कूटलिपी - एक विचार (भाग २)
भाग २
७. हस्ताक्षरवाचनकौशल्य :
नाडिग्रंथ हे हस्तलिखित स्वरूपात असल्याकारणाने अभ्यासकाचे केवळ लिपीचा अभ्यास असून भागणार नाही तर विविध प्रकारची हस्ताक्षरे वाचनाचा सराव असणे आवश्यक आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे शीघ्रलेखनात लिपीचे आघात (स्ट्रोक्स) हे थोडेअधिक प्रमाणात बदलले जातात, ते बदलले जाण्यास शीघ्रगतीने केलेले लेखन हे एक प्राथमिक कारण असून दुसरे कारण म्हणजे असे लेखन हे विविध व्यक्तिंकडून केले गेलेले असणे हे होय. व्यक्तिगणिक आघात बदलतांत आणि त्यामुळे बारकाईने वाचन करणे हे अक्षरे लागण्यासाठी आवश्यक ठरते. महाराष्ट्रीय वाचकांस हा विचार उमगणे कठिण खचितच नसावे, ह्याचे कारण असे की महाराष्ट्रात मोडी लिपीचा अभ्यास असणारे अनेक अभ्यासक आहेत, आणि ह्याबाबतीत त्यांचे मतही हेच आहे. ह्या प्रकारचे लेखन वाचण्यासाठी प्रथमदर्शनी दुर्बोध जरी वाटत असले तरी ते वाचणे अशक्यप्राय निश्चितच नसते.
८. कूटलिपी कां म्हणतांत? शब्दार्थ :
असे असतांना हिला सरळसरळ ग्रंथलिपी न म्हणतां कूटलिपी कां म्हणतांत? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथम 'कूटलिपी' ह्या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक ठरते. ह्या लिपीला 'कूटलिपी' असे मराठीभाषेमध्ये संबोधिले जाते आहे. (नाडिवाचक स्वत: त्याला कूट्टेळुत्तु असेही म्हणतात) मराठी शब्दाचा विचार करता एक गोष्ट अशी लक्षात येते की मराठीभाषेमध्ये 'कूट' म्हणजे चूर्ण किंवा कोडे किंवा संकेत. ह्यावरून कूटलिपी म्हणजे सांकेतिक लिपी असा विचित्रार्थ मराठीभाषेमध्ये लावला जातो आहे. परंतु ही लिपी सांकेतिक नक्कीच नाही. आपल्या येथील एका अ-तमिळ सदस्यालाही ह्या लिपीतील अक्षरे विशेष कष्ट न घेता वाचता आलेली आहेत. तरीही ही लिपी कूट (सांकेतिक) असावी काय?
९. कूट्टेळुत्तु आणि युक्ताक्षरे ही संकल्पना :
हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 'कूट्टेळुत्तु' ह्या शब्दाचा अर्थ जाणावा लागेल. ह्यासाठी लिपीशास्त्रातील 'युक्ताक्षर' ह्या संकल्पनेची उजळणी करावी. 'युक्ताक्षर' हा संस्कृतभाषी शब्द आहे. मराठीभाषेमध्ये ह्या शब्दास 'जोडाक्षर' म्हणतात. देवनागरी लिपी आणि इतर तीसदृश लिपींमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली गेली म्हणजे त्या अक्षरांतून नवीन युक्तचिह्नाक्षरे सिद्ध होतात. ही युक्तचिह्नाक्षरे बरीचशी मूळ अक्षरासारखी दिसणारी परंतु मूळ अक्षरापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी असतात. ह्या अक्षरांनाच सामान्यपणे युक्ताक्षरे असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ: श्री = श् + र् + ई = असे न लिहिता, 'श्री' असे लिहिले जाते. 'श्री' हे युक्ताक्षर होय. लिपीशास्त्राभ्यासकांचे एक आवडते उदाहरण द्यावयाचे झाल्यास, संस्कृत शब्द 'कार्त्स्न्यम्' ह्याची रचना क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म् अशी असून, तो 'का र्त्स्न्य म्' असा लिहिला जातो. ह्यात 'र्त्स्न्य' हे युक्ताक्षर आहे.
१०. नाडीग्रंथांच्या संदर्भातील युक्ताक्षर ह्या संकल्पनेचे स्थान काय? :
नाडिग्रंथ-नाडिपट्टी आणि नाडिभविष्य ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? कारण नाडिग्रंथामध्ये जे तथाकथित भविष्यकथन लिखितस्वरूपामध्ये उपलब्ध आहे असे सांगितले जाते, ते तर तमिळभाषेमध्ये आहे. आणि तमिळभाषेमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही! तमिळ लिपीमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली जातच नाहीत, त्यामुळे युक्तचिह्नाक्षरे - थोडक्यात युक्ताक्षरे - सिद्ध होत नाहीत.
उदाहरण: वर दिलेला 'कार्त्स्न्यम्' हाच शब्द तमिळ लिपीमध्ये लिहायचा झाल्यास க் + ஆ + ர் + த் + ஸ் + ன் + ய் + அ + ம் (क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म्) अशी फोड असली तरीही तो கார்த்ஸ்ன்யம் असाच लिहिला जाईल. ह्याचे कारण असे, की आधुनिक तमिळ लिपीमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही. अक्षरे एकास एक जोडून लिहिली न जाता, एकासमोर एक लिहिली जातात. ज्या अक्षरांचा हलन्त उच्चार असेल, त्यांच्या डोक्यावर 'पुळ्ळि' (बिन्दु) देऊन त्यांचे अपूर्णत्त्व स्पष्ट केले जाते.
ह्याच युक्ताक्षरांना तमिळभाषेत 'कूट्टेळुत्तु' असे म्हणतांत. ह्या शब्दात 'कूड' आणि 'एळुत्तल' असे धातु आहेत. 'कूड' म्हणजे 'सह' तर 'कूट्टम' म्हणजे 'संघ'. 'एळुत्तल' म्हणजे 'लेखन' किंवा 'लिहिणे'. कूडऽ एळुदिनदु ஃ कूट्टेळुत्तु = एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असा एकूण अर्थ आहे.
परंतु मुळात तमिळ लिपीमध्ये जोडाक्षरेच नसताना, 'कूट्टेळुत्तु' हा शब्द नाडीग्रंथांच्या लेखनाबाबत काय म्हणून उपयोजिला जातो आहे? ते लेखनदेखील ग्रंथलिपीमध्ये आहे, तर ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? ह्याचे कारण असे की कूट्टेळुत्तु ह्या शब्दाचा 'जोडाक्षरे' असा एकमेव अर्थ नसून एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असाही अर्थ होतो. नाडीग्रंथांच्या लेखनाबाबतीत बोलावयाचे झाल्यास ह्यातील ग्रंथलिपी ही बरीचशी मोडी लिपीसारखी हात न उचलता लिहिण्याच्या शैलीमध्ये (पक्षी : एकत्रितरीतिने, सोबत लिहिलेली, एकसारखी अशी) असल्यामुळे 'कूट्टेळुत्तु' असा शब्द तिच्याबाबतीत उपयोजिला जातो. ती लिपी सांकेतिक आहे म्हणून नव्हे!
११. तात्पर्य :
'कूडऽ एळुदिनदु' म्हणजे एकत्रितरीतिने लिहिले गेलेले असे हे लेखन. हे लेखन ग्रंथलिपीमध्ये 'ग्रथित' करून ठेवलेले असते, म्हणून ग्रंथ हा शब्द : नाडिग्रंथ.
१२. पुढील संशोधनाची आवश्यकता :
नाडिग्रंथ-नाडिपट्टीआधारे भविष्यकथन करण्याच्या प्रकारामध्ये "जातकाकडूनच विविध मार्गांनी माहिती काढून, आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन, तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो" असा एक संशय नेहमी घेतला जातो. ह्या संशयाचे निराकरण करण्याकरता लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्यता काय आहे हे स्पष्ट होऊन निष्कर्षास येता येईल.
खरे पाहता हा सारा विषय समाजाशी संबंधीत असल्याकारणे ह्या विषयावर केवळ वैयक्तिक जिज्ञासापूर्तीसाठी अथवा वैयक्तिक चिकित्सापूर्तीसाठी अभ्यास न होता शास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील अनेक तथाकथित पुरोगामी लोकांचा उत्साह त्यातील 'ज्योतिष' किंवा 'भविष्य' हे शब्द ऐकूनच ढेपाळतो आणि केवळ ह्या अभ्यासाच्या अभावामुळे विषयाकडे दुर्लक्ष होते आहे.
हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.
लेखक मुंबई उच्च न्यायालय येथे अभ्यसनक अधिवक्ता म्हणून कार्यरत. न्यायशास्त्राभ्यासक. समाजशास्त्राभ्यासाची आवड. वैद्यकीय न्यायशास्त्राची आवड. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' ह्याही तत्त्वाचा खंदा समर्थक. विविध भाषांचे भाषाशास्त्र तथा लिपीशास्त्रावर २० वर्षांचा अभ्यास. डिसेंबर २००९ मध्ये तुळुभाषेसाठी स्वनिर्मित नवी लिपी सादर करणार. द्राविडभाषाकुलातील भाषांच्या व्याकरणाचा मुळातून अभ्यास. मराठीभाषेच्या व्याकरणाचाही अभ्यास. श्री. विश्वनाथ खैरे ह्यांनी मांडलेल्या संमत सिद्धांताचा पुरस्कर्ता. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर तमिळ - इंग्रजी इत्यादि भाषांमधून लेखन. भविष्यकालात मराठीभाषेतून लेखन करण्याची इच्छा.