आयसीसीएस - सांस्कृतिक समन्वय साधणार्या संस्थेचा परीचय
जगातील विविध खंडात पसरलेल्या आणि आजही जागृतावस्थेत असलेल्या प्राचीन सांस्कृतिक जगताला एकत्र आणण्याच्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ही ओळख आहे.
अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेला आणि अमेरिकेमुळे जगाला जागतीक राजकीय घडामोडींचे विपरीत परीणाम दिसून आले. संस्कृती, जीवनपद्धती इत्यादी जर परस्परविरोधी अथवा राजकीय दृष्ट्या विरुद्ध असले, तर असेच घडणार असे एक सरळ त्रैराशीक यातून सर्वत्र वापरले जाऊ लागले. हार्वर्ड विद्यापिठातील सॅम्युअल पी हंटीग्टन यांचे १९९२ सालचे Clashes of Civilization हे पुस्तक २००१ च्या हल्ल्यानंतर खूपच गाजू लागले. हंटीग्टन यांच्या पाश्चिमात्य दृष्टिकोनातून आणि त्याला अनुसरून अभ्यासातून त्यांचे म्हणणे होते/आहे:
"The great divisions among humankind and the dominating source of conflict will be cultural. Nation states will remain the most powerful actors in world affairs, but the principal conflicts of global politics will occur between nations and groups of different civilizations."
थोडक्यात पुढे त्यांना अटळ वाटणारा संघर्ष हा आर्थिक घडामोडीमुळे असला तरी प्रामुख्याने तो सांस्कृतिक फरकामुळे असेल. वरकरणी आणि आत्ता जे काही दहशतवादाचे सावट पसरलेले आहे, ते पहाता ते खरे देखील वाटेल. मात्र "सांस्कृतिक भेद", हा केवळ एक दृष्टीकोन असू शकतो. याच्या विरुद्ध वाटेल असा समन्वयवादी दृष्टीकोन ठेवणे पण सहजशक्य आहे. हंटीग्टन साहेबांना हे पुस्तक हार्वर्डच्या आवारात १९९२ साली सुचले आणि त्याच सुमारास डॉ. यशवंत पाठक ह्यांना अफ्रिकेत अफ्रिकन परंपरांवरील पुस्तके वाचत असताना प्राचीन संस्कृतींमधील भेदांपेक्षा साम्ये आढळली. बघता बघता यात माहीती करण्याचा जास्त रस येऊ लागला आणि स्वतःपुरताच मर्यादीत न रहाता तो इतरांमधेही वाढू लागला. त्याचे सुपर्यवसन हे १९९५ मधे International Center for Cultural Studies (आयसीसीएस) अशी संस्था स्थापण्यात झाली.
गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत आयसीसीएस ने केलेले कार्य हे केवळ त्या संस्थेचे कार्य म्हणून सांगण्याचा उद्देश नसून त्यातून निघणार्या समन्वयी भुमिकेमुळे विविध पूर्वापार चालत आलेल्या आणि आजही पाळल्या जात असलेल्या संस्कृती कशा जवळ येऊ शकतात हे यातून बघता येऊ शकते. आयसीसीएस चे उद्दीष्ट नावात म्हणल्याप्रमाणे विविध संस्कृतींचा अभ्यास हे आहे. त्यासाठी तरूण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन अभ्यासास प्रोत्साहन देणे, विविध प्राचीन परंपरांच्या जगभरातील समाजाशी संपर्क साधून माहीती एकत्रीत करणे, विविध संस्कृतींमधील महत्त्वाचे लेखन भाषांतरीत करणे, तसेच तत्त्वज्ञान, धर्म, समाज, वाड्मय, इतिहास, आणि कला यांचा तुलनात्मक अभ्यास अशा काही ठळक गोष्टी सांगता येतील. त्या व्यतिरीक जगभर अमेरिका ते भारत, युरोप ते अफ्रिका, ऑस्ट्रेलीया-न्यूझीलंड अशा अक्षरश: जगाच्या पाठीवरील सर्वत्र पसरलेल्या अनेक संस्कृतींना एकत्र आणून त्यांची संशोधनात्मक अधिवेशने आणि संशोधने प्रकाशीत करण्याचे आगळेवेगळे काम ही संस्था यशस्वीरीत्या आणि सात्यत्याने करत आली आहे. आयसीसीएसच्या संकेतस्थळावर पाहिले असता १५ पुस्तके आणि १३ संशोधनात्मक ग्रंथ (जर्नल्स) आजपर्यंत प्रकाशीत केले गेले आहेत.
आयसीसीएसचे आंतर्राष्ट्रीय संयोजक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पाठकांशी बोलताना समजले की आज एकट्या अफ्रिकेत जवळपास हजार एक परंपरा आहेत, अमेरिकेत नेटीव्ह अमेरिकन्सच्या पाचएकशे, ऑस्ट्रेलीयात पंधरा-वीस, युरोपात अशाच काही शेकड्यामधे आणि भारतासहीत आशियात तर अनेक परंपरा आहेत! संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालाप्रमाणे जगात नव्वद देशांमधे जवळपास ३७ कोटी लोकसंख्या ही प्राचीन परंपरा असलेल्या लोकांची आहे. जगाच्या पाच टक्के लोकसंख्या, पंधरा टक्के दारीद्र्य आणि जगातल्या ७००० भाषांपैकी ४००० भाषा बोलणार्या समाजात मानवतेला महत्व आहे. समोरच्या व्यक्तीचा आदर राखण्याचे संस्कार आहेत आणि एकंदरीतच शांतताप्रिय राहाणीकडे कल आहे, जे आजच्या अधुनिक जगात आपण हरवून बसलो आहोत असे वाटते. आज अशा परंपरांमधील अनेक जण हे अधुनिक समाजात आर्थिक व्यवस्था आणि अधुनिकतेपोटी विलिन होत असले तरी त्यांची मुल्ये सांभाळण्याचा प्रयत्न यशस्वीपणे करत रहातात. आज अशा या जगभर पसरलेल्या वैविध्यपूर्ण समाजांसाठी आयसीसीएस हे असे एक माध्यम आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेल्या संस्थेचे जाळे जवळपास जगभरच्या पंचवीसएक राष्ट्रात आणि सर्व खंडांमधे पसरलेले आहे आणि विविध प्राचीन परंपरेच्या समाजाशी तसेच त्यावर अभ्यास करणार्या विद्वानांना एकत्र आणण्यात त्यांना यश मिळालेले आहे.
आयसीसीएसच्या पुढाकाराने अजून एक महत्वाचे काम चालू झाले आहे ते म्हणजे अरूणाचल प्रदेशात चालू केलेला रिवॉच हा महत्वाकांक्षी प्रकल्प. Research Institute of World’s Ancient Traditions, Cultures and Heritage (RIWATCH). या प्रकल्पाच्या माध्यमाने अरूणाचल प्रदेशातील स्थानीक परंपरांचा तसेच तेथील समाजाचा संपर्क हा इतरत्र असलेल्या संस्कृतींशी आणि अधुनिक जगाशी करणे चालू आहे. हा प्रकल्प हा स्थानिक जनता आणि राज्य शासनात शासकीय अधिकारी असलेले स्थानिक डॉ. जोराम बेगी यांच्या सहाय्याने/पुढाकाराने हा प्रकल्प चालू आहे. अमेरिकेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी या भागात आणणे तसेच येथील विद्यार्थ्यांना अशाच विद्यार्थी आदानप्रदान योजनेखाली अमेरिकेत नेऊन आणणे हा देखील त्यातील भाग आहे. असेच प्रकल्प जगातील इतर ठिकाणी चालू करायचा मनोदय आहे.
थोडक्यात सांकृतीक कलहाऐवजी सांस्कृतिक समन्वयाने जगाला जवळ आणण्याचे हे अवघड काम आहे. यात प्राचीनतेचे अधुनिकतेशी आदानप्रदान आहे. टिकेच्या नजरेतून एकमेकांकडे बघण्याऐवजी एकमेकांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच ज्ञानाचे संकलन घडत आहे जे केवळ त्या संस्कृतिंपुरतेच मर्यादीत नसून सार्या जगाचा ठेवा आहे.