या पेचांमधून निर्माण होणार्‍या विसंवादांची उदाहरणे संपादकीयात दिलेली आहेत - "सश्रद्ध/अश्रद्ध/अंधश्रद्ध", वगैरे. तरी, काही प्रमाणात ही अर्थसंदिग्धता व्याकरणाच्या क्षेत्रातून घालवण्यासारखी आहे. किमानपक्षी अर्थसंदिग्धतेचे मूळ ज्या अन्वयसंदिग्धतेमध्ये आहे (नकाराचा अर्थान्वय नामाशी की क्रियापदाशी) त्यावर व्याकरणाच्या अभ्यासातून प्रकाश पडू शकतो. पुष्कळदा अन्वयाची संदिग्धता वाक्याच्या हेलावरून किंवा बलवितरणावरून पुरती नाहीशी होते. तशा परिस्थितीत अर्थाची संदिग्धताही लेखन-वाचनातील "दृष्टिभ्रम" म्हणून कळून येते. बोलण्या-ऐकण्यात कदाचित ’अश्रद्ध आणि अ’श्रद्ध या बलवितरणांत प्रसज्यप्रतिषेध आणि पर्युदास कळून येत असावा - याबाबत सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

(आ) तात्त्विक विचार

वर व्याकरणाच्या दृष्टीने विचार केलेला आहे, यात भाषिक माध्यमातून जमेल तितके असंदिग्ध अर्थ मिळवण्याचा हेतू असतो. "नाही" किंवा "अभाव" यांच्याबद्दल तथ्य काय याबद्दल तत्त्वज्ञ विचार करतात का? प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानापैकी नैयायिकांचा विचार येथे थोडक्यात जाता-जाता देतो. पर्युदासासारखा "अन्योन्याभाव" आणि प्रसज्यप्रतिषेधासारखा "संसर्गाभाव" नैयायिकांनी सांगितलेला आहे. अन्योन्याभावाचे विश्लेषण वर सांगितल्यासारखेच आहे. मात्र संसर्गाभावाचे अधिक विश्लेषण केलेले आहे. "संसर्गाभाव" हा कुठल्यातरी संदर्भात असतो, मोकळा नसतो; ही जाणीव नैयायिकांना झाली. "घरात बाईमाणूस नाही" या वाक्याबद्दल व्याकरणाच्या भाषिक मर्यादेत "बाईमाणूस नाही, वेगळे काही नाही" इतके विश्लेषण झाले म्हणजे पुरते. भाषेच्या नियमनातून आणखी काही मिळत नाही. पण नैयायिकांनी हेरले, की "घरात" हा संदर्भ असल्याशिवाय या वाक्याला काही अर्थ नाही. अशा अभावाला "केवळ आणि पुरता" अभाव इतके म्हणून सोडता येत नाही. दिलेल्या संदर्भात वस्तू निर्माण होण्यापूर्वी वस्तूचा "प्राग्-अभाव" असतो, त्या संदर्भात वस्तू नष्ट झाली की तिचा "ध्वंस-अभाव" असतो. दिलेल्या संदर्भात वस्तू कधी उपलब्धच नसली, तर त्या संदर्भात वस्तूचा "अत्यंत-अभाव" असतो.

अत्यंत अभावासाठी सुद्धा संदर्भ लागतो, हे समजल्यामुळे नैयायिकांनी, विशेषतः नव्य-नैयायिकांनी "अमुक वस्तू कुठल्याही हालतीत नाहीच" या प्रकारचे भाकड वाद बाद केलेत, यात त्यांच्या बुद्धिमत्तेची मोठी झेप दिसते.

सारांश : "नाही" ही कल्पना रोजव्यवहारात पुष्कळदा असंदिग्ध वाटते. पण पुष्कळ विसंवादांच्या मुळाशी या संकल्पनेमधील संदिग्धता असते. भाषिक विश्लेषणाद्वारे यापैकी काही प्रयोग संदिग्ध नाहीतच असे आपण जाणू शकतो - "नाही" शब्दाचा अन्वय क्रियापदाशी लागतो की नामाशी, यावरून बरेचदा अर्थ स्पष्ट होतो. मात्र भाषिक स्तरापेक्षाही मूलगामी तत्त्वज्ञानात जाता आपल्याला जाणवते, की "नाही/अभाव" ही संकल्पना वैश्विक नसून संदर्भसिद्धच आहे. भाषिक गैरसमज-शब्दच्छलापेक्षा खोल असलेल्या काही अयोग्य शंका-संदेहांचे या जाणिवेमधून निरसन होते.

- - -
संदर्भसूची :
१. परमलघुमंजूषा (भाषेच्या स्वरूपाची तात्त्विक भूमिका मांडणारा नागेशभट्ट-लिखित ग्रंथ): भाग पहिला (मूळ व मराठी अनुवाद) व भाग दुसरा (प्रकरणशः परिचय व स्पष्टीकरणात्मक टीका) अनुवादक आणि टिप्पणीकार : वा. बा. भागवत, व्याकरणपारंगत. परामर्श प्रकाशनमाला, पुष्प चवथे, पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग, पुणे.
२. नीलिमा गुंडी यांचे संपादकीय, भाषा आणि जीवन २.३, हिवाळा २०१०
३. डी. एच्. एच्. इंगल्स. मटेरियल्स फॊर द स्टडी ऑफ नव्य-न्याय लॉजिक. प्रकाशक - मोतीलाल बनारसीदास, नवी दिल्ली. प्रथम प्रकाशन १९५१, पुनर्मुद्रण १९८८.

- - -
लेखक : धनंजय वैद्य.
लेखक बॉल्टिमोर, मेरीलॅंड, यू.एस्. येथे राहातो. भाषेचा अभ्यास आणि भारतीय दर्शनांबद्दल त्याची विशेष रुची आहे.