संकीर्ण

बहिणाबाई चौधरींचा अक्षरखेळ

धनंजय वैद्य

खानदेशी अहिराणी बोलीतली अव्वल दर्जाची कवयित्री बहिणाबाई चौधरी - मराठी वाचकाला त्यांची वेगळी ओळख करून द्यायची आवश्यकता नाही - बहिणाबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे शब्दांच्या ध्वनीबद्दल आणि लय-ठेक्याबद्दल तिखट कान. त्यांनी वर्णमालेतील ध्वनींचे मर्म ओळखून, ते गोवून काही मिष्किल ओव्या लिहिल्या आहेत. वर्णांचा उच्चार करताना जिभेचा-तोंडाचा होणारा आकार-विकार लक्षात घेऊन त्यांनी कुटुंबातील काही नात्यांचे वर्णन केलेले आहे, आईच्या बाजूचे नातलग जिव्हाळ्याचे असतात, बापाच्या बाजूचे नातलग मात्र थोड्या दुराव्याचे असतात, असे गंमतशीरपणे सांगितलेले आहे. ते असे :
- - -
माय म्हनता म्हनता
होट होटालागे भिडे
आत्या म्हनता म्हनता
केवढं अंतर पडे
- - -
("म"कार हा ओष्ट्य वर्ण असल्यामुळे ओठ ओठाला भिडतो. "आ"कार विवृत असतो, ओठ दूर उघडे राहातात.)
- - -
ताता म्हनता म्हनता
दातामधी जीभ अडे
काका म्हनता म्हनता
कशी मांघे मांघे दडे
- - -
"त" हे व्यंजन दंत्य आहे, जीभ दाताला आदळते. "क" हे कंठ्य व्यंजन आहे. जिभेचा मागचा भाग ताळूच्या मागच्या भागाला भिडायला जातो.
- - -
जीजी म्हनता म्हनता
झाला जिभले निवारा
सासू म्हनता म्हनता
गेला तोंडातून वारा.
- - -
तालव्य वर्ण "ज" म्हणताना जीभ प्रसरण पावून सपाट होते, तीत तणाव राहात नाही. उष्मवर्ण असलेला "स"कार काहीही नाद न करता धुसफुसतो.
- - -

या ओव्या वाचताना आपल्या लक्षात येते, की कवितेची कला फार श्रवणानुसारी आहे. लेखनानुसारी नाही. निरक्षर असलेल्या बहिणाबाईंनी शब्द तोंडात इतके घोळवले होते, की त्यांना ध्वनी नातेवाइकांसारखे चांगले ओळखीचे होते. साधारणपणे ही ओळख कवी अशी थेट सांगत नाहीत. कारण ती रंजक करून सांगण्याची प्रतिभा कोणाला स्फुरेल? बहिणाबाईंच्या विनोदबुद्धीला ध्वनींबद्दल या गमतीदार कल्पना सुचल्या हे फार छान झाले!

साम्याभास

निखिल जोशी

प्रयोगशाळेतील बेडूक या रूपककथेनुसार कढत पाण्यात बेडूक सोडला तर तो उडी मारून पळण्याचा प्रयत्न करतो पण बेडूक थंड पाण्यात सोडून पाणी हळूहळू तापविले तर मात्र त्याला भिन्नत्वज्ञान होत नाही. ती वस्तुस्थिती आहे की नाही ते मला माहिती नाही परंतु काही संवेदनांच्या बाबतीत मात्र तसे घडते खरे!

या चित्राकडे बारकाईने पाहिले नाही तर त्यात सर्वत्र एकसमान रंग असल्याचा भास होतो. वास्तविक, उजवीकडील बाजूच्या रंगात २५% लाल आणि हिरवे रंगही मिसळलेले आहेत (किंवा २५% निळेपणा काढून पांढरा 'रंग' मिसळला आहे). परंतु, दोन्ही टोके शेजारीशेजारी ठेवली तर मात्र तुलना सोपी जाते:

अशीच अधिक उदाहरणे आणि येथे पहाता येतील.

भिन्नत्वाचे (काँट्रास्ट) ज्ञान होण्याऐवजी साम्यभास कधी होतो?
परिस्थिती अचानक बदलत असेल, तिच्याशी जुळवून घेण्यास वेळ मिळत नसेल तर सजीवसृष्टीची उत्क्रांती घडणार नाही. त्यामुळे, अँथ्रॉपिक तत्त्वानुसार, सभोवतीचे जग हळूहळू बदलणारेच असते. अशा जगात घडणार्‍या बदलांचा आलेख काढला तर समजा असा काही दिसेल:

पण त्यातील बदलांचा (उदा., डेरिवेटिव) आलेख असा काही दिसेल:

उलट, स्टोकॅस्टिक जगात मूळ आलेखासारखाच:

डेरिवेटिवचा आलेखही किचकट असेल:

मूळ परिस्थितीच्या एका क्षणाचे आणि सर्व बदलांचे ज्ञान असेल तर मूळ परिस्थितीचे ज्ञान असल्यासारखेच असते. परंतु, आलेख बघितल्यास असे दिसेल की जेव्हा परिस्थिती बदलत नसते तेव्हा बदलाचे ज्ञान 'शून्य' असते आणि ते 'मिळविण्याची' आवश्यकता नसते. त्यामुळे, हळूहळू बदलणार्‍या परिस्थितीचे ज्ञान मिळविण्यापेक्षा केवळ बदलांचे ज्ञान मिळवून परिस्थितीची जाणीव घेणे सोपे असते.
दुसरा मुद्दा असा की मुळात परिस्थितीची जाणीव घेण्याची आवश्यकता ही बदलत्या परिस्थितीतच असते. कारण, परिस्थिती बदलली असेल तेव्हाच 'वर्तणूक बदलावी काय?' या प्रश्नाचा सजीवांना विचार करावा लागतो. अन्यथा, "परिस्थिती बदललेली नाही म्हणून वागणूक बदलण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता नाही" हा निर्णय दरक्षणी घेण्यात लक्ष द्यावे लागेल. त्यामुळेही, स्थिर परिस्थितीचे ज्ञान घेण्याची आवश्यकता नसते.

शिवाय, कोणत्याही ज्ञानेंद्रियाचे किंवा अधिक सामान्य विचार केल्यास कोणत्याही संवेदकाचे कार्य हे 'फरकाने कार्यान्वित होणे' या तत्त्वावरच चालते. निरपेक्ष मापन असे कधीच नसते. हवेचा दाब मोजण्यासाठी बंद डब्यातील निर्वाताशी तुलना केली जाते, वस्तुमान मोजण्यासाठी तागडीच्या दुसर्‍या पारड्यात प्रमाण वस्तुमान लागते, ताणकाट्याच्या लांबीमध्ये 'बदल' घडतो म्हणून वजन मोजता येते, विद्युतविभवमापन हेही विभवांतरमापनच असते. म्हणजे, कोणत्याही मापनासाठी एक प्रमाण आदर्श लागतो. त्वचेतील स्पर्शेंद्रियांचा विचार करू. स्पर्शेंद्रियांचा आकार स्पर्शामुळे बदलतो तेव्हा स्पर्शाचे ज्ञान होते. परंतु, स्पर्शाचा दाब स्थिर असतो तेव्हा काहीच संदेश पाठविला जात नाही. मापनपदार्थ आणि प्रमाणपदार्थ यांच्यात उतार असतो तेव्हा त्या उतारावर उर्जेचे थोडेसे वहन करवून मापनपदार्थाचे मापन करणे स्वस्त असते. त्यामुळे, बदल नसताना, कमी महत्वाच्या बहुतेक संवेदना दुर्लक्षिल्या जातात. परंतु, वेदनादायी जाणिवांची सतत आठवण करवून देणे बहुतेकदा फायद्याचे ठरते.

साम्यभासाच्या अडचणीवर काय उपाय शोधले जातात? एक सोपा मार्ग म्हणजे तुलनाविषयांना एकत्र मांडणे. उदाहरणार्थ, सारख्याच परिस्थितींमध्ये नायक आणि खलनायक वेगवेगळे वागतात असे दाखविणे. परंतु, एखादी जाणीव सततच होत राहिली तर तिच्याकडे इतरांचे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते (उदा. रोज मरे त्याला कोण रडे? किंवा राजाला दिवाळी माहिती नसते, या म्हणी). त्यामुळे, साम्य नसल्याचे ठसविण्यासाठी व्यतिरेक साधला जातो. नायक खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच सज्जन दाखवावा लागतो. ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्तींना देवत्व देण्याची आवश्यकता भासते, त्यांचे वैगुण्य शोधण्याचे अभ्यासक प्रयत्न किंवा टिंगल यांना प्रखर विरोध केला जातो. फुटकळ गायकांचीही तोंडभरून स्तुती केली जाते. एखादी दंगल खूप वाईट होती असे सांगण्यासाठी "गर्भवतीवर पतीसमोर बलात्कार करण्यात आला आणि तिचे पोट फाडून गर्भाची खांडोळी करून तिला जिवंत जाळले" असे सांगण्याची आवश्यकता वाटते. परंतु, आर्म्स रेस च्या नियमांप्रमाणे काही कालाने अतिशयोक्तिही प्रभावहीन होऊ शकते आणि या सार्‍याची परिणिती संवेदना आणखीनच बोथट होण्यात घडते. संवेदना किती फसव्या असतात त्याची हजारो उदाहरणे जालावर सापडतील. चक्षुर्वै सत्यम् हा ठोकताळाही पुरेसा नाही. म्हणूनच, 'मला वाटते' या सबबीखाली कोणत्याही संवेदनेवर पूर्णपणे विसंबिणे धोक्याचे असू शकते.