ऊर्जा, प्रदूषण वगैरे...
विकास

आपण बर्याचदा ऊर्जा बचत म्हणले की घरातील उपकरणे आणि एकंदरीत वापर यावर भर देतो. पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या केल्याने आपण सहजतेने ऊर्जा बचतीस मदत करू शकतो... जे ऊर्जेच्याबाबत तेच प्रदुषण टाळण्यासाठी आणि निसर्गसाधन संपत्ती वाचवण्यासंदर्भातः
1. अॅल्युमिनमचा पुनरुत्पादनाने (रीसायक्लींग) नवीन अॅल्युमिनम पासून तयार करण्यात येणार्या मालापेक्षा ९५% कमी ऊर्जा उत्पादनास लागते. तितक्याच प्रमाणात प्रदूषणही वाचते.
2. गणितच करायचे झाले, तर एक अॅल्युमिनम कॅनचे पुनरुत्पादन हे दूरचित्रवाणी तीन तास चालू शकेल इतकी ऊर्जा वाचवतो!
3. एका पाउंडाच्या अॅल्युमिनम पुनरुत्पादनाने चार पाउंड बॉक्साईट हे खनिज वाचते, पर्यायाने खाण आणि जमीन वाचते.
4. एक टन कार्बन पुनरुत्पादनाने हवेत जाणारा कार्बन जो पर्यावरण बदलास प्रमुख कारण आहे, तो २३ पाउंडाने कमी होतो.
5. अॅल्युमिनम प्रमाणे काचेच्या पुनरुत्पादनाने ५०% ऊर्जा ही नवीन उत्पादनात वाचू शकते.
6. काच पुनरुत्पादनाने २०% हवेचे आणि ५०% पाण्याचे प्रदूषण कमी होते.
7. एक टन काचेच्या उत्पादनात जर ५०% पुनरुत्पादीत काच वापरली तर खाणीतून निर्माण होणारा कचरा २५० पाउंडाने कमी होतो.
8. कागदाच्या पुनरुत्पादनाने ६०% ऊर्जा वाचते, ९५% हवेचे प्रदूषण कमी होते.
9. जर संपूर्ण अमेरिकेतील कचेर्यांनी केवळ दोन्हीबाजूने कागद छापण्यासाठी वापरायचे ठरवले आणि ते जर १९९१ च्या २०% वरून ६०% वर आले तर सुमारे दीड कोटी झाडे वाचू शकतील.
10. अजून एक अमेरिकेतील गणित: बंद असताना देखील टिव्ही, व्हिडीओ, डिव्हीडी/सीडी प्लेयर्स, मोबाईल फोन्स वगैरे, घड्याळ चालू ठेवायला, रिमोट कंट्रोलशी संवाद ठेवायला अथवा माहीती जागृत ठेवण्यासाठी मेमरी चीप चालू ठेवायला, ऊर्जा वापरतच रहातात. संपूर्ण देशाचा विचार केल्यास अंदाजे ५% ऊर्जा अथवा $८ बिलीयन वर्षाला खर्च होत असतात!
11. काँपॅक्ट फ्ल्युरोसंट लाईट्स नेहमीच्या दिव्यांपेक्षा दोन त्रितीयांश कमी वीज वापरतात आणि दहापटीने जास्त टिकतात.
12. जर तुमची ऊर्जा कोळशामधून येत असेल आणि तुम्ही फ्ल्युरोसंट लाईट्स वापरले तर तुमच्या नकळत तुम्ही १३०० पाउंड कार्बन आणि २० पाउंड सल्फर डाय ऑक्साईडचे उत्सर्जन वाचवत असता.
(संदर्भः earth911, EPA, Worldwatch Institute, The Alliance to Save Energy)
सुविचार
जगाची खरी समस्या अशी आहे की जगातील मूर्ख आणि धर्मवेडे दुराग्रही यांना आपली मते चूक असूच शकत नाहीत याविषयी प्रचंड आत्मविश्वास असतो तर बुद्धीवंताना आपली मते कदाचित चुकीचीही असू शकतील असे वाटत असते.
..............................................................................
गणित आणि विज्ञान यांच्या संदर्भात शंभर तज्ज्ञांची अधिकारवाणी ही एका व्यक्तीच्या युक्तिवादापुढे निष्प्रभ ठरू शकते.
..............................................................................
आपल्याशी संभाषण करणार्यांची चेष्टा करून त्यांना हास्यास्पद बनविण्याची कला कांही वाक्पटूंना अवगत असते. पण हे क्षुद्रबुद्धीचे आणि अनुदार वृत्तीचे लक्षण आहे.अशा प्रकारची मनोवृत्ती असणार्या माणसांची बौद्धिक प्रगती हो्ऊ शकत नाही.
..............................................................................
दुसर्यांनी दाखवून दिल्यावर आपले दोष मान्य करणे हे विनयाचे लक्षण आहे. आपले दोष स्वत:च जाणणे हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. पण आपले दोष स्वत: जगजाहीर करणे हे अहंकाराचे लक्षण आहे.
..............................................................................
मी भारतात जन्माला आलो.
भारत हा जगातील सर्वांत महान देश आहे असे मला वाटते.
माझा जन्म जर दुसर्या देशात झाला असता तर तोच देश सर्वांत महान असे मला वाटले असते. भारताला महान मानले नसते.
यावरून भारत सर्वात महान देश आहे याचे एकमेव कारण मी भारतात जन्मलो हे आहे.
म्हणजे माझा हा दुरभिमान आहे.
वरील युक्तिवादात मला कोणतीही चूक दिसत नाही.
जे देशाच्या विषयी तेच देवाविषयी. तेच धर्माविषयी.
जगातील सर्व माणसांच्या मनातून ही आत्मगौरवाची खुळे जोंवर जात नाहीत तोंवर जगात शांतता नांदणे शक्य नाही.
..............................................................................
प्रत्यक्षात असलेल्या या अफाट विश्वाचे वैज्ञांनिकांनी आजपर्यंत अगदी अल्प आणि तुटपुंजे ज्ञान मिळवले आहे. पण तेच आपले अमूल्य आणि सर्वाधिक विश्वासार्ह असे ज्ञानभांडार आहे.
..............................................................................
आपली चूक प्रांजळपणे कबूल न करणे ही त्या झालेल्या चुकीहून अधिक गंभीर चूक होय.
..............................................................................
चार ओळीत,साध्या सोप्या शब्दांत वाल्मीकीने रेखाटलेले शब्दचित्र. प्रत्येकाने यथाकल्पनाशक्ती त्यांत रंग भरावे.:
गायन्ति केचित् प्रहसन्ति केचित् ।
नृत्यन्ति केचित् प्रणमन्ति केचित् ।
पठन्ति केचित् प्रचरन्ति केचित् ।
प्लवन्ति केचित् प्रलपन्ति केचित् ।
(मारुती सीतेचा शोध लावून परतला.सीतेची सुटका करण्यासाठी लंकेवर स्वारी करायची असे राम आणि सुग्रीव यांनी ठरविले.आता आपल्याला लंकेत जायला मिळणार आणि राक्षसांशी युद्ध करायला मिळणार या कल्पनेने सर्व वानरांना अत्यानंद झाला.आणि:...)
काहीजण गाणी म्हणू लागले (गायन्ति).कित्येकजण मोठमोठ्याने हसतच सुटले.(प्रहसन्ति).कित्येक जण एकमेकांना सलाम ठोकू लागले.(प्रणमन्ति). काहीजण(मंत्र) पठण करू लागले.(हे बहुधा भित्रे असावे).कित्येकजण नुसते इकडून तिकडे हिंडू लागले.(प्रचरन्ति).कित्येकजण उड्या मारू लागले. (प्लवन्ति).तर काहीजण तोंडाला येतील ते प्रलाप(आता दाखवतोच. मारतोच एकेकाला.तुम्ही काही करू नका. मी एकटाच त्या रावणाला कसा झोडपतो ते नुसते पाहात राहा! असे काहीतरी)बडबडू लागले.(प्रलपन्ति).
..............................................................................
वेदांचा केवळ अभिमान बाळगायचा. त्याला अक्कल लागत नाही.पण वेद वाचून अभिमान बाळगणारे शोधून सापडणार नाहीत. सारे अभिमान आंधळे. भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता असे असे कोणीतरी म्हणायचे आणि इतरांनी तो आपण पाहिला आहे असे समजून वागायचे.
..............................................................................
आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणांसारखे.ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही.आत्मपरीक्षण नाही.कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फ़ंदात पडायचे नाही.सारा हवाला देवावर नाहीतर दैवावर.
शेवटचे दोन विचार "एक शून्य मी"(ले० पु.ल.देशपांडे) या पुस्तकांतील आहेत.
