PLM - नव्या संकल्पनेची ओळख

प्रसाद जोशी

PLM - संकल्पनेची ओळख

आजच्या गतिमान बाजारपेठेत स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी विविध कंपन्यांची चढाओढ चालू असते. आम्ही बनविलेले उत्पादन बाजारात लवकरात लवकर कसे आणता येईल, त्यातून आम्ही अधिकाधिक नफा कसा कमवू शकू, कमीत कमी किंमतीत ग्राहकाला जास्तीत जास्त समाधान कसे मिळू शकेल? या आणि अशा अनेक उद्दिष्टांसाठी प्रत्येक कंपनी धडपडत असते. या आणि अशा सर्व प्रश्नांची मोट बांधण्याचे काम करणारा दुवा बाजारात स्थिर होऊ पाहतोय - तो आहे - PLM (Product Lifecycle Management) उर्फ उत्पादनाचे जीवनचक्र ! ही संगणकावर आधारीत प्रणाली आहे. तुमच्या आमच्या परिचयाच्या "चारचाकी गाडी" या उदाहरणावरून आपण ही प्रणाली समजावून घेऊया.

कोणत्याही सजीवाच्या जीवनक्रमात जशा जन्म, बाल्य, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यू या अवस्था असतात, तशा कोणत्याही नव्या उत्पादनाच्या जीवनक्रमात देखील असतात (आकृती पहा). आता पाहूया बाजारात गाडीचे नवे मॉडेल कसा जन्म घेते ते?

PLM - उत्पादन जीवनचक्र नियोजन


आकृती १: PLM जीवनचक्र

  1. ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कंपनी नवे मॉडले बनविण्याचे ठरविते. यात अत्यंत महत्वाचा घटक असतो - "ग्राहक उर्फ Customer". ग्राहकांचा प्रतिसाद, त्यांच्या सुचना, त्यांना मिळणारे समाधान या सर्व गोष्टींचा संग्रह केलेला असतो CRM (Customer Relationship Management) या प्रणालीत!
  2. आता कंपनीतील अभियंते काम सुरु करतात नव्या मॉडेलचा आराखडा बनविण्याचे किंवा जुन्या मॉडेलमध्ये फेरफार करण्याचे! या अवस्थेला आपण Designing म्हणतो. आजकाल असे आराखडे CAD मार्फत संगणकावर बनविले जातात. कारण कागदाचा वापर कमी करण्यावर कंपनीचा भर असतो. या डिझाईनमधून जन्म घेतो मॉडेलचा संगणाकावरील आराखडा - म्हणजे त्यातील सुटे भाग, त्यांची जुळणी, लागणारे इतर साहित्य इत्यादी.
  3. आता पुढचे काम असते - हे मॉडेल संगणकावरुन प्रत्यक्षात उतरविण्याचे! यासाठी अभियंते ठरवतात की हे सुटे भाग आपणच बनवायचे की बाहेरून विकत घ्यायचे? यातून जन्म होतो "पुरवठादार उर्फ - Supplier" या घटकाचा. कंपनीचे उद्दिष्ट असते की हे मॉडेल अत्यंत कमी वेळात आणि मोठ्या प्रमाणावर कसे बनविता येईल. यासाठी कंपनीतील उत्पादन विभाग आणि पुरवठादार यांची सांगड घालणे खुप जरुरीचे असते. या सर्वांचा समावेश होतो SCM (Supply Chain Management) या संकल्पनेत.
  4. बनणार्‍या मॉडेल्ससाठी लागणारा कच्चा माल, वित्त, मनुष्यबळ, यंत्रसामग्री या सर्व साधनांचा (उर्फ Resources) विचार केला जातो ERP (Enterprise Resource Planning) या संकल्पनेत!
  5. अशा टप्प्यांतून पार पडून मॉडेल बाजारात शिरकाव करणार, तेंव्हा लगीन घाई सुरु होते ती कंपनीच्या विक्रीपश्चात सेवा आणि वित्त खात्यात! नवीन मॉडेलची चाचणी, त्यावरील ग्राहकांच्या प्रतिक्रिया, मॉडेलमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा डिझायनरकडे जाणे हे चक्र सुरु होते. विक्रीपश्चात सेवा हे देखील या अवस्थेतील एक महत्वाचे अंग आहे. या सर्वांच्या प्रतिक्रियांच्या आधारे मॉडेलमध्ये बदल सुचवले जातात ते पुन्हा CRM च्या माध्यमातून जेथून आपण समजावून घेण्यास सुरुवात केली.

अशा पद्धतीने नवे मॉडेल, त्याची बांधणी, उत्पादन, विक्री आणि देखभाल या चक्रातून कोणतेही उत्पादन जात असते. जसा सजीवांच्या जीवनचक्रावर ताबा असतो एका अज्ञात शक्तीचा, तसा उत्पादनाच्या जीवनचक्रावर ताबा असतो, कंपनीतील वा कंपनी बाहेरील एकदिलाने काम करणार्‍या सर्व घटकांचा - ग्राहक/कर्मचारी/पुरवठादार/कच्चामाल इ. या सर्व घटकांची मोट बांधणारी PLM संकल्पना उदयास येऊन ८-९ वर्षे झाली. ती आता बाळसे धरत आहे. या PLM ला आपण म्हणू शकू " उत्पादन जीवनचक्र नियोजन"!

थोडक्यात म्हणजे PLM हळूहळू सर्वसमावेशक बनत आहे - CRM / SCM / ERP यांना सामावून घेऊन! कंपनीच्या नव्या उत्पादनाच्या जन्मा पासून ते बाजारात उत्पादन स्थिर करण्याच्या प्रक्रियेत PLM चा महत्वाचा वाटा आहे.

असे हे सर्व समावेशक क्षेत्र अभियांत्रिकीत स्थिर होऊ पाहते आहे. नव्या वाटांनी जाऊ पाहणार्‍या अभियंत्याला PLM च्या माध्यमातून मोठे दालन खुले झाले आहे. करियरसाठी PLM निवडण्याचे प्रमाण वाढू लागणे, ही खूण आहे जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनाला महत्वाचे स्थान मिळण्याची!!

 
प्रसाद जोशी माहिती तंत्रज्ञान/कॅड/कॅम/पीएलएम क्षेत्रातमध्ये २४ वर्षे कार्यरत आहेत. टाटा मोटर्स, पीटीसी आणि ज्यॉमेट्रीक सॉफ्टवेअर या कंपन्यांमध्ये काम केले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पीएलएम क्षेत्रातल्या सेवा आणि शिक्षणासाठी वाहिलेल्या सेवांसाठी नवी कंपनी स्थापन केली आहे.

Comments

अतिशय सोपे करुन सांगितले

अतिशय सोपे करुन सांगितले आहेस. छान आहे लेख एकदम. --रोहित

अभिनदन

सुरेख आणी सुलभ लेखन केले आहेस. धन्य्वाद.

महेश नित्सुरे

मी ह्या क्षेत्रात करिय्रर

मी ह्या क्षेत्रात करिय्रर करायाला उत्सुक आहे. क्रुपया आपली सम्पर्क माहिती मला कोकुहोराईस्@जीमेल.कोम वर कलवा

आपला इमेल आयडी स्पेलिग कळवाल

आपला इमेल आयडी स्पेलिग कळवाल का?

हे पहा

येथे अधिक माहिती मिळेल.

तुम्ही

तुम्ही http://www.3dplmsoftware.com/ मध्ये होता काय? तुमचे नाव तिथे एकले आहे.

----
विकास
vikas.pisal@gmail.com