माझे संगीताचे प्रयोग

आशिष महाबळ

घरी भीमसेन जोशींच्या अभंगांच्या पलिकडे फार काही संगीत नसायचे. तिसरी-चौथीत शाळेतल्या एका बाईंकडे काही दिवस पेटी शिकायला गेलो होतो. मग सातवी-आठवीत असतांना शेजारी रहाणार्‍या एका दादामुळे हिंदी सिनेमातील गाणी ऐकायची सवय लागली. या शिवाय संगीताशी फार काही संबंध तिशीपर्यंत आला नाही. सर्व प्रकारची गाणी ऐकणे सुरु असायचे, पण त्या बद्दल फार काही विचार न करता. शाळेत असतांना चित्रकला जमत नाही म्हणुन सोडलेली, तर संगीत प्रयत्न न करताच सोडलेले. त्यामुळे पॅसॅडेनाला आल्यावर कधीतरी ठरवले की आपणही पहायचे संगीत हा काय प्रकार आहे ते.

मग बाकी विषय ज्या प्रमाणे हाताळतो त्याचप्रमाणे याच्या बाबतीतही केले. वाचणे, ऐकणे आणि विचार करणे. सप्तकांबद्दल माहीत होतेच, आता रागांमधील प्रकारांबद्दल वाचन सुरु झाले. आंतरजालामुळे अनेक मातब्बरांचे पिसेस पण ऐकायला मिळाले. उदा. SAWF वरील संग्रह. त्यातच कॅलटेकला एक गुरु भेटला व स्वत:च्या गळ्याची पट्टी शोधणे सुरु झाले. प्रयत्नांनी सुर योग्य त्या कंपनांकात पकडता येऊ लागले. पण लवकरच गुरुचा थेसीस झाल्यामुळे गुरुने पलायन केले (माझ्यामुळे त्याने घाई केली नसावी अशी आशा आहे) व परत एकट्याने मार्ग क्रमणे सुरु झाले. अर्थात मिळेल त्याला पकडून प्रश्न विचारणे सुरूच असायचे.

प्रश्न कधीकधी जरा जास्तच मूलभूत असायचे. उदा. मुख्य सूर फक्त १२ का असतात? कर्नाटक आणि हिंदुस्थानी हे दोन्ही जरी भारतीय शास्त्रीय संगीताचेच प्रकार असले तरी लोक त्यावर विभागलेले का असतात? पाश्चात्य आणि पौर्वात्य संगीतात नेमके फरक कोणते? भांगडा व जाझ या दोहोपेक्षा वेगळे कसे? वेगवेगळे राग दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांशी संबंधीत असतात म्हणजे नेमके काय? आणि मुख्य म्हणजे संगीत आपल्याला का भावते? फार समाधानकारक उत्तरे काही मिळत नसल्याने माझा शोध सुरुच होता.

हळुहळु काही उत्तरे मिळणे सुरु झाले. पाश्चिमात्य (शास्त्रीय) संगीत जसे लिहिले गेले असते तसेच सादर करायचे असते, तर हिंदुस्थानी संगीतातील लयकारी ही ठरावीक नियम मानून बर्‍यापैकी मुक्त असते. पाश्चिमात्य संगीतात सप्तकातील स्वरांचे कंपनांक ठरलेले असतात, तर भारतीय संगीतात गायकाप्रमाणे पट्टी ठरते. साधारण दोन हजार वर्षांपूर्वीच्या भरताच्या नाट्यशास्त्रात २२ मायक्रोटोन्स वापरलेले आहेत व त्यावर श्रुती (व जाती) आधारीत असतात (पण यांच्या नेमक्या सापेक्ष जागांबद्दल अजुनही पुर्ण माहिती नाही). तेराव्या शतकातील शारंगदेवाच्या संगीतरत्नाकरानंतर कर्नाटक व हिंदुस्थानी संगीतांची फारकत झाली असावी.

हिंदुस्थानी व पाश्चात्य संगीत प्रकारांमध्ये प्रयोग करणार्‍यांबद्दलही ज्ञान झाले. किशोरी आमोणकर यांचे संगीत सरस असुनही त्यांच्या प्रयोगांमुळे काही purists ना ते आवडत नाही. सिंफनीचा जनक, हायडन, याने तर अनेक पिसेस मध्ये हसू येईल (हास्यास्पद नव्हे) असे स्वरमेळ (कॉर्ड्स) वापरले आहेत. दब्युसीने देखील जुने नियम मोडून नवीन संरचना बनवायला मदत केली. भारतीय संगीतात जशी कलाकाराला बदल करायची मोकळीक असते तशीच, किंबहुना त्याही पेक्षा जास्त, नवीन प्रकार वापरायची मुभा जाझ मध्ये देखील असते.

गळ्याची फारशी साथ नसल्याने संगणकीय कौशल्य वापरून MIDI नामक प्रणाली मध्ये रागदारी सुरु केली. एक राग घ्यायचा, त्याचे स्वर, आरोह, अवरोह, वादी, संवादी घ्यायचे, melodic string निवडायची व आलापाचे ढोबळ नियम वापरून २-३ मिनीटांचे मुखडे/तुकडे बनवायचे. त्यात beat व तानपुर्याच्या 'सा' पण मिसळला. अतिशय साधे व खूप खोलात न शिरता केलेले हे गणित होते. एखाद्या रागातील एखादा स्वर थोडा बदलला तर तो कानांना कर्कश्य कसा वाटतो हे देखिल जाणवले.

हे सर्व होताहोता असे लक्षात येऊ लागले की संगीत ही एक formal system आहे. आपण एका 'प्रकारात' आपल्या मेंदुला शिकवले की तो तीच अपेक्षा करु लागतो. चांगल्या शास्त्रीय कलाकारांची तपश्चर्या जबरदस्त असते. बरोबर त्याच ratios मध्ये अर्धा-पाऊण तास स्वरयंत्राचा वापर करता येण्याकरता अमाप कंट्रोलची आवश्यकता असते. इतका वेळ एका स्ट्रक्चर मध्ये राहुन ऐकणार्‍यांच्या कानांना चांगले वाटेल असे जमविणे कठीणच. ढोबळमानाने बोलायचे झाल्यास कानांना लागोपाठचे दोन सुर मधुर वाटण्याकरिता त्यांच्या कंपनांकांचा ratio १:२, २:३, २:५ याप्रकारे दोन पुर्णांकांशी संबंधीत असावा लागतो. सप्तकात सातच मुख्य सुर जरी असले (सा, रे, ग, म, प, ध, नी) तरी वेगवेगळ्या रागांमध्ये योग्य ratios मिळवणे गमक/श्रुती/मींड/आंदोलन या प्रकारांनी साध्य होते. यात केवळ कोमल (रे, ग, ध, नी) व तीव्र (म) स्वरांचीच भर पडत नाही, तर रागाप्रमाणे, व रागांमधील सुरांच्या आवश्यकतेप्रमाणे सूक्ष्म बदल आवश्यक असतात.

सध्या मी केवळ पाश्चात्य सुर वापरले आहेत. यात एका सप्तकाला वर दिलेल्या१२ सुरांमध्ये अशा प्रकारे विभागण्यात येते की कोणत्याही सुराच्या कंपनांकाला त्याच्या आधीच्या सुराच्या कंपनांकाने भाग दिल्यास एकच उत्तर मिळते: १.०५९४६३. यामुळे पुर्णांक ratios च्या जवळ पोचता येते पण किंचीत फरक असतो (उदा. प/सा १.५ ऐवजी १.४९८ असतो). म्हणजेच नैसर्गीक पट्टी ऐवजी tempered/chromatic पट्टी वापरली असते. त्यामुळे 'खर्‍या' भारतीय संगीतासारखे संगीत संगणकाद्वारे बनवायला पाश्चात्य पट्टी उपयोगाची नाही, पण त्याचवेळी संगणकाला हवे ते कंपनांक निर्माण करायला सांगणे सोपे असते. काही वेगळ्या प्रयत्नांकरता पुढील दुवे पहा९,१०.

त्याचबरोबर हे ही जाणवले की या संगीत पद्धती बर्‍यापैकी धर्माप्रमाणेच असतात. तुम्ही ज्या पद्धतीचे असाल तीच तुम्हाला साधारणत: जास्त चांगली वाटते. काहींना संगीतात वाटत असलेला अनुक्रम (hierarchy) तर मुळीच पटण्यासारखा नाही. संगीत अनेक मितींचे व पैलूंचे असु शकते. त्यामुळे एक संगीत दुसर्‍या पेक्षा श्रेष्ठ असु शकत नाही. प्रत्येक प्रकाराचे चांगले तसेच वाईट सादरीकरण होऊ शकते. ज्यांचे कंडीशनींग झाले नसते (किंवा सांप्रदायातील दीक्षा म्हणूया) त्यांना माझ्या प्रोग्राम्सनी रचलेले संगीत सुद्धा आवडते (वाटल्यास "खटकत नाही" असे म्हणूया). जसे तुम्ही खोलात शिरता तसे जास्त टेक्नीकल होता. त्यामुळे तुम्हाला जास्त निर्भेळ आनंद मिळेल, पण बहुतांश लोकांना त्याची आवश्यकता नसते. माझ्या मते रागांचा दिवसाच्या वेळांशी असलेला तथाकथित संबंध देखील कंडीशनींग मुळेच असतो. 'क्ष' सूर असलेल्या रागातील सुरांच्या ratios ची संख्या (क्ष-१) + (क्ष-२) + .. + १ इतकी असु शकते (रागातील सुरांच्या सर्व जोड्या वापरल्या जात नसल्याने या पेक्षा प्रत्यक्षात कमी आढळतात). ५ सुरांच्या रागाकरिता ही संख्या १० आहे, तर ७ सुरांकरिता २१. त्यामुळे १-२ सुरांच्या इतर सुरांशी असलेल्या ratios मुळे वेगवेगळ्या वेळी वेगळा प्रभाव पडायची शक्यता नगण्य. अर्थात यात ताल, रस, प्रादेशिक प्रभावांचा विचार केलेला नाही. हिंदुस्थानी आधी न ऐकलेले पाश्चात्य संगीतदर्दी कदाचीत विविध राग ऐकून याला दुजोरा देऊ शकतील.

संगीत ऐकणे अजुनही सुरूच आहे, सर्व प्रकारचे. व ते सुरुही राहील. चांगले acoustics सोडता, live पेक्षा recorded संगीत ऐकणे जास्त पसंद करतो. केवळ वातावरणामुळे असलेला प्रभाव गेल्यामुळे निखळ संगीताचा अमूर्त आनंद लुटता येतो. अधुनमधून संगणकीय programs कडे परत जायची इच्छा होते. ते ही होईल कधीतरी ...

-आशिष महाबळ
---------------------------------------------------------------
१. http://www.sawf.org/music/articles.asp
२. http://raganet.com/Issues/1/research.html
३. http://en.wikipedia.org/wiki/Sangita_Ratnakara
४. http://www.classicalarchives.com/composer/2679.html
५. http://www.essentialsofmusic.com/composer/debussy.html
६. http://en.wikipedia.org/wiki/Musical_Instrument_Digital_Interface
७. http://www.astro.caltech.edu/~aam/music/midis/index.html
८. http://www.astro.caltech.edu/~aam/music/test/index.html
९. http://www.it.iitb.ac.in/~hvs/ISS.html
१०. http://www.tcs.tifr.res.in/~pandya/music/surtal/surtal.html

लेखक एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे सर्व शिक्षण महाराष्ट्रात झाले. गेले तप महाराष्ट्राबाहेर आहेत, त्यातील ११ वर्षे पॅसॅडेना, कॅलीफोर्नीया येथे.