कलकत्ता कॅलेडोस्कोप

प्राची देशपांडे

बहुभाषिक वस्तुस्थिती भारताच्या प्रत्येक मोठ्या शहराला लागू आहे - मुंबईसारखे महानगर असो, हैदराबाद सारखे ऐतिहासिक शहर असो, वा अलीकडे स्थलांतराने झपाट्याने बदलत जाणारी पुणे-बंगलोर ही शहरे असोत. भारतीय शहरी जीवन म्हणजेच एका दृष्टीने बहुभाषिक जीवन. असे असले तरी, प्रत्येक शहरातील भाषिक देवाण-घेवाण निराळी असते. त्या शहराच्या विशिष्ट इतिहासातून निर्माण झालेली, स्थिरावलेली, भाषिक वर्णसंस्था असते; आचार-विचार आणि वाद असतात. वर या विशिष्ट बहुभाषिकतेची ओळखही प्रत्येक व्यक्तीला सारखीच होते असे नाही - प्रसंगी चटकन सुचलेल्या आणि जिभेवर उमटलेल्या शब्दांवरही ती अवलंबून असते.

 
भाग १

कलकत्त्यातले आमचे घरमालक श्री. नागभूषणम्. बरीच वर्षे इथे नोकरी करून ते मायदेशी तमिळनाडूला परतले. घर दाखवण्याची, बोलण्यांची मध्यस्थी त्यांचे साडू श्री रायबर्धन यांनी केली. ते आमच्या वरच्याच फ्लॅटमध्ये राहतात. रायबर्धन बाबूंना प्रथम पाहिल्यावर त्यांचेही नाव वेंकटेसन वा वरदराजन असेच काहीतरी असले पाहिजे असे वाटले, कारण त्यांच्या इंग्रजीत थोडीशी दाक्षिणात्य छटा मला लगेच जाणवली. त्यांच्या पत्नी मूळच्या तमिळ; कलकत्त्यात लग्नानंतर आलेल्या, म्हणून त्यांचे बंगाली तामिळ चालीचे होतेच, पण तमिळ वळण ह्यांच्या बंगालीलाही बाईंनी लावलेलं होतं. चहा घेता घेता रायबर्धन बाबूंनी आमच्या नोकरी-शिक्षणाची चौकशी केली, तर त्यांच्या पत्नींनी घर-परिवाराबद्दल विचारले. विचारले म्हणजे काय, चांगली भाषिक परीक्षाच घेतली. माझे आई-वडील कर्नाटकातले, माझे जन्म-शिक्षण महाराष्ट्रात झालेले, नोकरी दिल्लीत, आणि नवरा बंगाली! - कानडी, मराठी, हिंदी व बंगाली या चारी भाषांमधून अगदी सैनिकी थाटात झटपट प्रश्न करून त्यांनी चार-चार वाक्ये माझ्याकडून म्हणवून घेतली. मी आश्चर्यचकित होऊन चहाच्या घोटांमागे लपत-लपत उत्तरे दिली. नवर्‍याचं मराठी अजूनही कच्चंच, हे पाहिल्यावर त्यांनी क्षणभर त्याच्यावर डोळे वटारले, आणि आमची चाचणी आटपली. बंगलोर आणि नागपूर येथे बरीच वर्षे राहिल्याने त्यांना कानडी, मराठी आणि हिंदी या भाषा येतात; व शहरातल्या सर्व दाक्षिणात्य सभा-संमेलनांत त्या पुढाकार घेतात हे मग आम्हाला कळलं. एकूण आमची पसंती झाली, आणि चाव्या हातात आल्या.

मी कलकत्त्यात स्थायिक होणार हे ऐकल्यावर दिल्लीतल्या माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींनी नाकं मुरडली. "कित्ती कित्ती बंगाली लोक! वर सतत बंगालीत बोलणार! आमची संस्कृती, आमची भाषा, आमचे साहित्य हे किती श्रेष्ठ आहे हे सदा ऐकवणार! वर मिनिटा-मिनिटाला ते रवींद्रसंगीताचं रडगाणं! बंद, बस जाळणे, आणि घाण ही तर कलकत्त्याची जगजाहीर ठळक लक्षणे, पण दैनंदिन जीवनात हा कॉस्मोपॉलिटनिझमचा अभाव म्हणजे फारच त्रास! हिंदीचेही वांधे, त्यामुळे थोडेसे बंगाली शिकावेच लागते, आणि इंग्रजी येत असूनही उच्चभ्रू वर्ग मुद्दामून बंगालीतच बोलणार - इतरांना परकं करण्यासाठी, दुसरं काय?"

ही वाक्ये एखाद्या नाट्यसंगीताच्या कंटाळवाण्या, निरनिराळ्या आकारांत गिरविलेल्या बोलतानांसारखी मी पुनःपुन्हा ऐकली. 'इंडियन' दृष्टिकोनातून तयार झालेल्या, भारतातल्या वेगवेगळ्या भाषिक/प्रांतिक समाजांच्या व्यंगचित्रांत बंगालीबाबूंचे असेच चित्रण आहे. याच दृष्टिकोनातून तयार झालेल्या 'इंग्रजी-हिंदी-प्रांतिक भाषा' या भाषिक वर्णसंस्थेलाही ह्या तक्रारी लागू आहेत. पण कलकत्त्यात आल्यावर हे बंगाली शहर बंगाली असूनही खरोखर किती बहुभाषिक आहे, हे मला उलगडत चाललंय. कॉस्मोपॉलिटनिझम म्हणजे नक्की काय, याचाच हे शहर आपल्याला फेरविचार करायला लावते.

तसे म्हणाल तर ही बहुभाषिक वस्तुस्थिती भारताच्या प्रत्येक मोठ्या शहराला लागू आहे - मुंबईसारखे महानगर असो, हैदराबाद सारखे ऐतिहासिक शहर असो, वा अलीकडे स्थलांतराने झपाट्याने बदलत जाणारी पुणे-बंगलोर ही शहरे असोत. भारतीय शहरी जीवन म्हणजेच एका दृष्टीने बहुभाषिक जीवन. असे असले तरी, प्रत्येक शहरातील भाषिक देवाण-घेवाण निराळी असते. त्या शहराच्या विशिष्ट इतिहासातून निर्माण झालेली, स्थिरावलेली, भाषिक वर्णसंस्था असते; आचार-विचार आणि वाद असतात. वर या विशिष्ट बहुभाषिकतेची ओळखही प्रत्येक व्यक्तीला सारखीच होते असे नाही - प्रसंगी चटकन सुचलेल्या आणि जिभेवर उमटलेल्या शब्दांवरही ती अवलंबून असते. कॅलेडोस्कोपसारखी ती बदलतही राह्ते. म्हणूनच बंगाली-बाबूंच्या व्यंगचित्रापलीकडे कलकत्त्याचा बहुभाषिक पसारा निरखून पाहण्यासारखा आहे. अर्थात, हा मला उमजलेला कॅलेडोस्कोप आहे.

आमचा परिसर लेक मार्केट. गेले सत्तर-एक वर्षे 'मद्रासी पाड़ा' म्हणुन प्रसिद्ध आहे. १९४७ च्या आधी व नंतर सरकारी नोकरीसाठी आलेले तमिळ ब्राह्मण आणि काही प्रमाणात कानडी, मलयाळम आणि तेलुगु भाषक मध्यमवर्गीय. 'मद्रासी' हे नाव सगळ्यांना लागू नव्हतं. काही तमिळ लोक बंगलोरहून आले - मिसेस रायबर्धनांसारखेच अनेकांना थोडेफार कानडी येत असे. बरेच तेलुगु लोक मद्रास इलाख्याचे भाषिक प्रांतात परिवर्तन होऊन, मद्रास शहर तमिळनाडूची राजधानी झाल्यावर ते सोडून इथे आले. (अर्थातच थोडी का होईना, तमिळ भाषाही त्यांना येत असे). तमिळ भाषिक चेट्टियार व्यापारी लोक १९४८ नंतर ब्रह्मदेश सोडून मोठ्या प्रमाणात इथे स्थायिक झाले.

"नागभूषणम् महामूर्ख! इतकी वर्षे इथे राहूनही दोन वाक्ये नीट बंगाली बोलायला शिकला नाही!" अशी रायबर्धन बाबूंची तक्रार होती. पण नागभूषणम् यांना अपवादच म्हणायला हरकत नाही. त्या काळात येऊन स्थायिक झालेले बहुतेक लोक अस्खलित बंगाली बोलतात - भाजीवाल्याशी वाद घालताना, ऑफिसमध्ये सरकारी धोरणाला शिव्या देताना अथवा आपल्या शेजार्‍यांशी गप्पा मारताना - कर्नाटकी ढंगात का असेना, इंग्रजीचा आधार घेत घेत का असेना, हे दक्षिणी कलकत्तेकर बंगाली स्वर लावतात. शहरातच वाढलेल्या त्यांच्या मुलांना तर बंगाली येतंच; शाळेत असताना वर्गातल्या चारू या तमिळ मैत्रिणीला बंगाली परीक्षेत सर्वांत जास्त मार्क पडत होते आणि त्यामुळे मला घरी आईकडून नेहमी बोलणी खावी लागत असत, हे माझा नवरा सांगत असे. चंद्रा नावाचा माझा असाच एक तमिळ कलकत्तेकर मित्र आणि मी एकदा न्यू यॉर्क शहरात फूटपाथवरच्या बाकावर बसून बंगालीत गप्पा मारत होतो. समोरून जाणारा एक भारतीय माणूस आमच्या गप्पा ऐकून थांबला आणि आनंदात बंगालीतच म्हणाला, "वा! न्यूयॉर्कमध्ये या बांग्लादेशी लोकांचे विचित्र बंगाली ऐकून मला वीट आला ; तुमच्यासारख्या खर्‍याखुर्‍या कलकत्तेकरांची बंगाली ऐकून किती बरे वाटले! घरची आठवण झाली! तुमचं घर तिथे कुठे आहे?" 'खर्‍याखुर्‍या', 'विचित्र' भाषेबद्दल चर्चा ऐकून चंद्राची उगाच चिडचिड झाली, आणि त्या माणसाला खिजवायला तो "ऍक्च्युअली, आय हेल फ़्रॉम कुंबकोणम् ..." अशी लांबलचक तमिळ घराण्याची कैफ़ियत सांगू लागला. माणूस गडबडून माझ्याकडे वळला. मी खरं ते सांगितलं - मी पुण्याची, नाव देशपांडे. उगीच खोटं बोलतो आहोत, असं वाटून तो तरातरा तेथून निघून गेला. आम्ही खो-खो हसलो. पण चंद्राला 'खरेखुरे' पणाबद्दलचा प्रश्न कुठेतरी बोचला अशी शंका आली - तिथेच जन्म, आणि स्पष्ट भाषा येत असूनही अस्सल कलकत्तेकर असण्यावरून प्रश्न झेलायची त्याला सवय होती की काय, असे वाटले.

 

पुढे: पृष्ठ २