नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास

भाग २

दोन जुळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी एकेकट्याने जावून नाडिग्रंथावलोकन केले होते. त्यांच्या पट्टींमध्ये त्यांच्या जुळेपणाबद्दल उल्लेख येतांना काय प्रकारची शब्दयोजना केली जाते, हे बघूया. त्यापैकी लहान असलेल्या भावंडाच्या वहीमध्ये खालीलप्रमाणे श्लोक येतो:

तमिळ लिपीमध्ये

சித்தார்த்தியிலே கடைதிங்கள் தசமோடொன்று
அறியமதி நாள்தானே ஆதிரைமீனும்
வாதிரைமீனும் மதியாழில் சிகிமால்கலசம்
கலசம்மேல் ரவிமீனில் சுங்கன்வருடை
கூறாத மற்றகோட்கள் வேங்கையில்காணும்

देवनागरी लिपीमध्ये

सित्तार्त्तियिले कडैतिङ्गळ् तसमोडॊऩ्ऱु
अऱियमदि नाळ्दाऩे आदिरैमीऩुम्
वादिरैमीनुम् मदियाळिल् सिहिमालकलसम्
कलसम्मेल् रविमीनिल् सुङ्गऩ्वरुडै
कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्

या व्यक्तीचा जन्म - सिद्धार्थी नामक संवत्सरात (१९७९-८० मध्ये) शेवटच्या (कडै) म्हणजे फाल्गुन महिन्यात, तमिळ पंचांगाप्रमाणे (तसमोडॊऩ्ऱु) ११ व्या तिथिवर सोमवारी (अऱियमदिनाळ्) झाला. पुढे ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्र (वादिरैमीनुम्), चंद्र मिथुनेत, (मदियाळिल्) केतु आणि बुध कुंभेत (सिहिमालकलसम्), कुंभेच्या पुढे मीनेत रवी (कलसम्मेल् रविमीनिल्), शुक्र मेषेत (सुङ्गऩ्वरुडै), न सांगितलेले इतर सारे ग्रह सिंहेत (कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्) - म्हणजे राहु, शनि, गुरु, मंगळ अशाप्रकारची शब्दयोजना आहे. साध्या भाषेत, या व्यक्तीचा जन्म २४ मार्च १९८० चा आहे असा अर्थ निघतो. ह्या व्यक्तीने एकट्याने जावून मुंबईमध्ये जुलै २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले होते. त्याहीपूर्वी तिच्या जुळ्या भावंडाने एकट्याने दिल्लीमध्ये मार्च २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले, त्यातील जन्मविषयक माहिती देणारा श्लोक खालीलप्रमाणे:

तमिळ लिपीमध्ये

யிவளுதிக்க சித்தார்த்தி பங்குனித்திங்கள்
வரும்திகதி யிலாபமதே சோமன்வாரம்
வாதிரைமீனில் மதிதண்டில் சிகிமால்கூனில்
கூனின்மேல் யிரவிமச்சம் சுங்கன்வருடை
கூடியிருக்க மற்றகோள் வேங்கைதன்னில்

देवनागरी लिपीमध्ये

यिवळुदिक्क सित्तार्त्ति पङ्गुऩित्तिङ्गळ्
वरुम्तिगदि यिलाबमदे सोमऩ्वारम्
वादिरैमीऩिल् मदिदण्डिल् सिहिमाल्गूऩिल्
कूऩिऩ्मेल् यिरविमच्चम् सुङ्गऩ्वरुडै
कूडियिरुक्क मऱ्ऱकोळ् वेङ्गैतऩ्ऩिल्

ह्याही व्यक्तीचा जन्म, २४ मार्च १९८० लाच झाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ह्या दोन्हीही व्यक्ती भिन्न असल्या तरी (जुळ्या असल्यामुळे) त्यांच्या श्लोकांतून मांडलेली ग्रहस्थिती एकच होय. सर्वसाधारणत: महाराष्ट्रीय अथवा दाक्षिणात्य पद्धतीने ह्या व्यक्तींची कुंडली मांडली असतां ग्रहस्थिती एकच असल्याने दृक् रूप कुंडली एकसारखीच दिसावी. (चूकभूल देणेघेणे - मी ज्योतिषाभ्यासक नाही!) तर दोन वेगवेगळ्या ह्या पट्टीतील व्यक्तींच्या बाबतीत येणा-या एकाच ग्रहस्थितीबद्दल शब्दयोजना ही भिन्न भिन्न पद्धतीने समोर येते. जन्ममहिन्याच्या बाबतीत एके ठिकाणी ’फाल्गुन’ (पङ्गुनि) असा उल्लेख असून दुसरे ठिकाणी शेवटचा महिना (कडैत्तिङ्गळ्) अशा शब्दरचनेने तोच महिना दर्शवला आहे. त्याचप्रमाणे जन्मतिथीही दोन वेगळ्या शब्दांनी (यिलाबम् तथा तसमोडॊऩ्ऱु; दोन्हीचा अर्थ ११) दर्शविली आहे. पुढे जन्मवारही दोन वेगळ्या शब्दांनी (अऱियमदिनाळ् तथा सोमन्वारम्) दर्शविला गेला आहे.

श्लोकांमध्ये ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्रासाठी दोन्हीही ठिकाणी एकच शब्द उपयोजिला आहे (आदिरैमीऩ). चंद्र मिथुन राशीत असल्याची स्थिती दोन्हीकडे वेगवेगळ्या शब्दांनी दर्शविली आहे (मदिदण्डिल् आणि मदियाळिल्). केतु आणि बुध कुंभ राशीत असे सांगतांना एके ठिकाणी ’सिहिमाल्गूऩिल्’ अशी शब्दयोजना आहे, तर दुसरे ठिकाणी ’सिहिमालकलसम्’ असे म्हटल्या गेले आहे. रवी मीन राशीत म्हणण्यासाठी दोन्हीकडे ’यिरविमच्चम्’ आणि ’रविमीनिल्’ अशी वेगवेगळी शब्दयोजना आहे तर शुक्र मेष राशीत असे सांगण्यासाठी मात्र दोन्हीकडे ’सुङ्गऩ्वरुडै’ असे म्हटले आहे. दोन्ही श्लोकांतील साम्यवैशिष्ट्य ते असे की दोन्ही श्लोकांमध्ये राहु, शनि, गुरु, मंगळ ह्या ग्रहांचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. दोन्हीही व्यक्तींच्या वहीमध्ये हा जातक जुळ्या भावंडांपैकी एक आहे असा उल्लेख नंतरच्या वर्णनातून केला जातो. त्यातही मोठे कोण, लहान कोण इत्यादि उल्लेख बारकाईने नोंदलेला आढळतो. जिच्या वहीमध्ये ’ही धाकटी आहे’ असा उल्लेख आहे, त्या व्यक्तीने स्वत:च्या मातोश्रींस विचारून घेवून खात्री करून घेतल्यानंतर आधीच्या व्यक्तीच्या जन्मानंतर ११ मिनिटांनी आपला जन्म झाला असल्याचे लक्षात आल्याचे कळवले आहे. असो.

माझ्या माहितीतील, राजकीय वर्तुळातील भारदस्त अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या वहीमध्ये खालील श्लोक येतो

तमिळ लिपीमध्ये

இவளாண்டு ஹேவிளம்பி பங்குனியதில்
இருபானார் திகதியுடன் சேயின்வாரம்
ஆவிசாபம் கரிவருமே சேய்மகரம்
மகரமீரதில் சுங்கனும் ரவிசேவில்
மால்ஞானி மேடம் அரவேந்தன்துளை
ஆகபின் சந்திரனும் தேளதுவில்

देवनागरी लिपीमध्ये

इवळाण्डु हेविळम्बि पङ्गुऩियदिल्
इरुबाऩार् तिगदियुडऩ् चेयिऩ्वारम्
आविसाबम् करिवरुमे सेयमहरम्
मगरमीरदिल् सुङ्गऩुम् रविसेविल्
माल्ञाऩि मेडम् अरवेन्दऩ्दुळै
आहपिऩ् सन्दिरऩुम् तेळदुविल्

हेविळम्बि संवत्सर, फाल्गुनमास, २६वी तिथी, मंगळवार, धनुलग्नी शनि, मंगळ मकरेत, शुक्र कुंभेत, रवी मीनेत, बुध+केतु मेषेत, राहू+गुरु तुळेत, चंद्र वृश्चिकेत. साध्या भाषेत ०८ एप्रिल १९५८.

नाडिग्रंथसाहित्यातून खरोखरीच व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद येते काय असे विचारणा-या अभ्यासकांसाठी वरील विवेचनाची झलक प्रेरणादायी ठरावे असे वाटते. गेल्या वर्षभरात सुमार शेकड्याने वह्या आणि ग्रंथपट्ट्या माझ्या नजरेखालून गेल्या असाव्यात, जागाभयास्तव त्या सा-यांतील केवळ ४च श्लोक येथे प्रातिनिधीक म्हणून दिले आहेत. अर्थात, केवळ ४ श्लोकांमध्ये संपणारा हा विषय खचितच नव्हे. खरेतर ह्यामध्ये अजूनही केवढेतरी लिहावयाचे उर्वरित आहे. मूळ मुद्दा मांडावयाचा तो असा, की नाडिग्रंथांमधून जन्मरास आणि लग्नरास "लिहिलेली असते" अथवा "लिहिलेली नसते" असा कोणत्याही प्रकारचा दावा ठोकण्याआधी स्वत:च्या अनुभवावर आधारीत दाव्याची भाषाशास्त्रीयदृष्ट्या खात्री करून घ्यावी. बाजारांत मिळणारी तमिळभाषाशास्त्रविषयक शब्दकोश तथा पुस्तके ह्यासाठी नक्कीच उपयोगांत आणतां येतील.

जातां जातां, फलज्योतिषाभ्यासकांसाठी मजजवळ एक प्रश्न आहे. पारंपारिक पद्धतीने कुंडली मांडतांना जन्मवेळेसह जन्मठिकाणाची आवश्यकता असते असे फलज्योतिषाभ्यासक लिहून ठेवतांत. नाडिग्रंथांवरील माझ्या आतांपर्यंतच्या अभ्यासामध्ये कोणाच्याही नाडिग्रंथपट्टीमध्ये जन्मवेळ आणि जन्मठिकाण नोंदविलेले आढळलेले नाही. असे असूनदेखील ’जन्मविषयक इतर माहिती अत्यंत अचूकरीत्या नोंदविली जाते’ असा दावा नाडिग्रंथप्रेमी आणि नाडिवाचकांकडून केला जातो. हे कसेकाय शक्य होते ह्या विषयावर ज्योतिषशास्त्राभ्यासकांनी विचार करावा, चिकित्सकांनी चिकित्सा करावी. असो.

एकुणात काय, तर पूर्वी म्हटल्याप्रमाणे ह्या विषयातील चमत्कृती आणि दाव्यांस बाजूस ठेवून तीमागील मीमांसा सर्वांगाने अभ्यासिली जाण्यास हवी; जेणेकरून वास्तवाचा अभ्यास होवून सत्यता काय आहे हे आपोआप स्पष्ट होईल. ह्याने अनेक अनुत्तरीत गूढ अशा प्रश्नांची उकलही होईल आणि दाव्यांबाबतच्या सत्यासत्यतेविषयी ठाम निष्कर्षासही येतां येईल.

------

लेखक: हैयो हैयैयो, मुंबई उच्च न्यायालय येथे अभ्यसनक अधिवक्ता म्हणून कार्यरत. न्यायशास्त्राभ्यासक. समाजशास्त्राभ्यासाची आवड. विविध भाषांचे भाषाशास्त्र तथा लिपीशास्त्रावर २० वर्षांहून अधिक काळ अभ्यास. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर मराठी, तमिळ, इंग्रजी इत्यादि भाषांमधून लेखन. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' ह्याही तत्त्वाचा खंदा समर्थक.

संपर्क: haiyohaiyaiyo@gmail.com
------