छायाचित्र - कॅमेराचा डोळा, भारीच भोळा

धनंजय वैद्य

छायाचित्रण आणि प्रकाशचित्रणाच्या बाबतीत दोन समजुती बिगर-चित्रकार लोकांत दिसतात : (१) कॅमेरा पारदर्शक भिंगातून यथातथ्य चित्रफितीवर उमटवतो, शब्द मात्र फसवे असतात, म्हणून कॅमेरा या सत्यवक्ता वार्ताहार आहे. (२) प्रकाशचित्रणातली कलात्मकता ही चित्र जसेच्या तसे प्रेक्षकाला दाखवण्यात आहे.

कॅमेरा वाटतो तितका तटस्थ नाही, कारण तो फक्त चित्रकार सांगेल त्या दिशेतलेच, तेही मर्यादित दृश्य टिपतो. शिवाय त्या मर्यादित दृष्टिक्षेपात ज्या काही वस्तू दिसतात, त्या सर्व एकमेकांशी संबंधित आहेत असा गर्भित विचार अनायासे प्रेक्षक मनात रचतो.

मोठे चित्र पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

 

विजापुर येथील गोल घुमटाची वरील दोन चित्रे मी एकाच दिवशी घेतली आहेत. कॅमेरा स्वयंचलित ठेवला आहे. अग्रभूमी वेगवेगळी आहे, हा मोठा फरक. एकात मुख्य दर्शनी भाग, तर कोपर्‍यात झाडलेली पाने जाळत होते, ती दुसर्‍यात अग्रभूमी आहे. सुरुवातीला वाटणार नाही दोन्ही चित्रांमध्ये अनेक रचनासाम्ये आहेत. घुमट साधारण मध्यभागी आहे, आणि घुमटाचे आकारमान दोन्ही चित्रांत जवळजवळ सारखे आहे. दोन्ही चित्रांत खालचा तृतीयांश वेगळा करणारी स्पष्ट आडवी रेषा आहे. एकीकडे गवत, तर दुसरीकडे कुंपण. दोन्ही चित्रांत घुमटाला कमानदार चौकट आहे. एकीकडे दगडी चौकट तर दुसरीकडे कोळपलेल्या झाडीची चौकट.

तीच साम्ये मात्र पार वेगळ्या भावनांकडे प्रेक्षकाला खेचतात. पहिले चित्र एखाद्या दुय्यम पर्यटन-पुस्तिकेत खपून जाईल. दुसरे चित्र एखाद्या संपादकीयाच्या खाली सापडू शकेल. पण संपादकीयाचे शीर्षक कुठल्याही टोकाचे असू शकेल - "इस्लाम खतर्‍यात", किंवा "खतरा इस्लामात"!

सारांश : (१) कॅमेराचा पारदर्शकपणा म्हणजे मृगजळ आहे. लबाड शब्द "चक्षुर्वै" बघितल्याची खोटी अनुभूती देत नाहीत म्हणून कॅमेर्‍याचा भोळा डोळा अधिक गंडवू शकतो. (२) प्रकाशचित्रणातली कलात्मकता ही चित्रकाराच्या मनातील भावना प्रेक्षकामध्ये प्रेरित करण्यात आहेत, यथातथ्य दाखवण्यात नव्हेत.

Comments

रोचक शीर्षक

आणि पटण्यासारखे.
(कॅमेर्‍याच्या) डोळ्याने दिसते तेच खरे असते असे नाही.