शटरस्पीड

वरुण वैद्य

कोणत्याही छायाचित्राचे तीन सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे ऍपर्चर साइज, शटर स्पीड आणि आय. एस. ओ. ही नावे परिचयाची नसल्याने आणि त्यांचे मोजमाप काहीशा अगम्य आकड्यांत केले जात असल्याने, हा एकूणच सगळा गोंधळात टाकणारा प्रकार वाटतो. एखादे गाणे आवडायला त्याचे तांत्रिक विश्लेषण माहीत असणे गरजेचे नसते तसेच कोणत्याही छायाचित्राचा आस्वाद घ्यायला ही माहिती असणे अजिबात आवश्यक नाही.

 

कोणत्याही छायाचित्राचे तीन सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे ऍपर्चर साइज, शटर स्पीड आणि आय. एस. ओ. ही नावे परिचयाची नसल्याने आणि त्यांचे मोजमाप काहीशा अगम्य आकड्यांत केले जात असल्याने, हा एकूणच सगळा गोंधळात टाकणारा प्रकार वाटतो. एखादे गाणे आवडायला त्याचे तांत्रिक विश्लेषण माहीत असणे गरजेचे नसते तसेच कोणत्याही छायाचित्राचा आस्वाद घ्यायला ही माहिती असणे अजिबात आवश्यक नाही. पण ह्या अनोळखी शब्दांच्या आडचे तत्त्व समजायला फारच सोपे आहे. एकदा का हे तत्त्व समजले की शब्दांचे अनोळखीपण नाहीसे व्हायला वेळ लागत नाही.


नॉर्मल शटरस्पीड

मुळात हे तीनही घटक कॅमेर्‍याच्या लेन्सशी संबंधित आहेत. लेन्सच्या माध्यमातून प्रकाश कॅमेर्‍यात शिरू दिला आणि तो प्रकाश फिल्मवर/डिजीटल मीडियावरती उमटला की चित्र तयार होते. म्हणजे सगळा खेळ प्रकाशाचा, त्यामुळेच छायाचित्रापेक्षा प्रकाशचित्र म्हणणे अधिक योग्य समजले जात असावे. सगळी गंमत आहे हा प्रकाश किती प्रमाणात, किती वेळासाठी फिल्मवर सांडू द्यायचा ह्याची. कमी प्रकाश सांडू दिला तर चित्र अंधारलेले काळपट दिसते आणि जास्त सांडू दिला तर धुवून निघाल्यासारखे पांढरेफटक दिसते. खरी मेख आहे ती योग्य तेवढाच प्रकाश सांडू देऊन परिपूर्ण चित्र काढण्याची; आणि नेमके हेच अवलंबून असते ऍपर्चर साइज, शटर स्पीड आणि आय. एस. ओ. ह्या तीन घटकांवरती.

असे समजा की कॅमेर्‍याचा लेन्स हा एक नळ आहे, त्यातून पडणारा प्रकाश म्हणजे पाणी आहे आणि फिल्म/डिजीटल मीडिया बादली आहे. आता ही बादली पाण्याने जेमतेम काठोकाठ भरण्यासाठी तीन गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे - नळाचा व्यास किती आहे? नळ किती वेळ चालू ठेवता येईल? आणि नळाच्या पाण्याला दाब किती आहे? ह्या तीन गोष्टींवर बादली अचूकपणे हवी तितकी भरणे अवलंबून आहे.

असे समजा की कॅमेर्‍याचा लेन्स हा एक नळ आहे, त्यातून पडणारा प्रकाश म्हणजे पाणी आहे आणि फिल्म/डिजीटल मीडिया बादली आहे. आता ही बादली पाण्याने जेमतेम काठोकाठ भरण्यासाठी तीन गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे - नळाचा व्यास किती आहे? नळ किती वेळ चालू ठेवता येईल? आणि नळाच्या पाण्याला फोर्स किती आहे? ह्या तीन गोष्टींवर बादली अचूकपणे हवी तितकी भरणे अवलंबून आहे. ह्यापैकी एखादी गोष्ट जरी कमी जास्त केली तर बादली कमी भरेल किंवा ओसंडून वाहू लागेल. कॅमेर्‍याच्या उदाहरणात ह्याच तीन गोष्टींना अनुक्रमे ऍपर्चर साइज, शटर स्पीड आणि आय. एस. ओ. म्हटले जाते.

ऍपर्चर साइज हा लेन्सच्या छिद्राचा व्यास ठरवतो, शटर स्पीड लेन्स किती वेळ उघडी ठेवायची ते ठरवतो आणि आय. एस. ओ प्रकाशाचे प्रमाण ठरवतो. ह्या लेखात मुख्यत्वे मला सोदाहरण दाखवायचे आहे, ते शटर स्पीडचा वापर कसा केले जातो ते. जे दृश्य टिपायचे आहे, त्यात उपलब्ध प्रकाश किती आणि ऍपर्चर कितपत उघडे ठेवले आहे ह्यावर शटर कितीवेळ उघडे ठेवायचे हे आजकालच्या कोणत्याही कॅमेर्‍याकडून ठरवले जाते. कॅमेर्‍याची चकती 'ऑटो'वर ठेवली की सगळे निर्णय कॅमेर्‍याचा प्रोसेसर घेऊ शकतो. भरपूर प्रकाश उपलब्ध आणि ऍपर्चर जितके मोठे तितका शटर उघडे ठेवायचा वेळ कमी लागतो. अचूक वेळेसाठी ऍपर्चर उघडे ठेवून योग्य प्रमाणात प्रकाश येऊ दिला तर 'पर्फेक्ट एक्स्पोजर' असणारे चित्र बनते. तेच जर कमी वेळासाठी ऍपर्चर उघडे ठेवले तर अल्प प्रकाश मिळाल्याने अंडर एक्स्पोज्ड (काळपट) चित्र आणि जास्त वेळ उघडे ठेवले तर अति प्रकाश येऊन ओव्हर एक्स्पोज्ड (पांढुरके) चित्र बनते. इतका सोपे तत्त्व 'शटरस्पीड' ह्या सेटिंगमध्ये असते. कॅमेर्‍याचा प्रोसेसर जरी शटर स्पीड ठरवून देत असला तरी तो स्पीड यांत्रिक आकडेमोड करुन काढलेला असतो. कधी कधी कॅमेर्‍याने दिलेला स्पीड कमी जास्त करणे, चित्र अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने गरजेचे असते. म्हणूनच सर्व सेटिंग्ज 'ऑटो' वर ठेवून कधी कधी काळपट/पांढरट चित्रे येतात.


शटरस्पीड लांबवल्याने आलेली नाट्यमयता

शटरस्पीड कमी जास्त करण्याची मजा येते ती संपूर्ण अंधार पडल्यावर रस्त्यावरील दिवे लागले की. अशा चित्रणामध्ये शटरस्पीड जर अधिक काळ उघडे ठेवून भरपूर प्रकाश आत येऊ दिला की विलोभनीय परिणाम साधता येतात. रस्त्याचे दिवे वेगळेच चमकू लागतात, तर वाहनांचे दिवे दीर्घकाळासाठी टिपले गेल्याने त्याचा 'ट्रेल' तयार होऊन वेगळाच परिणाम साधता येतो. घाटातील नागमोडी रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचा रात्री दुरून फोटो घेतला तर त्यात हे रंगीबेरंगी 'ट्रेल' खूप आकर्षक दिसू शकतात. स्लो शटरस्पीडची गंमत लक्षात यावी म्हणून इथे मी माझी दोन चित्रे दिली आहेत. शिकागोमधील नेवी पियर येथे एक जायंट व्हील आहे. रात्री त्यावर लागलेले दिवे पहिल्यांदा नॉर्मल शटरस्पीड ठेवून टिपले आहेत (चित्र क्र.१) तर नंतर स्लो शटरस्पीड ठेवून. शटरस्पीड स्लो ठेवल्याने म्हणजेच अधिक काळासाठी प्रकाश आत येऊ दिल्याने चक्राच्या दिव्यांमध्ये नाट्यमयता आलेली आहे (चित्र क्र.२). अशी नाट्यमयता कल्पकतेने अनेक चित्रांत आणता येऊ शकते.

हे करताना घ्यायची एकमेव काळजी म्हणजे, क्यामेरा तिवई (ट्रायपॉड) वापरून त्यावर स्थानबद्ध करणे. हे अतिशय आवश्यक आहे कारण जितका अधिक वेळ शटर उघडे राहणार तितका तुमच्या हाताचा कंप दृश्य हलवण्याची शक्यता वाढणार. त्यांमुळे कॅमेरा कोणत्यातरी आधाराने स्थिर ठेवणे अतिशय महत्त्वाचे. शक्य असल्यास स्थानबद्ध केल्यावर 'केबल रिलिज'चा वापर केल्यास अतिउत्तम. केबल रिलिज हे उपकरण कॅमेर्‍यावरील बटण कॅमेर्‍यापासून लांब नेऊन छायाचित्रकाराच्या हातात देण्याची सोय करते. जेणेकरून बटण दाबताना येणारा किंचित कंप देखिल टाळला जाऊन येणारे चित्र व्यावसायिक छायाचित्रकारांच्या भाषेत म्हणतात तसे 'टॅक शार्प' येईल. चला तर मग कॅमेरा ट्रायपॉड आणि केबल रिलिज घेऊन रात्रीच्यावेळी बाहेर पडा आणि दिवाळीच्या रोषणाई निमित्ताने निरनिराळी चित्रे काढायला सुरुवात करा. :)