वर्षात एकदां असा जोगिया रंगे

शरद

या कवितेवर रसग्रहणात्मक असे काही लिहण्यासारखे नाही. गेल्या २५-३० वर्षांत अनेकदा माझ्या मित्र मंडळीत या कवितेची फर्माइश झाली आहे व ऐकणारे १० असोत कीं शंभर, शेवटच्या कडव्यात सर्वजण श्वास रोखून, इतके नि:स्तब्ध झालेले असतात कीं जवळजवळ एक मिनिट सर्वत्र सन्नाटा असतो, दाद द्यावयालासुद्धा कोणी शुद्धीवर नसते म्हटले तरी चालेल. डोळे ओले न झालेली एकही व्यक्ती नसावयाची. ही मोहिनी कशाची? आयुष्यात एखादीच घडणारी घटना,त्यावेळीं तीचे न कळलेले मह्त्व, परत तो क्षण येणे नाही याची पूर्ण जाणीव, व अशा असहाय्य जीवनात नेहमीचे अटळ जगणे, ही त्या गणिकेची शोकांतिका, सर्वांना सुन्न करून सोडते. पण ही शोकांतिका गणिकेची आहे का ?

अत्यंत रेखिव शब्दात गदिमांनी हे गणिकेचे शब्दचित्र (शब्दशिल्प हा जास्त चांगला पर्याय?) रेखाटले आहे. पान नखलणे हा शब्दप्रयोग मी इथे पहिल्यांदीच वाचला (नंतर पुरुषोत्तम पाटीलांच्या पाहुणेरमध्ये). रतिक्लांत हा शब्द खरा म्हणजे अस्सल संस्कृत, पण इथे कसा चपखल बसतो. दुमडलेला गालिचा, अंग सैल टाकलेली पैंजणे, थरथरणारी स्वरवेल, अधरफुलांचे ओले, मृदुल पराग, अनमोल ओपुनिया जगणारे प्राण, आणि हा खुळ्या प्रीतिचा खुळा सन्मान आहे ही जाण, किती उदाहरणे देणार ? सर्वांना जवळ पोचणारी उपमा द्यावयाची तर दक्षिणेतील मंदिरांमधील घोटीव शिल्पांचीच. तरीही ही कविता, ही व्यथा, गणिकेची नाही. ती आहे स्वत: कवीची !

गदिमा. मराठीतीलच नव्हे तर आधुनिक भारतीय भाषांमधील एक श्रेष्ट कवी. आपल्याला ही एक दैवी देणगी मिळाली आहे याचे त्यांना पुरेपुर भान होते. आणि ही खंत होती की "चित्रपटांसाठी, रेडिओसाठी इच्छेने, अनिच्छेने आपण लिहित आहोत. हे अतीच होत आहे. परमेश्वराने दिलेल्या दुर्लभ शक्तीचा विनियोग आपण असा का बरे करत आहोत? स्वानंदसुखासाठी लिहणे वेगळे आणि हे मागणी आहे म्हणून लिहणे वेगळे! खूप खूप लिहण्याने या लेखन शक्तीला घेरी येत आहे. गणिकेचा देह आणि कला यांचा विक्रय करणारा व्यवसाय आणि आपला पुरवठ्याप्रमाणे काव्य पाडण्याचा व्यवसाय यात काहीतरी दाहक साम्य आहे." या हळव्या टोचणीतून जन्माला आला "जोगिया".

 

कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली.
झुंबरीं निळ्या दीपांत ताठली वीज
कां तुला कंचनी, अजुनी नाहीं नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
तें डावलूनी तूं दार दडपले पाठीं.
हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान,
निरखिसि कुसर वर कलती करूनी मान
गुणगुणसि काय तें ? -गौर नितळ तव कंठीं-
स्वरवेल थरथरे, फूल उमलतें ओठीं.
साधतां विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसतां होसि कशी बेभान ?
चित्रांत रेखितां चित्र बोलले ऐनें,
" कां नीर लोचनीं आज तुझ्या ग मैने ?"
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग--
हालले, साधला भावस्वराचा योग,
घमघमे, जोगिया दंवांत भिजुनी गातां
पाण्यांत तरंगे अभंग वेडी गाथा.
"मी देह विकुनियां मागून घेतें मोल,
जगविते प्राण हे ओपुनिया ’अनमोल’
रक्तात रुजविल्या भांगेच्या मीं बागा,
ना पवित्र देहीं तिळाएवढी जागा.
शोधीत एकदां घटकेचा विश्राम
भांगेत पेरूनी तुळस परतला श्याम,
सांवळा तरुन तो खराच ग वनमाली
लावितें पान... तों निघून गेला खालीं.
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नांव,
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
’मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !’
नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथें हा इष्का गणितो प्यार,
हासून म्हणाल्यें, ’दाम वाढवा थोडा....
या पुन्हां, पान घ्या ...’ निघून गेला वेडा !
राहिलें चुन्याचें बोट, थांबला हात,
जाणिली नाहिं मीं थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडितें अंतर जातां त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?
तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसले परी रतिक्लांत,
वळूनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळसच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदां असा ’जोगिया’ रंगे."

इथे आपल्याला ही कविता ऐकता येईल