संकीर्ण
चॉकोलेशियस
जाई जोशी
चॉकलेट! या तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थाच नावं काढताच चॉकोहोलिक माणसाच्या डोळ्यात चमक दिसते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या थरातील मंडळींनी या पदार्थाची चव चाखली असेलच. माइल्ड चॉकलेट, डार्क चॉकलेट, सुका मेवा असलेल चॉकलेट, फळांचा स्वाद असलेल चॉकलेट, हे आणि अश्या अनेक प्रकारे तयार केलेले चॉकलेट आणि आजकाल तर त्याच्या विविध प्रकाराबरोबर विविध आकारही, मग एखाद्या चॉकलेट न आवडणार्या व्यक्तीलाही त्याचा एखादा तुकडा चाखावा वाटला तर त्यात नवल नाही.
चॉकलेट कोकोच्या बियांपासून तयार होते हे सर्वांनाच माहीत असेल. तर या कोकोच्या बिया ज्या झाडापासून मिळतात त्याला Theobroma cacao (थिओब्रोमा कॅको), असे म्हणतात ज्याला आपण कोको ट्री म्हणून ओळखतो. Cacao आणि cocoa यामधेही एक फरक आहे, cacao (कॅको) हे झाडाला उद्देशून बोलल जात तर cocoa (कोको) हे त्या झाडाच्या बियांपासून मिळणाऱ्या उत्पादनाना ( कोको पावडर आणि कोको बटर) संबोधल जात. या विषुववृत्तीय झाडाचे मूळ मध्य आणि दक्षिण अमेरिकेत सापडते. सातव्या शतकाच्या सुरवातीपासून या झाडांची लागवड माया संस्कृतीत सुरू झाली. ते कोकोच्या बियांचा विनीमयासाठी चलन म्हणून वापर करत. पंधराव्या शतकाच्या दरम्यान ख्रिस्तोफर कोलंबसने या कोको बिया स्पेनला नेल्या. माया आणि ऍझटेक संस्कृतीचे लोक या बियांपासून फेसाळ, कडू पेय तयार करत असत. नव्या काळात शॉकोलाट (xocolātl) या नावाने त्याच प्रकारचे पेय तयार केले जाऊ लागले. या पेयासाठी भाजलेल्या कोकोच्या बिया आणि थंड पाणी वापरले जात असे. याची चवं कडवट असल्यामूळे नव्या काळात याला स्वाद आणण्यासाठी त्यात व्हेनीला, मध, साखर व काही मसाल्यांचा वापर केला जाऊ लागला. कोकोबियांच्या सभोवती असणाऱ्या गराचा उपयोग मादक द्रव्य बनवण्यासाठी केला जात असे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे कोकोच्या बिया पंधराव्या शतकात युरोपमधे पोहचल्या, पण कोकोला युरोपमधे प्रसिद्धी सतराव्या शतकात मिळायला सुरवात झाली. इंग्लंडमधे कोको सतराव्या शतकाच्या मध्याला पोहचले. या काळात पूर्ण युरोपमधे कोकोचे हे पेय लोकप्रिय होऊ लागले. याच काळात चॉकलेट हाऊसेस उघडली जाऊ लागली. सॉलीड चॉकलेट बनवायला १८४७ च्या दरम्यान सुरवात झाली.
चॉकलेटचे प्रकार :
चॉकलेट हे कोको पावडर आणि कोको फॅट यांपासून बनते. कोको पावडर आणि कोको बटर वेगवेगळ्या प्रमाणात वापरून चॉकलेटचे अनेक प्रकार बनतात. तसेच कोको पावडरचा वापर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी, दुधात मिसळून पिण्यासाठीही केला जातो.
डार्क चॉकलेट : याला प्लेन चॉकलेट किंवा ब्लॅक चॉकलेट असेही म्हणतात. ह्या चॉकलेटमधे दूध नसते आणि घातल्यास एकदम कमी प्रमाणात घातले जाते. चॉकलेट जितकं डार्क, जितकं कोकोच प्रमाण जास्त तितकी त्या चॉकलेटची किंमत जास्त. तसेच जेवढे कोकोचे प्रमाण जास्त तितके साखरेचे प्रमाण कमी त्यामूळे चॉकलेटची चवही अधिक कडवट. यामधे मध्यम गोड चॉकलेट, कडू गोड चॉकलेट असे प्रकार मिळतात. डार्क चॉकलेटचा वापर जास्तकरून स्वयंपाकात विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.
मिल्क चॉकलेट : हे चॉकलेट दूध, दूधाची पावडर किंवा कंन्डेन्स्ड मिल्क वापरून बनवल जात.
व्हाईट चॉकलेट : हे चॉकलेट दूधापासून बनवले जाते, ह्यात कोको बटरचा वापर होतो.
आजच्या काळात अर्ध्याहून अधिक कोकोचे उत्पादन दक्षिण आफ्रिकेत होत. कोकोच झाड लहान असतं जे जंगलात वाढतं आणि या झाडासाठी भरपूर पोषक द्रव्यांनी युक्त असणाऱ्या मातीची गरज असते. जगात तीन प्रकारच्या कोकोच्या झाडाची लागवड केली जाते, फोरऍस्टेरिओ(Forasterio), क्रिएलो(Criollo) आणि ट्रिनीटरिओ(Trinitario). यात क्रिएलो(criollo) या प्रकाराच्या झाडाच्या बियांचा चॉकलेट बनवण्यासाठी जास्त उपयोग होतो. चॉकलेटचा स्वाद कोकोच्या बियांवर अवलंबून असतो. प्रत्येक वेगवेगळ्या देशातल्या कोको बियांना आपला वेगळा स्वाद असतो. ह्या झाडांच्या बियांचेही दोन प्रकारात विभाजन केले आहे.
चॉकलेटचा आरोग्याशी संबध आहे हे आता सर्वांनाच माहीत असेल. चॉकलेटमधील काही पोषणमूल्यांमुळे चॉकलेट आरोग्यासाठी चांगल मानल जात आहे. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टिऑक्सिडन्ट एजंट असतात ऑक्सिडेशनमुळे होणार्या परीणामांना थांबवण्यासाठी मदत करतात. डार्क चॉकलेटमधून अनेक मिनरल्सही मिळतात. एक डार्क चॉकलेट तुमची दिवसाची १२% मॅग्नेशियची गरज पूर्ण करते. डार्क चॉकलेट आणि कोकोमधे भरपूर प्रमाणात फायबरही असते. माया संस्कृतीत कोकोचा औषधात उपयोग केला जायचा. अशा या चॉकलेट या अजब रसायनाची संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.
संदर्भः विकीपीडीया आणि चॉकलेटवरील काही पुस्तके.
तुम्हाला हे ठाऊक आहे का?
प्रियाली
कोहिनूर आणि दर्या-ए-नूर
कोहिनूर (प्रकाशाचा पर्वत), दर्या-ए-नूर (प्रकाशाचा समुद्र) हे प्रसिद्ध हिरे भारतात, गोवळकोंडा येथील खाणीतून मिळाल्याचे सांगितले जाते. कोहिनूर हा प्रसिद्ध हिरा मुघल-इराणी सत्ता इ. कडून पुढे ब्रिटिशांच्या हाती गेला आणि विक्टोरिया या ब्रिटीश साम्राज्ञीच्या मुकुटात त्याला स्थान मिळाले. अद्यापही हा हिरा, ब्रिटिश राज्यकर्तीच्या मुकुटात बसवला जातो. राज्यकर्ता पुरुष असल्यास त्याला हा हिरा धार्जिणा नाही असा समज आहे. दर्या-ए-नूर हा हिरा दिल्लीच्या लुटीत नादिरशहाने इराणला नेला आणि तो कायम इराणलाच राहीला. सध्या तो इराणी शहाच्या मुकुटात स्थानापन्न आहे.
चॉकलेट
चॉकलेट हा शब्द स्पॅनिश भाषेतून इंग्रजी भाषेत आला असे मानले जाते. स्पॅनिश भाषेतही हा शब्द नावताल या ऍझटेक लोकांच्या भाषेतून आला असे समजले जाते. गरम पाणी, कोको, तिखट, वॅनिला आणि इतर काही पदार्थांच्या मिश्रणाला ऍझटेक लोकांच्या भाषेत चॉकलेट सदृश शब्द वापरला जाई. या शब्दाचा अर्थ "कडवट पाणी" असा होतो. युरोपीय लोकांनी त्यात साखर मिसळून चॉकलेटला मिठाईचे स्वरूप दिले.
लीवाइ'ज जीन्स
जेकब डेविस या शिंप्याकडे अनेक कामगार लोक आपले कपडे शिवण्यास आणि फाटलेले कपडे दुरुस्त करून घेण्यासाठी येत. त्यांचे कपडे शिवण्यासाठी जेकब, लिवाय स्ट्रॉस आणि कंपनी कडून घाऊक भावात कापड विकत घेई. फाटलेल्या कपड्यांची शिलाई करताना खिसे आणि कडा पुन्हा पुन्हा शिवाव्या लागत त्यावर उपाय म्हणून जेकबने त्या कपड्यांवर तांब्याचे खिळे (रिवेट्स ना योग्य शब्द आठवला नाही, प्लीज दुरुस्ती करावी) मारायला सुरुवात केली आणि नंतर या कंपनीसोबत करार करून जीन्सच्या पँट्सची निर्मिती सुरू केली. फाटक्या कपड्यांची दुरुस्ती करण्यासाठी वापरलेले हे खिळेच लीवाइ'ज जीन्सचे शान ठरले.
जीजस क्राइस्ट सरडा
बॅसिलिस्क या नावाने ओळखल्या जाणार्या सरड्याला जीजस क्राइस्ट सरडा या नावानेही ओळखले जाते. बायबलमध्ये येशू पाण्यावरून चालत गेल्याचे उल्लेख आहेत. संकटाची चाहूल लागताच हा सरडा विजेच्या वेगाने पाण्याच्या पृष्ठभागावरून पळू शकतो यामुळे या सरड्यालाही जीजस क्राइस्ट सरडा असे म्हटले जाते. अधिक माहिती येथे वाचता येईल.
व्हाइट हाऊस
अमेरिकन अध्यक्षांच्या वॉशिंग्टन डिसीमधील घराला पूर्वी अध्यक्षांचे निवासस्थान किंवा अध्यक्षांचे घर असे संबोधले जाई. या घराचे व्हाइट हाऊस असे नामांतरण होण्यास पुढील आख्यायिका कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. १८१४ मधील लढाईत ब्रिटिश फौजांनी लावलेल्या आगीत अध्यक्षांच्या घराचे नुकसान झाले. जळलेल्या डागांची तात्पुरती डागडुजी करण्यासाठी घर पांढर्या रंगाने रंगवण्यात आले आणि त्याला व्हाइट हाऊस हे नाव पडले. दुसर्या आख्यायिकेनुसार हे नाव जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था यांच्या व्हाइट हाऊस या बागायतीतील घरावरून पडल्याचे सांगितले जाते.
मोना लिसा
मोना लिसा हे सुप्रसिद्ध चित्र लिओनार्डो द विन्चीने इटलीतून फ्रान्समध्ये आणल्यावर तीन वर्षांनी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हे चित्र १४ व्या लुईच्या राजवाड्यात होते. तेथून ते लूव्रच्या संग्रहालयात गेले. नेपोलियन बोनापार्टने हे चित्र लूव्रच्या संग्रहालयातून आणून आपल्या शयनगृहात लावले होते. कालांतराने ते पुन्हा लूव्रच्या संग्रहालयात परत केले गेले.