कोल्हापूरचा समृद्ध कलावारसा

रा. शि.गोसावी - कोकण(जलरंग)
कोल्हापूर कशाकरिता प्रसिद्ध आहे ? अंबाबाईच्या देवळाकरिता, चांदीच्या साजाकरिता, चपलेकरिता की लवंगी मिरचीकरता ? हे सगळे आहेच, पण कोल्हापूर कलानगरीही आहे. मग कोणाला अल्लादियाखांसाहेब आठवतील तर कोणाला शालिनी सिनेटोन वा भालजी पेंढारकर. पण कलावारसा म्हटले की त्याला परंपरा पाहिजे, आणि ती आहे 'चित्रकलेची'. आपण १८८५ पासून आजपर्यंतचा विचार केला तर सव्वाशे वर्षे तरी ही परंपरा उज्ज्वल आहे; संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर बाहेरही नावाजलेले कलाकार या नगरातून निर्माण झाले आहेत.
कलाकार निर्माण होतो देवदत्त देणगीमुळे. नुसत्या अभ्यासाने,कष्टाने तो घडत नाही. पण तेवढे पुरेसे नसते. उत्तम बियाण्यापासून डेरेदार वृक्ष व्हायचा असेल तर जमीन, खतपाणी पाहिजेच. आजूबाजूचा नितांत रम्य परिसर व राजर्षी शाहूंसारखा कलाप्रेमी राजा यांमुळे जोमदार मुळे धरली गेली व नंतर संस्थान गेले, तरी वृक्ष बहरतच राहिला. इथल्या ज्येष्ठ कलाकारांनी कलाशिक्षणाच्या संस्था काढल्या व त्यामुळे व त्यामुळेच परंपरा अखंडित चालू राहिली.कोल्हापुरात अशा चार नावाजलेल्या शाळा होत्या, तेवढ्या पुण्या-मुंबईत नव्हत्या! या कलावारशाची थोडीशी ओळख आज करून घेऊ.
आबालाल रेहमान १८८० ते १८८८ या काळात मुंबईच्या जे.जे.कला महाविद्यालयात शिकले. १८८६ मध्ये त्यांना व्हॉईसरॉय गोल्ड मेडल मिळाले. त्यांना मराठी, फारसी, संस्कृत आणि अरबी भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे वाचनही विविध विषयांतले होते. कोल्हापूरच्या कलागंगेची ही गंगोत्री. तेथून २००० सालांपर्यंतच्या नावाजलेल्या कलाकारांची यादी बरीच मोठी आहे. काही नावे घ्यायची तर रावबहाद्दूर धुरंधर, आनंदराव व कलामहर्षी बाबूराव पेंटर,विनायक मसोजी, दत्तोबा दळवी, श्री.ना.कुलकर्णी, विश्वनाथ नागेशकर, गणपतराव वडगणेकर, जी.आर. मेस्त्री, चंद्रकांत मांडरे, ग.ना.जाधव,वसंत सरवटे, रा.शि.गोसावी, रविंद्र मेस्त्री, बाबूराव सडवेलकर, सुखशील चव्हाण, नलिनी भागवत, विजयमाला मेस्त्री वगैरे वगैरे. सर्वांची माहिती देणे शक्य नाही, तेव्हा काही थोडक्यात बघू.
![]() बाबूराव पेन्टर - व्यक्क्तिचित्र (तैलरंग) |
![]() बालकृष्ण शिरगावकर - माझे पिताश्री (तैलरंग) |
कलाकारांच्या ओळखीपूर्वी कलेबद्दल बोलायचे झाले तर दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. सर्व कलाकार निसर्गचित्र व व्यक्तिचित्र या दोन प्रकारातच रमतात. अगदी दोन-चार कलाकारांनी या बाहेर लक्ष घातले, प्रावीण्य मिळवले. हा मातीचाच गुण. परिसर इतका रम्य की 'जो आला तो रमला'! मनोहर कोरडे यांचे उदाहरण घ्या. १९५६ साली त्यांनी भारताच्या पदयात्रेला सुरवात केली. काश्मीर ते कन्याकुमारी असा भारत दोन-तीनदा पालथा घातला. काही वेळा बस-रेल्वे वापरली पण शक्यतो पदयात्राच. शेकडो निसर्गचित्रे काढली. थांबले १९९२ ला, वयाच्या ६७व्या वर्षी ! वेड म्हणा किंवा तपस्या म्हणा. दुसरी गोष्ट म्हणजे या कलाकारांनी चाकोरी क्वचितच ओलांडली. अगदी सुरूवातीपासून जे.जे.मुळे त्यांच्यावर ब्रिटिश चित्रकारांच्या वास्तववादी, आभासमय प्रणालीचा पगडा बसला तो कायमचाच. जगातील इतर कलाकारांनी निरनिराळे प्रयोग केले, निरनिराळ्या शैली आल्या पण कोल्हापूरकर बदलले नाहीत. दोन-चार जण सोडा, शेकडा नव्वदजणांनी एकच शैली (त्यातही ८०% जलरंग) वापरली, जे काही प्रावीण्य मिळवायचे ते एकलव्याच्या निष्ठेने त्यातच. कलाकार निवडताना वरखाली असे म्हणायचे नाही. ती पायरी माझी नव्हे. म्हणूनच चित्रकलेबरोबर रांगोळी व भरतकाम यांचाही निर्देश केला आहे.
आबालालांचा उल्लेख केला आहेच. त्यांचे एक शिष्य धुरंधर (१८६७-१९४४). जे.जे.मध्ये शिक्षण घेतले व १८९५मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे गोल्ड मेडल मिळविले. हा मान मिळवणारे पहिले भारतीय. जे.जे.मध्ये १८९० ते १९३१ या प्रदीर्घ काळात शिक्षणकार्य केले. अनेक नामवंत विद्यार्थी तयार केले. त्यांची चित्रकला भारतीय जीवनाशी निगडित आहे. वेगवान आरेखन,जलरंगाची सखोल जाण व चित्राचा तोल सांभाळण्याची उपजत कला यांनी त्यांची चित्रकला संपन्न झाली.
कलामहर्षी बाबूराव पेंटर (पेंटर ही उपाधी; ज.१८९०- मृ.१९५४) व त्यांचे बंधू आनंदराव हे रंगभूमीवरचे पहिले कलाकार ज्यांनी कलारम्य पडद्यांकरिता रसिकांकडून टाळ्या मिळवल्या. मोजक्या रेषा व ओघवती शैली यांनी रेखाटने करून मग ते चित्र पुरे करत. एक रंगछटा दुसर्या रंगछटेत ते बेमालूमपणे मिसळत. प्रयोगशीलता, काव्यात्मकता व कल्पनारम्यता ही बलस्थाने. त्यांचा उपयोग त्यांनी चित्रपट निर्मितीत केला.१९१७ साली महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्याकरता त्यांनी स्वत: कॅमेरा निर्माण केला. बहुधा हे जगातले एकमेव उदाहरण असावे. त्यांनी भव्य सेट तयार केले; कपडेपट कल्पनेतून साकार केले; पोस्टर्स तयार केली. या नवीन सृष्टीत सव्वीस चित्रपट तयार केले . त्यात १९३६मध्ये तयार केलेला 'सावकारी पाश'सारखा सामाजिक जाणीव असलेला चित्रपट, ते याबाबतीत इतरांच्या पन्नास वर्षे पुढे असल्याचे सिद्ध करतो.
विनायक मसोजी (१८९६-१९७३) जे.जे. मध्ये शिक्षण झाल्यावर १९२१ ला शांतिनिकेतनला गेले. तेथे नंदलाल बसू प्राचार्य होते व हे उपप्राचार्य! पौर्वात्य व पाश्चिमात्य शैलींचा अनोखा मिलाफ त्यांच्या चित्रात दिसून येतो. हात, पाय, नाक, डोळे,ओठ भारतीय शैलीत तर मानवाकृती, शारीरिक ठेवण पाश्चिमात्य!
चित्रकार पुरे. संबंधित दोन निराळे प्रकार रांगोळी व भरतकाम. यात कोल्हापूरकर किती प्रगत झाले हे पाहण्याकरता शांताराम कमते यांचा "शालू" व विजयमाला मेस्त्री याचा "हुक्केवाला" पहा.
![]() शांताराम कमते ...शालू (रांगोळी) |
![]() विजयमाला मेस्त्री ... हुकाधारी (भरतकाम) |
लेख कुठेतरी थांबवायचा, इथेच थांबू.
ऋणनिर्देश: श्यामकांत जाधव.
शरद विष्णु हर्डीकर.
पत्ता : फिनिक्स अपार्टमेन्ट, से.बा.रस्ता, शिवाजीनगर,पुणे-१६. दू.ध्व.क्र. २५६७१३८४.
शिक्षण : B.Sc. B.Sc(Tech)
आवडी-निवडी : वाचन, शास्त्रीय संगीत, गप्पा. घरच्या सुगरणीने केलेले पदार्थ; उदा. दडपे पोहे, भेळ, थालिपीठ इ. गोष्टी आवडतात. सिनेमा-नाटकांचा नाद नाही. भरपूर वेळ असल्याने मित्रांनी घरी यावे ही इच्छा.



