संपादकीय
उपक्रम दिवाळी विशेषांकाचे यंदा चौथे वर्ष. हा अंक वाचकांसमोर ठेवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.
इंग्रजी भाषेच्या आंतरजालावरील एकछत्री अंमलाला छेद देत गेल्या काही वर्षात भारतीय भाषांनी आंतरजालावर उल्लेखनीय प्रगती केली आहे. दिवसागणिक या भाषांमधील लिखाणाचा ओघ आंतरजालावर वाढतो आहे. भारत आणि भारतीय आता खर्या अर्थाने या भाषिक क्रांतीत, काही अंशी 'उत्क्रांती'त सहभागी होत आहेत. या उत्साहवर्धक चित्रानंतरही काही महत्त्वाच्या गोष्टी राहतात ज्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे आवश्यक आहे. आंतरजालावर येणार्या लिखाणाचा ओघ प्रचंड असला तरी तो त्या लिखाणाच्या दर्जाला पर्याय होऊ शकत नाही. 'भरपूर लेखन आणि दर्जेदार लेखन"यांची उपलब्धताच खर्या अर्थाने एखाद्या भाषेच्या आंतरजालावरील यशाचे परिमाण होऊ शकते.
उपक्रमाची सुरुवात सदस्यांना आपले अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे मराठीतून लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी याचसाठी झाली. भाषाव्यवहार, सामाजिक आशय, विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, साहित्य अशा विविध विषयांवर उपक्रमावर विपुल लेखन झाले आहे. "केवळ माहितीप्रधान लेखनाला वाहिलेले मराठी संकेतस्थळ" ही कल्पना तीन वर्षांपूर्वी फारश्या गंभीरतेने घेतली गेली नसतीच. पण हे आव्हानात्मक धोरण स्वीकारून आणि चिकाटीने अंमलात आणून "असेही होऊ शकते" हे उपक्रमने सिद्ध केले आहे. मराठी संकेतस्थळांच्या वाढत्या गर्दीत उपक्रम संकेतस्थळाने आपले वेगळेपण नेहमीच जपले आहे याचे श्रेय खरेतर उपक्रमच्या ध्येयधोरणांशी बांधिलकी असणार्या आणि वेळोवेळी विविधप्रकारचे लेखन करून उपक्रमाचा लौकिक वाढवणार्या उपक्रमी सदस्यांचे आहे.
या दिवाळीच्या निमित्ताने उपक्रमच्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना उपक्रमच्या ब्रीदवाक्याची पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते. "जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा|". आपल्या विद्येचा, माहितीचा, शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग करून आंतरजालावर मराठी अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न उपक्रमच्या माध्यमातून होत आहे. उपक्रम सदस्यांच्या सहकार्याने उपक्रमाची आजपर्यंतची वाटचाल ध्येयाशी सुसंगतच झाली आहे. आता उपक्रमावर अधिकाधिक लेखन अपेक्षित आहे. लेखनाबरोबरच परस्पर सहकार्य, सामंजस्य, सकारात्मक चर्चा, नवीन लेखकांना उत्तेजन हे आणि यासारखे उपक्रम सुरू होणे आणि वाढणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदलत असलेली कौटुंबिक-सामाजिक चौकट, जगण्याच्या स्पर्धेत आर्थिक सुबत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांना आलेले भयंकर स्वरूप, राजकीय-सामाजिक पातळीवरील भ्रष्ट व्यवहार, सर्वच क्षेत्रात वाढत असलेली सुमारसद्दी अशा भोवंडून टाकणार्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे, वाचकांना-समाजाला नवे विचार देणारे लेखन उपक्रमावर अपेक्षित आहे. जागतिक, प्रादेशिक पातळीवरील उलथापालथी, तंत्रज्ञानाचा महाविस्फोट, संस्कॄतींमधील सहयोग आणि संघर्ष अश्या सद्यपरिस्थितीत उपक्रमींनी आपापले दृष्टीकोन, लेख आणि चर्चेच्या माध्यमातून अधिकाधिक उत्स्फूर्तपणे मांडावेत अशी अपेक्षा आहे
यंदाचा दिवाळी अंक उपक्रमाच्या परंपरेला साजेसाच आहे. विविध विषयांवरील दर्जेदार लेखन हे उपक्रमाचे वैशिष्ट्य या दिवाळी अंकामध्येही चोखपणे प्रतिबिंबित होईल असा संपादक मंडळाला विश्वास वाटतो. मागील अंकांप्रमाणेच हा अंकही वाचकांच्या पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे.
उपक्रमाच्या सर्व सदस्यांना, वाचकांना, प्रियजनांना आणि हितचिंतकांना ही दिवाळी व येणारे नवीन वर्ष सुखसमाधानाचे, भरभराटीचे व समृद्धीचे जावो हीच सदिच्छा.