संकीर्ण
आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
राजेंद्र

शेतीचा शोध ८-१० हजार वर्षांपूर्वीच्या निओलिथिक मानवाने लावला असे म्हटले जाते. दुर्दैवाने ते खरे नाही. शेतीचा शोध पाच कोटी वर्षांपूर्वीच लागला होता. आणि हा शोध लावला मुग्यांनी! अमेरिकेत आढळणार्या लीफकटर जातीच्या मुंग्या आपल्या उदरनिर्वाहासाठी बुरशीची शेती करतात. यासाठी या मुंग्या झाडांची पाने तोडून ती आपल्या जमिनीखालच्या शेतांमध्ये नेतात आणि त्यावर बुरशी वाढवतात. आपल्या शेतात जसे तण शेतीला अपायकारक ठरते त्याचप्रमाणे या बुरशीची वाढ होत असताना इतर जातींच्या बुरशींची वाढ हानिकारक ठरते. याला प्रतिबंध म्हणून या मुंग्या एका विशिष्ट प्रकारच्या जंतूंची पैदास करातात. या जंतूंनी बनवलेले प्रतिजैविक तण रोखण्यास मदत करते. शेतीमधून निर्माण होणारा कचरा सफाई कामगार मुंग्या एका ठिकाणी गोळा
करतात आणि त्याचे विघटन होण्यासाठी कचरा नियमितपणे वरखाली करत राहतात. या मुंग्या आणि त्यांनी वाढवलेली बुरशी यांच्यात सिम्बायोटीक नाते असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे.
पुढच्या वेळी एखाद्या मुंगीला पहाल तेव्हा ती काही बाबतीत आपल्यापेक्षा प्रगत असू शकेल याची जाणीव ठेवा!
संदर्भ : http://en.wikipedia.org/wiki/Leafcutter_ant
उखाणे व नवऱ्यामुलींच्या महत्वाकांक्षा
प्रभाकर नानावटी
निरनिराळ्या कालखंडातील वधूंचे निवडक उखाणे पुढे दिले आहेत. त्यावरून तत्कालीन वधूंच्या महत्वाकांक्षा प्रतीत होतात:
1600 - खंडोबाच्या देवळाला बसवलं चंदनाच दार,
महिपतरावाला बादशहानं नेमलं पेडगावचे कमाविसदार.
पुळ्याच्या गणपतीपुढं माजलं केवड्याचं रान,
गोमाजीपंताना दरबारात मिळालं मानाच पान.
1750 - पेशव्यांच्या शिकारखान्यात नेपाळचा आणला गेंडा,
शिरपतरावांनी अटकेपार नेला श्रीमंतांचा झेंडा.
सवाकोस पसरला अंगरख्याचा घोळ,
रामजीपंतांच अक्षर जशी मोत्याची ओळ.
तालमीच्या नादानं कपडे झाले मळके,
धनाजीरावांच्या हातात नंगी तलवार झळके.
1800 - गणेशाच्या स्मरणानं सगळी विघ्नं पळती,
गोविंदपंतांच प्रेम पाहून सवती मनात जळती.
श्रीमंतांच्या दरबारचं आमंत्रण आलं खास,
भवानरावांना जिल्बीचा देते गोडसा घास.
1850 - चंदनाचे पाट त्यांना सोन्याची चूक,
गोपाळरावांच्या हातात इंग्रजी चवथीच बूक.
सरकारच्या कृपेनी प्याद्याचा झाला फर्जी,
मारुतीरावांच्या वर बसली कलेक्टरसाहेबांची मर्जी.
1930 - सासरच्या माणसांच्या दारात फणस निघाला बरका,
मधुकरांच्या हातात सदैव फिरे चरका.
देशाचे पुढारी लागले स्वराज्याच्या नादी,
शांतारामराव सूट द्या टाकून नि वापरा खादी.
1950 - मधुकर! अरे मधू! ए मेल्या मध्या! केव्हाची वाट पहात आहे,
अजून नाही का कपडे चढवणं झालं?
-चिं वि जोशी, चिमणरावांचे चऱ्हाट
1961 - पानशेतचे धरण फुटून आला पूर,
अनंतरावांच्या स्कूटरवरून आम्ही जातो भुरभुर.
1975 - कपडे धुण्याला साबूपेक्षा पडतो चुरा बरा,
सदाशिवराव गेले तुरुंगात म्हणून आणीबाणीचे वाजले तीन तेरा.
2000 - हळदी-कुंकवाची जागा हल्ली टिकलीने घेतली,
माझ्याच हुशारीने सुरेशची नोकरी झक टिकली.
वाभाडे पुणेकर, अफलातून पण Not फालतू
सुज्ञ वाचकांच्या सर्जनशीलतेला आव्हान:
जरी आजकाल नवरी ही अल्लड, अजाण, पौगंडावस्थेतील अशी काही राहिली नसली तरी भोवतालची सामाजिक स्थिती व त्यानुसार महत्वाकांक्षा बदलत आहेत. त्यामुळे उखाण्यांच्या रचनेतही विविधता आली असेल. नवीन उखाणे कसे असतील हे एकदा वाचकांना कळू दे तरी!