सूर्याची विविध प्रतीके

अंजली

काही दिवसांपूर्वी माझी ३ वर्षांची भाची तिने काढलेलं चित्र मला दाखवायला आली. चित्र पाहिल्यावर मला त्यात तिने काढलेला एक लाल गोळा! ह्या पेक्षा काही अधिक दिसले नाही. पण ती त्याला 'सूर्य'.. 'सूर्य' असे म्हणत होती. मला खूप गंमत वाटली. लहानपणी काढलेल्या निसर्ग चित्रांत डोंगराच्या आडून उगवणारा सूर्य मी आता पर्यंत काढलेला होता. अशा लाल गोळ्याला सूर्य म्हणतात असे मला माहीत नव्हते. आमच्या बाईंनी असे सुर्याचे चित्र काढायला शाळेत शिकवले नव्हते. मज्जा आहे आज कालच्या मुलांची अशी सोपी चित्रे त्यांना काढायला शिकवतात.

हे चित्र तिला तिच्या आईने शिकवले असे तिने मला सांगितले. असो! 'माय मम्मा इज अलवेज ग्रेट'!!!

तिने काढलेल्या चित्राला मी जास्तीत जास्त 'आईची टिकली' म्हटले असते.

हनुमानानेपण ह्या उगवत्या लाल गोळ्याला आपलेसे केले होते. बराक ओबामांनी निवडणुकीसाठी वापरलेले चिन्ह पण 'उगवत्या सूर्याचे होते.


जपानचा राष्ट्रध्वज

ह्या लेखात आपण राष्ट्रध्वजावरील सूर्यांची प्रतीकेच विचारात घेऊ. (दिवाळी अंकासाठी शब्द मर्यादा आहे!)

अरे! 'उगवत्या सुर्याचा देश' जपान, ह्या देशाच्या राष्ट्रध्वजावर पण सूर्याचे प्रतीक रेखाटलेले आहे आणि हे प्रतीक असेच लाल गोळ्या सारखे आहे.

जपानच्या राष्ट्रध्वजाला जापानी भाषेत निस्सहोकि (Nisshōki - sun flag) म्हणतात. जास्तकरून हा ध्वज हिनोमारु (Hinomaru- "sun circle") म्हणून ओळखला जातो. पांढर्‍या रंगावर मध्यभागी लाल गोळा असा हा ध्वज आहे. हा लाल गोळा उगवत्या सूर्याचे प्रतीक आहे.

जवळपास १०-१२ इतर देशांच्या राष्ट्रध्वजावर सूर्याचे प्रतीकं रेखाटलेले आहेत. सूर्याच्या प्रतीकांचे आकार प्रत्येक देशांचे वेगवेगळे आहेत. खूप गंमत वाटते बघतांना. 'उगवता सूर्य', मेचा सूर्य' वैगरे.

आपण एक एक करून ह्या प्रतीकांची माहिती करून घेऊ.

रवांडा (Rwanda):

रवांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. रवांडाचा राष्ट्रध्वज २५ ऑक्टोबर २००१ ला वापरात आला. ह्या ध्वजात निळा, हिरवा,आणि पिवळ्या रंगाच्या २ छाटा असे ४ रंग वापरलेले आहेत. निळा रंगाचा पट्टा हा सुखाचा आणि शांतीचे प्रतीक म्हणून वापरलेला आहे. पिवळा रंगाचा पट्टा हा आर्थिक वाढीचे प्रतीक म्हणून वापरलेला आहे. हिरवा रंगाचा पट्टा हा आशा आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून वापरलेला आहे. सगळ्यात वरच्या निळ्या पट्ट्यावरच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात सूर्याचे प्रतीक 'प्रकाशात उजळा'’ ह्या अर्थाने रेखाटले आहे. सूर्याचा रंग 'सन येल्लो' आहे. किती किरणांचा हा सूर्य आहे ह्या उल्लेख नाही.

आर्जेन्टिना (Argentina):

आर्जेन्टिनाच्या राष्ट्रध्वजावर पण 'मेचा सूर्य' रेखाटला आहे. ह्या मेच्या सूर्यचे १६ किरणं सरळ आणि १६ किरणं वाकडी असे ३२ किरणं आहेत. सूर्याचा रंग सोनेरी पिवळा आहे. सूर्याचे डोळे, नाक आणि तोंडपण दाखवलेले आहे. ह्या सुर्याच्या प्रतीकाकडे बघतांना आपल्याकडे देवपूजेत वापरात असलेली सूर्यदेवतेच्या प्रतीकाची आठवण होते. आर्जेन्टिनाचा राष्ट्रध्वज हा तिन पट्ट्याचा आहे. आडव्या २ आकाशी आणि १ पांढर्‍या रंगाचे एक सारख्या मापाचे असे ३ पट्ट्यात ह्या राष्ट्रध्वजात आहेत. पांढर्‍या रंगाची पट्टी २ आकाशी रंगाच्या पट्टीमध्ये आहे आणि ह्या पांढर्‍या पट्टीवर मध्यभागी मेचा सूर्य रेखाटला आहे. मेचा सूर्य हा पहिल्या आर्जेन्टिनाच्या नाण्यावर १८१३ मध्ये कोरलेला होता. ह्या नाण्याची किंमत ८ ईसकूडोस (escudos ) म्हणजेच १ स्पानिश डॉलर होती.

किर्गिझस्तान ( Kyrgyzstan):

किर्गिझस्तानच्या राष्ट्रध्वजावरील सूर्य हा 'पिवळा सूर्य' आहे. लाल रंगावर मध्यभागी हा पिवळा सूर्य आहे. ह्या सुर्यला ४० किरणं आहेत, हि किरणं एक सारख्या अंतरावर आहेत. सुर्याच्या मध्यभागी लाल रंगाची रिंग आहे आणि सुर्याच्या दोन्ही बाजूला ३ रांगा आहे ज्या एका बाजू कडून दुसर्‍या बाजूला जातांना एकमेकांना दुभागल्या जातात. हया स्टाईलिश प्रतीकाला तंबू, झोपडी ('tündük ' )म्हणतात. ह्या प्रतीकाला किर्गिझ तंबूचे मुकूट पण म्हणतात.
ह्या ध्वजावरील सुर्याची जी ४० किरणं रेखाटलेली आहे ती किर्गिझच्या ४० जमातींचे प्रतीक आहे. मंगोल जमातीशी लढण्यासाठी ह्या ४० जमातींना मानसने एकत्रित आणले होते.

नामिबिया (Namibia):

नामिबियाच्या राष्ट्रध्वजावरील सूर्य हा 'सोनेरी सूर्य' आहे आणि हा सूर्य जिवन आणि उत्साह ह्या अर्थाने रेखाटलेला आहे.

बांगलादेश:

बांगलादेशचा राष्ट्रध्वजावरील सुर्याचे प्रतीक हे उगवत्या सुर्याचेच आहे. हिरव्या रंगावर लाल रंगाचा गोळा आहे. लाल रंगाचा गोळा हे बंगालवरच्या उगवत्या सूर्याचे आणि बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्यांच्या रक्ताचे प्रतीक आहे. हिरवा रंग देशाच्या हरित्वाचे, जंगलाचे, तारूण्याचे प्रतीक आहे.

नायजर (Niger):

नारंगी, पांढरा आणि हिरवा ह्या रंगाच्या एक सारख्या मापाच्या ३ पट्टात हा राष्ट्रध्वज बनलेला आहे. मधल्या पांढर्‍या पट्ट्यावर मध्यभागी नारंगी रंगाची चकती रेखाटली आहे. नायजर सरकारने ध्वजात वापरलेल्या रंगांचे आणि प्रतीकाचे काय अर्थ आहे सांगितले नाही. सर्वसामान्य नायजर नाकरिकांनी ह्या आपल्या मनाप्रमाणे अर्थकाढला आणि सर्वानूमते तो अर्थच आता प्रचलित झाला आहे. सगळ्यात वरचा नारंगी रंगाचा पट्टा साहारा वाळवंटाच्या उत्तरेकडच्या भागाचे प्रतीक आहे. मधला पांढरा पट्टा शुद्धतेचे प्रतीक आहे. खालचा हिरवा पट्टा हा 'आशा' आणि दक्षिण नायजराच्या उत्पादन देणार्‍या भागाचे प्रतीक आहे. मधल्या पांढर्‍या पट्टावरची नारंगी चकती ही 'सूर्याचे' किंवा स्वातंत्राचे प्रतीक आहे.

मलावी (Malawi):

मलावीच्या राष्ट्रध्वजावरील सुर्याचे प्रतीक हे उगवत्या सुर्याचे आहे. हे उगवत्या सूर्याचे प्रतीक जपान आणि नायजर देशांपेक्षा वेगळे आहे. ह्या सुर्याला किरणं आहेत. हा उगवता सूर्य आशेचा किरण आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून रेखाटलेले आहे.

मॅसिडोनिया (Macedonia– Republic of Macedonia):

मॅसिडोनियाच्या राष्ट्रध्वजावरचा सूर्य हा 'पिवळा सूर्य' आहे. हा पिवळा सूर्य लाल रंगावर आहे. सुर्याच्या मध्यभागापासून ८ किरणं निघतात. हा जगातला सगळ्यात नविन असा राष्ट्रध्वज आहे. जरा स्टाईलिश आहे! हा ८ पिवळ्या रंगाच्या किरणांच्या सुर्याला 'दि न्यू सन ऑफ लिबर्टि' असे म्हणतात.

फिलिपाईन्स:

फिलिपाईन्सच्या राष्ट्रध्वजावरील सूर्यहा 'सोनेरी पिवळा सूर्य' आहे. त्याला ८ मुख्य किरणं आहेत आणि त्या प्रत्येकाला ३ उपकिरणे आहेत.

मार्शल द्वीपसमूह (Marshall Island):

मार्शल द्वीपसमूहच्या राष्ट्रध्वजावरील पांढर्‍या पट्टा हा सूर्योद्य (Ratak Chain - "sunrise") आणि नारंगी पट्या हा सूर्यास्त (Ralik Chain - "sunset")चे प्रतीकं आहे. हे हा ध्वज बघतांना मी थोडी गोंधळात पडली होती... का? ध्वजावर पांढर्‍या रंगात सुर्यासारखं दिसणारी एक आकृति आहे. ती तार्‍याची आहे. ह्या तार्‍यातील २४ टोकं किंवा किरणं हे महत्वाची जिल्हे दाखवतात आणि ४ जाडी जी किरणं दिसतात ती महत्वाची ४ सांस्कृतिक केंद्राचे प्रतीक आहेत.

मंगोलिया (Mongolia):

ह्या देशाच्या राष्ट्रध्वजावर जे राष्ट्रप्रतीक रेखाटले आहे. ह्यात अग्नी, सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी आणि यिंग-यांगचे एकावर एक प्रतीकं आहेत. सूर्य पिवळ्या रंगाच्या गोळ्याने दाखवला आहे.

नेपाळ:

नेपाळच्या राष्ट्रध्वजावर सूर्य आणि चंद्र दोन्ही रेखाटलेली आहेत. सुर्याची १२ किरणं त्रिकोणि आकारात दाखवलेली आहेत. आधी ह्या सूर्य आणि चंद्राला कान, डोळे, नाक व तोंड असा चेहरा दाखवला होता कालांतराने तो चेहरा पुसून टाकला गेला.

उरुग्वे (Uruguay):

उरुग्वेचा राष्ट्रध्वजावरचा सूर्य मला हासरा सूर्य वाटतो. ह्या ध्वजात ९ एक सारख्या मापाच्या ९ पट्ट्या पांढर्‍या आणि नीळ्या रंगात एक आड एक आहे. ह्या ९ पट्ट्या उरुग्वेच्या ९ प्रभागाचे प्रतीक आहे. डाव्या वरच्या बाजूच्या कोपर्‍यात पांढर्‍या रंगाचा एक चॉकोन आहे आणि त्या चॉकोनात मे चा सूर्य आहे हा सूर्य १६ किरणांचा आहे. एक आड एक त्रिकोणी आणि वाकडी किरणं काढलेली आहेत.

लाल गोळा, केशरी गोळा, नुसताच पांढरा पट्टा, ८,१२,२४,३२... ४० किरणं!!! चेहरेवाला सूर्य, मेचा सूर्य, सोनेरी पिवळा!!! अशी ही सुर्याची आगळी वेगळी राष्ट्रध्वजावरील प्रतीकं.

दिवाळीत सुर्योदयापूर्वी उठावे लागते. दिवाळीच्या आनंदा सोबत ही सुर्याची आगळी वेगळी रुप सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष पाहीला मिळतील. थोडे कष्ट घ्यावे लागतील! १-२० मिनिट पूर्व दिशेला ज्या ठिकाणावरून सूर्य उगवतांना दिसेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहून हा सोहळा पाहात वेळ घालवावा लागेल. ती जागा आपल्या घराची खिडकी , गच्ची सुद्धा असू शकेल.