मंदीच्या काळात बचत म्हणजे कमाई. आपण खरंच काय करु शकतो आपले रोजचे खर्च कमी करायला? हा आपला आमचा दुपारचा चहा/कॉफी घेतानाचा नेहमीचाच विषय. "तू माझ्याकडे ये. आपण एक दिवस माझी गाडी, एक दिवस तुझी गाडी असे जाऊ.", मित्राचा सल्ला. मलासुद्धा मान्य. मी म्हटलं, अरे पण मला चारचाकीचा इंधन खर्च नाही परवडणार. मी तर दुचाकी घेउन येईन. आपण माझ्या दुचाकीने एक दिवस आणि तुझ्या चारचाकीने एक दिवस असे करु. वाटल्यास तूसुद्धा दुचाकी घे - माझा सल्ला. मित्र म्हणाला, " नको रे बाबा! मला माझ्या जीवाची काळजी आहे. मी चारचाकीच घेईन!", असा हा आमच्या गप्पांचा मूळ विषय बचतीकडून सुरक्षिततेकडे वळला.
हे खरं आहे की चारचाकी ही दुचाकीपेक्षा नक्कीच सुरक्षित. पण ती सुरक्षित असे आपण का म्हणतो? उत्तर सोपे आहे. चारचाकी तयार करतानाच, ती वापरणार्यांच्या आरामाइतकेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेलेले असते ते चारचाकीमध्ये बसणारर्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला. काही वर्षांपूर्वीपर्यंत मर्सिडिज कंपनीने आपल्या गाड्या या सर्वात सुरक्षित आहेत हे बिरुद मिरवले. पण ब्रिटिश राजघराण्याची सून डायना आणि पतंगराव कदमांचा पुत्र अभिजीत कदम यांच्या अपघाती मृत्यूने हा दावा खोटा ठरवला. मर्सिडिजमधून प्रवास करणार्या या दोघांचाही अपघाती मृत्यू झाला. आज हेच बिरुद व्होल्वोच्या गाड्या मिरवत आहेत. आता या गाड्या सुरक्षित म्हणजे नक्की काय असतं? ढोबळमानानं सांगायचं झालं तर काही विशिष्ट प्रकारच्या अपघातांमध्ये, गाडीत बसलेल्या प्रवाशांना कमीत कमी इजा होउन त्यांचा शक्यतो मृत्यू होणार नाही अशा प्रकारच्या उपाययोजना असलेल्या गाड्या. या उपाययोजना नक्की काय असतात, याचा आपण थोडक्यात मागोवा घेऊ. त्याच सोबत कशा प्रकारच्या अपघातचाचण्या घेतल्या जातात याचासुद्धा थोडक्यात आढावा पाहू.
क्रॅश टेस्ट (धडक चाचणी)
अनेक जीवघेणे अपघात हे गाड्या एकमेकांवर अथवा एखाद्या स्थिर साच्याला धडकल्याने होतात. गाड्या जेव्हा धडकतात तेव्हा त्यांच्या गतिज ऊर्जेचे स्थितिज ऊर्जेत रुपांतर होत असते. तसेच गाडीचे स्वतःचे जडत्वसुद्धा असते. ऊर्जेमधले हे बदल होत असताना, ही ऊर्जा शोषली जाणे आवश्यक असते. आत बसलेले प्रवासी नकळत ते काम करतात. मानवी शरीर हा ऊर्जाबदल सहन न करु शकल्याने इजा होणे स्वाभाविक आहे आणि प्रसंगी प्राण जाणेसुद्धा.
गाड्या धडकताना हे काम गाडीच्या भागांनी करणे अपेक्षित आहे. असे असूनही एखाद्या परिस्थितीत गाडीचे भाग तसेच आत बसलेले प्रवासी यांच्यावर त्या परिस्थितीचा काय परिणाम होतो? हे अभ्यासण्यासाठी गाडीच्या धडक चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमध्ये माणसांऐवजी फक्त ठराविक प्रकारच्या बाहुल्या बसवल्या जातात. या बाहुल्यांना अनेक संवेदक (सेन्सर्स) बसवलेले असतात. धडक झाल्यावर झालेल्या परिणामांचा खोलवर अभ्यास केला जातो आणि गरजेनुसार गाडीच्या मुळ साच्यात अथवा सुरक्षा उपकरणांमध्ये बदल केले जातात. या धडक चाचण्या कशा असतात त्याची झलक वोल्वो कंपनीच्या वाहन चाचणी विभागाच्या चलचित्रात पाहता येईल.
चलचित्र न दिसल्यास येथे पहा : वोल्वो चाचणी केंद्र
वेगवेगळ्या चाचण्या
वाहनांचा अपघात नक्की कसा होऊ शकतो ते सांगणे एक अवघड काम आहे. पण पूर्वी झालेले अपघात आणि अपघातासंबंधी अनेक शक्यतांचा विचार करुन गाड्यांच्या वेगवेगळ्या धडक चाचण्या केल्या जातात. त्यातल्या काही चाचण्यांची यादी खालील प्रमाणे आहे. प्रत्येक प्रकारची चाचणी हा अभ्यासाचा मोठा विषय आहे.
- स्थिर साच्याला समोरुन धडक
- खांबाला बाजूने धडक
- दोन गाड्यांची काटकोनात / काही अंशांच्या कोनात धडक
- पादचार्याला धडक
या चाचण्यासंबंधी सविस्तर माहिती या संकेतस्थळावर मिळेल.
सुरक्षा उपाय/उपकरणे
गाडीची धडक झाल्यावर गाडीच्या गतिसापेक्ष स्थिर असणार्या मानवी साच्याला अस्थिरता येणे आणि त्यामुळे इजा होणे स्वाभाविक आहे. त्याची तीव्रता कमी करण्यासाठी चारचाकीमध्ये अनेक उपाय केले जात त्यातले काही खालील प्रमणे आहेत.
गाडीच्या सांगाड्यात/दाराच्या सांगाड्यात
गाडीला होणारी धडक मुख्यकरुन समोरुन भरधाव वाहन आल्यामुळे, अचानक गती कमी केल्यास मागच्या बाजूने भरधाव येणार्या वाहनाची धडक बसल्याने अथवा, काटकोनात धडक झाल्यास दरवाजांच्या बाजूंने होण्याची शक्यता जास्त असते. या शक्यता गृहीत धरुन गाडीच्या साच्यात/दरवाज्याच्या अंतर्गत रचनेत अनेक उपाय केले जातात; जेणेकरुन धडक झाल्यास धक्का या सांगाड्यांमध्ये जास्तीत जास्त शोषला जावा आणि आत बसलेल्या प्रवाशाला त्याची कमीत कमी तीव्रता जाणवावी.
गाडीची बैठक

गाडीची बैठक
गाडीची बैठक म्हणजेच सीट हा प्रवाश्याच्या सुरक्षेची काळजी घेणारा एक मोठा भाग आहे. धडक झाल्यास प्रवासी बैठकीत घट्ट बसलेला असावा; तसेच बैठकीचा साचा/सांगाडा कमीत कमी प्रभावाखाली यावा यासाठी बैठकीची रचना केलेली असते. याच बैठकीत सुरक्षा पट्टा आणि काही गाड्यांमध्ये एअर बॅग अशी रचनासुद्धा असते. गाडीच्याच बैठकीला असेलेले शिररक्षक (हेड रेस्ट) हा देखील एक सुरक्षेचा आणि बैठकीचा महत्त्वाचा भाग. गाडीच्या धडक चाचण्या होत असताना समोरुन धडक झाल्यास आणि मागच्या बाजूने धडक झाल्यास पुढे बसलेल्या तसेच मागे बसलेल्या प्रवाश्यांना कितपत इजा होऊ शकते, याचाही अभ्यास केला जातो. मागे बसलेल्या प्रवाशांना त्यांच्या मागे ठेवलेल्या सामानामुळे काही धोका असल्यास त्याचीसुद्धा चाचणी केली जाते.
हेडरेस्ट
हेडरेस्ट
अनेकदा गाडीच्या हेडरेस्टचा वापर प्रामुख्याने झोपताना डोके टेकण्यासाठी असतो असे आपण समजतो. पण काही गाड्यांचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की पुढच्या बैठकांना चांगले हेडरेस्ट आहे आणि त्याची उंची बदलता येते पण मागच्या बाजूला फक्त मानेला आधार देण्या पुरतेच आहेत. अशा गाड्यांमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांची सुरक्षा पुढच्यांपेक्षा कमी आहे, हे नक्की. असे का? मुळात हेडरेस्टचा मुख्य हेतू झोपण्यासाठी डोक्याला आधार हा नसून, धडक झाल्यास तुमच्या डोक्याला आधार असावा हा आहे. तुमचे धड बैठकीला पट्ट्याने बांधलेले असेल पण शिराला म्हणावा तेवढा आधार नसतो. तसेच मेंदू आणि हृदय यांना जोडणार्या वाहिन्या नेणारा आपला गळा/मान हा नाजूक भाग विनाआधाराचाच राहतो. त्यामुळे डोके/शिर स्थिर राहिल्यास मानेला बसणारा झटका हा कमी तीव्रतेचा असेल आणि त्याने होणारी इजा कमी होईल, हा मुख्य हेतू हेडरेस्टमागे आहे. त्यामुळे यापुढे हेडरेस्ट आपल्या उंची प्रमाणे वापरा. काही गाड्यांमध्ये धडक होताच आपल्या शिरासोबत हलणारे हेडरेस्ट सुद्धा असतात.

सीट बेल्ट
सीट बेल्ट
वाहन व्यवसायामध्ये येणार्या अनेक तंत्रांमध्ये विमान व्यवसायातील तंत्रांचा मुख्य पाया असतो. वाहनांमध्ये असलेला सुरक्षा पट्टा (सीट बेल्ट) हे त्यातलेच एक उदाहरण. सीट बेल्ट बनवण्यासाठी वापरले जाणारे कापड/धागा हा एका विशिष्ट प्रकाराचा असतो. यामुळे प्रवाशाला इजा होता कामा नये; सामान्य परिस्थितीमध्ये हालचाल करता यावी; त्याचसोबत अचानक हालचाल झाल्यास तो आपोआपच बंदिस्त व्हावा आणि बैठकीत बसलेल्या प्रवाशाची हालचाल कमीत कमी व्हावी हे सीटबेल्टचे मुख्य हेतू आहेत. आपण सीटबेल्ट अलगद ओढल्यास बराच ओढला जातो पण अचानक ओढल्यास ओढला जात नाही हे आपल्याला अनुभवता येईलच. प्रवाशांनी सीटबेल्ट न लावल्यास सूचना देणार्या गाड्या आहेत. बहुतेक सर्व देशांमध्ये आता सीटबेल्ट वापरणे अनिवार्य केले आहे.
एअरबॅग्ज
सुरक्षा उपायांमध्ये सर्वात महाग असेलेला हा प्रकार - एअरबॅग्ज - वाहन व्यवसायामध्ये १९८० नंतर आला. वाहनाची धडक होताक्षणीच संवेदकाच्या (सेन्सरच्या) उपयोगाने कळ दाबली जाऊन नायट्रोजन गॅसची निर्मिती होते व तो एका पातळ नायलॉनच्या पिशवीत भरला जातो. ही बॅग प्रवाशासमोर आणि बाजूला असल्यास प्रवासी अलगदपणे त्यावर झेलला जातो आणि त्याच्या शरीराला होणार्या काचेच्या/धातुच्या इजा शक्य तेवढ्या प्रमाणात कमी केल्या जाऊ शकतात. सर्वात सुरक्षित गाड्यांमध्ये या एअरबॅग्ज सुकाणूमध्ये (स्टिअरिंग), डॅशबोर्डमध्ये, गाडीच्या सीटमध्ये, खिडक्यांच्या जवळ, दाराजवळच्या सांगाड्यात अशा अनेक ठिकाणी असतात. जेणे करुन प्रवासी आणि गाडी यांच्यामध्ये एक हवेने भरलेला अडथळा तयार होतो.

एअरबॅग्ज

एअरबॅग्ज
आढावा
वर लिहिल्याप्रमाणे हे आणि असे काही उपाय आहेत ज्यांमुळे जीवघेणे अपघात झाल्यास त्यांची तीव्रता कमी करता येऊ शकते. पण त्यांना एक सीमा आहे. त्या सीमा ओलांडल्यास आपल्याला देवसुद्धा वाचवू शकत नाही. वाहन चालवताना आपण खाली लिहिल्या प्रमाणे काळजी घेतल्यास आपल्याला अपघात टाळता येऊ शकतात. टाळता नाही आले तरी तीव्रता कमी करता येऊ शकते.
- सर्वप्रथम म्हणजे महामार्गांवर लिहिलेल्या वेगमर्यादांचे पालन करावे आणि आपल्या कुवतीनुसारच गाडीच्या शक्तीचा वापर करावा. (येथे कुवत म्हणजे गाडी नियंत्रित करण्याची क्षमता अपेक्षित आहे.)
- गाडीच्या डॅशबोर्डवर शक्यतो कोणत्याही सुट्या वस्तू ठेऊ नये. अनियंत्रित वेगामुळे होणार्या अपघातप्रसंगी या वस्तू त्यांच्या जडत्वामुळे बंदुकीच्या गोळी इतपत हानीकारक ठरु शकतात. अशा सुट्या गोष्टी फारतर आपण डॅशबोर्डला असलेल्या कप्प्यात ठेवू शकता.
- गाडीमध्ये बसताच सीट बेल्ट न विसरता लावावा. सवय नसल्यास सुरुवातीला बांधल्यासारखे होईल, पण अंतिमतः तेच आपल्याला वाचवण्याचे कार्य करणार आहे.
- सीटच्या हेडरेस्टची उंची आपल्या डोक्याच्या उंचीच्या गरजेनुसार कमीजास्त करुन घ्यावी.
- गाडीचे सर्व टायर (जादा चाकासह) योग्य स्थितीमध्ये आहेत आणि त्यात योग्य दाबाची हवा आहे याची वेळोवेळी तपासणी करावी.
चला तर मग, चारचाकी चालवताना या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपण आपला आणि सहप्रवाशांचा प्रवास आणखीन सुरक्षित बनवूया.
निवेदनः हा लेख हा एक सर्वसाधारण माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. प्रत्येक मुद्दा हा एक मोठ्या अभ्यासाचा मुद्दा आहे आणि त्यावर गाढा अभ्यास केला जाऊ शकतो. लेख लिहिताना माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा विचार केला आहे. अधिक माहितीसाठी महाजालावर शोध घेता येऊ शकतो.
चित्रसौजन्यः http://auto.howstuffworks.com
लेखक वाहन उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत, वाहन तंत्रज्ञाना बद्दल विशेष आवड!!
शिक्षण : मेकॅनिकल इंजिनीअर
कार्यक्षेत्र - उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन, वाहन उद्योग संशोधन

Comments
चांगली माहिती
चांगली माहिती वाचायला मिळाली.
माहितीपूर्ण लेख, चित्रांमुळे आकर्षक
लेख माहितीपूर्ण आहेच. चित्रांमुळे आकर्षक झाला आहे. (एअरबॅगचे तंत्र कळण्यात चित्राची मद्त झाली.)
धनंजय
(उपक्रम संकेतस्थळावर हेच सदस्यनाम)
उत्तम लेख.
उपयुक्त आणि माहितीयुक्त लेख. नुकताच एका अपघाताला तोंड दिलेले असल्याने या उपयुक्त साधनांची प्रचिती आलेली आहे. चारचाकी वाहनांमध्ये हजार्ड वार्निंग नावाचा एक प्रकार पाहिला. त्याचीही माहिती मिळाल्यास आवडेल.